एव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेची थरकाप उडवणारी कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज एका खंबीर आणि मजबूत महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या त्यासाठी जिद्दीने लढणाऱ्या महिलेची कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जिने वयाच्या २४व्या वर्षी आपल्या ईंडो-तिबेटीयन पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा दिला कारण तिला आपले स्वप्न पूर्ण करायचे होते.

त्यानंतर पुढच्या दोनच वर्षात पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारी ही महिला सलग दोनदा जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करणारी जगातली पहिली महिला ठरली.

ती जेव्हा पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होती तेव्हा, तिला ती करत असलेल्या कामाबद्दल पुरेसे समाधान वाटत नव्हते. आपण देशसेवेत कमी पडतोय अशी काहीशी भावना तिच्या मनात होती शिवाय एक स्त्री म्हणून तिला काहीतरी करून दाखवायचं होतं.

स्वतःला सिध्द करायचं होतं. त्यामुळे तिने तडक आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि एव्हरेस्टवर चढाई करण्याचा निर्णय घेतला.

 

mount everest women inmarathi
WION

 

संतोषचा जन्म १० ऑक्टोबर १९६७ रोजी हरियाणाच्या रेवारी जिल्ह्यातील जोनियावास ह्या गावी झाला. तिथले  ग्रामीण वातावरण, त्यावेळी प्रचलित असलेली सामाजिक बंधने आणि मुलींच्या शिषणाला असलेला विरोध ह्या सगळ्यांशी सामना करत तिने आपले शिक्षण सुरूच ठेवले.

तिचे आईवडील अगदी जुन्या विचारांचे होते. त्यांची एकाच इच्छा होती, काहीही करून संतोषचे लाग्न लावून द्यायचे!

परंतु तिचे लक्ष्य काहीतरी वेगळेच होते ज्यासाठी लढली आणि यश मिळवले. लहानपणी तिचा असा कसलाही विचार नव्हता.

तिने वयाच्या सोळाव्या वर्षी तिने जयपूर येथे गिर्यारोहणाचा कॅम्प केला आणि तिला जाणवलं की, आपण ह्या साहसी खेळात चांगली कामगिरी करू शकतो. संतोष एका खंबीर स्त्री चे उत्तम उदाहरण आहे.

१९८७ साली तिने जयपूरच्या महाराणी महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आणि त्याच्या पुढच्या वर्षी एनसीसी मध्ये ‘सी’ प्रमाणपत्र मिळवले.

जयपूरच्या ह्या प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत असताना तिला तिच्या आयुष्याचे ध्येय गवसले.

१८८६ साली तिने उत्तराकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियारिंग (एन आय एम) मधून प्रशिक्षण घेऊन त्यात ‘ए’ ग्रेड मिळविला.

 

nehru institute of mountaineering inmarathi
Steemit

 

त्यावेळी तिने प्रथमच बर्फ पहिला होता. त्यानंतर तिने त्याच संस्थेतून अडव्हांस माउंटनियारिंगचा कोर्स “ए” ग्रेड मिळवून पूर्ण केला.

१९८९ साली तिला नुन कुन परिसरातल्या  9- nation international climbing camp-cum-expedition (२१,६५३फूट) मध्ये सामील होण्याची संधी मिळाली.

त्यात एकूण ३१ सदस्य होते आणि त्या सर्वांमध्ये संतोष ही एकमेव महिला सदस्य होती. ही तिची पहिलीच आणि काहीशी किचकट मोहीम होती.

मात्र त्यात तिने उत्तम कामगिरी करत आपले गिर्यारोहणाचे कौशल्य दाखवले. ती आपल्या पहिल्या गिर्यारोहण मोहिमेसाठी घरातून चक्क पळून गेली होती आणि हा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला.

त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे १९९० साली ती इंडो ताईवान च्या सेसार कांगरी- प्रथम (२५,१७०) साठी निवडली गेली ज्यात तिने मार्ग खुला करणे आणि लोड फेरी बनवणे असे दुहेरी योगदान दिले. ती त्यातल्या १८ जणांपैकी एक होती.

तांत्रिकदृष्ट्या कठीण असा पश्चिमेकडे तोंड असणाऱ्या मार्गाने काराकोरमचे सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली महिला म्हणून तिने गौरव प्राप्त केला.

त्यानंतर १९९० साली नोव्हेंबर महिन्यात तिची आयटीबीपी, गृहमंत्रालय, भारत सरकार द्वारे पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९१ साली पुन्हा तिची भारत-जपानी कांचनजंगा अभियानाची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ह्या प्रवासी संघात ती सर्वात मजबूत आणि सक्षम पर्वतारोही होती.

ती २४,९५० फुटांपर्यंत सहज पोहोचू शकली असती मात्र खराब हवामानामुळे ते शक्य झाले नाही.

 

mount everest inmarathi

 

ह्या मोहिमे नंतर लगेच तिची माउंटन इंडियाच्या पूर्व-एव्हरेस्ट मोहिमेची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ज्यात ती मार्ग खुला करणारी आघाडीची गिर्यारोहक होती. मात्र प्रतीकूल हवामानामुळे माउंट अबी गामिन (२४,४४७ फूट) सर करण्याचा हा प्रयत्न तिथेच थांबला.

१२ मे १९९२ रोजी संतोषचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले. हाच तो दिवस जेव्हा तिने एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले.

तेथे पाय ठेवताक्षणी क्षणभर तिला विश्वासच बसला नाही की, ती जगातल्या सर्वोच्च शिखरावर उभी आहे!

तिचे मन अतीव समाधानाने भरून आले आणि तिने अभिमानाने तिथे आपल्या देशाच, भारताचा तिरंगा झेंडा फडकावून त्याला सलाम करून मानवंदना दिली.

ती एवढ्यावरच थांबली नाही. पुढच्या वर्षी तिने पुन्हा एव्हरेस्ट सर केला. मात्र दुसऱ्यांदा एव्हरेस्टवर चढाई करणे हा नशिबाचा भाग होता असे ती मानते. त्यावर्षी तीची इंडियन माउंटनियर्स असोसिएशनच्या मोहिमेसाठी पंधरा जणांच्या टीमचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती.

 

everest inmarathi
the star online

 

त्या पंधरा जणांपैकी नऊ भारतीय आणि सहा नेपाळी गिर्यारोहक होते. १२ मे १९९३ रोजी म्हणजे बरोबर वर्षभरानंतर तिने एव्हरेस्ट सलग दोनदा सर केल्याचा विक्रम स्थापित केला.

आणि असा विक्रम करणारी ती पहिली महिला ठरली. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी एकूण चौदा रस्ते आहेत. मात्र ह्यावेळी संतोषने नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गाने एव्हरेस्ट सर करायचे ठरवले ज्या मार्गाने पूर्वी कधीही कोणी शिखरावर गेलेले नव्हते.

 

santosh yadav 1 inmarathi
SheThePeople.TV

 

हा मार्ग मृत्यूचा मार्ग म्हणून ओळखला जायचा. अशा मार्गावर त्यांनी कुठल्याही शेरपाच्या मदतीशिवाय चढाई करायला सुरुवात केली आणि यश मिळविले. त्याबरोबरच एव्हरेस्ट शिखर सलग दोनदा काबीज करणारी महिला म्हणून तिने जागतिक विक्रम स्थापित केला.

१९९४ च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिचे नाव नोंदवण्यात आले.

तिच्या गिर्यारोहणातील उत्कृष्ठ कामगिरीसाठी तिला ३० मार्च २००० रोजी नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

santosh yadav inmarathi
Indiatimes

 

२००२ साली तिने एनसीईआरटी च्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात बारावीच्या विद्यार्थ्यासाठी ‘इको टूरीजम- प्रोब्लम्सand prospects’ हा धडा लिहिलेला आहे.

अनेक आंतरराष्टीय आणि राष्ट्रीय मासिके आणि नियतकालिकात तिचे साहसी खेळांसंबंधीत अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.

२००६ साली दिल्लीच्या उपनगरातील एका खास रस्त्याला तिच्या नावावरून ‘संतोष यादव’ मार्ग असे नाव देण्यात आले. एनसीईआरटी ने २००७ साली चौथ्या आणि सातव्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांत संतोष यादवच्या कामगिरीचा धड्यांच्या स्वरुपात समावेश केला आहे.

 

santosh yadav 2 inmarathi
biographyhindi.com

 

तर असा झाला संतोष यादवचा ध्येयाकडे जाणारा प्रवास. त्यांची ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद अशीच आहे. मात्र त्यांना एवढ्यावरच थांबायचं नाही.

त्यांना आपला हा अनुभव इतर महिलांपर्यंत पोचवण्याची इच्छा आहे. त्यांना मदत करून सक्षम बनवण्याची इच्छा आहे.

त्यांना वाटतं की, भारतीय महिलांनी आपल्या आवडत्या  क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवावी. स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणतात की, महिलांनी असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे ज्यासाठी संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?