मातृभूमीसाठी असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : सर्वेश फडणवीस 

InMarathi Android App

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अदम्य स्वातंत्र्य, प्रीती, अतुल धैर्य, प्रज्ञा, प्रतिभा, ध्येयवादित्य, हौतात्म्याविषयीचे आकर्षण, भावनात्मकता, इत्यादी गुणांच्या मिश्रणाने बनले होते. त्याच्या ठिकाणी प्रबळ ज्ञानलालसाही होती.

सावरकर जे काय म्हणून माहिती आहेत ते केवळ क्रांतिवीर,अंदमानात छळ सहन करणारे राष्ट्रभक्त ! मात्र या त्यांच्या ओळखीच्या पलीकडे अत्यंत उदात्त ध्येयवादी , साहित्यिक,कवी हृदयाचा अथांग महासागर,महाकवींच्या ताकदीचा साहित्यक ही सावरकरांची ओळखआहे.

 

savarkar-inmarathi
images.asianage.com

जवळ जवळ ९००० पानांच्या या वाङ्मयापैकी अंदमान मधील काव्य हे हृदयाचा ठाव घेणारे सुमारे ६००० ओळीपेक्षा जास्त आहे.

या काव्याचे बंदीगृहाच्या भिंतीच्या दगडावर खरडणे,तेही चोरून-मारून पाठांतर करण्याची कला ,यातून त्यांची स्मरणशक्तीची उच्चतम हातोटी, नैपुण्य या गोष्टी सुष्पष्ट होतात.

काव्य, नाटके, कादंबऱ्या, निबंध, इतिहास, टीकात्मक निबंध अशा वाङ्मयाच्या विविध क्षेत्रातून त्यांचे लिखाणातील प्रभुत्व दिसून येते.

सावरकर हे हाडाचे कवीच होते. वयाच्या ९ व्या वर्षी कवितेला सुरुवात करणारे कवी म्हणून सावरकरांना जसेजसे समजदार होत गेले तसे त्यांना खात्री पटली की आपणास प्राप्त झालेले हे सरस्वती चे वरदान केवळ देशाच्या राष्ट्रभक्तीचे वर्णन करण्यासाठीच आहे.

म्हणून त्यांनी आपले सर्व साहित्य, रचना या मातृभूच्या चरणी अर्पण केलेले आहे. सातत्याने ब्रिटिश राजसत्तेकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ सहन करीत आपले परमेश्वरी प्राप्त वागवैभव केवळ मातृभूमीला अर्पण करणारा असा कवी कोणी नसावा.

मातृभूमी म्हणजे सावरकरांचा श्वास होता. त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवते ती मातृभूमीची ओढ. सावरकर लंडनच्या ब्रिक्सटन तुरुंगात होते. त्यावेळी त्यांची आपल्या मातृतुल्य वाहिनीस काव्यात्मक लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,

हे मातृभूमी तुजला मन वाहियेले,
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,
तूं तेंची अर्पिली नवी कविता रसाला,
लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला !

हे मातृभूमी तुला मन वाहिले, माझे वाकवैभव ही तुला अर्पण केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या या काव्यातून म्हणतात की मी माझे सर्वस्व,तन-मन-धन तुझ्या पायांशी अर्पण करत आहे.

इतकेच नव्हे तर या माझ्या क्रांतीकार्यामुळे दूर असलेल्या माझ्या मातृतुल्य वहिनीकडेही लक्ष देण्याचा मोह मी टाळत आहे.

माझी आतुरतेने वाट पाहणारी पत्नी आणि निरागस हास्याने खळखळून हसणारा माझा मुलगा प्रभाकर याच्याकडेही पाठ फिरवून हे मातृभूमी मी तुझ्या आणि तुझ्याच साठी हा राष्ट्रयज्ञ चेतवला आहे.

माझे ज्येष्ठ बंधू गणेशराव हे अत्यंत प्रेमळ मात्र मऊ मेणाहूनी, वज्राहून कठोर. अत्यंत निश्चयी व कर्तव्य कठोर. त्यांनी सुद्धा माझ्याप्रमाणे तुझीच पूजा मांडलेली आहे. सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी देखील तुझाच यज्ञ मांडलेला आहे.

 

savarkar family inmarathi
Quora

माझा कनिष्ठ बंधू नारायण याने देखील आम्हा दोघा ज्येष्ठ बंधूंच्या ध्येयाने प्रेरित होऊन अगदी दीपकाप्रमाणे प्रज्वलित होऊन तुझ्याच सेवेत दाखल झालेला आहे.

हे मातृभूमी आम्ही सर्वजण तुझ्या चरणाशी अर्पिलेले आहोत. आम्ही जर अजून सातजण ही असतो तरीदेखील सर्वजण या यज्ञात सहभागी झालो असतो. कारण एकमेव तू आम्हाला प्राणप्रिय व परमपवित्र आहेस. तुझी सेवा हीच ईश्वरसेवा आहे.

ईश्वरी सेवेचे समाधान केवळ तुझ्याच सेवेत आहे याची मला खात्री आहे. या भूमीची लेकरे, त्यातून जाज्वल्य अभिमानी,स्वाभिमानी व प्रतिशोध घेत सर्वस्व अर्पण करणारे जे जे आहेत त्यांची कर्मे त्यांना अमरत्वाकडे घेऊन जाणारी आहेत.

 

savarkar writing inmarathi
Swarajya

 

माझ्या घराण्याचा वृक्ष या राष्ट्रकार्यात नामशेष झाला तरी या कर्तृत्वाची थोरवी एवढी दृढमूल असेल की तो इतिहास कधीच विचारला जाणार नाही. त्या कर्तृत्वाचा वृक्ष आधारवड बनून कायम फुलतच राहणार आहे.

या सावरकर यांच्या काव्यातील राष्ट्रभक्ती आणि अमरत्वाचा जोश आणि त्यांनी समुद्रात उडी घेऊन केलेले अदम्य साहस यामुळे सावरकर व्यक्तिशः त्यांच्या काव्यातून वेगळे करताच येत नाही. सावरकर हे काव्याचा जिवंत आविष्कार आहेत.

राष्ट्रभक्तीच्या चैतन्यशक्तीने आणि परिपूर्णतेने भरलेले तसेच हौतात्म्याच्या उत्कट इच्छेने भारलेले असे त्यांचे संपूर्ण वाङ्मय आहे.

यंदाचे वर्ष सावरकरांच्या मातृतुल्य येसूवहिनी यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. सावरकर यांनी आपल्या वहिनी यांना मातेचा मान दिला. २८ मे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्त्याने त्यांना अभिवादन.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “मातृभूमीसाठी असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी

  • August 1, 2019 at 12:37 am
    Permalink

    स्वातंत्र्य वीर सावरकरांसारखा देशभक्त क्वचितच जन्माला येतो. त्यांचे अतुलनीय शौर्य, देशभक्ती व साहित्यातले योगदान ह्यास भारतीय इतिहासांत तोड नाही. अशा थोर वंदनीय अद्वितीय व्यक्तिमत्वाला शतश: नमन. अशा अजोड देशभक्ताला “भारतरत्नाने” सुशोभित केले नाही हे आम्हा भारतीयांचे दुर्दैव. माझी व प्रत्येक देशभक्तांची सांप्रत सरकारला विनंती आहे कि त्यांना मरणोत्तर भारतरत्न अर्पण करावे. जय भारत. वंदे मातरम्.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *