बिच्चारा सलमान! विनाकारण अडकवलय रे त्याला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : पवन गंगावणे 

===

न्यायव्यवस्था सामान्य माणसापासून ते व्हीआयपी लोकांपर्यंत सगळ्यांसाठी सारखी असते हे वाक्य जनसामान्यांना याची शाश्वती देते की, गुन्हा करणारा सोशल स्टेटसने कितीही मोठा असला तरी कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकत नाही.

पण हे वाक्य बाकी काही नसून एक फार्स आहे जो लोकांना सुरक्षित वाटावं यासाठी सरकारने निर्माण केला आहे.

खिशात बक्कळ पैसा आणि ओळखीपाळखी असल्यास कितीही मोठा गुन्हा करून बिनधास्तपणे क्लीन चिट मिळवली जाऊ शकते किंवा देशातून पळून तरी जाता येऊ शकतं हे वेळोवेळी सिद्ध झालंय.

पण ‘कायदा सगळ्यांसाठी समान आहे.’ हा फार्स कायम ठेवण्यासाठी सरकार किंवा पर्यायाने न्यायालय जेव्हा सलमान खानसारख्या लोकांचा बळी घेते तेव्हा खरंच खूप त्रास होतो.

वर्ष १९९८.

सुरज बडजात्याच्या हम साथ साथ है या कौटुंबिक सिनेमाच्या शूटिंगसाठी नट सलमान खान व इतर काही कलाकार जोधपूर जवळील कांकणी या गावात शूटिंगसाठी गेलेले होते.

पण काहीच दिवसात सलमान व त्याच्या सहकलाकार यांनी दोन काळविटांची शिकार केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि अभिनेता सलमान व इतर सहकलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

hum-saath-saath-hain- inmarathi

खटल्याच्या अगदी सुरुवातीपासूनच कसं सलमानला या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू होता हे आता सविस्तर सांगतो.

२ काळवीट मेली. मान्य. पण ती सलमाननेच मारली हे कशावरून? काळविटाच्या कुटुंबियांनी येऊन हे माननीय कोर्टास सांगितले काय? नियमांचा पक्का असलेला सलमान “औरतो, ब्लॅकबक और बच्चो को नही मारता.” हे सर्वश्रुत आहे. (यातला ब्लॅकबक वाला भाग प्रभूदेवाने कॉन्ट्रोव्हर्सि टाळण्यासाठी वगळला होता.)

हिंस्त्रप्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांडग्यांना जेव्हा सलमान “टायगर झिंदा है” मध्ये जिवंत सोडून देतो, तर तो निष्पाप काळविटांना कशासाठी मारेल?

आणि अभिनेता सलमान सोडा, त्यासोबत इतर कोण लोकं होते ते बघा.

तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे या महिला कलाकार आणि सैफ अली खान. सैफची इमेज तर त्याकाळी अशी होती की त्याला बायल्या, गे म्हणून संबोधलं जायचं. त्याची बायको करिना तर आजही त्याला सैफ ऐवजी सेफ म्हणते.

असला बायल्या प्रतिमेवाला व्यक्ती शिकार बिकार भानगडतीत कशाला पडेल?

वरून ते सगळे एका अत्यंत कौटुंबिक सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेले होते. “ये तो सच है की भगवान है” अशाप्रकारची गाणी असलेल्या सिनेमात काम करताना शिकार करण्याचा विचारही कुणाला शिवेल का?

hum sath sath hai inmarathi

दुसरीकडे, सगळ्यात मोठी चूक जोधपूरमध्ये असलेल्या करमणूक स्थळांच्या कमतरतेची आहे. जोधपूरमध्ये त्याकाळी ना बार होते ना कॅसिनो.

आता तरी आलोकनाथ चू* वगैरे म्हणून स्वतःला कुल म्हणवतात पण त्याकाळी ते नुसतंच संस्कारावर प्रवचन द्यायचे.

मग करमणुकीला एक तर त्यांची बडबड ऐकावी किंवा जंगलात भटकावे हे दोनच पर्याय होते.

स्टार सलमान आणि इतर सहकलाकारांनी साहजिकच दुसरा पर्याय निवडला. ट्रॅव्हल एजंट दुष्यंत सिंग यांनी काळवीट दाखविण्यासाठी सुपरस्टार व इतर सहकालाकारांना कांकणी येथे नेले. सोबत सलमानचा मॅनेजर दिनेश गावडे सुद्धा होता. जंगलात पोचताच काळविटांचा कळप दुरून धावताना सर्वाना दिसला.

मेगास्टार सलमानने ट्रॅव्हल एजंटकडे “काका! काका! काळवीट दाखवा ना” म्हणून गळ घातली. परंतु इथेही जोधपूऱ्यांच्या ढिसाळपणा दिसून आला. काळवीट जवळून न्याहाळता यावी म्हणून सिंग यांनी दुर्बीणच सोबत आणलेले नव्हते.

मग आपत्कालीन उपाय म्हणून वाघांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी सोबत ठेवलेल्या रायफलच्या दुर्बिणीतून काळवीट बघण्याचा सल्ला सिंग यांनी दिला.

 

hunt-inmarathi
www.thequint.com

जुबली स्टार सलमानला रायफलीच्या दुर्बिणीतून काळवीट बघताना खूप आनंद झाला. त्याने दुर्बिणीचा झूम कसा वाढवायचा? असे विचारल्यावर त्याचा मॅनेजर दिनेश गावडे याने,

“भाई वो बटन दबाके देखो ना!”

असा सल्ला दिला. संजय दत्तप्रमाणेच सलमानने सुद्धा खरी बंदूक कधीच बघितली नसल्याने ती कशी चालते याचा भोळ्या सलमानला काहीच अंदाज नव्हता आणि बटन दाबताच अघटित घडले.

काळविटांना गोळ्या लागलेल्या बघताच सलमान कळवळून “उई मा!” म्हटला. पण आता खूप उशीर झालेला होता.

ग्रँडस्टार सलमानचा मॅनेजर गावडे त्या दिवसापासून आजपर्यंत फरार आहे.

बरं समजा एका सेकंदासाठी जर असं मानूनही घेतलं की सलमानने काळवीट मारली, तर काय बिघडलं? असतील ती लुप्त होत असलेली प्रजाती, डायनॉसौर तरी कुठे पाहायला भेटले आम्हाला? त्याने कुठे आयुष्य थांबलं कोणाचं? मनुष्यप्रजातीची उत्क्रांती झालीच ना!

आणि धुमकेतूंवर कोणते खटले भरले गेले हे तरी सांगा.

काय योगदान आहे काळविटांचं समाजाप्रती? ते १९९८ मध्ये मरून मोकळे झाले. पण डायमंडस्टार सलमानने २००७ पासून बिंग ह्युमनच्या माध्यमातून किती समाजकार्य केलंय! त्याने कित्येक नवीन चेहरे बॉलिवूडला दिलेत.

Athiya-Shetty-InMarathi

डेजी शाह, आथिया शेट्टी, सूरज पांचोली सारखे आज टॉपवर असलेले नट/नट्या एकेकाळी सलमाननेच लाँच केल्या होत्या.

Suraj Pancholi Inmarathi
Suraj Pancholi

 

ब्रेकअप झालेला असतानाही सलमान दुःखात रममाण होऊन बसला नाही.

zareen-khan Inmarathi

 

त्याकाळातही त्याने स्नेहा उल्लाल आणि झरीन खान सारखे दोन सुंदर चेहरे बॉलिवूडला दिले.

 

Sneha-Ullal-InMarathi

 

अनेक वर्षे आपल्या सिनेमातून सलमान कुटुंबाला जपा, आई-वडिलांचा आदर करा, तीन लोकांची मदत करा, महेशबाबूचे सिनेमे हिंदीत लोकांना दाखविण्याची सोय करा, भारत-पाकिस्तान ऐक्य यांसारख्या विषयावर सिनेमे करून एकेप्रकारे समाजप्रबोधनचं करत आहे.

बिगबॉसचा सूत्रधार बनून त्याने सगळ्याच घरात भांडणं, लावलाव्या होतात हे दाखवून घरोघरी मातीच्याच चुली आहेत हे प्रेक्षकांना माहीत करून दिलं. उगाच नाही मॅन ऑफ अ गोल्डन हार्ट म्हणतात त्याला.

salman-story bigg boss InMarathi

सलमानच्या दोनशे-तीनशे कोटी पार करणाऱ्या सिनेमांमुळे स्पॉटबॉयपासून ते थिएटरवर तिकीटं विकणाऱ्यापर्यंत हजारो लोकांना रोजगार मिळतो. त्या दोन काळविटांचा समाजाला काय उपयोग होता? मग मेले ते तर कुठे बिघडलं?

आणि तसेही ते जोधपूरच्या दुष्काळाला कंटाळून आत्महत्या करून म्हणजे नैसर्गिक कारणांनी मेले होते, असं युनायटेड नेशन्सच्या एका रिपोर्टने स्पष्ट होतं पण ती रिपोर्टही कालांतराने गायब करण्यात आली.

खूप वर्षांपूर्वी प्लॅटिनम स्टार सलमानने फुटपाथवर झोपलेल्या काही लोकांना गाडीखाली चिरडलं असा आरोप करून त्यावर खटला भरण्यात आला होता. पण भक्त असलेल्या सलमानवर देवाची कृपा झाली आणि त्यातून तो निर्दोष सुटला.

salman khan drive InMarathi

पण आज पुन्हा कायदा कसा सगळ्यांना समान आहे आणि तो कुणा एका पक्षाच्या लोकांना किंवा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले संबंध असलेल्या लोकांना सोडून देत नाही हे देशाला दाखवून देण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालय सलमानच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत आहे.

सेलिब्रिटी असल्याची मोठी किंमत नेहमीच सलमानला मोजावी लागली आहे. कारण अशा वेळी तो नेहमीच सोप्पं सावज म्हणून कायद्याच्या कचाट्यात अडकतो. यात सर्वात महत्वाची गोष्ट ही की या शिकारीच्या वेळी सलमानचा ड्रायव्हरही तिथे उपस्थित होता.

Chinkara Salman spoof Inmarathi

मग ही शिकार त्या ड्रायव्हरने केली नसेल हे कशावरून? या केसच्या तपासात पोलीस नक्कीच कुठेतरी कमी पडत आहे आणि बळी मात्र नेहमीप्रमाणे मिलेनियम स्टार सलमानचा जातोय.

===

सदर लेख उपहासात्मक आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?