' भारतीय हुतात्मा सैनिकांना अनोखी मानवंदना देणारं हे “वॉर मेमोरियल” अंगावर रोमांच उभे करतं! – InMarathi

भारतीय हुतात्मा सैनिकांना अनोखी मानवंदना देणारं हे “वॉर मेमोरियल” अंगावर रोमांच उभे करतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक लढाईत गौरवपूर्ण कामगिरी करणारं आपलं भारतीय सैन्य, आर्मी नेव्ही आणि एअर फोर्स अशा तीन भागात विभागलेलं आहे, देशावरचं संकट आपल्या शौर्याने दूर करण्याची अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या ह्या सैन्याबद्दल आपल्याला कितीशी माहिती आहे ?

सामान्य माणूस म्हणून आपल्याला बरेचदा आपल्या देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या ह्या वीरांबद्दल पुरेशी माहिती नसते.

त्यांच्या कामाचं स्वरूप, तिथलं वातावरण, त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडी, ह्याबद्दल आपल्याला नीटशी कल्पना नसते. २००८  साली आपल्या भारावून टाकणाऱ्या भाषणात आर्मी चीफ जनरल दीपक कपूर ह्यांनी एक प्रश्न उपस्थित केला,

“आर्मीला सामान्य समूहापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कुठले आवाहनात्मक प्रयत्न केले आहेत?”

 

Indian-army-inmarathi03
kappajobs.com

 

त्यांनी मुख्यत्वेकरून सैनिकांचे शौर्य, त्यांचा त्याग, त्यांच्या भावना ह्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडतो आहोत हे आर्मीच्या निदर्शनास आणून दिले.

त्यांच्या विचारातली कळकळ मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री, श्री शिवराज सिंग चौहान ह्यांना जाणवली आणि अशाप्रकारे ह्या
“शौर्य स्मारक”चा जन्म झाला.

२००९ साली ह्या स्मारकाची पायाभरणी झाली आणि पुढे चार वर्षात येथे संग्रहालय आणि त्यातली विविध दालनं तयार झाली पण जनसामान्यांच्या भेटीसाठी तयार व्हायला थोडा अधिक वेळ लागला.

प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी असे हे स्मारक, मध्यप्रदेशातल्या भोपाळ येथे, अरेरा नामक डोंगरावर, बांधण्यात आलेले आहे.

सामान्य भारतीयांना, सैनिकांच्या युद्धाच्या अलौकिक शौर्यगाथांचा अनुभव मिळावा ह्यासाठी उभारलेल्या ह्या शौर्य स्मारकाचे उदघाटन आणि लोकार्पण सोहळा दि. १४ ऑक्टोबर २०१६ रोजी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्याच्या शुभहस्ते पार पडला. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ भारतातल्या प्रमुख स्थळांपैकी महत्वाचे एक बनले आहे.

 

shaurya smarak-inmarathi
patrika.com

 

भोपाळ स्थित हे स्मारक, सुमारे १२ एकर इतक्या विशाल परिसरात बांधले गेले आहे. इथे प्रवेश करण्यासाठी, तिथले सौन्दर्य आणि देखरेख नीट व्हावी म्हणून अगदी कमी असे प्रवेश शुल्क आकारले जाते जे तिथे मिळणाऱ्या असामान्य अनुभवाच्या मानाने अगदीच कमी आहे.

माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना येथे मोफत प्रवेश आहे. इथला सांभाळ आणि देखरेख मध्यप्रदेश शासन आणि भारतीय सेने तर्फे केली जाते.

इथले आकर्षण असणारा सरळ आकाशाकडे झेपावणारा शौर्य स्तंभ सुमारे ६३ फूट उंचीचा आहे.

हा स्तंभ तीन रंगाच्या ग्रॅनाईट दगडाने बांधला गेला असून त्यात गर्द रंग आर्मीचा, करडा नेव्हीचा आणि पांढरा रंग एयरफोर्सचे प्रतीक आहे. हा स्तंभ आपल्याला, आपल्या वीर जवानांच्या शौर्यगाथा, त्यांचे आत्मबळ, त्यांचा त्याग अगदी स्पष्टपणे दर्शवितो.

स्तंभाच्या पायाशी असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गुलाबांची बाग शांतीची अनुभूती देते. स्तंभाच्या भोवती मूळच्या मध्यप्रदेशातील आणि इतर शाहीद जवानांची नावं काचेच्या बोर्डसवर लिहिलेली आहेत. बाजूलाच शहिद जवानांच्या सन्मानार्थ, आठवण म्हणून एक होलोग्राफीक ज्योत अखंड तेवत असते.

 

shaurya smarak-inmarathi01
hindi.catchnews.com

 

येथे प्रवेश केल्यानंतर लाल रंगातलं एक अप्रतिम शिल्प आहे जे एकबाजूने “नमस्कार”सारखं आणि दुसऱ्याबाजूने रक्ताच्या मोठ्या थेंबासारखं दिसतं.

वरवर बागेसारख्या दिसणाऱ्या ह्या परिसरात, संग्रहालयाची दालनं तळघरात आहेत, येथे पाकिस्तान आणि चीनशी झालेल्या युद्धातल्या अनेक बहुमूल्य आठवणी जतन केल्या गेल्या आहेत.

ज्या आपल्या सैनिकांचे बलिदान आणि वीरता ह्यांची आठवण देतात, त्यांच्या असीम आत्मबळाची अनुभूती देतात. येथे महाराणा प्रताप आणि टिपू सुलतान ह्यांच्याबद्दलही माहिती पाहायला मिळते. येथल्या दालनात हाताने बनवलेल्या उत्तम कालाकृती ठेवलेल्या आहेत शिवाय युध्दवीरांचे उत्तमोत्तम पोर्टरेट्स बघायला मिळतात.

आर्मी नेव्ही आणि एयरफोर्स अशा तिन्ही दलातली सन्मानाची पदकं, त्या त्या रँकच्या नावसाहित प्रदर्शित केली गेली आहेत.

पुढच्या दालनात, ज्यांना परमवीर चक्र, महावीर चक्र असा बहुमान मिळवणार्या सैनिकांचा उद्धतला संघर्ष आणि यशस्वी लढ्याची साहसगाथा त्यांच्या फोटो सहित दिलेली आहे जी वाचताना, कृतज्ञतेने मन भरून येतं.

 

shaurya smarak-inmarathi02
patrika.com

 

सैनिकांचे प्रशिक्षण आणि त्यांचे आयुष्य कसे असते हे दाखवणारी एक शॉर्ट फिल्म येथे दाखवली जाते. ह्याशिवाय युद्धात कामी येणारी जहाज, रणगाडे, पाणबुड्या, विमानं ह्यांची सुबक मॉडेल्सही येथे ठेवण्यात आलेली आहेत.

युद्धाच्या वातावरण निर्मितीसाठी येथे सतत होत असलेला गोळीबाराचा आवाज आणि सियाचीनच्या दुर्गम पर्वत रांगांमधला युद्धाचा अप्रतिम आणि तेवढाच थरारक देखावा अगदी भारावून टाकतो, येथे युद्धभूमीतला तंतोतंत गोठवणारा अनुभव शहारे आणतो.

ह्या संपूर्ण परिसरात फिरल्यानंतर, देशाभिमान आणखीनच दुणावतो, भारतीय नागरिक असल्याच्या अभिमानाने उर भरून येतो. आपण आपल्या सैनिकांच्या ऋणात असल्याची जाणीव होते. देशासाठी धारातीर्थी पडलेल्या जवानांची साहस गाथा पाहून नतमस्तक व्हायला होतं.

थीम पार्क आणि इतर प्रेक्षणीय ठिकाणी आपण जातोच पण अशा ठिकाणी येऊन आपल्या देशाच्या सैन्याबद्दल, देशाच्या महात्वाच्या यंत्रणेबद्दल आवश्य जाणून घ्या.

भारतीय असण्याचा गर्व आणि समाधान अनुभवा. मित्रांनो, एकदा ह्या स्मारकाला मित्र मंडळींना कुटुंबाला घेऊन आवर्जून भेट द्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?