' क्रांतिकारकांची अतुल्य देशभक्ती: स्वातंत्र्य सूर्य बघण्यासाठी मृत्यूलाही रोखून ठेवले! – InMarathi

क्रांतिकारकांची अतुल्य देशभक्ती: स्वातंत्र्य सूर्य बघण्यासाठी मृत्यूलाही रोखून ठेवले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ब्रिटीशांच्या जुलुमी राजवटीतून भारताला मुक्त करण्यासाठी हजारो लोकांनी प्राणपणाने प्रयत्न केले.

सशस्त्र क्रांतीच्या मार्गापासून तर अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करून इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांनी अनेक हाल अपेष्टा सहन केल्या.

प्रसंगी प्राणाची आहुती देण्यासही मागे पुढे पाहिले नाही. त्यांच्या ह्या त्यागामुळेच आज भारत स्वतंत्र आहे.

ह्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या अनेक क्रांतीकारकांची नावे आपल्याला माहिती आहेत. परंतु असेही काही अनामिक आहेत ज्यांचे ह्या स्वातंत्र्ययज्ञात मोलाचे योगदान असूनही आपल्याला अनेकांची नावे माहिती नाहीत.

असेच एक क्रांतीकारक ज्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार झालेले बघण्यासाठी मृत्यूलाही १५ ऑगस्ट पर्यंत थांबवून ठेवले ते म्हणजे सरदार अजित सिंग!

 

sardar-ajit-singh-inmarathi
jatland.com

 

सरदार अजित सिंग हे शहीद भगतसिंग ह्यांचे काका होते. लोकमान्य टिळक हे सरदार अजितसिंग ह्यांच्याबद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की,

“सरदार अजितसिंग हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याच्या योग्यतेचे आहेत.”

लोकमान्य टिळकांनी सरदार अजितसिंग ह्यांच्याबद्दल जेव्हा हे उद्गार काढले तेव्हा ते फक्त २५ वर्षांचे होते.

सरदार अजितसिंग ह्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८८१ रोजी जालंधर जिल्ह्यातील खटकर कलां या गावात झाला.

त्यांचे संपूर्ण कुटुंबच देशसेवेसाठी वाहून घेतलेल्यांचे होते. सरदार अजितसिंग ह्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण जालंधर येथील सैन्दास अँग्लो संस्कृत स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी बरेली येथील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात पूर्णवेळ भाग घेण्यासाठी कायद्याचे शिक्षण सोडले.

शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी सरकारी कचेऱ्या व कोर्टात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी १९०६ साली ट्रेड युनियनची स्थापना केली.

येथेच त्यांच्या समाजसेवी कार्याची मुहूर्तमेढ झाली. त्यांनी गरीब ,अनाथ व विधवांच्या कल्याणासाठी कार्य केले.

 

sardar ajit singh-inmarathi
thepinsta.com

 

सरदार अजितसिंग हे “पगडी संभाल जट्टा” ह्या चळवळीचे नायक होते.

कोलकाता येथील दादाभाई नवरोजी ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाला गेले होते. तेथे त्यांना स्वातंत्र्यलढ्याबद्दल पंजाबमध्ये जनजागृती करण्याची कल्पना सुचली.

ह्यानंतर क्रांतिकारक सुफी अंबाप्रसाद ह्यांची तुरुंगातून सुटका झाली व ते सरदार अजितसिंग ह्यांना भेटले.

ह्या दोघांनी मिळून “भारतमाता सोसायटी”ची स्थापना केली. ही संघटना भारतातील पहिल्या काही क्रांतिकारक संघटनांपैकी एक होती.

ब्रिटीश सरकारने लाहोर व अमृतसर येथील जाट शेतकऱ्यांवर अन्यायकारक कर लादले तेव्हा ह्याचा भारतमाता संघटनेने निषेध केला.

सरदार अजितसिंग ह्यांनी गावोगावी जाऊन तेथे सभा घेऊन लोकांमध्ये पाण्यासाठीचा कर व अन्य कर देण्याविरूद्ध जनजागृती केली.

या कार्यासह सरदार अजितसिंग ह्यांनी भारताच्या घटनेचा कच्चा आराखडा सुद्धा तयार केला होता. तसेच त्यांच्यासारख्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या देशातल्या तसेच परदेशातल्या क्रांतिकारकांना संपर्क करण्यासाठी एक गुप्त कोड तयार केला होता.

 

sardar ajit singh-inmarathi01
thewire.in

 

१९०७ साली ब्रिटीश सरकारने लाला लजपतराय व सरदार अजितसिंग ह्यांना अटक करून मंडाले येथे हद्दपारीच्या शिक्षेसाठी पाठवले होते. परंतु त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न मिळाल्याने ब्रिटीश सरकारला त्यांना सहा महिन्यातच मुक्त करावे लागले.

नंतर सरदार अजितसिंग अज्ञातवासात गेले. त्यांनी गुप्त राहून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.

मंडाले येथून सुटका झाल्यानंतर ते इराणला गेले. तेथे त्यांनी सुफी अम्बाप्रसाद ह्यांच्यासह समविचारी तरुणांना एकत्र करून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले.

त्यांच्या संघटनेत हृषीकेश लेथा, झिया उल हक, ठाकूर दास धुरी ह्यासारखे क्रांतिकारक होते. १९१० साली ब्रिटीश सरकारची ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर नजर गेली.

ही संघटना “द हयात” हे नियतकालिक प्रसिद्ध करायची. ब्रिटीशांना संशय आल्यावर सरदार अजितसिंग इराण हून रोम, जिनेव्हा, रियो दे जानेरो, पॅरिस, टर्की, जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान ह्या ठिकाणी गेले. तेथेही त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आपले कार्य सुरूच ठेवले.

१९१८ साली त्यांचा संपर्क सॅन फ्रांसिस्को येथील गदर पार्टीशी आला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी सुद्धा सरदार अजितसिंग ह्यांनी स्वातंत्र्यलढा सुरूच ठेवला.

१९३९ साली ते युरोपला परत आले व नंतर त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना इटलीमध्ये त्यांच्या कामात मदत केली.

त्यांनी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत सुद्धा मोठे योगदान दिले. त्यांनी नेताजी ह्यांची हिटलर व मुसोलिनी ह्यांच्याशी भेट घडवून आणली.

 

sardar ajit singh-inmarathi02
thewire.in

 

मुसोलिनी तर अजितसिंग ह्यांचा आदर करीत असत. ह्या सर्व प्रवासात सरदार अजितसिंग ह्यांनी जवळजवळ ४० भाषांवर प्रभुत्व मिळवले होते.

रोम रेडीयोचे नामकरण त्यांनी “आझाद हिंद रेडियो” असे केले होते. ह्या रेडीयोच्या माध्यमातून त्यांनी क्रांतीचा प्रचार व प्रसार केला. ते रोम मध्ये असताना ब्रिटीश सरकारने त्यांना अटक केली.

१९४६ साली भारतात अंतरिम सरकार स्थापन झाले होते. तेव्हा लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडे सरदार अजितसिंग ह्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

भारताचे परराष्ट्र मंत्री व्ही.के. सिंग ह्यांना अजितसिंग ह्यांची सुटका करण्यात यश मिळाले. मार्च १९४७ साली सरदार अजितसिंग भारतात परत आले.

ते परत आल्यानंतर त्यांची ओळख पटवून घेण्यासाठी त्यांची पत्नी श्रीमती हरनाम कौर ह्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले कारण इतक्या वर्षात सरदार अजितसिंग इतके बदलले होते की, त्यांच्या पत्नीला सुद्धा त्यांना ओळखणे अवघड झाले होते.

सरदार अजितसिंग ह्यांच्या त्यागासह त्यांच्या पत्नीनेही खूप मोठा त्याग केला आहे. आयुष्याची ४० वर्ष ह्या माउलीने एकाकी व तपस्वी जीवन जगण्यात घालवली.

भारतात परत आल्यानंतर सरदार अजितसिंग ह्यांची तब्येत बिघडली. ते तब्येत सुधारण्यासाठी त्यांच्या पत्नीसह डलहौसी येथे गेले. तेथ त्यांनी स्प्रिंग हॉटेल येथे वास्तव्य केले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री १२ वाजता जेव्हा स्वातंत्र्य घोषित झाले तेव्हा डलहौसीचे अनेक रहिवासी ही बातमी सांगायला व स्वातंत्र्यदिन साजरा करायला सरदार अजितसिंग ह्यांना भेटायला स्प्रिंग हॉटेल येथे गेले.

त्यांची तब्येत तेव्हा फार बरी नव्हती. त्यात फाळणीच्या बातमीने ते व्यथित झाले होते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जाताना त्यांचे शेवटचे शब्द होते की,

“अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले. माझा देश स्वतंत्र झाला. आता मी सुखाने निरोप घेऊ शकतो. जय हिंद!”

असे म्हणून त्यांनी डोळे मिटले ते कधीही न उघडण्यासाठीच! त्यांच्या मृत्यूने देश एका महान क्रांतीकारकाला मुकला.

 

ajit-singh-inmarathi
india.com

 

आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहून घेतलेल्या ह्या तपस्व्याने मृत्यूला सुद्धा देश स्वतंत्र होईपर्यंत जणू थोपवून ठेवले होते. आपले कर्तव्य पूर्ण झाले हे कळताच त्यांनी प्रयाण केले.

आज सरदार अजितसिंग हे नाव फार कुणाला माहित नाही. त्यांची समाधी डलहौसी मधील पंजपुल्ला येथे आहे हे सुद्धा फार कमी लोकांना माहित आहे.

देशासाठी आपले सर्वस्व वाहिलेल्या सरदार अजितसिंग ह्यांना मानाचा मुजरा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?