नेताजी सुभाषचंद्रांसाठी चक्क इंग्रजांची हेरगिरी करणाऱ्या “महिला डिटेक्टीव्ह”ची अज्ञात कथा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अथक परिश्रम करून आणि अनेक संकटांना तोंड देऊन स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे होऊन गेली. मात्र आज स्वातंत्र्यलढ्यात प्रयत्नांची शर्थ केलेल्या आणि आपल्या बलिदानाने देशाला जीवनदान मिळवून दिलेल्या अनेक स्वातंत्र्यसेनानींचा आपल्याला विसर पडत चालला आहे. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी, इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी छेडलेल्या या आंदोलनातील अशा कित्येक नायक, नायिका आहेत ज्यांचे स्वातंत्रलढ्यातील योगदान इतिहासकारांनी आणि लेखकांनी नजरेआड केले आहे.

सरस्वती राजामणी ही अशीच एक स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित राहिलेली नायिका.

अशी एक नायिका जिचं आयुष्य कायमच संकटांनी आणि कटकारस्थानांनी भरलेलं होतं. पण तिने आपल्या भारतभूला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

ही महिला भारताची सर्वांत कमी वय असलेली गुप्तहेर होती. सरस्वती राजामणी त्यांचं नाव. त्यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) च्या गुप्तचर यंत्रणेला इंग्रजांची गुप्त माहिती पुरवण्याचे कार्य केले.

 

rajamani.inmarathi
yourstory.com

राजामणी यांचा जन्म इसवीसन १९२७ मध्ये बर्मा येथे एका स्वातंत्र्यसेनानीच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील तामिळनाडू मधील तिरुचीलापल्ली म्हणजेच त्रिचीत नावाजलेले होते आणि भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे समर्थक होते. स्वतंत्रता आंदोलनाचे समर्थन करण्याबद्दल स्वतःला अटक होण्यापासून वाचविण्यासाठी ते परिवारासमवेत बर्मा येथे राहण्यास गेले.


राजामणी यांचा परिवार एक उदारतावादी परिवार होता जिथे मुलींना फार बंधनात जखडलेलं नसे. अशा परिवारातील, देशप्रेमाची भावना ठासून भरलेली राजामणी दहा वर्षांची सुद्धा नसेल जेव्हा ती आपल्या आलिशान घराकडे जात असताना रंगूनमध्ये (बर्माची आजची राजधानी) महात्मा गांधींना भेटली.

राजामणी यांचा पूर्ण परिवार गांधीजींना भेटण्यासाठी एकत्र झाला होता. महात्मा गांधी हे तोवर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते बनले होते. जेव्हा संपूर्ण परिवाराची गांधीजींशी ओळख करून दिली जात होती तेव्हा परिवारातील सदस्यांच्या हे लक्षात आलं की राजामणी तिथे नव्हती. त्यामुळे घाबरून जेव्हा गांधीजींसकट घरातील सगळे तिचा शोध घेऊ लागले तेव्हा ती बागेमध्ये बंदुकीने नेमबाजीचा सराव करताना दिसली. एक छोटी मुलगी बंदुकीने नेमबाजीचा सराव करताना पाहून गांधीजींना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला या बंदुकीची काय गरज आहे असे विचारले.

“इंग्रजांना संपवून टाकण्यासाठी” त्या लहानग्या मुलीने गांधीजींकडे न पाहता तडफदार उत्तर दिले. “हिंसा ही कधी कोणत्या गोष्टीचं उत्तर असू शकत नाही बाळा, आम्ही अहिंसेने इंग्रजांचा विरोध करत आहोत. तुलाही तसंच केलं पाहिजे.” गांधीजी म्हणाले.

“आपण चोर-लुटेरू यांनाही तर मारूनच टाकतो. मग जर इंग्रज आपल्या देशाची लूट करत आहेत तर त्यांना का सोडायचे? मी मोठी होईपर्यंत एका तरी इंग्रजाला माझ्या बंदुकीच्या गोळीने निश्चितच ठार मारेन, ” तिने निश्चयपूर्वक सांगितले.

जसजशी राजामणी मोठी झाली तिने सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या इंडियन नॅशनल आर्मीबद्दल ऐकले. ती स्वातंत्र्य चळवळीचे उघडउघड समर्थन करत असे पण सुभाषचंद्र बोस यांचे एक ओजस्वी भाषण ऐकून ती अत्यंत प्रभावित झाली. आणि तिने स्वातंत्र्यलढ्यात उतरण्याचे ठरवले.

 

saraswathi-story-inmarathi
yourstory.com

राजामणी केवळ १६ वर्षांची होती जेव्हा दुसरे जागतिक युद्ध भडकले होते. तेव्हा सुभाषचंद्र बोस आयएनएसाठी फंड गोळा करण्यासाठी आणि स्वयंसेवकांची भरती करण्यासाठी रंगूनला आले होते. सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजी आणि भारतीय नॅशनल कांग्रेससारखा अहिंसक मार्ग न निवडता लोकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हत्यार हातात घ्यायला सांगितले आणि सशस्त्र क्रांतीचा उद्घोष केला. बोस यांच्या भाषणाने प्रभावित होऊन राजामणीने आपले सर्व सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने आंदोलनासाठी आयएनएला समर्पित केले. तिचे हे असाधारण उदार कृत्य नेताजींच्या नजरेतून सुटले नाही.

त्यांनी तिच्याबद्दल अधिक चौकशी केली असता ती रंगूनमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील एक मुलगी असल्याचे त्यांना समजले. दुसऱ्याच दिवशी ते तिचे दागिने परत करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले.

राजामणीच्या वडिलांशी भेट झाल्यावर बोस यांनी त्यांना सांगितले की तिच्या बालमनाला वाटले म्हणून तिने सर्व दागिने आयएनएला समर्पित केले होते. म्हणून मी ते परत करायला आलो आहे. तिचे वडील एक स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी स्वतः सुद्धा बोस यांच्या चळवळीला योगदान दिले होते. बोस यांच्या बोलण्यावर ते केवळ हसले.

तेवढ्यात राजामणीने चिडून म्हटले, हे दागिने माझे आहेत. माझ्या वडिलांचे नाहीत आणि ते मी तुम्हाला दिले आहेत. ते मी परत घेणार नाही. एका किशोरवयीन मुलीचा एवढा दृढनिश्चय बघून सुभाषचंद्र बोस भारावून गेले. त्यांना तिचं कौतुक केल्याशिवाय राहवलं नाही.

त्यांनी राजामणींना सांगितले, लक्ष्मी येते आणि जाते मात्र सरस्वतीचं तसं नसतं. तुमच्याकडे सरस्वतीसारखी बुद्धिमत्ता आहे. त्यायामुळे मी आजपासून तुमचं नाव सरस्वती असं ठेवत आहे. अशाप्रकारे राजामणी आता सरस्वती राजामणी या नावाने ओळखली जाऊ लागली.

 

sarasvati-rajamani-inmarathi
thebetterindia.com

पण राजामणी इतक्यावरच थांबल्या नाहीत. १६ वर्षांच्या राजमणींनी त्याच भेटीत नेताजींना स्वतःला त्यांच्या आर्मीमध्ये सामील करून घेण्याची विनंती केली. त्यांच्या प्रस्तावातच इतका दृढनिश्चय होता की सुभाषचंद्र बोस त्यांना नाही म्हणू शकले नाहीत आणि दुसऱ्याच दिवशी राजामणी आणि त्यांचे चार सहकारी आयएनए च्या गुप्तचर विभागात गुप्तहेर म्हणून रुजू झाले. लवकरच या मुली, मुलांच्या वेशात ब्रिटिश मिलिट्री कॅम्प आणि इंग्रज ऑफिसर्सच्या घरातील संदेशवाहक म्हणून काम करू लागले.

इंग्रजांच्या गोटात संदेशवाहकांच्या रुपात असलेल्या या गुप्तहेरांचं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे ब्रिटिश सरकारचे आदेश आणि ब्रिटिश सेनेबद्दलच्या महत्त्वपूर्ण बातम्या आयएनए पर्यंत गुप्तपणे पोहोचवणे.

राजामणी आणि त्यांचे सहकारी मुलाच्या वेशात जवळजवळ दोन वर्षे गुप्तपणे माहिती गोळा करण्याचे काम करत राहिले. यांना असा सक्त आदेश होता की यांच्यापैकी कोणी शत्रूच्या तावडीत सापडू नये. पण यांच्यातली एक अखेर इंग्रज ऑफिसरच्या हाती पकडली गेली. राजामणी शत्रूच्या तावडीत सापडण्याचा अर्थ ओळखून होती. त्यामुळे तिने आपल्या सहकारी मुलीला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्याचा निश्चय केला.

त्या साहसी वीरांगनेने एका नर्तिकेचे रूप घेतले आणि जिथे तिच्या साथीदाराला कैदी बनवून ठेवण्यात आले होते त्या ऑफिसरला बेशुद्ध पाडून तिने आपल्या सहकाऱ्याला मुक्त केले. कैदेतून पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. त्यातलीच एक राजामणीच्या पायावर लागली. तरीही त्या आणि त्यांची सहकारी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. ते इंग्रजांनी त्यांना शोधायचे बंद करेपर्यंत जवळजवळ तीन दिवस एका झाडावर लपून बसले.

गोळी लागल्याने आणि वेळेवर उपचार घेता न आल्याने त्या एका पायाने अधू झाल्या होत्या. पण त्यांना याचा आयुष्यभर गर्वच वाटला. त्यांच्यासाठी ही त्यांच्या साहसी दिवसांची खूण होती.

 

sarasvati-inmarathi
deccanchronicle.com

का, कुणास ठाऊक इतिहासात महिलांचं योगदान हे कायमच दुर्लक्षित राहिलंय. अशा कित्येक वीरांगना आहेत ज्या इतिहासातील कठीण प्रसंगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या ठाकल्यायत. पुरुषांच्या तुलनेत त्या कमी असतीलही, पण आज त्या कोणाच्याच आठवणीतसुद्धा नाहीत. त्या विस्मरणात गेल्या आहेत. त्यांच्या बहादुरीचे पोवाडे गायले गेले नाहीत.

सरस्वती राजामणी ही अशांपैकीच एक वीरांगना, जिच्या बुद्धीला आणि साहसी वृत्तीला ओळख मिळण्याची, प्रतिष्ठा मिळण्याची गरज आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *