' योगी, मोदी आणि युपीतील कात्रजचा घाट! – InMarathi

योगी, मोदी आणि युपीतील कात्रजचा घाट!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गोरखनाथ मठाचे अधिपती योगी आदित्यनाथ आज दुपारी उत्तर प्रदेशचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. कालच्या नाट्यमय घडामोडींनंतर जेव्हा त्यांचे नाव घोषित करण्यात आले तेव्हा स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या समस्त मंडळींचे धाबे दणाणले. उत्तर प्रदेशच्या निकालांनंतर बसलेल्या झटक्यातून सावरायच्या आतच त्याहून मोठा झटका बसला. आता भारत मध्ययुगात आणि उत्तर प्रदेश अश्मयुगात जाणार म्हणून त्यांनी ट्विटर, फेसबुक ते टीव्हीवरील वाद-चर्चांमध्ये जाहीर करून टाकले. त्यांना बसलेला धक्का अनपेक्षित असल्याने त्यांच्या असल्या प्रतिक्रिया अपेक्षितच होत्या. पण विकासाच्या मुद्यावर मोदींना पाठिंबा देणाऱ्या शहरी-सुशिक्षित वर्गालाही हा निर्णय रूचला नाही.

yogi adityanath amit shah marathipizza

स्रोत

कायम भगव्या कपड्यांत वावरणारा, आक्रमक हिंदुत्त्वाचा आणि गोरक्षणाचा कट्टर पुरस्कर्ता, हिंदु युवा वाहिनीच्या माध्यमातून आंदोलनं करणारा आणि अशा आंदोलनांत हिंसा झाली तरी त्याची तमा न बाळगणारा, अन्य पक्षातील आयाराम-गयारामांना भाजपाने निवडणुकीत तिकिट दिली असता त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करून ते निवडून आणणाऱ्या व्यक्तीला देशातील सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या पण दशकानुदशके जात आणि धर्माच्या गर्तेत रूतल्यामुळे विकासाची बोंब असलेल्या राज्याचा मुख्यमंत्री करणे त्यांना रूचले नाही. त्यांच्या मतानुसार देवेंद्र फडणवीस, मनोहर पर्रिकर यांच्यासारखा उच्चशिक्षित किंवा मग शिवराज सिंह चौहान आणि डॉ. रमण सिंह यांच्यासारख्या तडफदार व्यक्तीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद मिळायला हवे होते. पण अशा प्रकारची छबी असलेले लखनौचे महापौर दिनेश शर्मा किंवा उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय मंत्री मनोज सिन्हांची बोळवण करून योगी आदित्यनाथांसारख्या वादग्रस्त नेत्यास मुख्यमंत्रीपद का दिले या प्रश्नाचे उत्तर न सापडल्याने त्यांनीही समाजमाध्यमांतून आपली नापसंती व्यक्त केली आहे.

cm yogi adityanath marathipizza

 

पण उत्तर साधे आणि सोपे आहे. पहिली गोष्टं म्हणजे वय वर्षं ४४ असले तरी योगी हे उत्तर प्रदेशातील भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. सलग ५ लोकसभा निवडणुकांत ते विजयी होत आहेत आणि आपल्या सोबतच पूर्वांचल किंवा पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भाजपा उमेदवारांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देणे हा कार्यक्षम कार्यकर्त्याचा सन्मान आहे. दुसरी गोष्टं म्हणजे ते सुशिक्षित आहेत. संन्यास घेऊन भगवी वस्त्रं परिधान केली असली तरी त्यांनी जीवनातून निवृत्ती घेतली नाही. खासदार म्हणून लोकांची कामं करताना जाती-धर्मानुसार भेदभाव केल्याचे उदाहरण नाही. तिसरे म्हणजे सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही. मायावती किंवा मुलायम सिंह यादवांच्या कुटुंबियांची संपत्ती, सत्तेत असताना तिच्यात झालेली वाढ आणि सार्वजनिक जीवनात त्याचे प्रदर्शन लपून  राहिलेले नाही. त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तर प्रदेशचे राजकारण जात आणि धर्माच्या आहारी गेले आहे. भाजपाने हिंदुत्त्व आणि विकास यांच्या जोडीला बिगर मुस्लिम, जाटव आणि यादव जातींची यशस्वीपणे मोट बांधली. यापैकी एका जातीच्या नेत्यास मुख्यमंत्री केले असते तर कदाचित २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अन्य काही जाती पुन्हा सपा किंवा बसपाकडे गेल्या असत्या. योगी आदित्यनाथ जन्माने राजपूत असले तरी संन्यास घेतल्यामुळे त्यांची जातीय ओळख केव्हाच लोप पावली आहे. मौर्य आणि शर्मा यांना उपमुख्यमंत्री करून भाजपाने जातीय समीकरण अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे.

yogi adityanath marathipizza

स्रोत

राहता राहिला मुद्दा आक्रमक हिंदुत्त्वाचा. उत्तर प्रदेशची वस्तुस्थिती मनासारखी नसली तरी ती नाकारण्यात काही अर्थ नाही. राजकीय इस्लाम असो किंवा भारताची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी; त्याची मूळं पंजाब, बंगाल किंवा सिंध प्रांतात नाही तर आजच्या उत्तर प्रदेशात रोवली गेली आहेत. हिंदू-मुस्लिम समाजातील तणाव तेथे ब्रिटिश काळापूर्वीपासून आहे. स्वातंत्र्यानंतर आजवरचे बहुतेक पंतप्रधान लखनौमार्गेच लाल किल्यावर पोहचल्याने पहिले कॉंग्रेस आणि त्यानंतर समाजवादी पार्टी तसेच बसपाने युपीत सत्ता मिळवण्यासाठी मुस्लिम अनुयायाच्या धोरणाचा राजकीय लाभ मिळवण्यासाठी प्रच्छन्नपणे वापर केला आहे. मंडल आयोगाच्या शिफारसींमुळे गेली ३० वर्षं जातीसमुहांवर आधारित जे राजकारण उभे राहिले, त्याचीही केंद्रभूमी उत्तर प्रदेश हीच आहे. त्याला उत्तर म्हणून भाजपा तसेच आदित्यनाथांचे हिंदुत्त्वाभोवती फिरणारे राजकारण ही उत्तर प्रदेशच्या राजकारणाची वास्तविकता आहे.

===

योगी आदित्यनाथ हे जरी एक मोठे नाव असले तरी महाराष्ट्रातील बहुतांश जनतेला ते माहित नाही. त्यांची पार्श्वभूमी काय? त्यांचे राजकारणातील कर्तुत्व काय? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही सांगत आहोत योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल तुम्हाला काही माहित नसलेल्या गोष्टी ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्यात! नक्की वाचा:

उत्तर प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी!

===

पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे पुढील लक्ष्य २०१९ सालच्या लोकसभा निवडणुका असून त्यांचे पडघम लवकरच वाजू लागतील. विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश इतका मागे आहे की, विकासात्मक राजकारण करून त्याची फळं दिसेपर्यंत अनेक वर्षांचा अवधी जाईल. सर्वोच्च न्यायालयाने भाषा, जात आणि धर्माच्या नावावर मतं मागायला प्रतिबंध केला असला तरी उत्तर प्रदेशातील निवडणूकांत सर्वच पक्षांनी विकासाच्या आवरणाखाली जात आणि धर्माच्या समीकरणांवर मतदारांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानही त्यात मागे राहिले नाहीत. पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात अनेक जागांवर हिंदू-मुस्लिम तणाव असल्याने त्यांनी ज्या गावात कब्रस्तान आहे तिथे स्मशानही असायला हवे किंवा जर ईदला लोडशेडिंग होत नसेल तर दिवाळीतही वीज उपलब्ध व्हायला हवी अशा आवाहनांद्वारे हिंदुंच्या मनात असलेल्या सापत्न वागणूकीच्या वेदनेवर फुंकर घातली. मोदी आणि अमित शहांनी रचलेल्या पायावर आदित्यनाथांसह अन्य स्थानिक नेत्यांनी मंदिर बांधले आणि नोटबंदी तसेच विकासाच्या अन्य मुद्यांचा कळस त्यावर चढवला. त्यामुळे एकही मुस्लिम उमेदवार न देता भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश हे जसे विकासाचे आहे तसेच ते हिंदुत्त्वाचेदेखील आहे.

yogi-aaditynath-marathipizza03

स्रोत

गेली अनेक दशकं राजकीय समीक्षक तसेच विरोधी पक्षांकडून संघ आणि भाजपा यांचे विश्लेषण करताना चेहरा आणि मुखवटा किंवा लोहपुरूष आणि विकासपुरूष या संज्ञांचा वापर होतो. अनेकदा भाजपा नेतेही ही तुलना गांभीर्याने घेतात. अटल बिहारी वाजपेयी हे विकासात्मक राजकारणाचे आणि लाल कृष्ण आडवाणी हिंदुत्त्वाचे नेते म्हणून ओळखले गेले. अटलजींनंतर सर्वसमावेशक नेता अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी आडवाणींनी ज्या काही गोष्टी केल्या त्या त्यांच्या अंगलट आल्या. नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकीय राजकारणात उदय होऊ लागला तसे आडवाणी उदारमतवादी आणि मोदी जहाल ठरवले गेले. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या लाटेत देशभर सर्वत्र मोदी यांचा भर विकासावर राहिला असला तरी युपी आणि बिहारमध्ये त्यांनी विकासाला बेमालुमपणे जात (अन्य मागास वर्गिय) आणि धर्माची (हिंदुत्त्व) जोड दिली.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदी विकास पुरूषाला बसवले नाही अशी ओरड करणाऱ्यांना हे कळत नाहीये की, जो फॉर्मुला गेल्या दोन निवडणुकांत यशस्वी ठरला तो २०१९च्या निवडणुकीत यशस्वी ठरेल याची शाश्वती नाही. उत्तर प्रदेशातील विकास पुरूष मोदी होते आणि मोदीच राहणार आहेत. पण हिंदुत्त्वाचा चेहरा असणेही आवश्यक आहे म्हणून योगींना पुढे केले आहे. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना मशाली बांधून मागावर असणाऱ्या मुघल सैन्याची दिशाभूल केली, तीच चाल मोदींनी योगींच्या रूपाने खेळली आहे. यापुढे युपीत योगी हिंदुत्त्वाचा खुंटा बळकट करत जातील आणि मिडिया आणि स्वघोषित पुरोगामी आता योगींची फॅसिस्ट, प्रतिगामी किंवा हुकुमशहा म्हणून प्रतिमा निर्मिती करण्यासाठी धडपड करतील. या गोंधळात पाकिस्तानशी शांततेचा राग न आळवता, गुजरातबद्दल माफी न मागता किंवा मुस्लिम टोपी न घालता मोदी अगदी अल्पसंख्यांच्या मनातही आपली विकास पुरूष म्हणून प्रतिमा निर्माण करतील. एका रेषेला धक्का न लावता, तिला न खोडता, बाजूला दुसरी मोठी रेष काढून पहिली रेषा लहान करण्याची ही सोपी युक्ती आहे. या एकाच खेळीद्वारे अमित शहा आणि मोदी या जोडीने विरोधी पक्ष आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांना कात्रजचा घाट दाखवला आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?