दगडाला सुद्धा पाझर फुटेल असे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराच्या आत्महत्येचे हृदयद्रावक कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या जगात दोन प्रकारचे दृश्य दिसते. एक म्हणजे जिथे लोक भरभरून मोठ्या प्रमाणात अन्न शिजवून ते नंतर टाकून देतात. रस्त्याच्या कडेला किंवा कचराकुंडीत असे अन्न टाकून दिलेले दिसते.

 

Food Wastage Feature InMarathi
CounterCurrents.org

दुसरे हृदयद्रावक दृश्य म्हणजे अन्न, पाणी न मिळाल्याने अतिशय कुपोषित, मरायला टेकलेली लहान बालके!

ही परस्परविरोधी दृश्ये पाहून एखाद्या संवेदनशील व्यक्तीचे मन हेलावले नाही तरच नवल!

जगात एका बाजूला इतकी संपन्नता (की माज?) आहे की जिथे उरलेले अन्न  किंवा ताटात जास्तीचे अन्न वाढून घेऊन नंतर ते खाल्ले जात नाही म्हणून फेकून दिले जाते. तर दुसरीकडे दिवसेंदिवस उपवास घडल्याने, काहीही खायला न मिळाल्याने लोकांचे बळी जातात.

अन्नाची खरी किंमत त्यालाच कळते ज्याला ते मिळत नाही.

 

hunger-inmarathi
blog.forumias.com

१९९३ साली दक्षिण आफ्रिकेत अतिशय भयाण अशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक लोकांचे ह्यात बळी गेले. ह्या दुष्काळी परिस्थितीमुळे ह्या प्रदेशात गृहयुद्ध सुरु झाले होते.

मार्च १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या ऑपरेशन लाईफलाईन सुदानच्या रॉबर्ट हॅडली ह्यांनी प्रसिद्ध फोटोग्राफर जो सिल्वा ह्यांना सुदानमध्ये जाऊन तेथील दुष्काळाबद्दल रिपोर्ट करण्याची संधी देऊ केली होती. ह्या वेळी दुष्काळामुळे तेथे गृहयुद्ध पेटण्याची चिन्हे दिसू लागली होती.

जो सिल्वा हे युद्धाचे फोटो काढत असत. त्यांनी ही संधी केव्हिन कार्टर ह्या दक्षिण आफ्रिकन फोटोजर्नालिस्टला दिली. सिल्वा ह्यांनी कार्टर ह्यांना सांगिले की ही त्यांच्या फ्रीलान्स करियरमधील मोठी संधी सिद्ध होऊ शकते.

यूएनच्या ऑपरेशन लाईफलाईन सुदानकडे निधीची कमतरता होती आणि यूएनच्या लोकांना असे वाटले की सुदानमधील भयावह परिस्थिती जगासमोर आणल्यास तेथील लोकांना अधिकाधिक मदत मिळू शकेल.

सिल्वा व कार्टर ह्या दोघांनाही राजकारणात पडायचे नसल्याने त्यांनी ह्या ठिकाणचे फक्त फोटो काढण्याचा निर्णय घेतला. नैरोबीला गेल्यानंतर त्यांना कळले की सुदानमधील नाजूक परिस्थितीमुळे त्यांना तेथून पुढे जाता येणार नाही.

ह्या काळात कार्टर यूएनच्या लोकांबरोबर दक्षिण सुदानमधील जुबा ह्या ठिकाणी दुष्काळग्रस्त लोकांना अन्नाचा पुरवठा करण्यासाठी तसेच फोटो काढण्यास गेले.

 

kevin-carter-inmarathi
contohpom.blogspot.com

त्यानंतर काही काळातच संयुक्त राष्ट्राच्या लोकांना तेथील विद्रोही लोकांच्या संघटनेने अयोड ह्या ठिकाणी अन्नाचा पुरवठा करण्याची परवानगी दिली.

संयुक्त राष्ट्राच्या हॅडली ह्यांनी सिल्वा व कार्टर ह्यांना आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. अयोडला पोचल्यानंतर सिल्वा व कार्टर हे आपल्या फोटोच्या कामासाठी त्या ठिकाणी फिरू लागले तेव्हा त्यांना तेथे अतिशय हृदयद्रावक दृश्य दिसले.

हे फोटोग्राफर लोक दुष्काळग्रस्त लोकांची मदत करू शकत नव्हते कारण त्यांना यूएनच्या लोकांनी त्या लोकांच्या जवळ न जाण्याच्या स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिल्या होत्या. हे लोक अतिशय भयाण परिस्थितीचा सामना करीत असल्याने अन्नासाठी कुणावरही हल्ला करू शकतात म्हणूनच ह्या फोटोग्राफर्सना लांबूनच काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.

ह्या प्रदेशाचे फोटो काढताना कार्टर ह्यांनी एक असा फोटो काढला जो बघून दगडाला सुद्धा पाझर फुटेल.

कार्टर ह्यांच्या फोटोत एक कुपोषित लहान बालक भुकेमुळे चालू शकत नाही. मरणासन्न अवस्थेत कसेबसे खुरडत सरपटत ते यूएनच्या कॅम्पकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एक गिधाड स्वतःच्या अन्नासाठी त्याच्या मरणाची वाट बघत त्याच्या मागे थांबले आहे.

 

dying-child-inmarathi
100photos.time.com

हा तो फोटो होता ज्याने कुठलीही व्यक्ती हळहळेल. हा फोटो काढल्यानंतर अर्थातच मनातून हादरलेल्या कार्टर ह्यांनी त्या गिधाडाला हाकलवून लावले.

नंतर कार्टर व सिल्वा त्या ठिकाणहून काँगोर ह्या ठिकाणी गेले. हा फोटो द न्यूयॉर्क टाइम्सने विकत घेतला आणि २६ मार्च १९९३ रोजी छापला. तो जगात सगळीकडे प्रसिद्ध झाला. हजारो लोकांनी न्यूयॉर्क टाइम्सला संपर्क करून त्या बालकाचे काय झाले ह्याची विचारणा केली.

ते बाळ तेव्हा वाचले. त्याला यूएनच्या फूड सेंटरला नेण्यात आले. परंतु नंतर ते काही वर्षातच आजारपणाने मरण पावले. हा फोटो काढण्यात आला तेव्हा त्या बाळाचे आई वडील अन्नाच्या शोधात जंगलात गेले होते.

ह्या फोटोसाठी कार्टर ह्यांना एप्रिल १९९४ मध्ये पुलित्झर प्राईझ फॉर फिचर फोटोग्राफी मिळाले.

परंतु सुदान मधील परिस्थिती बघून नैराश्य आलेल्या केव्हिन कार्टर ह्यांनी २७ जुलै १९९४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या पार्कमोर येथे आत्महत्या केली.

त्यांनी आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहून ठेवली त्यात असे लिहिले होते की ,

“मला माफ करा. माझ्या आयुष्यात दु:खाने सुखावर मात केली आहे. मला असे वाटते आहे की सुख मुळात अस्तित्वातच नाही. माझ्या डोक्यात खून, राग, दु:ख, द्वेष, भूकबळी गेलेल्यांचे मृतदेह, कुपोषणामुळे मरणाला टेकलेल्या बालकांच्या आठवणी सतत मला मानसिक त्रास देत आहेत. माणसाने प्रोफेशनपेक्षा माणुसकीला महत्व दिले पाहिजे.”

 

kevin-carter1-inmarathi

कार्टर ह्यांचा कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग मुळे वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी मृत्यू झाला. ही सर्व परिस्थिती बघितल्याने ते अत्यंत निराश झाले होते.

केव्हिन कार्टर ह्यांचा जन्म जोहान्सबर्गच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. ते स्वत: गोरे होते परंतु त्यांनी लहानपणापासूनच वर्णभेद जवळून बघितला होता. दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीय लोकांवर होणारा अन्याय त्यांना लहानपणापासूनच अस्वस्थ करीत असे.

त्यांनी काही काळ सैन्यात व नंतर चार वर्ष वायुसेनेत काम केले होते. एकदा त्यांच्यासमोर एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा अपमान झाला. त्यांनी त्या कृष्णवर्णीय व्यक्तीची बाजू घेतल्याने त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी मारझोड केली होती.

त्यानंतर त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली व रेडिओ डिस्क जॉकी म्हणून काही काळ काम केले. परंतु ते फार जमले नाही म्हणून त्यांनी परत सैन्यातील नोकरी स्वीकारली.

१९८३ साली प्रेटोरिया येथे झालेले भीषण चर्च स्ट्रीट बॉम्बिंग स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यानंतर त्यांनी पत्रकार आणि फोटोग्राफर होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे हेच प्रोफेशन अखेर त्यांना नैराश्य व आत्महत्येकडे घेऊन गेले.

 १६ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय खाद्य दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९३ साली सुदानमध्ये जी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आजही जगात अनेक ठिकाणी बघायला मिळते.

 

sudan-camp-inmarathi
en.jrs.net

आपण अतिशय भाग्यवान आहोत कारण आपल्याला जेवायला पोटभर ताजे अन्न, स्वच्छ पाणी सहज उपलब्ध आहे. ह्या जीवनावश्यक गोष्टी काही लोकांना मात्र बघायलाही मिळत नाहीत. सार्वजनिक समारंभात अन्न उरले तर ते गरजू व्यक्तींना देण्याची व्यवस्था करण्याचे प्रत्येक आयोजकांनी/यजमानांनी मनावर घेतले पाहिजे.

खाद्य दिवसाच्या निमित्ताने आपण स्वतःलाच वचन देऊया की ज्या अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, जे मिळवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो, त्या अन्नाचा अपमान मी होऊ देणार नाही. गरजेपुरतेच अन्न मी शिजवेन, संपवू शकेन इतकेच अन्न मी ताटात वाढून घेईन आणि अन्नाचा एकही कण मी कचराकुंडीत जाऊ देणार नाही.

घराघरातील अन्नपूर्णांनी हे मनावर घेतले तर अन्नाचा अपमान होणार नाही, अन्न वाया जाणार नाही.

ह्यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होतेय! म्हणूनच हा मन हेलावुन टाकणारा फोटो कायम डोळ्यापुढे ठेवून अन्न वाया जाणार नाही ह्याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “दगडाला सुद्धा पाझर फुटेल असे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराच्या आत्महत्येचे हृदयद्रावक कारण…

  • July 13, 2019 at 8:09 am
    Permalink

    वा ई ट वाटते की काही लोकांना त्या गोष्टीची जाणीव नाही होत

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?