प्रेम, रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा प्रचंड मोठा अपव्यय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा ह्युज वेस्टेज?! — रोज सकाळ संध्याकाळ हा प्रश्न हमखास पडतो.

सकाळ संध्याकाळ ऑफिसला जाताना स्टेशन ओलांडावं लागतं. कोपऱ्या कोपऱ्यात जोडपे (आणि बहुतेकवेळा कोपरा वगैरेची गरज नं भासणारे, भर रस्त्यातच) दिसतात. एरवी बहुतेक सर्वच कोलेजकुमार असतात. संध्याकाळी पस्तिशी पुढची कपल्स पण दिसतात. जागेचं भान बिन सोडा. त्या अपेक्षाच राहिल्या नाहीत आताशा. पण ह्यातले फार कमी जोडपे हसतखेळत बोलत असतात.

 

Jab We Met inmarathi

 

दोघांपैकी एक हमखास रागावलेला असतो…दुसरा गडी मनधरणी करत असतो किंवा हताशपणे बसलेला असतो. दोघांच्या चेहऱ्यावर, देहबोलीतून प्रचंड ताण, फ्रस्ट्रेशन दिसत असतं. दिवसाची सुरूवात, ही अशी? थकून-भागून, कॉलेज-नोकरी करून शेवटी हे असं सहन करत बसायचं?

इंजिनिअरिंगमध्ये बरेच जवळचे मित्र ह्यातून गेलेले बघितलेत. तेव्हा भयंकर हसू यायचं सुरुवातीला. फुटकळ विषयांवर रात्र रात्र घालवायचे. (एअरटेल ने हे रात्रीची ब्याद आणली लोकांवर. १० पैसे पर मिनिट. फ्रेंड्स कार्ड्स. अनेक मुलांचे तळतळाट लागले म्हणून आज जिओ येऊन बसलाय उरावर. पण तो ही पुढचं पाऊल गाठत – १० पैसे तरी कशाला? फुकटच बोंबलत बसा! असो. तर – ) हे मित्र रात्रभर गप्पा मारायचे. फार कमीवेळा सुखद वार्ता असत, बहुतेकवेळा भांडणं कटकटीच. हास्यास्पद विषयांवर.

 

fighting couple inmarathi
bollywoodshaadis.com

 

माझ्या सख्ख्या मित्राचं एक दिवस भांडण झालं – कशावरून? तर – नीट समजून घ्या – तिला म्हणे आदल्या रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात ही बया रुसली होती आणि ह्याने म्हणे तिचा रुसवा काढला नाही. कधी – आदल्यादिवशी, स्वप्नात. म्हणून ही आज प्रत्यक्ष जीवनात त्याच्याशी भांडत होती.

मला दुसऱ्यादिवशी हे कळाल्यावर मी काही मिनिटं धक्क्यातून सावरू शकलो नाही. अर्थात, नेहेमी मुलीच असा राडा घालतात असं अजिबात नाही. दोघांपैकी एक कुणीतरी चक्रम असतो. बास.

पण ह्यात कित्येक दिवस-महिने अक्षरशः वाया जातात हे कुणाच्याच कसं लक्षात येत नाही? हे सगळं कशासाठी? व्हॉट्स दि पॉईंट? विचारावं वाटतं सर्वांना. पण मला १०१% खात्री आहे – कुणालाच उत्तर देता येणार नाही.

प्रेम एकमेकांना ऊर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन देणारं असावं. दुसऱ्याला मागे ओढणारं, त्याची ऊर्जा शोषून घेणारं, खचवणारं नसावं. टीनएज मध्ये हे भान लवकर येत नाही बहुतेक. पण यायला पाहिजे. कुणीतरी हे सांगायला पाहिजे प्रत्येक टीनएज जनरेशनला.

की बाबानो हळवी नाती तयार होत असतील तर होऊ देत – आमच्या “नको” म्हणण्याने तुम्ही ऐकणार नाही आहात – पण किमान त्यातून तुम्हाला नेमकं काय मिळतंय ह्याची गोळा बेरीज करत जा अधूनमधून.

हाती छान काहीतरी गवसत असेल तर खुशाल चालू देत. एकमेकांना न्या पुढे जीवनात!

आधार द्या, ऊर्जा द्या…अवघड प्रसंगी सपोर्ट द्या…एकमेकांच्या यशाची कारणं व्हा!

एकंदरीत – एकमेकांच्या जीवनात मोठी value addition करा…आनंदाचं कारण बना…

 

 

पण…स्वतःच दुसऱ्यासाठी अवघड प्रसंग उभे करत बसू नका. दुसरा तसं करत असेल तर वेळीच सावध व्हा, जागे व्हा…मोकळे व्हा.

विनाकारण ड्रॅग करत बसण्यात काहीच अर्थ नाही. दोघांचेही अमूल्य दिवस…सळसळती ऊर्जा अश्या फुटकळ कारणासाठी वाया जाता कामा नये.

एकमेकांचे रुसवे फुगवे काढणं, जस्टिफिकेशन्स देत बसणं – एवढंच एक काम आहे काय जीवनात? दुसऱ्या गोष्टी नाहीत का करायला?

मला यशराज, धर्म प्रोडक्शन्स आणि तत्सम चित्रपट निर्माते ह्याचमुळे आवडत नाहीत. कुणीतरी प्रियकर-प्रेयसी मिळवणे आणि त्यांना at any cost “टिकवणे” हे जीवनाचं एकुलतं एक ध्येय असल्यासारखे नायक-नायिका दाखवतात. अश्याने त्या वयात फारच चुकीच्या प्रायोरिटीज तयार होतात.

 

shahrukh-kajol-gerua-inmarathi

 

आमच्या टीव्ही सिरियल्ससुद्धा तसल्याच. पोटा-पाण्याचा, शिक्षण-व्यवसायाचा स्ट्रगल कुठेच दाखवला जात नाही. अधोरेखित होत नाही, त्यातील मार्ग सुचवले जात नाहीत. फक्त नात्यांचा गुंता, त्यातलं संपूर्णपणे काळं किंवा पांढरं असणाऱ्या पात्रांचं यंत्र…बास हेच अव्याहत सुरु आहे…चुकीची मानसिकता घडवत.

अर्थात, हे ओघाने आलं म्हणून. चित्रपट, टीव्ही ही काही “संस्कार” घडवण्याची केंद्रं नव्हे, त्यांच्याकडून अपेक्षा नाहीच. पण ते समस्येचा मोठा भाग आहेत ही जाणीव मात्र पाहिजेच.

म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक पिढीला, जुन्या अनुभवी पिढीने हे नात्यांची गोळाबेरीज करण्याबद्दल पुन्हापुन्हा आवर्जून सांगायला हवं.

नको ते ताण घेत जगण्याने व्यावहारिक जीवनातील यश-अपयशावर मोठा परिणाम घडतो. ते परिणाम आपल्या बाजूने असावेत ह्यासाठी हे “प्रेम” नावाचं ओझं पेलवतंय तो पर्यंत पेलावं, अन्यथा खांदे हलके करावेत.

Love, romance – at what cost ?! हा प्रश्न फार महत्वाचा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 203 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?