' उगवला चंद्र पुनवेचा! – InMarathi

उगवला चंद्र पुनवेचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

२६ जानेवारी,२०१९ रोजी पुण्याहून मनमाडला मला ‘पुणे – हावडा’ या दुरांतो एक्सप्रेसने यायचे होते. दुपारी तीन वाजता स्टेशनवर मला सोडायला माझा भाऊ विवेक आणि बहीण वासंती(आक्का) आले होते. त्यांनी मला डब्यात बसवलं, आणि ते निघून गेले. मला रेल्वे प्रवासात साईड लोअर बर्थ आवडतो. तो त्या दिवशी न मिळाल्याने मन थोडंसं खट्टू झालं होतं. दोन्ही बॅग्ज जागेवर लावून माझ्या बर्थवर मी स्थानापन्न झाले. माझ्या शेजारच्या बर्थवर एक प्रौढ बाई ब्लँकेट ओढून पहुडलेल्या होत्या. काश्मीरी एम्ब्रॉयडरीचा साधा, फिका केशरी -अबोली रंगाचा पंजाबी ड्रेस व केसांचा आखुड बॉयकट. डोळयांवर चष्मा. टीसीने आल्यावर त्यांना नाव विचारलं…. त्यांनी सांगितलं “वाडेकर ”. मी ही टीसीला माझं नाव सांगितलं.

दुरांतो एक्सप्रेस असल्यामुळे थोड्या वेळाने रेल्वेचा वेटर आला. “आप व्हेज लोगी की नॉनव्हेज?” हा प्रश्न त्याने विचारताच त्या म्हणाल्या, “मुझे कुछ नही चाहिये!” “फिर भी? कुछ तो लोगी?” “अरे भैय्या, मुझे कुछ भी नहीं चाहिये!” वेटरच्या आग्रहाला त्या जुमानत नाहीयेत, हे पाहून मी त्यांना म्हटलं, “अहो, आपल्या तिकिटात फूड इनक्ल्यूडेड असतंच. काही तरी घ्या थोडंसं”. हे कळाल्यावर त्या अगदी नाईलाजाने म्हणाल्या, “ठीक है, व्हेज लाओ!”

गाडी निघाली. बेडींगचं पॅकेट उघडून आम्ही आपापल्या बर्थवर चादरी टाकल्या. थंडी बरीच होती. त्यामुळे ऊबदार चादर- ब्लँकेट ओढून पडलो. बराच काळ दोघीही शांतपणे झोपून राहिलो.

दौंड आल्यावर मी उठले आणि माझं रेल्वे संबंधीचं ज्ञान पाजळत म्हटलं, “दौंड आलं! आता गाडी बराच वेळ येथे थांबेल. आणि या गाडीत ना, बरंच काही खायला देतात ते घ्यायचं अहो! काही हलदीरामचे वगैरेही पॅकेट्स देतात. आत्ता खायचे नसले तर ठेवून द्या बॅगेत. कुठे जाणार तुम्ही ?” असं विचारल्यावर त्या उठल्या. मांडी घालून बसत म्हणाल्या, “भुसावळला.” “अच्छा! भुसावळला असता का तुम्ही?” त्यावर त्या म्हणाल्या, “नाही. मी पुण्यात आणि मुंबईत असते. आता इथून भुसावळहून मला चोपड्याला जायचंय. तिथे मी स्पर्धेला चाललेय.” त्यांचं वय पाहता मी म्हणाले, “परीक्षक म्हणून ना ? कसल्या स्पर्धा आहेत?” त्या म्हणाल्या, “नाट्यगीत गायनाच्या.” “अरे वा! आम्हाला पण गाण्यात खूपच इंटरेस्ट आहे. नाट्यगीत गायनाच्या अजूनही स्पर्धा होतात हे ऐकून मला खूप छान वाटलं”, मी म्हटलं.

आणि पुढे सहज विचारलं, “तुमचं नाव काय?” तर त्या अगदी शांतपणे म्हणाल्या, “बकुल पंडित.” मी आश्चर्याने, आनंदाने तीन ताड उडाले!!!

माझे डोळे विस्फारले गेले आणि “क्काय….?” असं म्हणून मी त्यांच्या मांडी घातलेल्या पायांना, त्या तशाच विसावलेल्या पावलांना माझ्या उजव्या हाताने हलकासा स्पर्श केला आणि तो माझाच हात माझ्या हृदयाकडे, कपाळाकडे आणि मस्तकावर नेला! त्या जराशा ऑकवर्ड होऊन म्हणाल्या, ”हे असं काय? काय झालं ?”

“अहो आम्ही केवढेतरी भक्त आहोत तुमचे! ‘उगवला चंद्र पुनवेचा’ या तुमच्या गाण्याची केवढी जबरदस्त मोहिनी गेल्या चाळीस वर्षांपासून आमच्या मनावर आहे!”

मी उत्साहाने, आनंदाने, त्यांच्याविषयीच्या आदराने जणू सळसळत होते! ‘आज मी ब्रह्म पाहिले ‘ या भावनेने मी एकदम भारलेल्या अवस्थेत पोहोचले. त्यांचा चेहरा मात्र अतिशय शांत होता. माझ्या या आश्चर्याच्या, आदराच्या (त्यांनाअतिरेकी वाटणाऱ्या !) प्रतिक्रियेने त्या जराही विचलित झाल्या नाहीत.

आणि मग मी त्यांच्याशी संवाद सुरू केला. म्हणाले, “आचार्य अत्र्यांनी लिहिलं होतं ना हे गाणं? पाणिग्रहण नाटकात? ” त्या म्हणाल्या, “हो! ”
“किती साल होतं ते?” त्या म्हणाल्या, “मूळ नाटक तसं ४६-४७ साली आलं. पण आम्ही ते ७१ मध्ये पुनरुज्जीवित केलं. तेव्हा मी आणि विश्वनाथ बागूल त्या नाटकात होतो.” मी विचारलं,”मी जरा विसरलेय हो,संगीत कोणाचं होतं?” तर त्या म्हणाल्या, “खळे काकांचं- श्रीनिवास खळ्यांचं!”

मग आम्ही खूप काळ पाणिग्रहण नाटकाविषयी बोलत राहिलो. ‘उगवला चंद्र पुनवेचा’ आणि ‘प्रीती सुरी दुधारी’ ही दोन अगदी काळजात रुजली गेलेली गाणी आहेत, हे त्यांना मी पुन्हा सांगितलं.

“त्या गाण्यांची एक ईपी रेकॉर्ड आमच्याकडे भातसानगरला होती आणि शहात्तर -सत्त्याहत्तर साली आम्ही वारंवार, फिरून- फिरून ती सारखी वाजवत असू! त्या रेकॉर्डच्या कव्हरवर तुमचा फोटो होता.” त्यात तुमचा पौर्णिमेच्या चंद्रासारखा गोल, देखणा चेहरा, (गाणं -उगवला चंद्र पुनवेचा ) आणि अतिशय पाणीदार, सुंदर डोळे आणि नाटकाचं नाव – पाणिग्रहण!

या दोन गोष्टींचा अन्योन्यसंबंध इयत्ता सातवीतल्या मी, माझ्या बालमनाने एकमेकांशी जोडला होता!! मी वारंवार तो तुमचा फोटो बघायची. त्या तुमच्या डोळ्यांच्या मी फार प्रेमात पडले होते!

 

bakul-pandit-inmarathi

 

एवढेच नव्हे तर, माझा हा धाकटा भाऊ विवेक, आत्ता आला होता ना, हा आज एक अतिशय चांगला गायक आहे. त्याने आयुष्यात पहिलं गायलेलं गाणं ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे आहे! म्हणजे काय गंमत असायची.. वसमतनगरला आमच्या घराच्या अगदी जवळ आमची शाळा होती. माझा हा भाऊ माझ्याहून सहा वर्ष लहान आहे. घरून तो आणि माझी छोटी बहीण हे त्या काळात केव्हाही शाळेत येऊ शकत! तर हा छोटा मुलगा गातो, असं कळल्यामुळे आमचे गुरुजी त्याला उचलून घ्यायचे, टेबलावर बसवायचे,आणि त्याला गायला सांगायचे…! तर मला आठवतं की त्याने पहिल्यांदा ‘उगवला चंद्र पुनवेचा!’ हेच गाणं म्हटलं होतं, टेबलावर बसून मांडी घालून! तो केवळ तीन -साडेतीन वर्षांचा होता!

त्या काळी ‘आपली आवड’ या आकाशवाणीच्या कार्यक्रमात, ती निवेदिका म्हणायची, ‘आणि कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत,आमच्या असंख्य श्रोत्यांच्या पसंतीवरून, ‘पाणिग्रहण’ नाटकातील, बकुल पंडित यांनी गायलेलं हे नाट्यगीत ….!’ अन् मग असंख्य मनांना मोहित करणारं ते आमचं लाडकं गाणं सुरू होत असे…. ‘उगवला चंद्र पुनवेचा ‘….!

या गीताची पसंती कळवणाऱ्या त्या असंख्य श्रोत्यांमधलेच एक असलेले आम्हीही सारे, असंख्य वेळा मंत्रमुग्ध होऊन ते गाणं ऐकत असायचो! म्हणजे किती बालपणापासून तुमच्या गाण्याचा प्रभाव आमच्यावर आहे बघा!”

त्यावर त्या मंद हसल्या! त्यांच्या प्रसन्न हसण्यामुळे जणू पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाप्रमाणे आसमंत उजळून निघाला असं मला वाटलं.

त्यानंतर मी चोपड्याला असलेल्या त्या नाट्यगीत गायन स्पर्धेची चौकशी केली. त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. चोपड्याच्या ‘संत गजानन बहुउद्देशीय संस्थे’ने आयोजित केलेल्या त्या स्पर्धेच्या जाहीरातीचा फोटोही व्हॉटस अॅपवर दाखवला. पुढे गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितलं की, पंडित कुटुंबीय मूळ वाईचे. आजोबा पुण्यात स्थायिक झाले. वडिल हैदराबादला वैद्यकीय प्रतिनिधी होते. बकुलताईंना स्वतःला वयाच्या दहाव्या वर्षी कळलं की आपण गाऊ शकतो. त्यांनी आई – वडिलांना सांगितलं की मला गाणं शिकायचं आहे! तेव्हा १९५९साली, घरी घेतलेल्या हार्मोनियमवर, हैदराबादच्या त्यांच्या घरी येऊन श्रीयुत भगवान धारप यांनी त्यांना ‘गीतरामायण’ शिकवायला सुरुवात केली. त्यातलं प्रत्येक गाणं कोणत्या रागावर आधारीत आहे, हे ते त्यांना शिकवीत असत, उलगडून सांगत असत. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या घरी रामनवमी ऊत्साहात साजरी होते!

पुढे हैदराबादलाच दिगंबर कामतकर आणि उत्तमराव पाटील, यासारख्या उत्तमोत्तम गुरुजींकडे त्या गाणं शिकल्या. १९६२ झाली हैदराबादला त्यांचा गीतरामायणाचा एक कार्यक्रम देखील झाला! स्टेजवरून सादर केलेला हा त्यांचा पहिला कार्यक्रम!  गाण्यातलं त्यांचं कौशल्य आणि गती पाहून त्यांच्या एका कौटुंबिक स्नेहींनी, (जे वसंतराव देशपांडे यांचे नातेवाईक होते,) त्यांना पुण्यात वसंतराव देशपांडेंकडे गाणं शिकवायला पाठवण्याविषयी आई -वडिलांना सुचवलं.

हैदराबादला असतानाच १९६५ मध्ये ऑल इंडिया रेडिओवरचं सुगम गायनाचं; आणि १९६६ मध्ये शास्त्रीय गायनासाठीचं राष्ट्रपती पारितोषिक मिळालं!

मग १९६६ मध्ये पुण्यात येऊन त्या वसंतराव देशपांडे, त्यानंतर हिराबाई बडोदेकर आणि दाजी ऊर्फ विजय करंदीकर यांच्याकडे गायन शिकल्या. सी.रामचंद्रांच्या ‘गीतगोपाल’ या कार्यक्रमातही १९६६ ते १९६९ या काळात त्या गायल्या. याच काळात राम कदमाच्यांही कार्यक्रमातून त्या गात असत. १९७० साली त्यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ हे, व १९७१मध्ये ‘पाणिग्रहण’ नाटक केलं. पुढे १९७२मध्ये ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकाच्या निमित्ताने त्यांना जितेंद्र अभिषेकींकडे शिकण्याची संधी मिळाली. मी विचारलं “मग त्या काळी तुम्ही संगीत विशारद वगैरे झालात का? “त्यावर त्या म्हणाल्या, “छे! विशारद वगैरे कसलं? मला गाण्याची परीक्षा-बिरीक्षा देण्यात रस नव्हता; पण गाणं शिकायचंच होतं. मी बी.ए.फिलॉसॉफी, पुढे एम. ए.फिलॉसॉफी वगैरे केलं.

पण वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी यांनी मैफिलींमध्ये मला शेजारी बसवून गाण्याचे कार्यक्रम सादर केले. किती थोर आणि विनम्र होते ते लोक बघा!

नाहीतर कोणी म्हणाले असते की, माझ्या शिष्येबरोबर मी कशाला गाऊ? पण त्याकाळी असा गर्व नसायचा! गुरूंच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसून मी गाण्याचे कार्यक्रम सादर केले आहेत ! धन्य होते ते लोक !”

पुढे मुंबईत पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडेही जवळपास वीस वर्षे त्यांनी संगीत साधना चालू ठेवली. राम कदमांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी काही चित्रपट गीतेही गायली. तसंच बोलता बोलताना त्यांनी हेही सांगितलं की ‘अष्टविनायक’ चित्रपटाची नायिका वंदना पंडित ही त्यांची धाकटी बहीण !सर्व कलाक्षेत्रात प्रवीण कुटुंब!

त्यांनी हे ही आग्रहाने आणि आवर्जून सांगितलं की बरेच लोक त्यांना ‘बकुळ पंडित’ म्हणतात. ते चुकीचं आहे . तो मूळ संस्कृत शब्द आहे व त्याचा उच्चार ‘बकुल’ असाच करायला हवा !

मी म्हटलं, “आता वयानुसार माझा आवाज गेला आहे. माझी स्केल खाली गेली आहे. पूर्वी मी उंच, काळी एक मध्ये गाऊ शकत होते. पण रियाजाअभावी सध्या मला गाता येत नाही.” तर त्या म्हणाल्या, “हो बरोबर…. जातो ना ! वयानूसार स्केल खाली जातो. आणि मी सुद्धा काळी चार मध्येच गायचे! ‘उगवला चंद्र पुनवेचा’ पण काळी चारमध्ये आहे.”

“प्रीती सुरी दुधारी पण फारच छान होते.” मी. “ते काळी पाचमध्ये रेकॉर्ड केले खळेकाकांनी.

‘परदेस सजणा का धरिला परदेस’ हे तर पांढरी सात मध्ये रेकॉर्ड केले. ‘कसं काय येत नाही, म्हण … !’ असं मला म्हणून-म्हणून, माझ्या नैसर्गिकपेक्षा वरच्या पट्टीत मला गायला लावून, ते रेकॉर्ड केलं जितेंद्र अभिषेकीबुवांनी!”

मग मी रियाज कसा करायचा याविषयी काही प्रश्न विचारले. मी नुकतंच विवेककडेही रियाजाची ‘अ आ इ ‘ शिकून आले होते. त्यामुळे त्या काय सांगतायत, हे निदान मला कळत तरी होतं! त्यांनी मला रियाजाची त्यांची पद्धत दाखवली. त्यांची परवानगी घेऊन मी त्यांचे रियाजाचे व्हिडिओ घेतले. माझ्या फोनमधे डाऊनलोड केलेला तानपुरा मी सुरू केला. तो स्वर ऐकताक्षणी, त्या उद्गारल्या, “काळी पाच आहे ना ही?” विवेकने आधी सांगितलेलं असल्यामुळे ते मला माहीत होतं. त्या व्यासंगाने मी स्तिमित झाले!

आम्ही पुन्हा ‘उगवला चंद्र पुनवेचा’ कडे वळलो. मी त्यांना विचारलं, “किती साली तुम्ही हे गाणं रेकॉर्ड केलं? तुम्ही किती वर्षांच्या होत्या तेव्हा ?”
त्या म्हणाल्या “४९ सालचा जन्म माझा. ७१ साली केलं हे रेकॉर्डिंग आम्ही. म्हणजे मी तेव्हा २२ वर्षांची होते!” पाणिग्रहण नाटकाच्या त्यावेळच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. नाटकांचे दौरे, त्यासाठी बसने प्रवास करणं, जागरणं करणं याविषयी त्या बोलत होत्या.

मी एखादी अद्भुत कहाणी ऐकावी त्याप्रमाणे चित्त पूर्ण त्यांच्याकडे ठेवून ऐकत होते. “नाट्यगीतं खरंतर खूप आवडायची आम्हाला. पण नंतर नंतर हिंदी- मराठी सिनेसंगीतामध्येच आमचं मन अधिक रमलं.” असं सांगत मी म्हणाले, “संगीत नाटकंही पुढेपुढे कमी कमी होत बंद पडली ना?” त्या म्हणाल्या, “हो ना.बालगंधर्वांच्या काळी जसा असायचा तसा राजाश्रय पुढे लाभला नाही. कमी झाला. संगीतास पोषक अशी नवीन नाटकंही लिहिली गेली नाहीत. अजूनही जुनीच नाटकं सादर होत आहेत. प्रचंड खर्च असतो संगीत नाटक करायचं म्हणजे. हा खर्च उचलू शकणारे निर्माते-प्रायोजक मिळणं दिवसेंदिवस अवघड झालं. म्हणजे लोकाश्रयही कमी झाला. आर्थिक गणिते जमेनाशी झाली. आणि असे कलाकार, जे दिसायला चांगले आहेत, गातात, अभिनय करू शकतात, असे मिळणंही खूप अवघड झालं! त्यामुळे संगीत नाटकं बंद पडली. देशभरात केवळ महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून ओळखला जाणारा संगीत नाटके व त्यातली मनोहर नाट्यगीते हा आपला सांस्कृतिक वारसा, ठेवा हरवत चालल्याचा खेद आम्हां दोघींनाही झाला.

नाट्यगीतांविषयी बोलतांना त्यांनी, बालगंधर्वांचं ‘सत्य वदे वचनाला नाथा!’ हे पद मूळ ‘कत्ल मुझे कर डाला’ या ठुमरीवर कसं आधारित आहे, हे गाऊन दाखवून मला कत्ल करून टाकलं!

गाडी वेगाने पुढे चालली होती.. थोड्या वेळाने “मला गोड खायला खूप आवडतं!” असं म्हणत त्यांनी बॅगेतून डबा काढला आणि एक डिंकाचा लाडू मला दिला. म्हणाल्या, “शेजारच्या आजींनी करून दिले आहेत! खा एक! “अपना हाथ ‘जगन्नाथ’ म्हणत, ‘दीक्षितांना’ सुटी देत, मी तो आवडीने खाल्ला ! आणि मग त्यानंतर त्यांना वेगवेगळे गोड पदार्थ खायला कसं आवडतं… आणि कुठल्याही प्रकारचे डाएटिंग वगैरे त्या करत नाहीत… आणि तिखट मात्र फारसं आवडत नाही हे सांगितलं. त्यांनी पण एक लाडू खाल्ला.

मध्ये एकदा मी विवेकला फोन करून सांगितलं की, माझ्या सहप्रवासी बकुल पंडित आहेत! हे आणि तिकडून त्याची आलेली आनंदाश्चर्याची प्रतिक्रिया ,हे त्या सगळं माझ्याकडे बघत शांतपणे ऐकत होत्या! मग आम्ही लता-आशा- किशोर- मोहम्मद रफी, हिंदी चित्रपट संगीत, आणि नवं संगीत सध्या का रुजत नाहीये… उत्तम गीतकार, उत्तम संगीतकार, सर्वोत्तम गायक – गायिका, नट -नट्या… असा तो सुवर्णकाळ किती मोलाचा होता; अमूल्य होता आणि आपण सगळे त्याचे साक्षी आहोत याविषयीच्या भाग्याची चर्चा केली! शम्मी कपूर गाण्याच्या रेकॉर्डिंगला स्टुडिओत जाऊन रफीसाहेब कसे उच्चार करताहेत, ते बघून तसा अभिनय करत असे, हे त्यांनी मला सांगितलं.

नुकत्याच पुण्यात झालेल्या कार्यक्रमातलं विवेकचं मी फोनवर व्हिडीओ रेकॉर्ड केलेलं गाणं त्यांना इअरफोन्स लावून ऐकवलं. तेही त्यांनी पूर्ण ऐकलं. “पग घुंगरू बांध मीरा नाची थी” हा त्याच्या गाण्याचाआठ दहा मिनिटाचा व्हिडीओ त्यांनी मन लावून पाहिला व ऐकला. कुठेही न कंटाळता किंवा त्याकडे दुर्लक्ष न करता ऐकला. “छान गातात हं तुमचे बंधू!” असं म्हणाल्या. त्या सर्वकाही मनःपूर्वक, अगदी मोकळेपणाने बोलत होत्या. त्यांना मी विचारलं, “तुम्ही मघा टीसीला ‘वाडेकर’ नाव सांगितलं, काय करतात मिस्टर तुमचे?” त्यावर त्या म्हणाल्या, “तुम्ही डॉक्टर आहात, तसे ते पण डॉक्टर आहेत. गायनॅकॉलॉजिस्ट आहेत. आता रिटायर झाले. आधी मुंबईत सायन हॉस्पिटलला टिचींग पोस्टवर होते.” “मुलं किती तुम्हाला ?” मी विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, “मला एकच मुलगी. संघमित्रा नाव तिचं. ती भाषातज्ज्ञ आहे. मराठी, इंग्रजी, जर्मन, संस्कृत, हिंदी वरती तिचे प्रभुत्व आहे. ‘जर्मन टु इंग्लिश ट्रान्सलेशन’ मधे तिने पोस्टग्रॅज्युएट डिग्री घेतलीय आणि मुंबईत त्याच पोस्टवर काम करते”, हे सांगितलं. स्वतःच्या स्मार्टफोनकडे निर्देश करत त्या म्हणाल्या, “हा फोन तिनेच घेऊन दिला. पण हा अगदी दररोज चार्ज करावा लागतो. हा बघा माझा जुना फोन ! आठ आठ दिवस चार्ज नाही केला तरी चालतो. त्यामुळे मी त्याला ‘माझा सोन्या’ म्हणते!” मी मागितल्यावर त्यांनी त्यांचे दोन्ही फोन नंबर मला दिले.
‘सोन्या’ला घरात रेंज येत नाही असंही म्हणाल्या!

आणखी एक मजेची गोष्ट त्यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, “पूर्वी ना, बॉयकट केलेल्या बायका बघितल्या की त्यांना मी हसायचे. म्हणजे काय बाई….! बाई असून बॉयकट करतात, असं म्हणायचे. पण मला पुढे टायफॉईड झाला आणि माझे केस इतके गेले, इतके गेले की केसांचे पुंजकेच्या पुंजके मस्तकावरून निघायला लागले. इतके पातळ झाले केस, की त्यांचा पोनीटेल बांधणं केवळ अशक्यच झालं. मग मला असा हा बॉयकट ठेवणं भाग पडलं! त्यामुळे तुम्हाला सांगते, कधी कोणाला हसू नये हं!”

आमचा प्रवास अतिशय छान चालू होता. मग त्यांच्या गाण्याच्या काही कार्यक्रमांविषयी त्यांनी सांगितलं. आम्ही मूळ मराठवाड्यातले राहणारे म्हटल्यावर त्या म्हणाल्या, “परभणी जवळ सेलू म्हणून गाव आहे. तिथे माझ्या गाण्याचा कार्यक्रम झाला होता. तिथे साईबाबांच्या किंवा साईबाबांच्या गुरूंच्या मंदिरात कार्यक्रम होता .

एक मंडलिक म्हणून, बहुतेक वसंतराव मंडलिक या नावाचे पेटीवादक होते. त्यांनी अतिशय सुंदर पेटी वाजवली होती. हे मला आजही स्मरते.” हे त्यांनी सांगितले. कितीतरी मागे, पंधराएक वर्षांपूर्वी, एका लहानशा गावात झालेल्या कार्यक्रमातलं, केवळ त्यांना साथ देण्यासाठी केलेलं सुरेख पेटीवादन त्यांना, वादकाच्या नावासह आठवत होतं!

पुढे त्या म्हणाल्या, “तुम्ही डॉक्टर आहात म्हणून सांगते. आता मी सत्तर वर्षांची होईन. पण मी एकदम कम्फर्टेबल आहे. बघा ना, मी आता एकटी निघालेय परीक्षक म्हणून, आणि एकटी फिरते आहे की नाही ! मला वाटतं गाण्याने, रियाजाने तुमची व्हायटल कपॅसिटी चांगली राहते, तुम्हाला काही त्रास होत नाही!
रियाज चांगला केला तर तो प्राणायामाइतकाच लाभकारी असतो. तुमची औषधे कशी, इफेक्ट देतात पण साईड इफेक्टही सहन करायला भाग पाडतात. तो वाईट असतो. पण काही गोष्टींमध्ये आपल्याला दुहेरी लाभ होतो. म्हणजे जसं, उसाच्या रसापासून गूळ बनवताना कशी आपोआप काकवीही मिळते. दोन्ही मधुर गोष्टी ! तसं रियाज केला की संगीत तर मिळतंच, सृजनात्मक आनंदही मिळतो, पण चांगलं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही मिळतं! मी तर याला परमेश्वरी कृपा मानते! इतरही बऱ्याच प्रॉब्लेम्स मधून आम्हाला परमेश्वराने सोडवलं…. श्रद्धा पाहिजे. देव असतोच.”

मी त्यांच्याबरोबर माझे काही फोटो घेतले. नेहमीप्रमाणे सेल्फी खराब आले. वरच्या बर्थवर कलकत्त्याला जाणारा एक मुलगा व एक मुलगी बसलेले होते. त्यातल्या मुलीला मी आमचा फोटो घ्यायला सांगितलं. ती मोबाईलवर चार्जर लावून मुव्ही बघत होती. मग त्या मुलाने आमचा फोटो घेतला. ही बाई, त्या दुसऱ्या बाईचे व्हिडिओ आणि फोटो का काढतेय हे त्या अमराठी युवक- युवतीला कळत नव्हतं, आणि कधीच कळणं शक्य नव्हतं!बिचारे अभागी जीव! पण मी मात्र अत्यंत समाधानी होते!

माझी वहिनी, सुचिता फोनवर म्हणाली की, ‘तुझ्यासाठी ट्रेनमध्ये पुनवेचा चंद्र उगवला!’ अगदी बरोबर होतं तिचं म्हणणं ! मीही, माझी त्या स्वरचंद्रिकेशी केवळ भाग्ययोगाने घडत असलेली भेट, कोजागिरी पौर्णिमेसारखी साजरी करत होते!

अतिशय थोर गायिका असूनही अत्यंत साधेपणाने, आपलेपणाने त्या माझ्याशी वागत होत्या. आम्ही दोघीही पाच साडेपाच तास नुसत्या गप्पा मारत होतो आणि एकमेकींविषयी…, खरंतर मी त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेत होते ! मधे एकदा विवेकचं आणि त्याचं फोनवर बोलणंही करून दिलं.

मग ट्रेनमधलं जेवण आलं. पोळ्या गरम होत्या आणि जेवण चांगलं दिसत होतं म्हणून आम्ही दोघींनीही ते उघडलं. स्वतःच्या डब्यातला दुधी हलवा मला वाढत त्या म्हणाल्या, “मला नको हे. मी आणलाय डबा. मला आपला मेथीचा भरडा आणि पोळी हेच खायला आवडेल.”
मग मी त्यांना तरीही रेल्वेतल्या जेवणातला गरम वरण-भात खाण्याचा आग्रह केला. त्यांनी दही-भात खाल्ला. त्या नको नको म्हणत असताना, मी माझ्याकडची तीळ-गुळाची पोळी देत सांगितलं, ही आक्काने केलीये. धपाटंही दिलं आणि सांगितलं की हे सुचिताने, माझ्या वहीनीने बनवले आहेत. ते खाऊन त्यांनी सांगितलं की दोन्ही खूप छान झालंय. धपाटं थोडं तिखट आहे; पण अंगावर येणारं नाहीये. दह्यात केल्यामुळे खमंग-तिखट आहे!

रात्रीचे साडेआठ होत आले होते…. मनमाड जवळ आल्यावर त्या म्हणाल्या, “आता उतरायचं तुला !” ‘मला ‘अहो-जाहो ‘ करू नका ‘ या माझ्या सततच्या आर्जवाला शेवटी-शेवटी फळ मिळालं होतं! मी म्हटलं, “हो… !” “तुला दोन दोन बॅग जड होतील … ” म्हणून मी कितीही अडवलं, तरी माझी बॅग घ्यायला मला मदत करत त्या डब्याच्या दारापर्यंत आल्या.

मूर्तिमंत साधेपणा, निगर्वीपणा, आपलेपणा आणि निखळ, निर्लेप सात्विकता!

मला घ्यायला आलेले माझे यजमान डॉ. सुहास आणि मुलगा सुश्रुतशीही त्या डब्यातून खाली उतरून बोलल्या. फोनवर आधीच कल्पना दिल्यामुळे त्यांना दोघांनाही खूप आनंद झाला होता आणि बकुलताईंना भेटण्याची त्यांनाही उत्सुकता होती. त्यांच्याशीही आपलेपणानं बोलून त्यांनी त्यांच्यासोबत फोटो घेऊ दिले !

थोडया वेळाने ट्रेन त्यांना घेऊन मार्गस्थ झाली….

=====

२६ जानेवारी या आपल्या राष्ट्रीय सणाच्या सुमुहुर्तावर घडून आलेली ही सुमधुर, सुमंगल घटना! माझ्या आयुष्यातला अत्यंत सुदैवी, परमभाग्ययोगाचा तो दिवस !आपल्याला मिळालेलं देखणं रुप, मधुर-मधुरतम स्वर, गळ्यातली फिरत आणि सहजता, लाभलेलं प्रचंड यश आणि कीर्ती या साऱ्याचा नखाएवढाही अहंकार न बाळगणाऱ्या या स्वरपंडिता!

केवळ परमेश्वरी कृपेने मला त्यांचा एवढा पाच-साडेपाच तासांचा, विनाव्यत्यय, निकट सहवास लाभला ! मनमाडच्या वास्तव्याचा व त्यामुळे घडणाऱ्या रेल्वे प्रवासाचा हा केवढा मोठा फायदा!!

घरी आल्यानंतर माझ्याकडून सगळ्यांना, मुख्यत्वे माझ्या सासुबाईंना या अनोख्या प्रवासाची हकीकत ऐकायची होती. मग आधी हॉलमध्ये बसून त्यांना सगळं सांगितलं. आम्ही सर्वांनी मग बोसच्या स्पीकरवर सुश्रुतच्या मोबाईल मधून बकुलताईंची ती चार सुप्रसिद्ध, अजरामर गाणी ऐकली….

‘सजणा का धरिला परदेस ‘,
‘विकल मन आज’ ,
‘प्रीती सुरी दुधारी ‘ आणि अर्थातच
‘उगवला चंद्र पुनवेचा ‘….. !

================

“उगवला चंद्र पुनवेचा ….
मम हृदयी दरिया
उसळला प्रीतीचा
उगवला चंद्र पुनवेचा…. !
दाही दिशा कशा खुलल्या …
वनिवनी कुमुदिनी फुलल्या !
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे
वितळला स्वर्गिचा….!
उगवला चंद्र पुनवेचा…. !”

बकुल पंडितांनी गायलेली ही सर्वच गाणी एकाहून एक सरस, सुरेल आणि अत्यंत देखणी आहेत.

‘उगवला चंद्र पुनवेचा’या गाण्याला तर मी “विश्वमोहिनी” असा किताब दिला आहे! अक्षरशः जीव ओवाळून टाकावा असं हे गाणं! मनातलं दुःख, खंत, वेदना, थकवा ह्या साऱ्या गोष्टींचे मळभ दूर करून निखळ आनंदाची प्रचिती देणारं, आपल्या अंतर्मनाला भिडणारं, त्याला हर्षोल्हासाची भरती आणून रिझवणारं, असं हे दैवी गाणं!

निशिगंध, मोगरा किंवा सोनचाफा यांच्या सोनेरी सुगंधासारखं, ऐहिक आसक्तीसारखं; आणि त्याचवेळी प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे शुद्ध ,शुभ्र, सात्विक-सुवासिक आणि पारलौकिक विरक्तीसारखं!! आचार्य अत्रेंनी अत्यंत नादमय, तालबद्ध शब्दांनी रचलेलं हे गीत. अत्र्यांनी जरी त्या युवतीच्या मनातल्या प्रीतीच्या, प्रणयाच्या भावना व्यक्त करण्यासाठी लिहिलेलं असलं, तरी श्रीनिवास खळेंच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली, मालकंसमध्ये बांधलेली त्या गाण्याची सुंदर चाल, आपल्याला अशा भावनांच्याही पलिकडची एक प्रशांत, सुखद आणि शीतल अनुभूती देते!

बकुलताईंनी त्यांच्या अत्यंत सुमधुर आवाजाने आणि शास्त्रोक्त रागदारीच्या ज्ञानाच्या पूर्ण वापराने या साऱ्यावर जणू कळस चढवलाय. “उगवलाssss चंद्र पुनवेsssचा … ”

ही पहिली ओळ कानावर पडताच तो आवाज आपला संपूर्ण ताबा घेऊन टाकतो. ‘चंद्र’ आणि ‘ह्रदयी ‘ या दोन शब्दांवर दिलेलं नाजूक, पण ठाशीव वजन आणि ‘दरिया’तल्या ‘या’ वरचा तो अल्लड हेलकावा आपल्याला गाण्याकडे खेचून घेतात. त्या सुरेख तानांवर अनेक माना डोलायला लागतात! अलौकिक माधुर्याच्या त्या सुरेख, सुडौल, सुकोमल तरीही भारदस्त स्वराने जणू संमोहित होऊन आपण आजूबाजूच्या साऱ्या गोष्टी विसरतो आणि आपलं मन अलगदपणे एका सुरम्य प्रदेशात जातं … जिथे शांत रात्री पौर्णिमेचा चंद्र आकाशात हसत उभा आहे ….. त्याचा अद्भूत, पिठूर, शीतल, अत्यंत प्रसन्न प्रकाश दाही दिशांमध्ये ओसंडतो आहे…. त्या मंद, सुखद प्रकाशाच्या शांत लहरींवर जणू आपण विहार करत आहोत … एक अनामिक परिमळ आसमंतात दरवळतो आहे…. अंगोपांगी चांदणं लेवून तृप्त झालेल्या, सुखावलेल्या निसर्गाशी जणू आपलं अद्वैत झालेलं आहे…. या दैवी साक्षात्कारात झाडं, वेली, फुलं….. सारेच आपल्याला साथ देत आहेत…. अशा अनेक सुरेख जाणिवा हे गाणं ऐकताना होतात. अशा त्या शीतल, चैतन्यमय प्रदेशात आपल्याला नेऊन सोडून गाणं संपतं!

तरीही त्यातले शब्द, चाल , ताल आणि तानांची स्पंदनं कितीतरी वेळ मनात निनादत राहतात. त्या दिव्य अनुभूतीने मन प्रासादिक होऊन जातं ! गाण्यातला तो अद्भूत तबला , रमणीय हार्मोनियम आणि बाकीचा साधा पण तनामनाला प्रमुदित करणारा वाद्यमेळ खूप काळ कानात गुंजत राहतात!

प्रीती-प्रणय याचा ‘प्र’ देखील माहीत नसलेल्या साडेतीन वर्षांच्या बालकाला, चंद्रप्रकाश आणि प्रणय यांचं अतूट नातं चांगलंच माहीत असलेल्या तरुण पिढीला, प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र असलेल्या आमच्यासारख्या मध्यमवयीन- प्रौढ लोकांना आणि या साऱ्या स्थित्यंतरांमधून पुढे गेलेल्या ज्येष्ठांनाही हे गाणं स्पर्शून जातं. खरंच, केवढं सुखकारक, वेदनाहारक आणि स्वर्गीय सामर्थ्य आहे या गाण्यात!

परमेश्वराच्या अत्यंत लाडक्या असलेल्या, त्याची अगदी खास निर्मिती असलेल्या, बकुलताईंसारख्या काही अतिविशेष व्यक्ती आयुष्यात असं उत्तुंग काम करून दाखवतात!

बकुलताईंना माझे त्रिवार वंदन !

ही चारही गाणी दोन-दोनदा ऐकून, ती मनात व कानात रुंजी घालत असताना, रात्री जवळपास साडेअकरा-बाराला आम्ही निद्रादेवीच्या राज्यात गेलो…. प्रसन्नचित्त आणि अत्यंत तृप्त!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?