मीचि मज व्यालो । पोटां आपुलिया आलो ॥: जाऊ तुकोबांच्या गावा (५२)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : “असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल! : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)

InMarathi Android App

===

jave-tujave-tjave-tukobanchya-gaava-marathipizza01ukobanchya-gaava-marathipizza01kobanchya-gaava-marathipizza01

 

नारायणास याप्रमाणे पुढील जीवनासाठी मार्ग दाखवून झाल्यावर तुकोबा आबा पाटलाकडे वळले आणि म्हणाले, “आता आपला विचार सांगा. काय ठरते आहे?”

आबाने मान किंचित खाली केली आणि तो म्हणाला,

“द्येवा, आपल्यासंग ऱ्हायलो, मन भरून पावलं. पर ह्यो घरसंसार नग वाटतुया. घरी ग्येलो तर दोनाचे चार करून बी टाकतील. म्यां म्हनतो, त्ये तुटलं आता. पुना तिकडं नगं. मला संन्यास घ्यावा वाटतुया. श्येवटी आपन म्हनाल तसं.”

आबाचे बोलणे ऐकून सर्व एकदम गंभीर झाले. तुकोबांना मात्र खरे तर हसूच आले पण त्यांनी ते आवरले व रामभटांकडे वळून म्हणाले,

“काय हो, आबा संन्यास घेऊ शकतात काय? शास्त्र काय सांगते?”

रामभट उत्तरले, “देवा, आपल्या सहवासात आल्यापासून मी त्या शास्त्रांना सोडले ते कायमचे. त्या अर्थाने शास्त्रार्थ करण्यास आता मी योग्य राहिलो नाही. परंतु, आदि श्री शंकराचार्यांचे मत सांगतो. ते म्हणतात, ब्रह्मचर्याश्रमात संन्यास घेतल्यासच मोक्ष मिळतो! म्हणजेच संन्यास सफल व्हायचा असेल तर तो निर्णय ब्रह्मचारी अवस्थेतच व्हायला हवा होता.”

हे ऐकून नारायण म्हणतो, “हे काही आबांच्या विरोधी नाही. त्यांचा विवाह झालेला नाही. ते संन्यास घेऊ शकतात!”

ह्यावर रामभट म्हणाले, “आचार्यांचे मत असे नाही. त्यांचा ब्रह्मचर्याश्रमाचा अर्थ, मनात कामविकार उत्पन्न व्हायच्या आधीचा काळ असा आहे. त्या अर्थाने आबा आता बरेच मोठे झाले आहेत. एकदा कामविकार उत्पन्न झाला की देहाने नाही तरि मनाने, जागेपणी नाही तरी स्वप्नांत त्याचा भोग घेतला जायचाच. तो आवेग आता आवरणे सोपे नाही. तशी मानसिकता ज्यांची आधीच घडते तेच संन्यासास योग्य होत. दमन हा आता मार्ग नव्हे.”

“रामराय बरोबर सांगत आहेत आबा. तुम्ही ह्या विषयाच्या नादी लागल्याने तुमच्या मनात विरक्तीचे विचार येत आहेत. तो मोह आहे. तो टाळा आणि रीतसर संसार करा. संसार करणे वाईट नव्हे. संसार करूनही तुम्ही उत्तम अवस्था गाठाल.”

रामभट मध्येच म्हणाले, “देवा, अशीच इच्छा करून एक विद्वान संन्यासासाठी आपली अनुमती मागण्यासाठी मागे आला होता नाही? आपण त्याला म्हणालात –

वर्णाश्रम करिसी चोख । तरिं तूं पावसी उत्तम लोक ॥
तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगे चिं ब्रह्म व्हावें ॥
तुका ह्मणे देहीं । संत जाहाले विदेही ॥

हे ऐकून तुकोबा म्हणाले, “अहो, आपला धर्म आपण पाळलाच पाहिजे आणि समाजातील धर्म टिकून राहावा यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठाही केली पाहिजे.

धर्म रक्षावयासाठी । करणे आटी आह्मांसि ॥
वाचा बोलो वेदनीती । करूं संती केलें तें ॥
न बाणतां स्थिती अंगी । कर्म त्यागी लंड तो ॥
तुका ह्मणे ह्मणे अधम त्याची । भक्ति दूषी हरीची ॥

आबा, आता रामरायांनी सांगितले ते नीट लक्षात घ्या. संन्यास म्हणजे जे कर्म आपल्याला वर्णाश्रमानुसार प्राप्त झाले ते त्यागणे आणि अंगी पूर्ण वैराग्य बाणविणे. ही काही साधी गोष्ट नव्हे. खरा संन्यासी जन्माला येण्यासाठी शतके जातात. आपण नसते साहस करू नये. अंगी पुरेशी स्थिती बाणल्याशिवाय कर्म त्यागले म्हणणारा लबाड असतो. त्याची भक्ती दूषीत म्हणावी आणि त्यास अधम म्हणावे.

आबा, आपण असे होऊ नये. आपण आपले निसर्गदत्त कर्म करावे. आपला धर्म पाळावा. त्यासाठी आटापिटा करा असे वेद सांगतात. ती वेदनीती पाळण्यातच आपले हित आहे. संतांनी तेच केले आणि म्हणून आपणही तेच करावे.

उचित जाणावे मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥
न घलावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥
अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका ह्मणे ॥

आबा, तुम्ही घरी जा. लग्न करा. गृहस्थधर्म पाळा. तुम्ही शेतकरी ना? उत्तम शेती करा. व्यवहार शिका. गुणवंत व्हा. धनवंत व्हा.

जोडोनियां धन उत्तम व्यवहारें । उदास विचारें वेच करी ॥
उत्तम चिं गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥
परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥
भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवीं महत्त्व वडिलांचे ॥
तुका ह्मणे हें चि आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ॥

आबा, तुम्हाला झालेली संन्यासाची इच्छा हे शुभलक्षण आहे. गृहस्थाश्रमी असूनही तुम्ही त्याच दर्जाचे वैराग्य अंगी बाणवू शकाल. त्यासाठी एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा.

तो असा की प्रथम उत्तम व्यवहार शिकावा व करावा. तसा केलात की तुम्हाला उत्तम धनप्राप्ती होईल. नंतर ते धन आपले नाही असे समजून त्याचा विश्वस्त भावनेने विनियोग करा. असे केलेत की तुम्हांस समाजात उत्तम गती प्राप्त होईल आणि उत्तम लोकांमध्ये तुम्ही राहाल.

ही अवस्था टिकविण्यासाठी आपल्या हातून परनिंदा घडणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. परस्त्रिया ह्या आपल्या माताभगिनींसमान आहेत असे आपले वर्तन व्हायला हवे. यासोबत भूतदयाही अंगी वसविली पाहिजे. गायीपशूंचे प्रेमपूर्वक पालन, अडचणीत सापडेल्याला मदत करणे आदी सवयीं लावून घेतल्या पाहिजेत.

लोकांना आपले दर्शन असे व्हावे की लोकांनी तुम्हाला शांतीरूप म्हणावे. तुम्ही कोणाचे वाईट चिंतीत नाही असे लोकांस नेहमी जाणवले पाहिजे. अशा रीतीने वागून आपल्या वाडवडिलांची कीर्ती तुम्ही वाढवा.

आबा, गृहस्थाश्रम मोठे फळ देणारा आहे. आत्ता सांगितले तसे वागाल तर तुम्ही वैराग्याची साधना केली असे होईल व जेथे संन्यासी पोहोचतो त्या परमपदाला तुम्ही पोहोचाल.

आबा, गृहस्थाश्रम आहे म्हणून समाज आहे हे विसरू नका. गृहस्थाश्रमी लोकांच्या पोटी नररत्ने जन्माला येतात म्हणूनही गृहस्थाश्रमाचे महत्त्व आहे. गृहस्थाश्रम म्हणजे भोग नव्हे, अविरत त्यागवृत्ती सांभाळण्याची ती संधी आहे, उत्तम जीव जन्माला यावेत यासाठी केलेली ती व्यवस्था आहे हे सतत लक्षात ठेवा.

तुम्हाला उत्तम पत्नी मिळो आणि तुम्हाला उत्तम संतती होवो. आपल्याला उत्तम संतती व्हावी आणि आपली संतती उत्तम व्हावी अशी कामना प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीने केली पाहिजे.

जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा ॥
पोटा येतां हरले पापा । ज्ञानदेवा मायबापा ॥
मुळी बाप होता ज्ञानी । तरी आह्मी लागलो ध्यानीं ॥
तुका ह्मणे मी पोटींचे बाळ । माझी पुरवा ब्रह्मींची आळ ॥

आबा, एक ज्ञानदेव जन्माला येण्यासाठी अनेक पोटीं बाळे जन्माला यावी लागतात. म्हणून आपणही म्हणावे की मी अनेक पोटींचे बाळ आहे आणि मग आळवावे की आपण ब्रह्मरूप होऊ या. ज्ञानदेवांचे वडील ज्ञानी होते पण संन्यास सोडण्याचे पाप लागले. तरी बघा, मुले अशी झाली की त्या पापाचा नाश त्या मुलांनी केला आणि अवघा वंश मुक्तीस गेला. त्या विठ्ठलपंतांसारखा बाप मी होईन अशी कामना, आबा, तुम्ही मनात धरून गृहस्थाश्रम स्वीकारा.

तुकोबांचा हा उपदेश ऐकता ऐकता आपल्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या आहेत हे आबाच्या आधी लक्षात आले नाही. तुकोबा थांबले तश्या त्याने बाह्यांनीच डोळे पुसले, तुकोबांना साष्टांग दंडवत घातले आणि गद्गगदीत स्वराने म्हणाला, “द्येवा, म्यां जातो गावाकडं परत, आता आशीर्वाद द्यावा.”

तुकोबांनी आबास जवळ घेतले व म्हणाले अजून काय आशीर्वाद द्यायचा? वैराग्याची साधना चालू ठेवा. एक दिवस तुमच्या आयुष्यात असा येईल की तुम्ही म्हणाल –

मीचि मज व्यालो । पोटां आपुलिया आलो ॥
आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥
जालो बरा बळी । गेलों मरोनि तेंकाळीं ॥
दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥

अशा तऱ्हेने तुकोबांमुळे आबा पावन झाला. त्याची कथा आपण ऐकली. त्या ज्ञानामृताचा लाभ आपणही घेतला. तो आता सर्वांचा निरोप घेईल. आबाबरोबर आपलेही वर्ष तुकोबांच्या सहवासात अभ्यासाचे गेले. आपणही एकमेकांचा निरोप घेऊ या. मात्र, हा अभ्यास चालू राहील ह्याची काळजीही आपण करू या. तुकोबांच्या गावाहून परतताना बांधून आणलेली ज्ञानाची शिदोरी आपल्याला जन्मभर प्रेरणा देईल, त्यासाठी आपण सावध राहू या.

होतो तुकोबांचे गावी । काय कथा वर्णावी ॥
होते सोनियाचे दिस । घडला तुकयाचा सहवास ॥
श्रवणांद्वारे पसरले । ज्ञानामृत शरीरीं वसले ॥
देहासंगे मन अन बुद्घी । निवतील ही उपलब्धी ॥
ज्ञानदेवी परंपरा । असे तुकया आधारा ॥
तयां संगे राहू । ज्ञानदासा दुसरें न पाहू ॥

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *