चहाबाज मंडळींनी आवर्जून समजून घ्यावे असे : चहाचे साईड इफेट्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चहा! असं चहाचं नुसतं नाव जरी काढलं तरी मरगळलेला माणूस मानसिकरीत्याच ताजातवाना होतो.

कट्टर चहाप्रेमींना रात्री झोपेतून उठवून विचारले,”चहा घेणार का?” तरी नाही म्हणणार नाहीत कारण चहाप्रेमींच्या मते चहाला नाही म्हणणे हे मोठे पाप आहे!

पृथ्वीवरचे अमृत म्हणजे अमृततुल्य चहा असे सर्व चहाप्रेमींचे मत असते. चहाप्रेमींसाठी चहा हे पेय नसून ती एक संस्कृती असते आणि त्यांच्यासाठी चहा करणे हे एक काम नसून तो एक सोहळा असतो.

अट्टल चहाप्रेमी चहाचे वर्णन करताना म्हणतात की ,”चहा म्हणजे माणसांना एकमेकांशी जोडून ठेवणारी संस्कृती आहे. अबोल्याचे रूपांतर जवळिकीत करणारी, अनोळखी लोकांना मैत्रीत बांधणारी , श्रमपरिहार करणारी अशी ही संस्कृती आहे.

 

tea2-inmarathi
india.com

ह्या चहाच्याच साथीने अनेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार सापडतात, टपरीवर “पेशल कटिंग” मारता मारता दु:ख हलकी होतात आणि आयुष्यातल्या समस्यांवर उपाय सापडतात.

असा हा चहा म्हणजे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ” वगैरे वगैरे…

काही लोकांना चहाने ऍसिडिटी होते,चहात टॅनिन असतं ते शरीरासाठी चांगलं नाही वगैरे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत असे चहाप्रेमींचे मत असते. त्यांच्या मते अस्सल चहाप्रेमी व्यक्तीला कधीच चहाने त्रास होत नाही. पण असे नाही.

चहाप्रेम वगैरे एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. उगाच आवडतो म्हणून किंवा क्रेझ म्हणून चहाचे अतिरिक्त प्रमाणात सेवन केले तर त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात.

सकाळी उठल्या उठल्या चहा तर लागतोच, मग नाश्त्याबरोबर एक चहा, मग ऑफिसला गेल्यावर ट्रॅफिकच्या वैतागातून बाहेर पडण्यासाठी आणि कामाची सुरुवात तरतरीत मनाने व्हावी म्हणून चहा, नंतर काम करत असताना शीण आला म्हणून मध्येच चहा, मग लंच टाइम नंतर झोप येऊ नये म्हणून चहा, संध्याकाळी दमलो म्हणून चहा, घरी आल्यावर रिलॅक्स होण्यासाठी म्हणून परत चहा इतके तुमचे चहासेवन असेल तर त्याने तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो.

 

tea-inmarathi
heritage.com

चहाच्या अतिरेकी सेवनामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घ्या.

१. चहाच्या अतिरिक्त सेवनामुळे तुम्हाला झोप न येणे, निद्रानाश असे विकार उद्भवू शकतात. तसेच मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा चहातील घटकांमुळे परिणाम होऊ शकतो.

म्हणजेच तुम्हाला डाययुरेसिसचा त्रास होऊ शकतो. डाययुरेसिस म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात लघवी तयार होते. अतिरेकी चहामुळे शरीरावर सौम्य प्रकारचा डाययुरेटिक इफेक्ट होऊ शकतो.

२. चहाच्या अतिरेकी सेवनामुळे डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. जास्त प्रमाणात चहा घेतल्याने तुमच्या शरीराची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

डॉक्टरांच्या मते दिवसातून जास्तीत जास्त तीन कप चहा घ्यावा. त्यापेक्षा जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास डिहायड्रेशनचा आणि पचनाचा त्रास होऊ शकतो आणि पोटाचे विकार उद्भवू शकतात.

३. जेव्हा तुमच्या शरीरात डिहायड्रेशन होते तेव्हा शरीर अतिरिक्त पाणी साठवून ठेवू लागते आणि तुम्हाला ब्लोटिंग झाल्यासारखे म्हणजे पोट फुगल्यासारखे वाटते.

 

bloating inmarathi
todayshow.com

ब्लोटिंगचे एक कारण अतिरिक्त चहासेवन देखील आहे.

४. चहाच्या अतिरेकी सेवनामुळे आपल्या शरीराची शोषून घेण्याची क्षमता कमी होते त्यामुळे अन्नातून शरीराला मिळालेले पोषक घटक नीटपणे शोषून घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शरीरात अत्यावश्यक पोषक घटकांची कमतरता तयार होते.

काही डॉक्टरांच्या मते काळ्या चहाचे अतिरिक्त प्रमाणात सेवन केले तर शरीरात लोह शोषून घेतले जात नाही व लोहाची कमतरता तयार होऊन गंभीर विकार उद्भवू शकतात.

५. चहाच्या झाडात म्हणजेच Camellia sinensis ह्या झाडात नैसर्गिकपणे कॅफिन आढळते. त्यामुळे चहा ह्या पेयात सुद्धा काही प्रमाणात कॅफिन असते.

गरम पाण्यात उकळणे व मुरण्यासाठी ठेवून देणे ह्यामुळे चहामध्ये कॅफिन जास्त प्रमाणात उतरते. Camellia sinensis हे एकमेव असे झाड आहे ज्यात L-theanine नावाचे अमिनो ऍसिड आहे.

हे अमिनो ऍसिड माणसाला डोके शांत आणि रिलॅक्स झाल्याची भावना देते. म्हणूनच चहा घेतल्यावर आपल्याला बरे वाटते.

पण चहात असलेल्या कॅफिनमुळे चहाची सवय लागते आणि त्या सवयीचे हळूहळू व्यसनात रूपांतर होते. म्हणूनच ठरलेल्या वेळेला चहा मिळाला नाही तर डोके दुखते, अस्वस्थ वाटते, चिडचिड होते. तसेच काहींना तर चहा घेतल्याशिवाय शौचाला जाता येत नाही इतके चहाचे व्यसन लागते.

 

drinking-tea-inmarathi
reddit.com

रोजच्या वेळेला चहा मिळाला नाही तर अनेकांना अशक्त झाल्यासारखे वाटते, त्यांची एनर्जी लेव्हल कमी होते. त्यांना आळस आल्यासारखे वाटते. काहींना तर थकवा देखील जाणवतो.

अश्या लोकांना चहा मिळाला की ते जादू झाल्यासारखे लगेच तरतरीत होतात. ह्याचाच अर्थ असा की चहाचे अगदी दारू आणि ड्रग्स सारखे व्यसन लागते. जे शरीरासाठी अजिबातच चांगले नाही.

६. चहा घेतल्याने जरी आपल्याला एनर्जी आल्यासारखे आणि तरतरीत ताजेतवाने झाल्यासारखे वाटत असले तरीही चहाच्या अतिरेकी सेवनामुळे मानसिक आजार होण्याची भीती असते.

जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने चिंता आणि अस्वस्थता असे मनोविकार मागे लागतात. झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे अस्वस्थता वाढते आणि शरीराचे सगळे चक्रच बिघडते.

७. अतिरिक्त चहासेवनामुळे ऍसिडिटी तर वाढतेच शिवाय मलावरोध होतो हे तर अनेकांना माहितीच आहे. चहामध्ये असलेल्या थिओफायलीन ह्या रसायनामुळे शरीरात डिहायड्रेशन होते.

असे झाल्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. पाणी कमी प्यायले किंवा शरीरात पाण्याची कमतरता असली तर मलावरोध होतो.

अनेकांना सकाळी कडक चहा प्यायल्याशिवाय शौचाला साफ होत नाही अशी त्यांची धारणा असते. पण अतिरिक्त प्रमाणात चहाचे सेवन केल्यास मलावरोध होतो व त्यामुळे पोटाचे अनेक विकार मागे लागतात.

 

acidity-inmarathi
azabgazab.com

८. चहाचे अतिरिक्त सेवन केल्याने हृदयाचे ठोके जलद पडतात असेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्यांना हृदयरोग आहे किंवा ज्यांना हृदयासंबंधित काही समस्या आहेत त्यांनी तर चहाचे अतिरिक्त सेवन टाळणेच योग्य आहे. कारण चहामध्ये असलेले कॅफिन हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

९. गर्भवती स्त्रियांच्या व गर्भाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेत जास्त प्रमाणात चहा टाळणेच योग्य आहे.

कारण चहात असलेल्या कॅफिनमुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच जास्त प्रमाणात चहाचे सेवन केल्याने गर्भपात होण्याचा धोका देखील वाढतो.

१०. जास्त प्रमाणात चहा प्यायल्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांपैकी सर्वात गंभीर विकार म्हणजे कर्करोग! चहाचे अतिरेकी सेवन केल्यामुळे पुरुषांमध्ये प्रोस्ट्रेटचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की जास्त प्रमाणात चहाचे सेवन करणाऱ्या पुरुषांना चहा न घेणाऱ्या पुरुषांपेक्षा प्रोस्ट्रेटचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त आहे.

म्हणूनच आपल्याकडे म्हणतात की ‘अति सर्वत्र वर्जयेत’ म्हणजेच सगळ्याच बाबतीत अतिरेक टाळायला हवा. मग तो तुमचा खास अमृततुल्य चहा का असेना!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?