नक्षल्यांची दहशत विरूद्ध शिक्षिकेचे धाडस!- बस्तरमधील एका शिक्षिकेच्या जिद्दीची कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

कोंटा हे गाव छत्तीसगढ राज्यातील बस्तर ह्या जिल्ह्यात आहे. बस्तर हा परिसर नक्षलग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो. ज्यामुळे येथील रहिवासी हे आजही इतर शहरांच्या तुलनेत मागासलेले आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण..

म्हणूनच येथील काही शिक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता येथील मुलांना शिकवायला जातात. जेणेकरून ते शिक्षित होऊन स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणू शकतील.

ह्यासाठी येथील काही शिक्षक जमेल तेवढे प्रयत्न करत आहेत. अशाच एका शिक्षिकेच्या असामान्य जिद्दीची ही कथा..

शिवपूर गावातील राम कुमारी सेन, ह्या कोंटा येथिल कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षिका आहेत.

 

konta-school-students-inmarathi
indianexpress.com

त्या सांगतात की,

“जेव्हा मला ही नोकरी मिळाली तेव्हा माझ्या घरच्यांनी मला येथे नोकरी न करण्याचा सल्ला दिला. ते मला म्हणाले की येथे नोकरी करणे म्हणजे खूप धोकादायक आहे. पण मी ही सरकारी नोकरी कशी सोडली असती? आणि आता मला इथुन कुठेही जायचं नाहीये. हे ते सर्वात चॅलेंजिंग काम आहे ज्यातून मला समाधान मिळते.”

त्या ज्या परिसरात वाढल्या तेथे नक्षलींचा काहीही त्रास नव्हता. पण तरीही मुलींना शाळेत जाण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर आर्थिक चणचणीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण मध्येच थांबवावे लागले.

“मी एका वर्षांकरिता शाळा सोडली. त्यानंतर शिरपूर या गावात मी राहायचे, तेथे मिळेल ते काम करायला लागले. जेव्हा माझ्याजवळ काही पैसे जमा झाले तेव्हा मी १२ वी उत्तीर्ण केली. त्यानंतर मी तेथील लोकल हेल्थ वर्कर म्हणून काम केले. पैसे जोडून मी केमिस्ट्री विषयात MSc ची पदवी घेतली.”

 

prema-kujur-sukma-inmarathi
indianexpress.com

कोंटा येथील केजीवी ही शाळा इतर शाळांसारखीच, दोन मजली शाळेची इमारत, समोर पटांगण, ग्रंथालय, कॉम्पुटर खोली, वर्गांतील भिंती प्रेरणादायी घोषणांनी सजलेल्या. जशी इतर कुठली शाळा असते तशीच. पण एक गोष्ट ह्या शाळेला इतर शाळांपेक्षा वेगळे बनवते आणि ते म्हणजे ह्या शाळेत शिकणारे विद्यार्थी…

कोंटा हे गाव आंध्रप्रदेशच्या सीमेवर आहे. येथे येण्यासाठी ओडीसा पासून नावेत प्रवास करून यावे लागते. ह्या शाळेत विविध भाषीय विद्यार्थी आहेत. येथील काही विद्यार्थी हे ओडिया बोलतात तर काही तेलुगु, गोंडी, हलबी बोलतात.

“आमचे विद्यार्थी एकत्र येतात ते गरिबी आणि नक्षलवादाच्या मुद्द्यावर.”

असे कोंटाच्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, आर. एन. मिरे यांनी सांगितले.

ह्या शाळेत सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत ज्यात ६५ विद्यार्थी शिकत असून ३ शिक्षक आहेत. सेन यांनी २०११ साली येथे नियुक्त झाल्या. ते गणित आणि विज्ञान हे विषय सर्व वर्गांना शिकवतात. त्या आपल्या विद्यार्थांना त्यांच्याप्रमाणे कधीही शिक्षण न सोडण्याचा धडा देतात.

मुख्य प्रवाहापासून दूर असल्याने त्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कारण त्यांना आज खरी गरज आहे ती नोकरी मिळवून गरिबी मिटविण्याची.

शाळा सुटल्यानंतर जर मुलांना काही शंका असेल तर त्या दूर करण्यसाठी खास शिकवणी वर्ग देखील घेतात.

कोंटा येथील लोकांना हे समजावून सांगणे की त्यांनी त्यांच्या मुलींना शाळेत का पाठवावे हे खरच खूप कठीण काम आहे.

शिक्षण करून देखील जर त्यांना त्याचा काही फायदा होत नसेल तर आम्ही आमच्या मुलींना शाळेत का पाठवावे, असे पालक विचारतात. तेव्हा आम्ही त्यांना समजावतो की आम्ही त्यांना शिक्षणा सोबतच इतर घरकाम देखील शिकवू.

 

kasturba-school-konta-inmarathi
new-img.patrika.com

ह्या शाळेतील एका वर्गात तुम्हाला लोणची, मुरांबा, सुका मेवा, एम्ब्रॉयडरी केलेले कपडे दिसतील. येथे विद्यार्थ्यांना ही कामे देखील शिकवली जातात, जे शिकून ह्या मुली घरी जाऊन आपल्या पालकांना ह्याद्वारे जास्त पैसे कसे कमवता येईल हे सांगतात.

२० नोव्हेंबर ला जेव्हा सेन ह्या त्यांच्या दोन विद्यार्थिनींना घेऊन रायपुर येथे एक पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेल्या. तेही मुख्यमंत्री रमणसिंह आणि अभिनेत्री करीना कपूर ह्यांच्या हस्ते.

तेव्हा त्यांना अनेकांनी विचारले की त्या कुठल्या भागातून येतात. तेव्हा त्या उत्तरल्या,

“मी अभिमानाने सांगू शकते की मी आणि माझ्या विद्यार्थिनी बस्तर च्या आहोत. मला स्वतःचा अभिमान आहे आणि माझ्या विद्यार्थिनीचा सुद्धा…”

अश्या ह्या सेन आणि येथील इतर शिक्षकांमुळेच बस्तर भागात थैमान घालणाऱ्या नक्षलवादी गटांना न जुमानता शिक्षण घेण्याचे आणि परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन यशस्वी होण्याचे धैर्य तिथल्या नागरिकांत हळूहळू येते आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?