तीन वेळा पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर शेवटी कुख्यात अतिरेकी यासिन भटकळ ‘असा’ पकडला गेला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आतापर्यंत आपण अनेक दहशतवादी हल्ले, साखळी बाॅम्बस्फोटाच्या घटना पचवल्या आहेत. या घटनांपैकी बहूतांश घटनांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असलेला कुख्यात दहशतवादी यासिन भटकळ हा पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात तीनवेळा यशस्वी ठरला होता.

पण अखेर तो कसा पकडला गेला, याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

यासिन भटकळ हे नाव प्रत्येकालाच माहित आहे. देशावर कुठलाही अतिरेकी हल्ला झाला की हे नाव प्रामुख्याने चर्चेत येत असे.

यासिन भटकळचा जन्म १९७३ मध्ये कर्नाटक राज्यातील भटकळ या गावी झाला. त्याचं मुळ नाव होतं अहमद सिदृीबाप्पा.

त्याने सुरूवातीच्या काळात अंजुमन-ए-मुस्लिमीन या मदरशात प्राथमिक शिक्षण घेतले. २००४ मध्ये सिमी या अतिरेकी संघटनेशी जोडला गेल्यानंतर तो दहशतवादात सक्रिय झाला. याच संघटनेचा मुखवटा म्हणून पुढे इंडियन मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेचा उदय झाला.

 

Indian-Mujahideen-inmarathi

 

यासीन भटकळ बरोबरच त्याचे दोन चुलत भाऊ रियाज व इकबाल भटकळ हे दोन्ही देखील या संघटनेच्या स्थापनेत सहभागी होते.

पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय व लश्कर-ए-तैयबा या संघटनांनी १२ वर्षांपूर्वीच भारतातच एक अतिरेकी संघटना तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते व त्यानुसार २००७ मध्ये इंडियन मुजाहिद्दीनची स्थापना झाली.

सुरूवातीच्या काळात यासीन भटकळ केवळ बाॅम्बचा पुरवठा करण्याचे काम करीत होता.

२६/११ च्या मुुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आयएसआय व लश्कर-ए-तैयबा या दोन्ही संघटनांना थेट प्रकाशात न येता दहशत पसरविण्यासाठी एका तिस-या संघटनेची आवश्यकता निर्माण झाली होती व ती आवश्यकता इंडियन मुजाहिद्दीने पूर्ण केली.

यासीनने २००६ मध्येच पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतले होते, त्यामुळे त्याला बाॅम्ब तयार करणे व ते पेरणे याचे सखोल ज्ञान होते.

शिवाय इंडियन मुजाहिद्दीनमध्ये नवीन सदस्यांची भरती करणे व विविध हल्ले घडवून आणण्यातही तो सक्रिय होता. २००७ मध्ये उत्तर प्रदेशात तीन ठिकाणी बाॅम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते.

त्यावेळीच यासीन भटकळचे नाव चर्चेत आले पण ते शाहरूख खान या नावाने.

 

bhatkal-inmarathi
news18.com

नवी दिल्लीत २००८ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटांनंतर सुरक्षा यंत्रणांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका अतिरेक्याला अटक केली होती व त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून यासीन भटकळ हे नाव सर्वप्रथम समोर आले.

तोपर्यंत भारताच्या सुरक्षा यंत्रणांनाही यासीनबद्दल विशेष माहिती नव्हती. शिवाय तो वेशभूषा व नावे वारंवार बदलत असल्याने त्याची खरी ओळख समोर येत नव्हती.

परंतु दिल्ली स्फोटानंतर इंडियन मुजाहिद्दीनवर मात्र सुरक्षा यंत्रणांनी चांगलाच दबाव निर्माण केला, त्यामुळे रियाज व इकबाल भटकळ हे पाकिस्तानात पळून गेले व इंडियन मुजाहिद्दीनचा सर्वात मोठा चेहरा म्हणून यासीन भटकळ समोर आला.

त्यानंतर वाराणसीमधील दषवमेश्वर घाट (२०१०), बंगलोरमधील चिन्नास्वामी स्टेडीयम (२०१०), पुण्यातील जर्मन बेकरी बाॅम्बस्फोट (२०११), मुंबई (२०११), हैद्राबाद (२०१३) व बंगलोर (२०१३) मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटाच्या घटनांमध्ये यासीन भटकळचा सक्रिय सहभाग होता व भारताच्या सर्वच सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर तो आला होता.

त्यामुळे त्याला पकडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू होते, पण तो सुरक्षा यंत्रणांना चकमा देण्यात यशस्वी ठरत होता.

२००९ मध्ये कोलकाता पोलिसांच्या विशेष पथकाने यासीन भटकळला सर्वप्रथम ताब्यात घेतले त्यावेळी तो मोहम्मद अशरफ या नावाने सक्रिय होता. पण अन्य दहशतवादी संघटनांच्या मदतीने त्याची अवघ्या महिनाभरातच जामिनावर सुटका झाली.

 

yasin-inmarathi
india.com

पण त्यानंतर घडत असलेल्या बाॅम्बस्फोटाच्या घटनांमध्ये भटकळचा हात असल्याचे समोर येते होते, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता.

२०११ मध्ये चेन्नईतील एका घरात भटकळसह काही दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मोबाईल लोकेशनच्या आधारे मिळाली होती.

पण तत्पूर्वीच संबंधित दहशतवाद्यांना त्याची कुणकुण लागल्याने त्यांनी मोबाईल पूर्णपणे बंद करून पळ काढला होता. त्यामुळे आयबी, दिल्ली व चेन्नई पोलिसांनी त्या घराला घेरून घेत गोळीबार केला पण काहीच उपयोग झाला नाही.

त्यावेळीही भटकळ पळून जाण्यात यशस्वी ठरला, काहींनी त्याला बसस्थानकात पाहिल्याचेही नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर २०१२ मध्ये त्याला पकडण्याची आणखी एक संधी सुरक्षा यंत्रणांना चालून आली होती.

पण त्यावेळी दिल्ली पोलीस व महाराष्ट्र एटीएस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे तीही संधी हुकली.

भटकळने अटक होण्याच्या भीतीने इंटरनेट व मोबाईलचा वापरही थांबवला होता. पण हैद्राबादमधील दिलखुश नगरमध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटानंतर त्याने भारत-नेपाळ सीमेवरील गावांमध्ये असलेल्या काही लोकांना संपर्क केला होता जे नंतर नेपाळला गेले होते, असे सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास आले.

शिवाय नेपाळ गुप्तचर यंत्रणेशी संबंधित एका व्यक्तीनेही भटकळला भारत-नेपाळ सीमेवर पाहिल्याचे सांगितले होते. त्यामुळे भटकळ हा नेपाळ सीमेवर असल्याची खात्री सुरक्षा यंत्रणांनी करवून घेतली.

 

Yasin-Bhatkal-inmarathi
eesanje.com

त्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून काठमांडूमध्ये एक पथक कार्यरत करण्यात आले जे भटकळच्या हालचालींवर नजर ठेवून होते.

भटकळचा स्थानिक नेपाळी नेत्यांशी संबंध असू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन नेपाळी अधिका-यांना देखील या मोहिमेची माहिती देण्यात आली नव्हती.

पण नेपाळ सुरक्षा दलाच्या मदतीने फोन नंबरच्या आधारे भटकळ हा पोखरा येथील एका घरात असल्याची माहिती मिळविण्यात आली व भटकळला अखेर ३० आॅगस्ट २०१३ ला अटक करण्यात आली.

त्याला करण्यात आलेली अटक हे भारतीय सुरक्षा यंत्रणांचे सर्वात मोठे यश होते. भटकळला भारतातच अटक करण्यात आली होती, पण सुरक्षा यंत्रणांनी त्याला नेपाळमध्ये अटक केल्याचे दर्शविल्याचे वृत्त नंतर काही इंग्रजी दैनिकांनी दिले होते.

भटकळ हा नेपाळ सीमेवर वांरवार भेट देत असे. शिवाय त्याला भारतातील युनानी औषधांविषयी चांगले ज्ञान असल्याने तो डाॅक्टर म्हणून ओळखला जात होता.

 

islam-inmarathi
deccanchronicle.com

तो बिहारच्या काही गावांमध्ये फिरत असे, त्याच्या आजुबाजूला काही नागरिक सुरक्षेसाठी तैनात राहत होते. इंडियन मुजाहिद्दीनसाठी नवीन सदस्यांची नेमणूक करण्यासाठी त्याने मद्रासलाही भेट दिली होती, असे एका अहवालातून समोर आले.

भटकळला अटक झाल्यानंतर कालांतराने त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. पण दहशतवादाची समस्या अजूनही मुळापासून सुटलेली नाही.

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशात नेहमीच संताप आणि असंतोष व्यक्त केला जातो. भटकळ नंतर जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा  प्रमुख मसुद अजहर हा आता भारतीय सुरक्षा यंत्रणांसमोरील प्रमुख लक्ष्य असणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?