मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


मागील भागाची लिंक: मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १

===

शाळेत लैंगिक शिक्षण का द्यावे ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे मुलांचे ह्या विषयावर बऱ्याच शंका असतात. त्यातल्या काही वेडगळ वाटाव्या अशा, काही अत्यंत गंभीर, तर काही अंतर्मुख करायला लावणाऱ्या असतात. पण एक गोष्ट नक्की की ह्या सगळ्या शंकांचे समाधान अत्यंत समर्पक शांत आणि समजूतदारपणे दिलेल्या उत्तरानेच होणे शक्य आहे. पण वर सांगितल्या प्रमाणे ह्या विषयावर मुलांशी बोलायची पालकांची कोणतीही तयारी नसते हे तर आहेच पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे तशी त्यांची इच्छाच नसते. खरेतर हा फार विसंगत दृष्टीकोन आहे. म्हणजे आपल्या कुणाचीही आपल्या मुलाला खेळताना पडून लागावे अशी इच्छा नसते, तरीही मुल कधी धडपडेल किंवा आजारी पडेल आणि त्यावेळी डॉक्टर कडे लगेच जाणे शक्य होईल का? हे काही सांगता येत नाही म्हणून घरात वेळ पडली तर उपचार करण्याचे जुजबी सामान, औषधं वगैरे आपण ठेवतोच. पण झपाट्याने वाढत जाणाऱ्या मुलाशी विश्वासाचे आणि सुसंवादाचे नाते, जे सुरुवातीला असतेच, ते टिकवून ठेवावे, वृद्धिंगत व्हावे म्हणून फारसा प्रयत्न होत नाही. ह्यामुळे मुलं ही त्याच्या मनात उद्भवणाऱ्या लैंगिकते संबंधी शंका, प्रश्न, जिज्ञासा आपल्या पालकांसमोर मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत.तेव्हा आपण पालकांनी हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ही आपली गरज आहे, तसेच ती आपल्या मुलांची ही गरज आहे, निकडीची.

sex-education-marathipizza01
news18.com

मुलांना ह्या संबंधांनी पडणाऱ्या प्रश्नापैकी काही वानगी दाखल खाली दिलेले आहेत. ह्यातले काही प्रश्न मी स्वत: लहान असताना माझ्या आई वडलांना विचारले होते तर काही प्रश्न निरनिराळ्या लेखामधून, युट्यूब वरच्या डॉक्युमेंटरीज, बायकोच्याकडे येणाऱ्या मुलाकडून तसे त्यांच्या पालकांनी सांगितल्या प्रमाणे घेतले आहे. असले प्रश्न विचारले म्हणून घाबरून हे ‘पालक’ लोक तिच्याकडे मुलांना घेऊन आले होते. (बरं आहे. ह्या व्यवसायाचे भवितव्य उज्वल आहे. आम्ही येडयासारखे इंजिनियरिंग करत बसलो…) असो, ह्या प्रश्नाची उत्तर मुद्दाम इथे दिलेली नाहीत. प्रश्न वाचून ठरवा आपल्या मुलांना ह्या असल्या प्रकारच्या शंका येत असतील कि नाही आणि त्यांचे योग्य निराकरण होणे गरजेचे आहे कि नाही.

ब्ल्यू फिल्म्स पाहून मला गर्भ धारणा होईल का?

हस्तमैथून केल्यामुळे शक्तीपात, एखादा रोग होतो का? की हस्तमैथून ही एक मनोविकृती आहे का?


हस्तमैथून केल्यामुळे मला कमी मार्क पडतील किंवा मी नापास होईल का?

हस्तमैथून पाप आहे का?

मुली हस्तमैथून करतात का? असल्यास कसे?

हस्तमैथूनात बाहेर पडणारे वीर्य तोंडाला लावले तर तोंडावरच्या पिटीका कमी होतात हे खरे आहे का?

समलैंगिक असणे ही विकृती आहे का?

वीर्य प्रश्न केल्यामुळे गर्भ धारणा होते का?

चुंबन घेतल्याने मी गर्भवती होईल का?

टूथ पेस्ट गर्भ निरोधक म्हणून वापरता येते हे खरे आहे का?

मुलगा आणि मुलगी एकत्र झोपले तर ती मुलगी गर्भवती होईल का?

एड्स झालेल्या मुलाचे/ मुलीचे चुंबन घेतले तर मला सुद्धा एड्स होईल का

मला ही सगळी( लैंगिक ज्ञान) माहिती घेणे जरुरी आहे का आणि मला ते जमेल का?

हे फक्त वानगी दाखल विचारले जाणारे प्रश्न आहेत. प्रत्यक्षात ह्या प्रश्नांची यादी प्रचंड आहे.

sex-education-marathipizza02
news18.com

ही आणि अशी प्रश्नावली पहिली की जाणवते ते हे की मुलांच्या मनात ह्या विषयासंदर्भाने शंकांचे काहूर उठलेले असते आणि ह्यातील सगळ्या शंकांचे योग्य प्रकारे ( “अभ्यास करा, एक थोतरीत ठेवून देईन, असले प्रश्न पुन्हा विचारशील तर!”… अशा प्रतिक्रिया न देता …पण बहुतेक वेळा अशा प्रतिक्रियाच दिल्या जातात.) शास्त्रीय माहितीच्या आधारेच निराकरण करणे जरुरीचे आहे. कोणताही धार्मिक, सांस्कृतिक किंवा इतर अभिनिवेश अंगी न बाळगता. पण तसे होताना दिसत नाही. अनेक पालकांना  ह्यातील अनेक प्रश्नांचे योग्य उत्तर कसे द्यायचे हेही माहिती नसते. तेही एक वेळ क्षम्य मानता येईल, पण म्हणून मग ती माहिती घेऊन मुलांना योग्य प्रकारे सांगायची गरजही पालकांना पटलेली दिसत नाही ही मात्र गंभीर बाब आहे.

आता ह्या संबंधाने पालकांचे दृष्टीकोन कसे आहेत किंवा त्यांचे आक्षेप काय आहेत ते ही पाहून घेऊ.

लैंगिक शिक्षणाची आमच्या मुलांना गरज नाही. ती अत्यंत सालस, निरागस(?) आहेत. त्यांच्या डोक्यात नाही त्या गोष्टी भरवून देऊ नका.

लैंगिक शिक्षणामुळे ज्या मुलांच्या मनात ह्या संबंधी  काही शंका विचार अजून आलेले नाहीत, त्यांना ही उगाच ह्या विषयावर विचार करायला, शंका विचारायला उद्युक्त केले जात आहे.

ही पाश्चात्त्यांची थेरं आहेत. आपल्या सारख्या सांस्कृतिक,अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत समाजाला त्याची गरज नाही.

मुलांना लैंगिक शिक्षणाची गरजच नाही. हे ज्ञान आपोआप होते, आम्ही नाही शिकलो? झाले ना सगळे व्यवस्थित!

ह्या विषयावर मुलांशी बोलणे अत्यंत अवघड आहे. आम्हाला शरम वाटते.

मुलांनी काही अडचणीचे प्रश्न विचारले तर.

लैंगिक शिक्षण मोठ्या (म्हणजे?) मुलांना द्यावे. शाळेत जाणाऱ्या मुलांना नको.

शाळेत जे शिक्षक हे शिक्षण देणार आहेत ते पुरेसे माहितगार किमान अर्हताप्राप्त तरी आहेत का?( ही शंका/ आक्षेप मात्र खरोखर योग्य आहे.)

sex-education-marathipizza03
indiatimes.com

ह्या शेवटच्या शंकेचा धागा पकडून असे काही जण म्हणतात की आपण जरी मुलांच्या लैंगिक शिक्षणाची अपरिहार्यता मान्य केली तरी शाळा, ( खाजगी, शासकीय, अनुदानित, विना अनुदानित सर्व) शासन आणि शिक्षक ह्या आघाडीवर पुरेशी सिद्धता होत नाही तोपर्यंत तरी शाळेत लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्यात काही अर्थ नाही, उलट त्यातून अनर्थ होण्याचीच शक्यता जास्त. आता मतामतांच्या गदारोळात ही एक शंका किंवा आक्षेप खरोखरच काही गांभीर्य अंगी बाळगून आहे. पण त्यावर उपाय तो पर्यंत मुलांचे (शाळेतील तरी) लैंगिक शिक्षण लांबणीवर टाकणे कसा काय असू शकेल? भारतासारख्या देशात तरी आता हा विषय पालकांनी शाळेच्या आणि शासनच्या तसेच शासनाने पालकांच्या सद्सद विवेक बुद्धीच्या हवाली  (तसेच इतर मतदार गटांच्या मर्जीवर) सोडणे बंद केले पाहिजे. का? कारण काय? दै. सकाळ मध्ये ४ ऑक्टोबर २०१५ रोजी आलेल्या लेखातील हा भाग पहा.

मुंबई महानगर पालिकेच्या इस्पितळातल्या सन २०१४-१५ या एका वर्षांतील नोंदीनुसार १५ वर्षांखालच्या मुलींच्या गर्भपातामध्ये ६७ टक्के वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. पालिकेतर्फे माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार या वर्षांत ३१ हजार महिलांनी गर्भपात केला. त्यात १६०० मुली या १९ वर्षांखालील आहेत. पालिकेने खासगी गर्भपात केंद्रांकडून घेतलेल्या माहितीप्रमाणे २०१३-१४ मध्ये १५ वर्षांखालील १११ मुलींनी गर्भपात केला तर २०१४-१५मध्ये गर्भपाताची संख्या आणखी १८५ ने वाढली आहे. म्हणजे १५ ते १९ वयोगटातील मुलींचे गर्भपाताचे प्रमाण दोन वर्षांत तब्बल ४७ टक्क्यांनी वाढले असल्याचे म्हटले आहे.

गर्भपाताच्या या आकडेवारीनुसार महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट आहे. कुठे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केले जात आहेत. कुठे मुलींचेच नव्हे तर मुलांचेही लैंगिक शोषण होत आहे. त्यामुळे लैंगिकतेविषयीचे शास्त्रीय ज्ञान शालेय अभ्यासक्रमात मिळणे ही काळाची गरज आहेच शिवाय मुलांचा तो अधिकार आहे. बालपणापासून लैंगिक शिक्षण मिळाल्यास त्याच्याकडे अश्लील म्हणून नव्हे तर जीवनविषयक आवश्यक ज्ञान म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्रत्येक नागरिकांत विकसित होईल. इंटरनेटसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या माध्यमांमुळे सध्या सर्वाना सर्व प्रकारचे ज्ञान खुले झाले आहे. मात्र त्याबाबतची परिपूर्ण आणि सर्व शंका निरसन करणारी माहिती शालेय अभ्यासक्रमातूनच मिळू शकते.

मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारा पैकी ५३% अत्याचार हे ५ ते १२ वर्षे वयोगटातल्या मुलावर होतात. पौगंडावस्थेताल्या  मुलींच्या गर्भधारणेचे प्रमाण हजारी ६२ इतके प्रचंड आहे . भ्रष्ट आणि वाह्यात म्हणून हिणवल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशांच्या पेक्षा किती तरी पट अधिक हे आहेच, पण आशिया आणि मध्य पूर्वेकडच्या देशातही आपण ह्या बाबत बराच वरचा नंबर पटकावून आहोत. ( अर्थात भारतात बाल विवाहांचे प्रमाण अजूनही खूप जास्त आहे म्हणून ही आकडे वारी अशी जास्त दिसते पण त्यामुळे ह्याचे गांभीर्य अधिकच वाढते.)

vijay-mallya-marathipizza06
hindustantimes.com

म्हणजे आपली लहानगी शाळेत जाणारी मुल अजिबात सुरक्षित नाहीत. हा भस्मासुर आपल्या अगदी दाराशी येऊन ठेपलेला आहे . हा लेख वाचणाऱ्यांपैकी अनेकांच्या घरात कदाचित तो शिरला ही असेल. पण आपण अनभिज्ञ आहोत. शासन काही करेल न करेल तो पर्यंत वाट पाहणे महागात पडू शकेल, पण स्वत:च्या मुलांसाठी आपल्याला आता ही गोष्ट दुर्लक्षीत करून चालणार नाही. मुलांच्या शास्त्र शुद्ध लैंगिक शिक्षणासाठी घरून वैयक्तिक/ कौटुंबिक पातळीवर तर शासनावर/ शाळांवर दबाव आणण्यासाठी सुज्ञ पालकांनी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत.

मला हे मान्य आहे की सगळ्यांना नोकरी धंद्याच्या कामाच्या व्यापातून हे शक्य होणार नाही पण कमीत कमी शाळेत दरमहा होणाऱ्या पालक सभांना उपस्थित राहून ह्याविषयावर जमेल तसे बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. किमान एवढे तरी जमायला हरकत नसावी.

वैयक्तिक पातळीवर आई बाबा दोघांनीही आपल्या मुलांशी ह्या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मुलं आपल्याशी बोलती झाली पाहिजेत. लगेच होणार नाही पणपण संयम आणि तितिक्षा हे मोठे प्रभावशाली गुण आहेत. सतत प्रामाणिक प्रयत्न केल्यावर यश नक्की मिळेल. एकदा मुलात आणि आपल्यात  विश्वासाचे, सुसंवादाचे नाते तयार झाले कि निम्मी लढाई जिंकल्यातच जमा आहे.


लैंगिक शिक्षण देताना ह्यात दोन भाग महत्वाचे आहेत एक म्हणजे शरीर शास्त्र म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्यांच्या शर्रीरातले मुलभूत फरक, वयानुसार होत जाणारे बदल आणि त्याचे शारारीरिक मानसिक परिणाम- मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, एचआयव्ही, एड्स, गुप्तरोग याबद्दलची माहिती या शिक्षणातून देता येईल. नऊ ते दहा हे अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी हे वय योग्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ज्यांची मुलं आता ७-८ वर्षांची आहेत पण पालकांची ह्या बाबत काही काही तयारी नाही त्यांनी आतापासून तयारी करायला सुरुवात करायला हवी आहे.

दुसरा भाग म्हणजे लैंगिकतेला धरून असलेली  सामाजिक, सांस्कृतिक, अशी अनेक परिमाणं. भिन्नलिंगी व्यक्तीला माणूस म्हणून वागवण्याची दृष्टी. ती  आधी स्वतःची लैंगिकता समजून घेतल्याशिवाय येणार नाही हे तर झालेच पण  चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा इथून सुरुवात असेल तर शालेय वय हे त्यासाठी सर्वात उत्तम आहे.

sex-education-marathipizza04
youtube.com

खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक किमान शैक्षणिक पातळीवरचे तरी आहेत असे गृहीत धरायला हरकत नाही. किशोर वयातील या मुलांना या लैंगिक शिक्षणाची माहिती शास्त्रीयदृष्ट्या दिल्यास प्रगत समाजासाठी एक चांगले पाऊल ठरणार आहे. आणि ही माहिती विविध पुस्तक, युट्यूब वरील डॉक्युमेंटरीज अशा निरनिराळ्या प्रकारे उपलब्ध आहे . मला नेट वर ह्या विषयी सुंदर ५ भागांची वेबसिरीज सापडली. आपल्या भारतीय लोकांनी काम केलेली  आणि Durex & Y-Films ने बनवलेली. आपल्या लाडक्या सचिन पिळगावकरने ह्यात काम केले आहे. ह्या बाबतीत त्याचे खरेच कौतुक केले पाहिजे. खाली लिंक दिलीआहे नक्की बघा आणि आपल्या मुलांना हि दाखवा. पण लक्षात असू द्या ही फक्त सुरुवात आहे. शेवट नाही.

sex chat with pappu and papa webseries link

 

मुल जन्माला आले की आपणही आई किंवा बाप म्हणून पुन्हा एकदा जन्माला येतोच, पण मुल ज्या प्रमाणात (खरेतर झपाट्याने) नवनवीन गोष्टी शिकते त्या प्रमाणात आपण काही शिकतो का? हा कळीचा प्रश्न आहे. आपणही त्यांच्या बरोबरच काही गोष्टी शिकलो, स्वत:ला बदलले  तर आई बाबा पासून जबाबदार पालक बनू नाही का…?!


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?