श्रीकृष्णाचा विवाह खरंच राधेशी झाला होता का? या प्रश्नाशी निगडीत प्रचलित कथांचा आढावा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भगवान श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झाला नाही असे होत नाही. राधा-कृष्ण असेच नाव आपण घेतो कारण ते वेगवेगळे नाहीतच मुळी! श्रीकृष्ण राधेशी व राधा श्रीकृष्णाशी एकरूप झाले आहेत. त्यांची शरीरं वेगवेगळी असली तरी आत्मा एकरूप झाला. राधा म्हणजे मूर्तिमंत प्रेमाचे, भक्तीचे व समर्पणाचे प्रतिक आहे.

InMarathi Android App

जसे काही लोक समजतात की राधा व श्रीकृष्णाचे एकमेकांवर प्रेम होते, ते प्रेम म्हणजे सिनेमात दाखवतात किंवा कथा कादंबऱ्यांतून रंगवतात ते प्रेम नव्हे! राधा कृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होय!

 

radha-krishna-marathipizza01
pinterest.com

देवाचे आपल्या भक्तावर किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल ते प्रेम म्हणजे राधा-कृष्णाचे प्रेम होय. राधा ही श्रीकृष्णाची प्रेयसी नसून त्याची निस्सीम भक्त होती. तिच्या निस्सीम भक्तीमुळे ती कृष्णाशी अद्वैत पावली होती. त्यांच्यात द्वैत भाव उरलाच नव्हता. तिच्या श्वासात कृष्णनाम होते. कृष्णभक्तीचा तिला ध्यास होता आणि म्हणूनच ती हृदयाने, आत्म्याने कृष्णरुपात विलीन पावली होती.

भौतिक दृष्ट्या जरी ती वेगळी दिसत असली किंवा कृष्ण गोकुळातून मथुरेला निघून गेल्यानंतर सुद्धा ती कृष्णापासून वेगळी नव्हती. तिचे मन, तिचे हृदय, तिचा आत्मा हा कृष्णाशी एकरूप झाला होता. म्हणूनच राधा –कृष्णाचे प्रेम हे भौतिक जगातील प्रेम नसून ती अत्युच्च कोटीची भक्ती होती.

राधा व कृष्ण इतके एकरूप झाले आहेत की आजही हजारो वर्षानंतर सुद्धा श्रीकृष्णाचे नाम राधेबरोबरच घेतले जाते. मंदिरात सुद्धा राधेशिवाय त्याची स्थापना होत नाही आणि म्हणूनच श्रीकृष्णाबरोबरच राधा राणीची सुद्धा पूजा केली जाते.

श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात नंदराजा आणि यशोदा मैयाकडे लहानाचा मोठा होत होता, तेव्हा राधेचा विवाह आधीच अनयशी झालेला होता. राधा श्रीकृष्णापेक्षा वयाने मोठी होती. श्रीकृष्ण जेव्हा कधीच न परतण्यासाठी गोकुळ सोडून अक्रुराबरोबर मथुरेला जाण्यास निघाला तेव्हा त्याचे वय अवघे आठ ते दहा वर्ष इतकेच होते. म्हणूनच राधा कृष्णाचे प्रेम हे भौतिक प्रेम नसावे असाच निष्कर्ष निघतो.

राधा श्रीकृष्णाच्या आयुष्यात भक्ती व प्रेम घेऊन आली व जगात प्रेमाचे प्रमाण म्हणून आज तिचे नाव घेतले जाते. राधा व कृष्णाच्या प्रेमाचे दाखले अनेक लोक देतात पण त्यांचे नाते हे भौतिक नसून पारलौकिक व अध्यात्मिक आहे. तरीही ह्या बाबतीत अनेक समज आढळतात. काही लोक म्हणतात की स्वत: ब्रह्मदेवाने लहानपणीच राधा व कृष्णाचा विवाह लावून दिला होता. पण अनेक लोक हे मानत नाहीत. अनेक लोकांचे अनेक ग्रह आहेत.

श्रीकृष्ण व राधा ह्यांच्या अद्भुत , अलौकिक प्रेमाविषयी अनेक प्रसंग अनेक धर्म ग्रंथात दिले आहेत. असे म्हणतात की एकदा राधेने श्रीकृष्णांना विचारले की,

तुम्ही प्रेम माझ्यावर केलेत परंतु विवाह मात्र माझ्याशी न करता रुक्मिणीशी केलात, असे का ? मला माहिती आहे की तुम्ही साक्षात परमेश्वर आहात आणि तुमच्याच मर्जीने हे जग चालते, तुम्ही एखाद्याचे भाग्य बदलू शकता. तरीही तुम्ही रुक्मिणीशी विवाह केला व माझ्याशी नाही.

राधेचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की,

हे राधे, विवाह होण्यासाठी दोन स्वतंत्र व्यक्तींची आवश्यकता असते. तू मला सांग की आपल्यात राधा कोण व कृष्ण कोण? आपण तर वेगळे नसून एकरूप झालो आहोत. मग विवाह करण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे?

 

radha-krishna-marathipizza02
ibutters.com

पुराणात अशी कथा सांगितली जाते की, नारदमुनींच्या शापामुळे राधा व कृष्ण ह्यांना विरह सहन करावा लागला.

असे म्हणतात की राधा व रुक्मिणी ह्या दोघीही लक्ष्मीमातेच्या अंश आहेत. एकदा भगवान विष्णू ह्यांनी नारदमुनींची परीक्षा घेण्यासाठी आपल्या मायेने एक नगर निर्माण केले. त्या नगरीच्या राजाने आपल्या सुंदर मुलीसाठी स्वयंवर आयोजित केले. त्या स्वयंवरात नारदमुनी सुद्धा गेले आणि कामदेवाच्या प्रभावामुळे राजकन्येचे रूप पाहून तिच्यावर मोहित झाले. ते भगवान विष्णूकडे गेले व त्यांना विनंती केली की,

मला सुंदर रूप प्रदान करा, कारण माझे मन राजकन्येवर जडले आहे व मला तिच्याशी विवाह करायचा आहे.

नारदमुनींचे हे बोलणे ऐकून भगवान हसले व त्यांनी नारदमुनींना वानराचे रूप दिले. जेव्हा नारद मुनी स्वयंवराच्या ठिकाणी पोचले तेव्हा राजकन्येने त्यांच्या गळ्यात वरमाला न घालता विष्णूंच्या गळ्यात घातली. तेव्हा व्यथित होऊन ते परत येत असताना त्यांच्या मार्गात एक तळे लागले. त्या तळ्यात आपले प्रतिबिंब पहिले असता त्यांच्या लक्षात आले कीवानांनी त्यांना वानराचे रूप दिले आहे. तेव्हा नारदमुनींनी विष्णूंना शाप दिला की,

तुम्हालाही आपल्या प्राण प्रियेचा विरह सहन करावा लागेल.

त्यानंतर ह्याच शापामुळे रामावतारात भगवान विष्णूंना सीतामातेचा विरह सहन करावा लागला, तर कृष्णावतारात राधेचा विरह सहन करावा लागला.

 

radha-krishna-marathipizza01
1.bp.blogspot.com

असे म्हणतात की राधा व कृष्ण ह्यांची प्रेम कथा लहानपणापासूनच सुरु झाली होती. राधा श्रीकृष्णापेक्षा वयाने मोठी असली तरी ही गोष्ट त्यांच्या अलौकिक प्रेमाच्या आड आली नाही. एकदा खुद्द लक्ष्मी देविंनीच हे सांगितले होते की त्या स्वत: राधेच्या रुपात पृथ्वीवर आल्या आहेत आहेत.

गर्ग संहितेनुसार राधा व कृष्ण ह्यांचा विवाह स्वतः ब्रह्मदेवांनी लावून दिला होता. जेव्हा नंदमहाराज लहानग्या बाळकृष्णाला कडेवर घेऊन भंडीर नावाच्या गावाला जात असताना अचानक वादळ आले व प्रखर प्रकाशाने आसमंत व्यापून गेले.

अचानक सगळीकडे अंधकार पसरला व नंदमहाराजांना आपल्या आसपास कुठली तरी पारलौकिक शक्ती आहे असे जाणवले. ती शक्ती म्हणजे राधा होती…!

राधा त्या ठिकाणी येताच श्रीकृष्णांनी आपले बालस्वरूप त्यागून किशोर स्वरूप धारण केले व ह्याच वेळी भंडीर जंगलात ब्रह्मदेवाने ललिता व विशाखा ह्यांच्या उपस्थितीत राधा व कृष्ण ह्याचा विवाह लावून दिला. विवाह झाल्यावर सगळे वातावरण सामान्य झाले. सगळे अंतर्धान पावले व श्रीकृष्ण परत बालस्वरुपात आले.

 

radha-krishna-marathipizza00
kmkvaradhan.files.wordpress.com

राधेविषयी आणखी एक प्रचलित कथा म्हणजे राधेचा विवाह कृष्णाशी नाही तर जतिला नामक गोपीच्या मुलाशी म्हणजे अभिमन्युशी झाला होता. ही गोपी जावत नामक गावात राहत होती. अभिमन्यू व राधेचे लग्न झाले, परंतु योग मायेच्याच प्रभावामुळे अभिमन्यू राधेच्या अंगाला हातही लावू शकला नाही. असे म्हणतात की तो त्याच्या कामात सतत व्यग्र असायचा आणि लज्जेमुळे तो पत्नीशी बोलू शकत नसे.

अशा अनेक कथा राधा कृष्ण ह्यांच्या संदर्भात प्रचलित आहेत. त्यांचा विवाह झाला असो किंवा नसो, ते एकरूप आहेत, त्यांचे अद्वैत आहे हे मात्र खरे! राधेची भक्ती ही अलौकिक असल्यामुळेच कृष्णासह राधेची सुद्धा पूजा केली जाते. वृंदावनात तर राधेला अधिष्ठात्री देवी मानले जाते. तेथील लोक कायम राधे राधे असाच जप करीत असतात.

आपल्या नावाच्या आधी राधेचे नाव घेतले जावे ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ह्यांचीच इच्छा होती. त्यांनी सांगितले की त्यांचे नाव न घेताही जो राधेचे नाव घेईल त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा होईल. त्यांच्यासारखे प्रेम व एकरूपता दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. म्हणूनच राधेच्या अत्युच्च कोटीच्या भक्तीचे लोक पूजन करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “श्रीकृष्णाचा विवाह खरंच राधेशी झाला होता का? या प्रश्नाशी निगडीत प्रचलित कथांचा आढावा!

  • August 25, 2018 at 7:04 pm
    Permalink

    माहिती खूप आवडली .अशीच सर्व संतांची माहिती पाठवलीत तर वाचू. पुनच आभारी आहे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *