भारतीय सैन्याचा, दुसऱ्या देशातील ‘गृहयुद्ध’ संपवण्याचा हा रोमांचक इतिहास विस्मरणात जाऊ नये

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

श्रीलंकेतील गृहयुद्ध संपवण्यासाठी भारताने “ऑपरेशन पवन” ह्या कोडनेमखाली शांती सेना म्हणजेच इंडियन पीस किपींग फोर्स (IPKF) श्रीलंकेत पाठवली होती. ११ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर १९८७ दरम्यान भारतीय सेना व LTTE म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम ह्यांच्यात भीषण युद्ध झाले.

ह्या लढाईत शेकडो भारतीय सैनिक शहिद झाले होते.

श्रीलंकेतील जाफना ह्या शहराचा ताबा घेण्यासाठी इंडो श्रीलंकन कराराखाली आपले सैन्य पाठवण्यात आले होते. ह्या शहरावर LTTE च्या लोकांचा ताबा होता.

हे शहर ताब्यात घेण्याचा श्रीलंकन सैन्याने प्रयत्न केला होता परंतु त्यांना यश आले नाही. भारताचे आर्मी टँक्स, हेलिकॉप्टर गनशिप्स आणि भरपूर शस्त्रास्त्रांच्या मदतीने IPKF ने LTTE च्या ताब्यातून हे शहर हस्तगत केले.

तामिळी वाघांना श्रीलंकेपासून वेगळे होऊन स्वतःचे वेगळे तामिळ राष्ट्र हवे होते. त्यासाठी त्यांनी लढा सुद्धा दिला. सिलोन (तामिळ ईलम)चा उत्तर व पूर्व भाग त्यांना वेगळे राष्ट्र म्हणून हवा होता. त्यांच्या ह्या लढ्यामुळे तामिळी वाघ व श्रीलंकन सैन्य ह्यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले.

 

tamil-ilam-inmarathi
euractiv.com

१९८०च्या दशकाच्या शेवटी शेवटी भारतातील तामिळी बांधवांच्या आग्रहामुळे भारताला ह्यात हस्तक्षेप करावा लागला. भारताने डिप्लोमॅटिक तसेच मिल्ट्री बेसिसवर ह्यात हस्तक्षेप केला. ह्या वाटाघाटींदरम्यान कोलंबो येथे २९ जुलै १९८७ रोजी इंडो श्रीलंकन करार झाला.

ह्या करारात श्रीलंकन सरकारने देशातील प्रांतांना जास्त अधिकार व स्वायत्तता बहाल केली व सैन्य काढून घेतले. तामिळी विद्रोह्यांनी सुद्धा सैन्य मागे घ्यावे असे ठरले.

बहुतांश तामिळी संघटनांनी तसेचग तामिळी वाघांनी ह्या वाटाघाटीत भाग घेतला नव्हता. नाईलाजाने करारामुळे त्यांनी त्यांची शस्त्रे इंडियन पीस कीपिंग फोर्सकडे सुपूर्त केली. तरीही अनेक विद्रोह्यांनी आपली शस्त्रे सरेंडर केली नव्हती आणि परिस्थिती परत नाजूक झाली.

तामिळी वाघांनी वेगळ्या राष्ट्रासाठी परत सशस्त्र लढा सुरु केला आणि शस्त्रे सरेंडर करण्यास नकार दिला.

म्हणूनच IPKF ला नाईलाजाने तामिळी वाघांविरुद्ध लढा द्यावा लागला. हे विद्रोही जाफना द्वीपकल्पामध्ये उत्तरेकडील प्रदेशात कोंडीत सापडले होते. IPKF ने LTTE ना निशस्त्र करून ह्या भूप्रदेशावर अखेर ताबा मिळवला. ७ ऑक्टोबरला आर्मी स्टाफच्या प्रमुखांनी IPKF साठी काही निर्देश जारी केले होते.

LTTE चे रेडिओ नेटवर्क नष्ट करणे किंवा ते ताब्यात घेणे, LTTE कम्युनिकेशन नेटवर्क ताब्यात घेणे किंवा बंद करणे, LTTE च्या कॅम्प्सवर, अड्ड्यांवर आणि महत्वाच्या ठिकाणांवर धाडी टाकणे, LTTE पूर्वेकडील अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून माहिती मिळवणे, व त्यांनी माहिती देण्यास नकार दिल्यास बळाचा वापर करणे व ह्या भागावर IPKF चा होल्ड घट्ट राहण्यासाठी कृती करणे असे हे निर्देश होते.

 

shri-lanka-inmarathi
thetelegraph.com

IPKF चे पहिले ऑपरेशन ९ ऑक्टोबर १९८७ रोजी सुरु झाले. ह्या ऑपरेशन चे कोड नेम “पवन” असे होते.

ह्या ऑपरेशनमुळे LTTE च्या जाफना व त्या शहराच्या आसपासच्या कारवाया थंडावतील अशी अपेक्षा होती. ह्याने LTTE चा जोर कमी होऊन ते दिशाहीन होतील अशी अपेक्षा होती. ९ व १० ऑक्टोबरच्या रात्री IPKF ने LTTE च्या तवाडी येथील रेडिओ स्टेशनवर धाड टाकून ते ताब्यात घेतले. तसेच कोक्कुवीलचे टीव्ही स्टेशन सुद्धा ताब्यात घेतले.

LTTE ने स्पॉन्सर केलेल्या वर्तमानपत्रांच्या दोन प्रिंटिंग प्रेस ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आल्या. ह्या ऑपरेशनमध्ये २०० तामिळी विद्रोह्यांना अटक करण्यात आली.

ह्याचा बदला म्हणून LTTE ने सीआरपीएफ च्या तुकडीवर तेल्लीपल्लाइ येथे अचानक हल्ला करून चार जवानांना ठार मारले. तसेच ऑटोमॅटिक शस्त्रास्त्रांचा वापर करून IPKF च्या तेल्लीपल्लाइ येथील पोस्ट नष्ट केल्या. त्याच दिवशी LTTE ने गस्तीवर असलेल्या १० पॅरा कमांडो जीपवर हल्ला केला व जीपमधील ५ लोकांना ठार केले.

१० ऑक्टोबर रोजी भारताच्या एक्याण्णवव्या ब्रिगेडने जाफनामध्ये घुसण्याचे प्रयत्न सुरु केले. ह्या ब्रिगेडमध्ये तीन बटालियन्सचा समावेश होता व ह्या ब्रिगेडचे नेतृत्व ब्रिगेडियर जे. रल्ली ह्यांनी केले होते.

ऑपरेशन पवनची सुरुवात LTTE च्या जाफना युनिव्हर्सिटी हेडक्वार्टर्स वर हवाई हल्ल्याने झाली. भारतीय स्पेशल फोर्स व शीख लाईट इन्फ्रंटीच्या सैनिकांनी १२ ऑक्टोबरच्या रात्री हा हल्ला केला. ही एक कमांडो रेड होती ज्यात LTTE च्या मुख्य नेत्यांना व लोकल कमांडर्सना ताब्यात घेण्याचा उद्देश होता.

 

mission-overseas-inmarathi
blog.juggernaut.in

भारतीय गुप्तहेर खात्याच्या मते हे लोक त्या वेळी त्या इमारतीत असणार होते. हे लोक ताब्यात घेतल्याने जाफनावर ताबा मिळवणे तुलनेने सोपे झाले असते. प्लॅन असा होता की दहाव्या बटालियनच्या १७ कमांडोजना पॅराश्यूट च्या मदतीने खाली उतरवून फुटबॉलचे ग्राउंड ताब्यात घेणे व नंतर शीख लाईट इन्फ्रंट्रीच्या तेराव्या बटालियनमधील ३० ट्रूप्सने दुसऱ्या टप्प्यात कारवाई करणे.

म्हणजे काही जवान हेलिकॉप्टर मधून कारवाई करणार होते तर काही जमिनीवरून प्रयत्न करणार होते. परंतु LTTE च्या लोकांना ह्याचा सुगावा लागल्याने त्यांनी हल्ला सुरु केला व हेलिकॉप्टर मधून खाली येणारे जवान ह्या हल्ल्यात सापडले. हे ऑपरेशन त्यामुळे अर्धवट सोडावे लागले.

ह्या रात्रभर चाललेल्या हल्ल्यात शीख लाईट इन्फ्रंटी ट्रूप मधल्या २० सैनिक तर १७ पैकी २ कमांडो शहिद झाले. ह्या हल्ल्यात बचावलेला भारतीय सैनिक शिपाई गोरा सिंग ह्याला LTTE ने ताब्यात घेतले.

जाफनाचे युद्ध सुरु झाल्यानंतर IPKF ला तामिळी वाघांकडून विरोध झाला. म्हणूनच इंडियन हाय कमांड ने अधिक शस्त्रे वापरून LTTE चा विरोध मोडून काढण्याचे आदेश सेनेला दिले. जाफनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर LTTE ने माईन्स व स्फोटक शस्त्रे पेरून ठेवली होती. ही शस्त्रे लांबून सुद्धा डेटोनेट करता येण्यासारखी होती.

ह्या वेळी भारतीय नौदलाच्या ईस्ट कमांडने कोस्ट गार्डला मदत केली, आणि उत्तर श्रीलंकेतील ४८० किलोमीटर्सचा रस्ता ब्लॉक करण्यात आला.

ह्याने तामिळी वाघांच्या कम्युनिकेशन आणि पुरवठ्यावर मर्यादा आल्या. ह्याच वेळी भारताचे नेव्ही कमांडोज म्हणजे मार्कोस फोर्सेस कामाला लागले. मार्कोस फोर्सेस तसेच ३४०व्या बटालियनच्या सैनिकांनी जाफना व बट्टीकलोआ च्या जवळ बीच स्काऊटींग केले. म्हणजेच तेथील माहिती काढली. IMSF ने जाफनाच्या पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्या जवळील रस्त्याचे सिक्युरिटी पॅट्रोलींग सुद्धा केले.

 

army-operation-inmarathi
indiatoday.in

ऑक्टोबर १५/१६ ला IPKF ने पुढे जाणे थांबवले. पलय येथील मोठे ऑपरेशन हेडक्वार्टर तामिळी वाघांपासून सोडवले. ह्याच वेळी भारतीय वायुसेनेने मोठे एअरलिफ्ट सुरु केले. त्यांनी तीन ब्रिगेड्स, मोठा शस्त्रसाठा, तसेच T-72 टँक्स व BMP-1 फायटिंग व्हेकल्सची वाहतूक केली.

ह्या सगळ्यात इंडियन एयरलाईन्सने खूप मोलाचा सहभाग घेतला. ह्याच काळात Mi-8 मिडीयम हेलिकॉप्टर्स व Mi-25 गनशिप्स तसेच HAL Cheetah लाईट हेलिकॉप्टर्सचाही उपयोग करण्यात आला.

भरपूर शस्त्रसाठा आणल्यानंतर IPKF ने पुन्हा लढा सुरु केला. तामिळी वाघ सुद्धा चांगल्या तयारीचे असल्याने त्यांनी कट्टर लढा दिला. ह्यात आपलेही पुष्कळ नुकसान झाले. परंतु IPKF ने सुद्धा खबरदारी घेतली. नंतर LTTE ने अँटी टॅंक माईन्सचा उपयोग करत IPKF चे आणखी नुकसान केले. चिडलेल्या IPKF ने जाफनाचा विद्युतप्रवाह खंडित केला.

IPKF च्या येण्याजाण्याच्या रस्त्यांवर LTTE ने भरपूर माईन्स लावून ठेवल्या. ह्याने भारतीय सैन्यापुढे संकट उभे राहिले. त्यानंतर IMSF कमांडो जाफना पोर्ट वरून पुढे आले आणि त्यांनी नवनतुराई कोस्ट मार्ग माईन्स मुक्त केला.

ह्यानंतर आपल्या सैन्याने म्हणजेच मराठा लाईट इन्फ्रंट्री व ४१वी ब्रिगेड ह्यांनी नल्लूर प्रदेश मुक्त केला. २१ ऑक्टोबर रोजी कमांडोंनी गुरु नगर एक यशस्वी धाड टाकून LTTE चा अड्डा ताब्यात घेतला.

ह्यानंतर दोन आठवड्यांच्या कट्टर लढाईनंतर IPKF ने जाफना व LTTE च्या मुख्य शहरांवर ताबा मिळवला. हे ऑपरेशन पुढे नोव्हेम्बरमध्ये सुद्धा सुरु राहिले.

 

jafna-inmarathi
Medium.com

जाफना फोर्टचा २८ नोव्हेम्बर रोजी पाडाव झाला आणि हे ऑपरेशन संपले. ह्या संपूर्ण ऑपरेशन मध्ये आपले ६०० ते १२०० सैनिक धारातीर्थी पडले. ह्यात LTTE चे हल्ले तसेच स्थानिकांशी मिळून केलेला गनिमी कावा हा आपल्या सैन्यासाठी मोठा अडथळा ठरला. आपल्या सैनिकांना LTTE च्या बाल सैनिकांशी सुद्धा लढावे लागले.

हा लढा म्हणजे IPKF च्या LTTE शी लढ्याची एक सुरुवात होती. हे तीन वर्षांचे कॅम्पेन होते जाफना हस्तगत केल्यानंतर LTTE चे बचावलेले कट्टर लोक दक्षिणेकडील जंगलात गेले. त्यांनी तिथून आपला लढा सुरु ठेवला. हे होते ऑपरेशन पवन!

पंतप्रधान राजेंव गांधींनी श्रीलंकेला मदत केल्याने पंतप्रधान राजीव गांधींवर टीका सुद्धा झाली. ह्याच कारणाने LTTE ने राजीव गांधींना लक्ष्य करून त्यांचा बॉम्बस्फोटात बळी घेतला व देश एका चांगल्या युवा नेत्याला मुकला.

आज ह्या ऑपरेशन पवनला ३१ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने ह्या ऑपरेशनमध्ये भाग घेतलेल्या भारतमातेच्या शूर सुपुत्रांना मानाचा मुजरा व जे ह्यात शहीद झाले त्या सर्व वीरपुत्रांना विनम्र अभिवादन!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?