रिक्षाचालकाने आपला प्राण गमावला, पण एका चिमुकल्याचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हल्ली आपण म्हणतो की घोर कलियुग आलंय! कुणी कुणाला विचारत नाही. कुणालाही कुणासाठी वेळ नसतो, किंबहुना कुणाला कुणासाठी वेळ काढावासा वाटत नाही. जग स्वार्थी झालंय.

हल्ली कुणी संकटात असेल तर लोक मदत करायचं सोडून मोबाईलवर व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्यात जास्त रस घेतात.

किंवा जाऊदे, कोण नसत्या भानगडीत पडेल असा विचार करून दुर्लक्ष करून तिथून निघून जातात.

पण आशा सोडून देऊन चालणार नाही. आजही जगात माणुसकी शिल्लक आहे.

 

kindness-inmarathi
psychmatters.com

आजही असे निस्वार्थी लोक जगात आहेत जे प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याची मदत करतात. जीवघेणी परिस्थिती असताना देखील मागचा पुढचा कुठलाही विचार न करता दुसऱ्याचा जीव वाचवतात.

अशीच घटना काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत घडली.

दिल्लीतील एका रिक्षाचालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका महिलेचे व तिच्या लहानग्या मुलाचे प्राण वाचवले.

त्यांना जीवदान देता देता त्या देवदूताने आपले प्राण मात्र गमावले.

२२ डिसेंबर २०१८ हा दिवस पवन शाह ह्या तिशीतील रिक्षाचालकासाठी रोजच्या सारखाच होता. त्याने रोजच्यासारखे आपले काम सुरु केले.

एका प्रवाश्याला सोडून परत घरी जात असतानाच सकाळी पावणे अकराच्या सुमारास मीठापूर कालव्याजवळ त्याला एक विचित्र दृश्य दिसले. तिथल्या नदीवर जो पूल बांधला आहे त्या पुलाच्या कठड्यावर एक महिला तिच्या बाळाला घेऊन उभी असलेली पवन शाहला दिसली.

तो काही करणार तोच काही क्षणांत त्या महिलेने त्या बाळासकट त्या नदीच्या प्रवाहात उडी घेतली.

 

kader-khan-inmarathi
thebetterindia.com

हे दृश्य बघून पवन घाबरला. त्याला माहिती होते की त्या बर्फासारख्या गार नदीच्या वाहत्या पात्रात उडी घेतल्यानंतर ती महिला व ते बाळ जिवंत राहणेच शक्य नाही.

त्यामुळे क्षणाचाही वेळ न दवडता त्याने त्याची रिक्षा तशीच टाकून मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या बर्फ़ासारख्या थंड पाण्यात उडी घेतली.

नदीचा प्रवाह जोरात होता. ह्या केसची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मते पवनने त्या एक वर्षाच्या लहान मुलाला धरले परंतु त्याला माहिती होते की एकाच वेळी दोघांचे प्राण वाचवणे त्याला शक्य होणार नाही म्हणून त्याने प्रसंगावधान राखून मदतीसाठी हाका मारणे सुरु केले.

त्याला आशा होती की त्याचा आवाज ऐकून कुणीतरी त्याची मदत करायला येईल.

सुदैवाने पवनची मदतीची हाक तिथून जाणाऱ्या तीन व्यक्तींना ऐकू आली. आणि राजवीर, जमील आणि संजीव ह्या तीन व्यक्तींनी त्या ठिकाणी धाव घेतली.

तेव्हा त्यांना दिसले की पवन जिवाच्या आकांताने त्या महिलेला व तिच्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करीत होता.

तो त्या दोघांचेही डोके पाण्याच्या वर ठेवून त्यांचा श्वास गुदमरणार नाही ह्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करीत होता.

 

rescue-inmarathi
patrika.com

हे बघून त्यांनी तातडीने हालचाल करीत मानवी साखळी तयार केली आणि त्या महिलेला हात देऊन तिला ओढून पाण्याबाहेर काढले. परंतु ह्या सगळ्या प्रयत्नात पवनचे शक्ती कमी पडली.

जोरदार प्रवाहापुढे पवनचे प्रयत्न कमी पडले आणि दुर्दैवाने तो प्रवाहाबरोबर वाहून गेला.

ह्या दुर्दैवी घटनेची नोंद तातडीने दिल्लीच्या कण्ट्रोल रूमकडे करण्यात आली. त्यांनी ह्या घटनेची दखल घेऊन तातडीने त्या ठिकाणी बोटी रवाना केल्या. आणि पवन शाहचा शोध घेण्यासाठी डायव्हर्स पाठवण्यात आले.

दुर्दैवाने पवन शाहचा कुठेही शोध लागला नाही आणि पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

 

river-inmarathi
india.com

त्या महिलेला व तिच्या बाळाला नंतर दवाखान्यात नेण्यात आले आणि सुदैवाने दोघांचीही प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्या महिलेने सांगितले की नवऱ्याशी भांडण झाल्यामुळे निराश होऊन तिने स्वतःच्या बाळासकट जीव देण्याचा निर्णय घेतला व नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्या महिलेची व तिच्या बाळाच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून पवनच्या प्रयत्नांमुळे त्यांचा जीव वाचला.

त्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पण पवनने ह्या दोघांचा जीव वाचवता वाचवता स्वत:चे प्राण मात्र गमावले .
पवनच्या घरच्यांना ह्या अनपेक्षित घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

त्याच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्याचे लवकरच लग्न करून द्यावे अशी घरच्यांची इच्छा होती मात्र दैवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

आजही त्याचे कुटुंबीय तो जिवंत असेल, सुखरूप असेल व लवकरच परत येईल अशी देवाकडे प्रार्थना करीत आहेत.

 

प्रतिकात्मक चित्र

दिल्लीचे डीसीपी चिन्मॉय बिस्वाल ह्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की पवन शाहचे नाव जीवन रक्षा ब्रेव्हरी अवॉर्ड साठी देण्यात येईल.

त्याला त्याच्या शौर्यासाठी पुरस्कार मिळेलही परंतु त्याच्या घरचे मात्र तो सुखरूप परत येईल ही आस लावून बसले आहेत.

पवनच्या ह्या शौर्याला व निस्वार्थ भावनेला सॅल्यूट!

त्याचे प्राण गेले असले तर ही अत्यंत दु:खाची बाब आहे. त्याच्यासारख्या तरुणांची आज समाजाला व देशाला गरज आहे. पवन शाह सुखरूप असावा आणि तो परत यावा ह्यासाठी आपण सगळे प्रार्थना करूया!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “रिक्षाचालकाने आपला प्राण गमावला, पण एका चिमुकल्याचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले!

  • January 2, 2019 at 9:55 am
    Permalink

    GoodStory

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?