' सरदार पटेल, पंडित नेहरु, शेख अब्दुल्ला आणि भाजपा-पीडीपी युती, एक मुक्त चिंतन – InMarathi

सरदार पटेल, पंडित नेहरु, शेख अब्दुल्ला आणि भाजपा-पीडीपी युती, एक मुक्त चिंतन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सरदार सरोवराशेजारी साधू बेटावर १८२ मीटर उंचीच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा असून त्याला स्टॅच्यु ऑफ युनिटी असे नाव देण्यात आले आहे.

या निमित्ताने राजकारण तापले असून भाजपा कॉंग्रेसच्या नेत्यांची स्मारकं बांधून स्वातंत्र्य चळवळीचे श्रेय लाटत आहे असा आरोप कॉंग्रेस आणि मोदी विरोधकांकडून होत आहे. तर हे सर्व नेते देशाचे नेते होते. कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्यानंतर त्यांची उपेक्षा केली, आम्ही त्यांचा उचित सन्मान करत आहोत अशी भाजपाची भूमिका आहे.

या निमित्ताने दिनकर जोषींचे महामानव सरदार पटेल पुस्तक वाचताना अनेक नवीन गोष्टी समजल्या. त्यातील देशाची फाळणी आणि काश्मीर संदर्भात सरदार पटेल, शेख अब्दुल्ला आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील संबंधांबाबत वाचत असताना अचानक भाजपा-पीडीपी यांच्यामध्ये २०१५ साली झालेल्या आणि २०१८ साली मोडलेल्या युतीबाबत एक शक्यता डोळ्यासमोर चमकून जाते.

 

shaikh abdullag nehru sardar patel

 

भाजपाने मेहबुबा मुफ्तींच्या पक्षाशी युती का केली याबाबत विविध कारणं दिली जातात. मोदी विरोधक त्याला तत्वशून्य राजकारण म्हणतात. भाजपाकडून विभाजित जनमताचा आदर हे कारण दिले जाते. पण या गोष्टीला काही ऐतिहासिक संदर्भही असू शकतात का?

ही शक्यता मांडण्यासाठी सरदार पटेलांच्या पुस्तकात दिनकर जोषींनी मांडलेल्या घटनांचा संदर्भ घ्यावा लागेल. पुढील उताऱ्यांत एकेरी अवतरण चिन्हांमधील वाक्यं या पुस्तकातून घेतली आहेत.

ऑक्टोबर १९३२ मध्ये शेख अब्दुल्ला आणि चौधरी गुलाम अब्बास यांनी ऑल जम्मू आणि काश्मीर मुस्लिम कॉंग्रेसची स्थापना करुन संस्थानात फुटिरतावादाची ठिणगी टाकली. शेख अब्दुल्ला आणि पंडित नेहरु यांच्यातील मैत्री सर्वश्रुत होती.

‘शेख अब्दुल्लांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे जवाहरलाल नेहरूंनी मुस्लीम कॉन्फरन्सला नॅशनल कॉन्फरन्स असं नाव तर दिलंच‚ त्याखेरीज तमाम काश्मिरी लोकांनी शेख अब्दुल्लांच्या नेतृत्वाखालील त्या कॉन्फरन्सचे सभासद होऊन त्यांना साथ द्यावी असं आवाहनही केलं. ज्या कोणाला काश्मीरमध्ये राहायचं असेल त्याला शेखांच्या नॅशनल कॉन्फरन्सचा अंगीकार केल्यावाचून चालणार नाही‚ असंही त्यांनी म्हटलं.’

१९३५ च्या कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतात प्रांतिय निवडणुकांना सुरूवात केली. १९३७च्या निवडणुकीतील अपयशानंतर महंमद अली जीनांच्या नेतृत्त्वाखाली मुस्लिम लीगने पाकिस्तानसाठी आंदोलन तीव्र केले. पंजाब, सिंध आणि बंगाल भागात मुस्लिम लीगला यश मिळाले असले तरी जिन्हांचा हुकूमशाही चेहरा फुटिरतावादी मुस्लिम नेत्यांच्या समोर येऊ लागला.

‘पंजाबची युनियनिस्ट पार्टी जीनाविरोधी होती. या पार्टीचे नेता सिकंदर हयातखान मुस्लीम लीगविरुद्ध असूनही पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. नंतर मात्र जीनांनी त्यांना भुलवून युनियनिस्ट पार्टी मुस्लीम लीगमध्ये विलीन करवून घेतली होती. परिणामी‚ सिकंदर हयातखानांची अवस्था पंख कापलेल्या पक्ष्यासारखी झाली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पंजाब सोडून रातोरात मुंबईला जायची त्यांच्यावर पाळी आली. मुंबईतही आपला जीव सुरक्षित नाही असं वाटलं तेव्हा ते लंडनला पळून गेले. अशीच गत सिंधच्या अल्लाबक्षांची झाली होती. जीनांच्या जाळ्यात ते ओढले तर गेले होते; पण जाळ्यात पूर्णपणे फसले नव्हते. शेवटी त्यांची हत्या झाली होती. त्या हत्येमागे कोणाचा हात होता‚ ते कोणाचं कारस्थान होतं त्याचा अद्यापही काही माग लागत नव्हता.’

टोळीवाल्यांच्या विध्वंसामुळे तसेच पाकिस्तानने काश्मीरवर कब्जा केल्यास तेथे आपल्याला काही स्थान उरणार नाही अशी जाणीव शेख अब्दुल्ला यांना झाल्यामुळे त्यांनी पंडित नेहरुंशी संपर्क साधून लष्करी मदत पाठवायची विनंती केली. त्यातून एकीकडे भारतवादी अशी त्यांची प्रतिमा निर्माण होणार होती तर दुसरीकडे नेहरुंच्या मदतीने महाराज हरिसिंहांची हाकालपट्टी करुन सत्तेवर येणेही शक्य होणार होते.

काश्मीर प्रश्न विवाद्य बनवून, त्याचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे आणि त्यावर सत्ता गाजवायची हे शेख अब्दुल्लांच्या राष्ट्रवादी धोरणामागचे रहस्य होते. सरदार वल्लभभाई पटेलांचा महाराजा हरिसिंहांकडे कल असला तरी नेहरूंपुढे त्यांना पडती बाजू घ्यावी लागली.

५६५ संस्थानांचे भारतात विलीनीकरण करुन देशाचे एकसंधत्त्व टिकवण्याचे सरदार पटेलांचे अविश्वसनीय कार्य, हा या पुस्तकाचा मुख्य विषय असला तरी त्यात अन्य अनेक विषयही येतात.

सरदारांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाईं पटेलांचे सुभाषबाबूंशी जवळीक आणि त्यासाठी महात्मा गांधींकडून त्यांना दरकिनार केले जाणे, सुभाषबाबूंचे सरदार आणि महात्मा गांधींशी असलेले मतभेद, कॉंग्रेसमधील जहालपंथियांना दरकिनार करण्यासाठी महात्मा गांधी आणि पटेलांनी जहाल समाजवादी विचारांच्या सुभाषबाबूंना सुरूवातीला दिलेला पाठिंबा पण ते कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांचे केलेले खच्चीकरण…

कॉंग्रेसमधील सर्वाधिक लोकप्रिय नेते असूनही महात्मा गांधींच्या इच्छेखातर नेतृत्त्वाचा आणि भविष्यातील पंतप्रधानपदाचा त्यांनी केलेला त्याग, पण गृहमंत्रीपदासाठी धरलेला आग्रह, राजाजींना देशाचे परराष्ट्र मंत्री करण्याला सरदार पटेलांचा पाठिंबा आणि मौलाना आझाद यांना शिक्षण मंत्री करण्यास असलेला विरोध, आणि दोन्ही सूचनांना केराची टोपली दाखवून नेहरुंनी केलेली मनमानी…

फाळणीची तसेच संस्थानांच्या भारतातील विलीनीकरणाची चर्चा सुरु झाली तेव्हा सरदार पटेलांचा काश्मीर खोरे पाकिस्तानकडे जाऊन जम्मू-लडाख भारताकडे ठेवण्याकडे असलेला कल, पण पंडित नेहरुंच्या आग्रहामुळे जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी प्रयत्न करायचे ठरल्यावर ते आपल्या ताब्यात राहावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात न्यायला त्यांचा विरोध…

टोळीवाल्यांच्या वेषात पाकिस्तानी सैनिक बारामुल्लापर्यंत पोहचल्यावर तत्परता दाखवत एका रात्रीत विमानाने सैन्य तेथे पाठवणे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून श्रीनगरला प्रयाण करणे…

अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून समोर येतात.

स्वातंत्र्य चळवळीतील, खासकरुन कॉंग्रेस पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांमधील महत्त्वाकांक्षा, परस्परांतील राग-लोभ, एकमेकांवर कुरघोडी करण्याची वृत्ती हे एकच गोष्टं ठळकपणे सुचवतात. राजकारण हे सगळीकडे एकसारखे असते. कदाचित आजच्या काळात त्याने आणखी खालची पातळी गाठली असली तरी या गोष्टी तेव्हाही होत्या.

स्वातंत्र्यानंतर ७० वर्षं होऊन गेली तरी इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याऐवजी आजवर आपण केवळ एका नेत्याची किंवा घराण्याची प्रतिमा संवर्धन करण्यासाठी इतिहास लिहिला आणि सांगितला.

सरदार पटेल आणि सुभाष चंद्र बोस हे कॉंग्रेसचे नेते होते, आणि मोदी-शहा पक्षांतर्गत विरोधकांना कशाप्रकारे कमकुवत करत आहेत याबाबत सकाळ-संध्याकाळ समाजमाध्यमांत ओरडाओरड करणारे विचारवंत या गोष्टींबाबत चकार शब्द काढत नाहीत.

महामानव सरदार हे पुस्तक गुजराथीत असल्यामुळे मोदी-शहा तसेच भाजपा-संघाच्या अनेकांनी वाचले असणार यात शंकाच नाही. अटलजी पंतप्रधान असताना भाजपाने नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी केली होती. असे ऐकण्यात आले आहे की, भाजपातील अनेक नेत्यांना शेख घराण्याची अत्यंत भ्रष्ट आणि छुपी फुटिरतावादी कार्यशैली सलत होती.

२०१५ साली त्रिशंकू विधानसभा अस्तित्त्वात आली असता जनतेने नाकारलेल्या अब्दुल्ला घराण्यासोबत युती रण्यापेक्षा फुटिरतावादी अशी ओळख असणाऱ्या पीडीपीशी युती करण्याचे धाडस भाजपाने केले. या निर्णयाला व्यावहारिक कारणांसोबतच सरदार पटेल, नेहरु, शेख अब्दुल्ला यांच्यातील संबंधांचा संदर्भही असावा असे हे पुस्तक वाचताना वाटते.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?