भगवान श्रीकृष्णांना ‘दामोदर’ का म्हटलं जातं? वाचा यामागची रंजक कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

श्रीकृष्णाची अनेक नावे आहेत जसे की, गोविंद, हरी, माधव, मुकुंद, गोपाळ, मुरारी, ऋषिकेश, द्वारकाधीश. श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार.

विष्णूची १००० नावे आहेत. विष्णुसहस्त्रनाम मध्ये त्यांचा उल्लेख आहे, त्यापैकी ३६७वं नाव म्हणजेच दामोदर. दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. पण हे नाव कसं पडलं? त्याच्यामागे खरंच एक खूपच मजेशीर गोष्ट आहे.

लहान असताना कृष्ण जेव्हा वृंदावनात होता, तेव्हा त्याच्या अनेक लीलांच्या, खोडकरपणाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच ही एक गोष्ट. कृष्ण दुसऱ्यांच्या घरातले लोणी चोरणे, गोपिकांची छेड काढणे, सवंगड्यांना जमा करून मस्ती करणे यासारख्या गोष्टी करायचा.

 

krishna 6 inmarathi

 

 

वृंदावनात त्याच्या तक्रारी लोक यशोदेला सांगत, यशोदा तसा फारसा लोकांवर विश्वास ठेवत नसे. उलट लोकच माझ्या मुलाची बदनामी करतात असं तिला वाटायचं. तरी ती कृष्णाला समजावून सांगायची. पण शेवटी कृष्णच तो, या कानाने ऐकायचा आणि त्या कानाने सोडून द्यायचा.

असंच एके दिवशी कृष्णाला भूक लागलेली होती म्हणून यशोदा त्याला भरवत होती आणि कृष्ण पण मजेत खात होता. तितक्यात यशोदेला आठवलं की तिने चुलीवरती दुध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध उतू जाऊ नये म्हणून ती धावत स्वयंपाक घरात गेली आणि दूध चुलीवरून काढून ठेवू लागली.

 

krishna 5 inmarathi

 

पण कृष्णाला मात्र याचा राग आला, मला जेवण भरवायचं सोडून आई तिकडे कशी गेली! “मला हे आवडलेला नाही”, हे दाखवण्यासाठी त्याने घरातलं मडक्यातलं दही घेतलं आणि एका दगडावर ते मडकं उपडं केलं त्यावर थोडं दूध पण आणून ओतलं.

घरातलं लोणी घेऊन तो माकडांना भरवू लागला. यशोदा परत कृष्णाला खाऊ घालण्यासाठी बाहेर आली आणि पाहते तर दूध, दही सांडलेले…. यशोदा कृष्णाला शोधायला लागली आणि पाहते तर काय, कृष्ण माकडांना लोणी भरवत होता, हे पाहून यशोदेचा रागाचा पारा अजूनच चढला.

लोक कृष्णाच्या तक्रारी करतात त्यात काही खोटं नाही असं तिला वाटलं. आता श्रीकृष्णाला धडा शिकवलाच पाहिजे म्हणून त्याला मारण्यासाठी तिने हातात काठी घेतली, आणि त्याला पकडण्यासाठी धावू लागली.

 

krishna inmarathi
iskon

 

आई काठी घेऊन येत आहे हे पाहून कृष्ण पळायला लागला. तो काही तिच्या हाती लागेना. ती धावून धावून दमली पण आईची ही अवस्था बघून शेवटी कृष्ण थांबला आणि लहान मुलं कशी घाबरतील, रडतील तसा तो घाबरला आणि रडू लागला, थरथर कापू लागला.

त्याला तसं पाहून यशोदेने काठी फेकून दिली. आपण त्याला मारू नये असं तिला वाटलं. पण शेवटी त्याला काहीतरी शिक्षा केलीच पाहिजे म्हणून मग तिने कृष्णाला एका ठिकाणी बांधून ठेवायचे ठरवले.

त्यासाठी तिने एक मोठी दोरी आणली, ती दोरी एका मोठ्या उखळाला बांधली आणि उरलेली दोरी कृष्णाच्या कमरेला बांधण्याचा तिने प्रयत्न केला. पण शेवटी तो कृष्ण.  त्याने लगेच काहीतरी लीला केली आणि ती दोरी काही त्याच्या कमरेपर्यंत येईना, ती अक्षरशः दोन बोट वगैरे कमी पडायला लागली.

 

damodar inmarathi

 

मग यशोदेने घरातून अजून दोर आणले पण तेही कमी पडायला लागले. मग तिने आसपासच्या घरांमधून दोऱ्या आणल्या पण त्याही दोऱ्या कमी पडायला लागल्या. मग तिने गोकुळातून सगळ्यांच्या घरातून दोऱ्या आणल्या पण त्याही कमी पडायला. म्हणजे फक्त दोन बोट कमी.

 

कृष्ण आपला हसत उभा होता.

शेवटी आई इतकी धावते आहे, दोऱ्या गोळा करते आहे आणि आता ती दमलीय हे पाहून त्याने मग स्वतःचं दोरीला गुंडाळून घ्यायचे ठरवले. आणि आश्चर्य म्हणजे यावेळेस पहिली एक जी दोरी होती तीसुद्धा पुरली. याच घटनेमुळे त्याचं नाव दामोदर पडलं.

मग यशोदा म्हणाली की, “बस आता एकाच ठिकाणी तुला कुठे जाता येणार नाही, खोड्या करता येणार नाहीत.” आणि ती निघून गेली. यशोदा गेल्यावर कृष्णाने त्या उखळासकट फिरायला सुरुवात केली.

 

krishna 3 inmarathi
pinterest

 

तो उखळ तसा खूप मोठा होता. तो फिरत फिरत बागेत गेला आणि फिरताना दोन झाडांच्या मध्ये तो मोठा उखळ अडकला. कृष्ण तसाच पुढे जात होता आणि ती दोन झाडं मोठा आवाज करत गडगडाटासह पडली.

आश्चर्य म्हणजे त्या दोन झाडात नलकूवर आणि मनिग्रिव यांचे आत्मे त्या बंदिस्त होते. त्यांच्या पूर्वजन्मात त्यांना कोणीतरी शाप देऊन त्या झाडांमध्ये बंद केले होते आणि ते आता शापमुक्त झाले. त्यासाठी त्यांनी श्रीकृष्णाचे आभार मानले.

 

krishna 1 inmarathi
pinterest

 

काहीजणांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली त्यांनी ती यशोदेला जाऊन सांगितली. यशोदा घाबरून आली कारण तिला वाटलं एवढी दोन मोठी झाडं माझ्या मुलावर पडली तर काय होईल! पण कृष्णाला काही झाले नाही हे पाहून तिचा जीव भांड्यात पडला.

आणि तिने कृष्णाची दोरी सोडली. या दोन घटनांमुळे कृष्णाला दामोदर असं म्हटलं जातं.

ही घटना कार्तिक महिन्यात घडली म्हणून कार्तिक महिन्याला दामोदर मास असंही म्हटलं जातं. म्हणूनच कार्तिक महिन्यात श्रीकृष्णाची पूजा केली जाते त्याला तुपाच्या दिव्याने ओवाळले जाते.

 

krishna 4 inmarathi

 

श्रीमद्भागवतमध्ये या घटनेचे वर्णन किंवा निरूपण असं केलं आहे की, ईश्वराला प्राप्त करण्याची माणसाची इच्छा ही नेहमी दोन बोट कमी पडते. माणसाची मनापासूनची इच्छा आणि भगवंताची कृपा झाली तर ईश्वराला प्राप्त करणे अवघड नाही.

श्रीकृष्णाला दोरीने बांधणे अवघड आहे, कुठलीही दोरी इतकी शक्तिशाली नाहीये, पण देवाला प्रेमाच्या धाग्याने जोडून ठेवता येतं आणि देवाला पण असे भक्त हवे असतात असाच याचा मतितार्थ.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?