लेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

झुंडी नेहमी भावनांच्या दोन टोकात वावरतात. झुंडींना मधली स्थिती कधीही माहित नसते. झुंडींची तुलना रानटी किंवा अडाणी माणसाशी करता येईल. रानटी माणूस फ़क्त ढोबळ गोष्टी तेवढ्या पहातो. झुंडींनासुद्धा ढोबळ गोष्टी तेवढ्या समजतात्त, सुक्ष्म विचार त्यांना करता येत नाही. झुंडी टोकाची भूमिका घेतात. तसेच त्या अंधश्रद्धाळूही असतात. कसल्याही गोष्टीवर त्यांचा चटकन विश्वास बसतो. झुंडीच्या या स्वभावामुळे शंका घेणे, ही गोष्ट त्यांच्या रक्तातच नसते.

झुंडींना एखाद्या गोष्टीचा संशय येतो न येतो, इतक्यात त्या घटनेचे रुपांतर शाश्वत सत्यात झाले म्हणून समजा. नापसंतीचे रुपांतर दुसर्‍या क्षणी द्वेषात झाले नाही तर झुंडींना चैन पडणार नाही. झुंडी रागाच्या आहारी जातात. झुंडींच्या जागी जबाबदारीची भावना अभावानेच असते. त्यामुळे झुंडींच्या, विशेषत: बहुजिनसी झुंडींच्या मनोविकाराची तीव्रता फ़ार झपाट्याने वाढत जाते. झुंडीत सामील होताच माणसे स्वत:च्या उणिवा लगेच विसरून जातात. उलट आपण कोणीतरी फ़ार शक्तीमान दैवी पुरूष आहोत असे त्यांना वाटू लागते. झुंडीत गेलेल्या मुर्ख, अज्ञ, मत्सरी माणसांना स्वत:च्या क्षुद्रतेचा, लाचार स्वभावाचा व भेकडपणाचा तात्काळ विसर पडतो आणि स्वत:ला ती उदार, प्रतापी व शूर समजू लागतात.

झुंडी अतिरेक करतात, पण हा अतिरेक साधारणपणे वाईट बाबतीत असतो, चांगल्या बाबतीत नाही. झुंडीत शिरताच माणसे आदिम माणसाची सांस्कृतिक पातळी गाठतात असे आपण म्हटले, त्याचा हा परिणाम असतो. एकटा माणूस शिक्षेला घाबरून सरळ मार्गाने जातो. झुंडींना शिक्षेची तमा नसते. म्हणून त्या वाटेल तशा वागू शकतात. मात्र याचा अर्थ असा नाही की झुंडी नेहमीच वाईट कृत्ये करतात. झुंडींच्या उत्साहाला कौशल्याने वळण दिले तर त्याच झुंडी पराक्रमाची आत्मत्यागाची आणि औदार्याची कृत्ये करू शकतात. उदात्त गुणांचा प्रत्ययसुद्धा एकेकट्या व्यक्तीपेक्षा झुंडीच अधिक प्रमाणात देतात. ( झुंडीचे मानसशास्त्र, पृष्ठ ३७-३८)

गेल्या आठवड्यात त्रिपुराचे निकाल लागल्यानंतर देशाच्या विविध भागात पुतळे फ़ोडण्याची व विटंबित करण्याची नवी लाट आलेली आहे. त्यामागे झुंडीची मानसिकता दडलेली आहे. त्याची सुरूवात त्रिपुरातील भाजपाच्या विजयाने झाली, म्हणून मग त्याचे खापर त्या पक्षावर किंवा संघावर फ़ोडले जाणे स्वाभाविक आहे. पण भाजपाच्या वा तत्सम विचारधारेच्या लोकसंख्येत वा झुंडीतच अशा आक्रस्ताळ्या प्रतिक्रीया येतात, असे मानायचे काही कारण नाही. तसे नसते तर प्रगत मानल्या जाणार्‍या युरोप खंडातल्या अनेक देशात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक मोठे दिव्यभव्य पुतळे वा स्मारके जमिनदोस्त करण्याची झुंबड उडाली नसती. तो मानवी स्वभावाचा एक अपरिहार्य घटक आहे. त्यात प्रगत सुशिक्षित वा बुद्धीमान असला भेदभाव करून चालत नाही.

 

Lenin-statue-inmarathi
dhakatribune.com

उलट अनेकदा बुद्धीमान लोकांच्या झुंडीने अडाण्यांपेक्षा भीषण कारवाया केल्या आहेत. त्याच्याशी त्यांच्या तल्लख बुद्धीमत्ता वा सुशिक्षित असण्याशी काडीमात्र संबंध नाही. त्यावेळी वा ठराविक कालखंडात अशी माणसे झुंडीत सहभागी होत असल्याने त्या घटना घडत असतात. त्याची सुक्ष्म कारणे उपरोक्त परिच्छेदामध्ये आलेली आहेत.

माणूस हा टोळीनेच जगत असतो आणि प्राण्याच्या कळपाची प्रवृत्ती माणसातही तितकीच ठासून भरलेली आहे. उलट आधुनिक शिक्षण, मिळवलेले ज्ञान वा आत्मसात केलेली बुद्धी; ह्या वरवरच्या गोष्टी असतात. त्या वरच्या कवचाला छेद दिला वा गेला, मग क्षणार्धात मुळची कळपवृत्ती उफ़ाळून बाहेर येत असते आणि आपला प्रभाव दाखवित असते. कारण सुशिक्षितपणा वा ज्ञानार्जन, ह्या लादलेल्या गोष्टी असतात आणि कळपवृत्ती ही उपजत असते. शिक्षण वा बुद्धी तुम्हाला संयम शिकवते. पण त्या सोशिकतेचा कडेलोट झाला, मग उपजतवृत्ती ज्वालामुखीसारखी उफ़ाळून येते. प्रामुख्याने पोषक वातावरण जाणवले, की त्या रानटी वृत्तीला चालना मिळत असते. त्रिपुरात त्याचीच प्रचिती आलेली आहे.

लेनिनच्या पुतळ्याच्या उध्वस्तीकरणाकडे जाण्यापुर्वी त्रिपुरात भाजपाला इतके मोठे यश कशाला मिळाले, त्याचे विश्लेषण अगत्याचे ठरावे. तिथे विविध कळपात, गटात विभागल्या गेलेल्या मोठ्या लोकसंख्येला डावी आघाडी वा कम्युनिस्ट नावाच्या एका अल्पसंख्य कळपाने ओलिस ठेवलेले होते. छोट्या कळपांना एकेकटे गाठून त्यांना भयभीत करण्यावर त्रिपुरात दिर्घकाळ डाव्या आघाडीची सत्ता चालू राहिली होती. तिची दहशत किती भयंकर होती, त्याची साक्ष मतदान होऊन निकाल येईपर्यंत लोकांनी पाळलेल्या संयमात मिळू शकते.

डाव्यांचा तिथे पराभव होऊ शकतो, यावर देशातल्या कुठल्या पत्रकाराचा वा जाणत्याचाही विश्वास नव्हता. मग पुन्हा तेच सत्तेत आले तर आपल्या विरोधाचे शिरकाण होण्याच्या भयाने कोण मतदार उघड बोलू शकणार होता?

म्हणून निवडणूक काळात तिथे भयाण स्मशानशांतता होती. पण आजवरच्या दहशतीचे निर्दालन करण्यासाठी तिथल्या बहुसंख्य मतदाराने कंबर कसलेली होती. त्याचेच प्रतिबिंब निकालात पडलेले आहे. मात्र तो दिसतो तसा भाजपाचा राजकीय विजय नसून, डाव्यांच्या दहशतीचा केविलवाणा पाडाव आहे. ते काम आधी तॄणमूल वा कॉग्रेसने नेटाने हाती घेतले असते आणि डाव्यांच्या दहशतीला उलथून पाडण्याच्या आकांक्षांना खतपाणी घातले असते; तर तिथे भाजपाऐवजी अन्य कुणाचा विजय होताना दिसला असता. पुतळा पाडण्यापासून अनेक गावातल्या डाव्यांच्या कार्यालयावर हल्ले करणार्‍या जमावाला भाजपाच्या विजयाशी कर्तव्य नव्हते. त्यांना डाव्यांना संपवायचे होते आणि असे लहानमोठे सगळीकडले कळप भाजपाने प्रयत्नपुर्वक आपल्या पाठीशी आणून उभे केले. त्यांना मतातून सत्तापालट व पर्यायाने दहशत संपवण्याची आशा दाखवली व चमत्कार घडला.

पण त्याचा लेनिनच्या पुतळ्याशी काय संबंध होता? पुतळा पाडण्याची काय गरज होती? नाहीतरी डाव्यांची सत्ता संपलेलीच होती ना?

सवाल डाव्यांची सत्ता संपण्यापुरता नव्हता. तो विषय भाजपापुरता मर्यादित होता. त्याचा सामान्य लोकांशी काडीमात्र संबंध नव्हता. सामान्य लोकांना डाव्या आघाडीला उध्वस्त होताना व जमिनदोस्त होताना बघायचे होते. सत्ता नावाच्या काल्पनिक समजूतीने ते समाधान मिळणे शक्य नव्हते. त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार कुठल्या तरी प्रतिकातून होत असतो. सामान्य लोक चिकित्सक बुद्धीचे नसतात वा त्यांची बुद्धी चिकित्सक विचार करू शकत नाही. त्यामुळेच त्यांना प्रतिकातून प्रेरणा मिळत असते. शत्रू वा मित्रही प्रतिकात दडलेले असतात.

कम्युनिस्ट सत्ता वा त्यांची दडपशाही जुलूम, याचे प्रतिक लाल झेंडा वा लेनिन स्टालीनचे पुतळे असतात. जागोजागी असे पुतळे वा झेंडे लावून आपली शक्ती वा दहशत माजवणारेही, त्याच हेतूने प्रतिके वापरत असतात. त्यामुळे या पुतळ्यांना वा प्रतिकांना निर्जीव म्हणून भागत नाही. रशियात सोवियत सत्ता उलथून पडल्यावर म्हणूनच लेनिन स्टालीनचे पुतळे उध्वस्त करण्यात आले.

हे सर्व त्रिपुराचे निकाल लागल्यानंतरही झाले. कारण आता डाव्यांच्या हाती सत्ता उरली नाही आणि ते आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाहीत, हे झुंडीतल्या लोकांना उमजलेले होते.

आसपास पक्षाचे कार्यकर्ते, गुंड वा पुरस्कर्ते दिर्घकाळ दहशत माजवत होते. त्यांच्या विरोधात दबलेला प्रत्येकजण साचलेला राग काढायला टपलेला होता आणि त्याचीच प्रतिक्रीया पुतळ्याला उध्वस्त करण्यातून उमटली. हे सर्व भाजपाच्या नेतृत्वाला मान्य नसले तरी त्यांना त्या झुंडींना रोखता आले नसते. कारण झुंडींना प्रतिके समजतात आणि बुद्धीवादी युक्तीवाद समाधान करू शकत नसतात. घटनात्मक पाडाव झुंडींच्या समजुतीपलिकडला विषय असतो. त्यामुळेच त्यावरून जे युक्तीवादी रणकंदन माजलेले आहे, त्याचा काडीमात्र उपयोग नाही. त्यापेक्षा समाजातली झुंडीची मानसिकता समजून घेण्याला प्राधान्य असायला हवे.

अर्थात त्यासाठी दुर जाण्याची अजिबात गरज नाही.

एकदा त्रिपुरातील त्या घटनेची माहिती समोर आली, त्यानंतर विरोधात कोणत्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत? त्या प्रतिक्रीया बुद्धीवादाची साक्ष देणार्‍या आहेत काय?

कोलकाता येथील एका विद्यापीठाच्या आवारात भाजपाला पूजजीय वाटणार्‍या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याही पुतळ्याची डाव्या विद्यार्थ्यांनी विटंबना केली. मोडतोड केली. त्रिपुरातील जमाव तरी सामान्य होता, विद्यापीठातील उच्चशिक्षण घेणार्‍या, पुरोगामी म्हणवणार्‍या विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले. तर त्याला काय म्हणायचे? तेही सुशिक्षित असून झुंडीचाच भाग नाहीत काय? हिंदूत्ववादी वा संघाच्या समर्थकांची झुंड असेल, तर डाव्या विचारसरणीच्या हुशार बुद्धीमान विद्यार्थ्यांनी कोणते संयमाचे संहिष्णूतेचे प्रात्यक्षिक दाखवले?

दोन्ही बाजू तितक्याच दांभिक असतात. ते आपापले कळप बनवून विचाराचे मुखवटे पांघरत असतात. त्या बुरख्याच्या मागे तितकाच हिंस्र रानटी माणूस दडलेला असतो. जोपर्यंत समोरचा माणुस वा कळप आपल्या दडपशाहीला शरण जात असतो, तोपर्यंतच आपणही संयम सहिष्णूतेचे नाटक रंगवित असतो. समोरचा संयम सोडून अंगावर येतो, तेव्हा आपलाही मुखवटा टराटरा फ़ाटून जातो. वरकरणी लावलेला बुद्धीवादाचा चेहरा गळून पडतो आणि आपल्या मनातली झुंडशाही झेप घेऊन बाहेर येते. कारण त्या सामान्य अज्ञ वा निर्बुद्ध झुंडीपेक्षा आपल्यात वेगळी कुठलीही वैचारिक पातळी नसते.

प्रश्न शिरजोर कोण आहे आणि कोणाचा टिकाव लागणार आहे, इतकाच असतो. त्या घनघोर लढाईत आपल्याला रक्तबंबाळ व्हावे लागणार असेल वा जीवाचे भय असेल, तर संयमाचे वा संहिष्णूतेचे नाटक सुरू होते. ज्या क्षणी समोरची बाजू दुबळी पडते, त्याक्षणी आपला संयम संपतो आणि आपणही हिंस्त्ररुप धारण करून रानटी वागू लागतो. मात्र ते सत्य स्विकारण्याची आपली तयारी नसते.

एका झुंडीने लेनिनचा पुतळा पाडल्यावर जो गहजब चालू झाला, ते तमाम लोक आपण विचारवंत वा बुद्धीजिवी असल्याच्या थाटात बोलत होते. समोरच्या म्हणजे संघ वा भाजपाच्या विचारातच हिंसा असल्याचा दावा करत होते. पण खरेच त्यांची डावी पुरोगामी विचारधारा तितकी संयमी वा सहिष्णू असती, तर कोलकात्यात मुखर्जींच्या पुतळ्याची मोडतोड झाली नसती, की डाव्या विद्यार्थी संघटनेकडून झाली नसती. आणखी एक बाब म्हणजे पुतळा ही केवळ निर्जीव वस्तु वा प्रतिमा असल्याने तिच्या मोडतोडीने विचार मारला जात नाही, हा बुद्धीवाद कोण विसरला? खरा चिकित्सक त्या मोडतोड करणार्‍यांची कींव करून मोकळा झाला असता. त्यापेक्षा अधिक काही प्रतिक्रीया आली नसती. पण तमाम शहाणे डावेही रडकुंडीला आले. कारण त्यांची बुद्धीही अशा प्रतिकापर्यंत येऊन कुंठीत झालेली आहे.

लेनिनच्या पुतळ्याची विटंबना झाली वा मोडतोड झाली, म्हणजे आपले विचारही धोक्यात आले असे त्यांना जाणवले. मनापासून वाटले. याचा अर्थच त्यांचे विचार मारले जाऊ शकतात वा संपुष्टात येऊ शकतात. निदान अशा डाव्यांचा त्यावर पुर्ण विश्वास आहे.

पानसरे वा दाभोळकरांच्या हत्येनंतर असेच पांडित्य सांगितले गेले होते. माणूस मारता येतो, विचार मारत येत नाहीत. पण प्रत्यक्ष वर्तनात त्याची प्रचिती येत नाही. कारण अशा लोकांनाही मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या विचारापेक्षाही त्याच्या हत्येची चिंताच भेडसावत असते. अन्यथा बाकीची चळवळ बाजूला ठेवून “खुनी पकडा”, म्हणून वेळ खर्ची घातला गेला नसता.

गांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण?” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले? विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय?

सामान्य बुद्धीचा जमाव आणि सुशिक्षित बुद्धीजिवी घोळका, यात तसूभरही फ़रक नसल्याची यातून साक्ष मिळते. तसे नसते तर त्रिपुरातील एका पुतळ्याची विटंबना देशाच्या अन्य भागातही तशाच घटनांची लाट घेऊन आली नसती. प्रतिकांना पुसून टाकण्याची, नष्ट करण्याची अतीव इच्छा, ही रानटीपणाचे लक्षण आहे. पण त्यामध्ये सामान्य झुंडीइतकेच बुद्धीजिवीही पुढाकार घेतना दिसतात, तेव्हा माणूस अजूनही रानटी अवस्थेत जगत असल्याची खात्री पटते.

एका उथळ दिवट्या संपादक पत्रकाराने तर म्हणे संघाचे मुख्यालय उध्वस्त करण्याची हमी दिलेली आहे. “आमचे सरकार येऊ देत, मग नागपुरात तुमचे कार्यालय कसे शिल्लक उरते बघूया…!” असली भाषा बोलणार्‍याचा कोणा पुरोगामी विचारवंत वा पत्रकाराने, नेत्याने निषेध केल्याचे बघण्यात नाही. म्हणजेच इकडचे असोत वा तिकडचे असोत, विचारवंतही झुंडीतले जमावातले दंगलखोर असल्याचे पुरावे मिळत असतात.

प्रत्येकाने पांघरलेला संयम सहिष्णूतेचा मुखवटा हिंसेची संधी सापडण्यापर्यंतच शाबुत असतो. जेव्हा तशी संधी मिळते त्याक्षणी तो मुखवटा गळून पडत असतो. प्रत्येकजण आपापल्या झुंडीत शिरून अमानुष हिंसा करायला उतावळा झालेला असतो. त्याच्या मनात दडी मारून बसलेला रानटी पशू क्षणात झेपावण्यासाठी सज्ज असतो. त्याची कळपवृत्ती सुप्तावस्थेत असते, योग्य सूचनांची, प्रेरणांची प्रतिक्षा करत असते. त्रिपुरात आजवर डाव्या सत्तेमुळे त्या कळपाला शिरजोर वागता आले. त्यांचा वरचष्मा संपल्याचे संकेत मतमोजणीतून येताच आजवर दबलेल्या विरुद्ध बाजूच्या कळपांना प्रेरणा मिळाली.

आता डावे नामोहरम म्हणजे दुबळे झाल्याचा तो संकेत डाव्यांच्या प्रतिकावर हल्ला करण्याची प्रेरणा झाला. पण दुसरीकडे भाजपा दुबळा असलेल्या जागी त्याच्या विरोधातली प्रतिक्रीया उमटली. ती तशाच झुंडशाहीची साक्ष असते ना?

सुशिक्षित असोत वा अशिक्षित असोत, झुंडी या अविचारी असतात, हेच त्यातले सार आहे.

(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

  bhau-torsekar has 29 posts and counting.See all posts by bhau-torsekar

  2 thoughts on “लेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर

  • March 12, 2018 at 8:12 pm
   Permalink

   हा लेख लिहीनारा पागल दिसतोय

   Reply
  • March 12, 2018 at 11:41 pm
   Permalink

   लेख मस्त होता…पण लेनिन ने आपल्या देशासाठी (india) काय केलं हा लेख कृपया प्रसिद्ध करा..त्यांनी खूप चांगले कार्य केली…पण ती कार्य कोणती…अन कधी केली…हा लेख पाठवावा…हि विनंती…

   Reply

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?