लहान मुलांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारामागची दोन भावंडांची ‘सत्य कथा’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारतात शौर्य पुरस्कार नावाजलेल्या आणि मानाच्या पुरस्कारांपैकी एक आहे. आपल्या जीवावर उदार होऊन अतुल्य शौर्य गाजवणाऱ्या लहान मुलांना हा पुरस्कार दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, हा पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो आणि हा पुरस्कार देण्यामागे काय कथा आहे? नाही! चला तर मग जाणून घेऊया!

२६ ऑगस्ट १९७८ ला नेव्ही ऑफिसर मदन चोपडा यांची दोन मुले गीता आणि संजय हे दोघे युवा वाणी या ऑल इंडिया रेडीओच्या कार्यक्रमासाठी जात होते. संजय हा बॉक्सर होता आणि त्याची बहिण गीता हिला नाच–गाण्याचा खूप छंद होता. नेव्ही ऑफिसरची मुले असल्याने मुळातच ती दोन्ही भावंडे खूप धाडसी होती.
हि दोन्ही भावंडे ६:१५ मिनटांनी घरातून निघाली होती आणि सात वाजेपर्यंत ते आकाशवाणी केंद्रात पोहचणे अपेक्षित होते. या दोघांना त्यांचे वडील मदन चोपडा ९ वाजता स्वतः आकाशवाणी केंद्रातून आणण्यास जाणार होते.
जेव्हा त्यांची आई रीमा आणि त्यांच्या कुटुंबियांनी रेडीओ चालू केला तेव्हा त्यांना दुसराच कोणतातरी कार्यक्रम सुरु असल्याचे लक्षात आले. त्यांना वाटले की, कार्यक्रम रद्द झाला असेल.
९ वाजता मदन चोपडा मुलांना आणण्यासाठी आकाशवाणी केंद्रामध्ये गेले, पण तिथे मुले नव्हतीच, त्यांना सांगण्यात आले की दोन्ही भावंडे तिथे पोचलीच नव्हती. त्यांनी घरी पत्नीला फोन लावून मुलांबद्दल विचारणा केली असता तिने देखील मुले घरी आली नसल्याचे सांगितले.

दुसरीकडे पोलिसांना एका अपहरणाची सूचना अगोदरच मिळाली होती. सांयकाळी ६:४५ वाजता भगवान दास यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला आणि ते म्हणाले की,
बंगला साहब गुरुद्वाऱ्याच्या बाजूने नोर्थे एवेन्युला जात असताना एका फियाट गाडीमध्ये दोन लहान मुलांना जबरदस्ती घेऊन जाताना मी पाहिले.
भगवान दास यांनी तेथे उपस्थित लोकांच्या मदतीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. भगवान दास यांनी गाडीचा नंबर HRK ८९३० आहे असे नमूद केले.
त्याच दिवशी राजेंद्र नगर पोलीस ठाण्यामध्ये २३ वर्षाच्या इंदरजीत नामक युवकाने अशीच एक तक्रार केली. इंदरजीतने सांगितले की,
शंकर रोडवर एका गाडीमध्ये दोन मुलांना जबरदस्ती नेले जात होते आणि त्यांना मारहाण सुद्धा केली जात होती. त्याने याची विचारणा केली असता, त्या वाहन चालकाने गाडी जोराने पळवली आणि भरधाव वेगाने तो निघून गेला. त्या गाडीचा नंबर HRK ८९३० असा होता.
पण पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी ही घटना आपल्या हद्दीत घडली नसल्याचे सांगत तक्रार नोंदवण्यास नकार दिला. पुढे या केस मध्ये दोन्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले.
दुसरीकडे वरील गोष्टींबद्दल काहीच कल्पना नसलेले मदन चोपडा यांनी आपल्या नेव्हीच्या सहकाऱ्यांबरोबर मिळून धौलाकुंआ पोलीस ठाण्यामध्ये रात्री १० वाजता तक्रार दाखल केली.
जवळपास १५ मिनिटांनी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. त्या मुलांचा सगळीकडे शोध घेण्यात आला. त्यांच्या मित्रांच्या घरांपासून, रुग्णालय ते रेस्टॉरंटपर्यंत सगळीकडे शोधण्यात आले परंतु मुले कुठेच सापडली नाहीत.
शेवटी असा संशय व्यक्त केला गेला की, मुलांना ठार मारून रिजच्या जंगलामध्ये टाकण्यात आले असावे. इंदरजीतने जिथे गाडीला पहिले होते, तिथून रिज हा भाग जवळच होता.

त्यावेळी या मुलांचे कॉम्बिंग ऑपरेशन करणारे कमिश्नर के.के.पॉल यांनी आपले लक्ष रिजवर केंद्रित केले. तेव्हा ३० पेक्षा जास्त गाड्या १४० पोलीस आणि अनेक नेव्ही ऑफिसर मुलांना संपूर्ण दिल्लीमध्ये शोधण्यात गुंतले होते.
अंधारामध्ये आणि भर पावसात मुलांना रिजमध्ये शोधणे खूप कठीण होते. रात्री अडीच वाजेपर्यंत शोधकार्य सुरु होते, पण मुले काही मिळाली नाहीत.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून संशयितांच्या गाडीचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना समजले की ती गाडी पानिपत मध्ये राहणाऱ्या रविंदर गुप्ताची आहे.
पोलीस पानिपतला पोहचले, पण ती गाडी फियाट नव्हती आणि त्या गाडीची कंडीशन अशी नव्हती की, दिल्लीला जाऊ शकते. पोलिसांच्या लक्षात आले की,अपहरण करणारे खोट्या नंबर प्लेटचा वापर करत आहेत.
२९ ऑगस्टला एका गुराख्याला रिजमध्ये एका मुलीचा मतदेह आढळला. हा मृतदेह रस्त्यापासून ५ मीटर लांब होता. लगेचच त्या गुराख्याने पोलिसांना सूचना केली. हा मृतदेह गीताचाच होता.
काहीवेळ शोधल्यानंतर पोलीसांना गीतापासून ५० मीटर लांब झाडांमध्ये संजयचा मृतदेह आढळला. दोघांची त्यांच्या कुटुंबियांकडून ओळख पटली.

मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. त्या दोघांवर खूप घाव करण्यात आले होते, यावरून हे सिद्ध झाले की, त्यांनी त्या गुन्हेगारांचा खूप धाडसाने विरोध केला होता.
पण अखेर त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. मुलांवर लैंगिक अत्याचार झाले होते का, याबाबत काहीच निष्पन्न झाले नाही कारण मृतदेहामध्ये डिकंपोजिशन सुरु झाले होते.
या प्रकरणाला संपूर्ण मिडीयाने उचलून धरले. लोकसभेमध्ये सुद्धा हंगामा झाला. राज्यसभेमध्ये पंतप्रधान मोरारजी देसाईंचा राजीनामा मागण्यात आला. ३१ ऑगस्टला अपहरणकर्त्यांची गाडी मसजिल पार्कमध्ये मिळाली.
अथक तपासानंतर रंगा आणि बिल्ला या दोन गुन्हेगारांचे नाव समोर आले. रंगा म्हणजेच जसवीर सिंह आणि बिल्ला म्हणजे कुलजित सिंह. या हत्याकांडामध्ये त्यांचा हात असल्याचे सिद्ध झाले.

८ सप्टेंबर १९७८ मध्ये त्यांना कालका मेलमधून पलायन करत असताना पकडले गेले. त्यांच्याकडे ते निर्दोष असल्याचे काहीही पुरावे नसल्यामुळे २६ नोव्हेंबर १९७९ मध्ये उच्च न्यायालयाने या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली.
शेवटी ३१ जानेवारी १९८२ मध्ये दोघांना तिहार जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यावेळी इंदिरा गांधी यांचे सरकार होते. मुलांनी केलेल्या प्रतिकाराच्या आणि त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ इंदिरा गांधीनी गीता आणि संजय चोपडा या दोन भावंडांच्या नावाने धाडसी मुलांना शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आणि तेव्हापासून दरवर्षी कठीण प्रसंगात साहस दाखवणाऱ्या लहानग्यांना शौर्य पुरस्कार दिला जातो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.