“शिवाजी कोण होता?” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं एक थोर रत्न. ज्यांच्या कर्तुत्वाचे दाखले जगभर दिले जातात त्या शिवाजी महाराजांना आपण मात्र केवळ राजकारणासाठी वापरतो, ही दुर्दैवी बाब आहे. या गोष्टीला ज्याप्रमाणे समाजातील काही स्वार्थी प्रवृत्ती कारणीभूत आहेत, त्याचप्रमाणे समाजातील एक नागरिक म्हणून आपण देखील कारणीभूत आहोत. महाराजांवर उगाच वाद उकरून कोणीतरी उभा राहतो आणि आपण देखील त्यात आपलं ‘योगदान’ देऊन त्या वादाचं महत्त्व वाढवतो, त्याला प्रसिद्धी देतो. त्याचा परिणाम असा होतो की सत्तापिपासू लोक त्याचं राजकारण करतात.

खरं तर आपल्याला माहीतच नाही की आपला राजा कसा होता आणि त्यामुळेच आपली ही दुबळी अवस्था झालीये. काही वर्षांपूर्वी प्रा. गोविंद पानसरेंनी “शिवाजी कोण होता” हे पुस्तक लिहिलं होतं. आपले छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे होते याचे उत्तम वर्णन करून महाराजांच्या नावाने शंख फुकीत राजकारण करणाऱ्यांवर प्रा. गोविंद पानसरेंनी चांगलेच आसूड ओढले होते. त्या पुस्तकावरूनही वाद आणि नंतर राजकारण झालं हे तुम्हाला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. प्रा. गोविंद पानसरेंच्या हत्येनंतर पुन्हा हे पुस्तक चर्चेत आलं होतं. त्याच पुस्तकातील काही महत्त्वाचे उतारे “बळवंतराव दळवी” यांनी संकलित करून शिवचरित्र आणि सह्याद्री या फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. त्यांची ही पोस्ट जशीच्या तशी सादर करत आहोत.

shivaji-kon-hota-marathipizza01

स्रोत

“शिवाजी कोण होता?” या पुस्तकात स्व. गोविंद पानसरे लिहितात……


● शिवाजी आणि धर्म-

“शिवाजी हिन्दू होता. शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभुमीही महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजीसंबंधी अभिमान वाटतो. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो.
(पान क्र. २३)

● देवळांची लुट, मोड़तोड इत्यादि-

मुस्लीम संघटनांचे त्याच्या अनुयायांना प्रतिपादन असते की, “हिन्दू धर्म म्हणजे काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले ते बरोबरच केले. जमले तर आपणही तसेच करावे. निदान हिंदूंविरुध्द आपणअसावे” असा त्यांचा प्रचार असतो व आहे . आपण राज्यकर्ते (होतो) परंतु राज्यकर्ते म्हणून आपले महत्व नाही ही खंत आणि त्यातून संघटित होण्याचा त्यांचा हां प्रयत्न .
(पान क्र. ३३-३४)

● आक्रमक मुस्लीम सैन्याने सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदूंची देवळे फोडली व लुटली हे सत्य आहे. अरब, तुर्क, अफगाण इत्यादी आक्रमकांच्या टोलीवजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लुट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातुन त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खुप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लूटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत.
(पान क्र. ३४)

● देवळे लुटण्याचा आणखी एक फायदा होई. “आम्ही काफरांची देवळे फोडतो, त्यांचा धर्म बुडवतो” असे सांगुन आपल्या लूटीला मुलामा चढवता येई. धर्मांध मुल्ला-मौलवींचा आणि त्यांच्या मार्फत एकूण मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपे जाई. स्वतःची दुष्कृत्ये लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जाई.
(पान क्र. ३४)

● शिवाजी आणि धर्म-

“याचा अर्थ शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केलं होतं, असा मात्र नाही .
शिवाजी हिंदू होता. त्याची धर्मावर श्रद्धा होती. त्या श्रध्देप्रमाणे तो वागत होता. देव-देवतांना आणि साधुसंतांना पूजत होता. धर्मासाठी आणि देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता.
(पान क्र. ३८)

● शिवाजी हां धर्माचा राजा होता. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता व त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली; या गोष्टी खऱ्या आहेत पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मीयांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता.
(पान क्र. ४२)

● शिवाजीचे ब्राह्मण सहकारी-

“शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. ‘दादोजी कोंडदेव’ हे तर त्यांचे गुरुच होते. रामदासाने शिवाजीला उपदेश व मार्गदर्शन केले की नाही याबाबत कडाक्याचे वाद आहेत. ते तज्ज्ञांवर सोपवून आपण बाजुस ठेवले तरी ‘दादोजींच्या’ भूमिकेसंबंधी शंकेला जागा नाही.
मोरोपंत पिंगळे हे तर पेशवे पदावर होते. ते एक मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होतेच पण मोठे कुशल वीर होते.
शिवाजीची आग्र्याहुन सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे ह्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासात नोंद केलेली आहे .
(पान क्र. ४६ )

● गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळनिरपेक्ष गौरव केला जातो. शिवाजीचे राज्य ‘धर्मनिरपेक्ष राज्य होते’, शिवाजी खरा ‘समाजवादी’ होता इत्यादी हास्यास्पद विधानेसुध्दा काही मंडळी करतात. अर्थात ते खरे नाही, हे स्पष्ट आहे. सरंजामी समाजरचनेच्या कालात स्वतः एक राजा असलेला शिवाजी ‘धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते’ ‘समाजवादीही असणे शक्य नव्हते.
(पान क्र. ४७)

● ‘९६ कुळी’ वाल्यांचा विरोध –

त्याकाळी शिवाजी महाराजांना शुद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यांत महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणविणारे ९६ कुलीचे मराठे सरदारही शिवाजीचा ‘राजा’ म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते.
(पान क्र. ४८)

● चातुर्वणर्य रचनेचा, वर्णवर्चस्वाचा त्रास शिवाजीलासुध्दा झाला. तो धर्म मानीत असल्याने त्याने मार्ग काढला. राज्याभिषेक करवून घ्यावा लागला धर्माची मान्यता घ्यावी लागली.

● ‘कुळवाडी भूषण’ –

“महात्मा जोतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लिहिला आहे. या पोवाड्यात सुरुवातीस धृपदातच ते शिवाजीला ‘कुळवाडी भूषण’ म्हणतात. पोवाड्याचा शेवट करताना ते म्हणतात, जोतीराव फुल्यांनी गाईला, ‘पूत शुद्राचा’.
मतितार्थ असा की, शिवाजी भोसला हां ‘शुद्राचा पुत्र’ होता. म. फुले इतिहाससंशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक म्हणून त्यांनी शिवाजीस असे म्हटले असेल म्हणून त्यांचा पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे .”
(पान क्र. ५०)

● शिवाजी व धर्मांतर –

“शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता पण त्याची धर्मश्रध्दा आंधळी नव्हती.
शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले नाही तर त्यांच्याशी सोयरसंबंध जोडले.
(पान क्र. ५३)

● हिंदूत दंगेखोर धर्मांध आहेत. तसे मुसलमानांत सुध्दा दंगेखोर आहेत. धर्मांध आहेत. काही मुसलमान तर स्वतःला शहेनशहाचेच वारस समजतात. आपण या देशात राज्य केले होते असे ते समजतात.
(पान क्र. ६०)

वरील सर्व उतारे हे स्व. गोविंद पानसरे यांच्या #शिवाजी_कोण_होता ?’ या पुस्तकातील आहेत. हे पुस्तक मी १५ वर्षापूर्वी वाचलेले होते. आणि पानसरे यांचे याच विषयावरील व्याख्यानही ऐकले होते. तेव्हाही मला त्या पुस्तकात काही खटकलं नव्हते. पण आज काही जण…

नाण्याला दोन बाजू असतात. या पुस्तकातील एक बाजू काहींनी उचलून धरली , मी फ़क्त दूसरी बाजू समोर आणली.

शिवछत्रपति हे आज आम्हाला खरचं समजले आहेत काय ?
की सत्याला जश्या तीन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक वेळी एक बाजू नेहमीच लपवली जाते . त्याप्रमाणे या पुस्तकातील ही बाजूही समोर यायला हवी त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे .

वरील सर्व उतारे त्याच पुस्तकातले असले तरीही आता यावरही बिनडोक लोकं वाद घालत बसतील , पण मी मात्र त्यांना एकच सांगेन, ‘तुम्ही नाण्याची एक बाजू समोर ठेवली मी दूसरी…’
आता लोकं ठरवतील काय स्विकारायचे !

 

   – बळवंतराव दळवी

मूळ पोस्टची लिंक 

===

वरील उतारे वाचून, ह्या पुस्तकावर असलेले – “शिवरायांचा अपमान केला”, “शिवरायांना निष्कारण ‘सेक्युरल’ दाखवलं” – हे व असे कित्येक आरोप निखालस खोटे आहेत हे स्पष्ट होतं.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *