हा भारतीय सैनिक मृत्यूनंतर देखील चिनी सैनिकांच्या छातीत धडकी भरवतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

आपल्या देशात देवांची किंवा मंदिरांची आजिबात कमी नाही.. पण देवतांची मंदिरे सोडून तुम्ही कधी कोण्या माणसाच्या किंवा “भुताच्या” मंदिराबद्दल ऐकलं आहे का? निश्चितच ऐकलं नसेल.

असे एक मंदिर आहे जे भारत आणि चीनच्या सीमेवर सिक्कीम राज्यात आहे. जिथे दूरवरून अनेक लोक दर्शन घेण्यासाठी येतात.

हो.. हे मंदिर सिक्कीमच्या राजधानी गंगटोक मधील जेलेप्ला आणि नथूलापासच्या मध्ये जवळपास १३ हजार फूट उंचीवर वसवले गेले आहे. हे मंदिर कोणा देवाचे नसून ते आहे एक मृत भारतीय सैनिक “हरभजन सिंह” यांचे!

आश्चर्य वाटते ना? सैनिकाचे मंदिर..

 

baba-inmarathi
wikipedia.com

ते आता फक्त सैनिक नसून “बाबा हरभजन सिंह” आहेत. मरणाला ४८ वर्षे उलटून सुद्धा ते आजही रक्षकाच्या ड्युटीवर आहेत. कामावर असताना एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला व त्यानंतर त्यांचा आत्मा आजही कोणत्या ना कोणत्या प्रकारे सीमेचे रक्षण करतो असे मानण्यात येते.

कोण आहेत हे हरभजन सिंह?

हरभजन सिंह कोणी साधू किंवा महात्मा नव्हते तर ते एक भारतीय सैन्यातील सैनिक होते.

ज्यांचा जन्म ३ ऑगस्ट, १९४१ ला पंजाब (सध्याचे पाकिस्तान) मधील कथपूर मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले आणि त्यांनी १० वी १९५५ मध्ये डी व्ही हायस्कुल मधून पूर्ण केली.

जुने,१९५६ मध्ये हरभजन सिंह अमृतसर मधून सैनिक म्हणून भारतीय सैन्य दलात सिग्नल कोर मध्ये दाखल झाले.

३० जुने,१९६५ ला त्यांना एक कमिशन प्रदान केले गेले आणि ते ‘१४ राजपूत रेजिमेंट’ मध्ये तैनात झाले. १९६५ मधील भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वपूर्ण अशी कामगिरी केली त्यानंतर त्यांची ‘१८ राजपूत रेजिमेंट’ मध्ये बदली केली गेली.

मृत्यूशी गाठभेट

४ ऑक्टोबर, १९६८ ला खेचरांचा कळप टुकूला ते डोन्गचुईला नेत असताना, पाय घसरल्या मुळे हरभजन सिंह दरीमध्ये पडले व दरीत खोलवर पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

पण दरीतून वाहत्या नदीत पडल्या कारणाने त्यांचे पार्थिव ३ दिवसांनी किमान २ किलोमीटर दूरवर सापडले.

 

baba-harbhajan-inmarathi
youthexpress.com

मंदिर-समाधी स्थापना

असं म्हटलं जातं की त्यांचे मित्र व सहकारी प्रीतम सिंह यांच्या स्वप्नात येऊन हरभजन सिंह यांनी स्वतः त्यांचे पार्थिव कुठे आहे हे सांगितले आणि आपली समाधी असावी अशी इच्छा प्रकट केली. सुरुवातीला प्रीतम सिंह यांचा यावर विश्वास बसला नाही.

पण त्यांनी सांगितलेल्या जागीच पार्थिव सापडल्यामुळे त्यांनी आश्चर्यचकित होऊन झालेल्या साक्षात्काराबद्दल बाकी सहकाऱ्यांना सांगितले.

सेनेच्या अधिकाऱ्यांनी “छोक्या छो” येथे त्यांची समाधी बनवली आणि पर्यटकांची सोय लक्षात घेऊन ११ नोव्हेंबर,१९८२ ला “बाबा हरभजन सिहं” यांचे मंदिर नाथूला पास जवळ स्थापन केले गेले.

मृत्यूनंतरही देशसेवा

आजही असे म्हटले जाते की ते त्यांच्या सहकाऱ्यांना स्वप्नात येऊन चिनी सैनिकांच्या डावपेचांनी माहिती देत असत जी नेहमी खरी असायची. त्यामुळे त्यांना आजही त्यांच्या या देशसेवेसाठी भारतीय सैन्यात ठेवले गेले आहे.

गेल्या ४८ वर्षात त्यांचे पद आता शिपाई पासून कॅप्टन पर्यंत जाऊन पोहोचले आहे.

असे म्हटले जाते की आजही ते सीमेचे रक्षण करण्यात कुसूर करत नाहीत. याचे दाखले फक्त भारतीय सैनिकच नाही तर चिनी सैनिक देखील देतात.

 

baba-mandir-inmarathi
procaffenation.com

त्यांच्या मते त्यांनी देखील “बाबा हरभजन सिहं” यांना बऱ्याचवेळा घोड्यावरून रपेट करत असताना सीमेलगत पहिले आहे. बाकी सैनिकांप्रमाणे त्यांना देखील दरवर्षी १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर अशी २ महिन्यांची सुट्टी जाहीर केली जात असे.

जिथे त्यांच्या नावचे तिकीट देखील काढले जाई आणि त्यांचे सामान म्हणजे टोपी, कपडे, वर्षभराचा पगार आणि बूट हे त्यांचा गावी त्यांच्या आईकडे सहकार्यांमार्फत पोहोचवले जाई.

तिथे जल्लोषात त्यांचे स्वागत होत असे आणि नंतर त्याच ट्रेनने ते परत नथूलाला जात असत.

पण काही लोकांनी यावर आक्षेप घेऊन कोर्टात धाव घेतली की भारतीय सेना अंधश्रद्धा मानत नसताना असे प्रकार का होत आहेत. तेव्हा पासून “बाबा हरभजन सिंह” यांच्या सुट्टीला सुट्टी देण्यात आली आणि नंतर ते वर्षभर ऑन ड्युटी असत.

आता ते रिटायर झाले आहेत. भारत चीन फ्लॅग मिटिंग मध्ये आजही त्यांचे अढळ स्थान आहे आणि त्यांच्या नावाची मोकळी खुर्ची आजही त्याच्या पदानुसार ठराविक जागी त्यांना प्रदान केली जाते. हा बाकी सैनिकांचा त्यांचा प्रति असलेला विश्वास आणि आदर आहे.

श्रद्धास्थान

 

baba-harbhajan-singh-inmarathi
MensXP.com

या मंदिरात बाबांची एक खोली देखील आहे जिथे त्यांचे सर्व सामान असून एक पलंग देखील आहे. रोज या जागेची स्वच्छता करूनही नवल वाटेल अशी गोष्ट म्हणजे रोज त्यांच्या बुटांना चिखल लागलेला असतो.

शिवाय चादरीला घड्या पडलेल्या असतात असे सफाई करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे.

तसेच या मंदिरात ठेवलेले पाणी काहीसे भरून जाते ज्याचे २१ दिवस रोज प्राशन केल्याने त्या व्यक्तीची रोगराई पासून सुटका होते असा काहींचा विश्वास आहे.

भारतीय सैनिकांना त्यांचा आधार वाटतो तिथेच चिनी सैन्य मात्र त्यांना टरकून असते.

नाथूला पास हिवाळ्यात बर्फाच्छादनामुळे जवळपास पूर्णपणे बंद असतो अश्या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. येथील सैनिक व बाकी लोकांचा हा विश्वास आहे की बाबा हरभजन सिह त्यांच्या सोबत असून त्यांची उमेद कायम वाढवतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?