' मृत्यू पावलेली पत्नी अजूनही पाठवतीये पत्र : अद्वितीय प्रेमाची सत्य कथा! – InMarathi

मृत्यू पावलेली पत्नी अजूनही पाठवतीये पत्र : अद्वितीय प्रेमाची सत्य कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एखाद्या चित्रपटाची वाटावी अशी ही गोष्ट.. काही चित्रपट आपल्या मनावर कोरले जातात. आणि कधीकधी तर ते संकटाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोणच बदलून टाकतात. ही गोष्ट आहे २०१६ मध्ये कॅन्सरमुळे आयुष्याचा शेवट झालेल्या एका पत्नीची. केटची.

इंग्लंडच्या मिरफिल्ड शहरात राहणारी डॉक्‍टर केट गारनर ही तरुणी. २०१६ मध्ये कॅन्सरच्या विळख्यात अडकून तिचा अंत झाला.

हॉलीवुड लव स्‍टोरी पी.एस. आय लव यू या चित्रपटाचा तिच्यावर खूप प्रभाव पडला होता. या चित्रपटात होली केनेडी या नायिकेचा नवरा गेरी आजारपणात जातो. त्याच्या जाण्यानंतर होलीला आपलं आयुष्य निरर्थक वाटू लागतं.

याची मृत्यूपूर्वीच कल्पना असलेला गेरी तिला दहा पत्रं लिहून जातो. त्यातलं पाहिलं तिला तिच्या तिसाव्या वाढदिवसाला मिळतं.

ही पत्रं तिच्यात आशावाद जागवतात. तिची ताकद बनतात. तिला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी उभारी देतात. आणि आयुष्याच्या वाटेवर, प्रत्येक वळणावर तो तिच्यासोबत आहे असा तिला विश्वास देतात.

 

headstuff.org

केट स्वतः डॉक्टर असल्याने तिला समजून चुकलं होतं की आपण यातून वाचत नाही. केट आणि क्रिसचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. तेव्हा तिने या चित्रपटाच्या नायकासारखं आपल्या मृत्यूपश्चात आपल्या नवऱ्यासाठी असं काहीतरी वेगळं करायचा निश्चय केला.

केटने ठरवलं की आपण गेल्यावरसुद्धा आपल्या पतीला, क्रिसला त्याच्या जन्मदिवशी आपलं शुभेच्छापत्र मिळावं आणि तो खूष व्हावा. त्याला आपण त्याच्यासोबत आहोत असं वाटावं..

म्हणून तिने आपल्या नवऱ्याला, क्रिस पॉइंटनला प्रत्येक वाढदिवसासाठी भेट म्हणून शुभेच्छापत्र देण्याचे ठरवले. पाच वर्षं कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर २९ वर्षाच्या केटचा २३ जुलै २०१६ ला मृत्यू झाला.

ती गेली तेव्हा केट आणि क्रिसच्या लग्नाला ११ वर्षं झाली होती. आपल्या आयुष्याची शेवटची दोन वर्षं तिने २०४२ पर्यंत म्हणजेच क्रिस ६५ वर्षांचा होईपर्यंत क्रिससाठी शुभेच्छापत्रे लिहिली.

 

loveletter-inmarathi
honey9.com

त्यानंतर ती शुभेच्छापत्र केटने एका बॉक्समध्ये बंद करून ठेवली आणि त्या बॉक्सला तिने आठवणींचा पेटारा असं नाव दिलं.

तिने आपल्या नवऱ्याला, क्रिसला तो बॉक्स देताना त्याच्याकडून वचन घेतलं की तो तिच्या मृत्यूपूर्वी तो बॉक्स उघडणार नाही. आणि नंतरही तो त्या त्या वर्षीच्या वाढदिवसासाठी असलेलंच शुभेच्छापत्र उघडून वाचेल.

 

kate-garner-inmarathii
kioa.com

क्रिसने सुद्धा तिला दिलेलं वचन आजतागायत पाळलंय. अजूनही दरवर्षी केटचं ग्रीटिंग कार्ड काय असेल याची क्रिसला उत्सुकता असते. मला कशाने आनंद होईल, हसू येईल हे केटला बरोबर ठाऊक होतं..

म्हणूनच आजही तिची पत्रं माझ्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम करताहेत असं क्रिस म्हणतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?