“परदेशातील काळा पैसा” – स्विस बँकांमध्येच का ठेवला जातो? समजून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

स्विस बँकेचं प्रकरण आपण सर्वजण जाणतोच. तुम्ही हे देखील ऐकून असाल की काळा पैसा जमवणाऱ्या सगळ्यांचीच खाती ही स्विस बँकांमध्येच आहेत. मोदीजी देखील भाषणात म्हणतात की स्वीस बॅंकांमधला काळा पैसा परत आणू.

केवळ भारतातीलचं नाही तर जगातल्या असंख्य धनदांडग्यांची संपत्ती याच बॅंकांमध्ये बंदिस्त आहे. मग अश्या वेळी मनात काही प्रश्न सहज उभे राहतात. जसे की-

स्विस बँक एवढी खास का आहे की जगातील सगळा काळा पैसा याचं बँकेत येतो?

बरं या बँकेला देखील माहित असेलच की हा काळा पैसा म्हणजे अनधिकृत आहे तर मग ही बँक पैसा स्वीकारतेच का? अश्या काळा पैसा ठेवणाऱ्या अजून काही बँक्स आहेत का?

 

swiss-bank-marathipizza01

स्रोत

आपल्यापैकी बहुतेकांना हे वाटत असेल की स्विस बँक ही एकच कोणतीतरी बँक आहे, पण तसं नाहीये.

स्विस बँक ही कोणती एक बँक नाही.  स्वित्झर्लंड देशामध्ये जेवढ्या बँका आहेत त्यांना स्विस बँक म्हटलं जातं. त्यापैकी युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड ही युरोपमधील सगळ्यात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे.

स्वित्झर्लंड हा देश ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखला जातो, कारण येथे कितीही पैसा ठेवा, साठवा तुम्हाला त्यावर अगदी मामुली कर भरावा लागतो किंवा कर भरावाच लागत नाही असं म्हटलं तरी चालेल.

तसेच तुमचे बँकिंग सिक्रेट्सदेखील अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. फक्त स्वित्झर्लंडच नाही तर जगात अशी अनेक ठिकाण आहेत जी ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळखली जातात.

त्यापैकी लुक्झमबर्ग, हॉंगकॉंग, कॅमन आयलँड, सिंगापूर, यु.एस.ए., लेबनन, जर्मनी, जर्सी, जपान या ठिकाणांचा टॉप टेनमध्ये समावेश होतो. या प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या बँकांचे निरनिराळे कायदे आहेत, परंतु काळा पैसा साठवण्यासाठी हे सगळेच कायदे अनुकूल आहेत.

चला तर आपण पुन्हा वळू स्विस बँकांकडे, पाहू त्यांचे कायदे काळा पैसा जमवणाऱ्यांसाठी किती पूरक आहेत.

 

swiss-bank-marathipizza02

स्रोत

स्विस बँकेमध्ये काळा पैसा साठवण्याचे मुख्य कारण आहे या देशातील बँक पॉलीसी!

१९३४ मध्ये या देशाने एक बँकिंग कायदा संमत केला, ज्यानुसार जर स्विस बँकेने त्यांच्याकडे असणाऱ्या खातेदारांची नावे आणि माहिती उघड केली तर तो कायदेशीर अपराध मानला जाईल. त्याबदल्यात त्या बँकेवर कठोर कारवाई करण्यात येईल. (धन्य आहे अश्या कायद्याची!)

याच कायद्यामुळे स्विस बँकेतील खातेदारांची दिवाळी सुरु आहे. फक्त याच नाही तर अश्या इतर अनेक बँकिंग कायद्यांमुळे स्विस बँक गोपनीयतेच्या चक्रव्युहात अडकली आहे.

म्हणजे जरी स्विस बँकेला कोणाची नावे उघड करायची असतील तरी ती करू शकणार नाही, कारण त्याची भारी किंमत त्यांना चुकवावी लागेल. (परदेशातले कायदे तुम्हाला माहित आहेतच! स्वित्झर्लंड देश अश्या कडक कायद्यांसाठी आणि शिक्षांसाठी फारच प्रसिध्द आहे.)

 

swiss-bank-marathipizza03

स्रोत

स्वित्झर्लंड सरकारच्या मते

नागरिकांना असणारा ‘गोपनीयता बाळगण्याचा अधिकार’ (right to privacy) हा मुलभूत अधिकारांपैकी एक आहे आणि प्रत्येक देशाने हा अधिकार आपल्या नागरिकाला दिला पाहिजे. म्हणूनच आम्ही आमच्या देशातील नागरिकांची आणि ग्राहकांची माहिती त्यांच्या संमती शिवाय उघड करत नाही, कारण तसे करणे त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे. म्हणूनच जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करेल त्याला कडक शासन करण्याची तरतूद आहे.

परंतु गुन्हेगारी याला अपवाद आहे. एखाद्या गुन्हेगारा विरोधात न्यायालयामध्ये खटला सुरु असेल तर स्वित्झर्लंडचे न्यायालय त्या व्यक्तीची सर्व माहिती आणि गुपिते उघड करण्याचे आदेश देऊ शकते.

स्विस बँकेमध्ये काळा पैसा साठवण्याचे अजून एक कारण म्हणजे स्विस बँक तुम्हाला हे विचारात नाही की तुम्ही हा पैसा कुठून आणला?

त्यांना या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या मार्गाने पैसा कमावता. तुम्हाला फक्त तुमचा पैसा त्यांच्याकडे द्यायचा असतो आणि त्या पैश्याचे संरक्षण करण्यासाठी एक ठराविक रक्कम बँकेला द्यावी लागते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्विस बँक आपल्या खातेदारांना एक युनिक नंबर देते, म्हणजे यात खातेदाराला स्वत:चे नाव देण्याची गरज भासत नाही.

खातेदाराला त्या नंबरच्या सहाय्याने संपूर्ण व्यवहार हाताळता येऊ शकतात. तसेच कोणीही व्यक्ती या नंबरचा वापर करून खाते हाताळू शकतो. त्याला ते खाते त्याचेच आहे हे सिद्ध करण्याची गरज भासत नाही. तो नंबरच सर्व गोष्टींसाठी पुरेसा आहे.

त्यामुळेच खाते नेमक्या कोणा व्यक्तीचे आहे हे शोधून काढणे जवळपास अशक्य आहे. एवढेच नाही तर ठराविक नंबरचे खाते कोणत्या व्यक्तीचे आहे हे तर खुद्द स्विस बँकेला देखील ठावूक नसते.

 

swiss-bank-marathipizza04

स्रोत

जसे आपल्या इथे बँकेमध्ये खातेसुरु करण्यासाठी काही अटी आणि निकष ठेवलेले असतात तसे स्विस बँकांचे देखील काही अटी आणि निकष आहेत.

  • खातेदाराचे वय किमान १८ असावे आणि त्याने खात्यामध्ये किमान ३.२१ ते ६.२४ करोड रुपयांचा बॅलेन्स राखण्याची गरज आहे. एवढा बॅलेन्स जर खात्यात ठेवला तरच व्याज मिळते. ते ही अतिशय कमी टक्क्यांनी !

 

  • स्विस बँकेमध्ये खाते हे स्वत: तेथे प्रत्यक्ष जाऊन सुरू करावे लागते किंवा स्विस बँकेच्या प्रतिनिधी मार्फत सुरू लागते. इंटरनेटच्या माध्यमातून स्विस बँकेमध्ये खाते उघडता येत नाही. कारण ते ट्रॅक केले जाऊ शकते. अगोदर सांगितलेल्या बँकिंग कायद्याच्या आधारावर ही अट घालण्यात आली आहे.

 

  • तसेच स्विस बँकेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे खातेदाराला पैसे भरताना किंवा काढताना स्वत: बँकेत जायची गरज पडत नाही. त्याच्या वतीने दुसरा एखादा व्यक्ती पैसे जाऊन भरू शकतो किंवा काढून आणू शकतो. यामुळे ज्या व्यक्तीचे खाते आहे त्या व्यक्तीला कोणी ट्रॅक करू शकत नाही.

 

swiss-bank-marathipizza05

स्रोत

तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्विस बँकांना काळ्या पैश्याचं माहेरघर का म्हणतात ते..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 66 posts and counting.See all posts by vishal

One thought on ““परदेशातील काळा पैसा” – स्विस बँकांमध्येच का ठेवला जातो? समजून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?