अवघ्या १२४ भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना धूळ चारल्याची – रेझांगलाची अज्ञात समरगाथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

फेब्रुवारी १९६३… एक लद्दाखी धनगराला चीनच्या सीमेवर असलेल्या रेझांगला खिंडीत थक्क करून टाकणारं दृश्य दिसलं. त्याने ताबडतोब परत येऊन सरकारी अधिकाऱ्यांना सूचना दिली. रेड क्रॉसच्या मदतीने एक टीम १६००० फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणी पोहोचली …

भारत-चीन युद्धातील एका अभूतपूर्व लढाईचे शेवटचे काही क्षण शून्यापेक्षा कमी असलेल्या तिथल्या तापमानाने गोठवून टाकले होते.

 

 

११४ इन्फन्ट्री ब्रिगेडचे प्रमुख आणि पुढे लष्करप्रमुख झालेले तपेश्वरनाथ रैना या पाहणी तुकडीत पत्रकारांसोबत गेले होते … शत्रूच्या तोफगोळ्यांनी नष्ट झालेले बंकर्स … पुठ्ठयाप्रमाणे वाकून गेलेले स्टील शीट … मोठ्या कातळाला रॉकेटच्या माऱ्याने पडलेले खळगे आणि या सगळ्यात विखुरलेले ९६ शहीदांचे पार्थिव देह …

मशीनगन्स व बंदुकांची रिकामी काडतूसं … डागलेल्या मॉर्टरचे रिकामे भाग … एका जवानाच्या हातात बॉम्ब तसाच राहिला होता … वैद्यकीय मदत देणाऱ्या जवानाच्या हातात मॉर्फीनचं इंजेक्शन होतं … सिरिंज हातात असतानाच त्याचा मृत्यू झाला असावा. ब्रिटिश लोक १३ हा आकडा अशुभ मानतात.

१३ कुमाऊची रेजिमेंटची ही चार्ली कंपनी चीनच्या सैन्यासाठी अशुभच ठरली असावी.

नक्की काय घडलं १८ नोव्हेंबर १९६२ रोजी, रेझांग ला च्या खिंडीत?

 

 

काही दिवसांपूर्वीच १३ कुमाऊं रेजिमेंटची चार्ली कंपनी लद्दाख मध्ये आली होती. अंबालाहून बारामुल्ला आणि मग तिथून भारताच्या उत्तर पूर्व सीमेवर रेझांगला ची पोस्ट सांभाळायला ही तुकडी तैनात केली गेली. जरी ही कुमाऊँ बटालियन असली तरी हरियाणातील रेवाडी आणि आसपासच्या भागातील अहिर-यादव जवान प्रामुख्याने या कंपनीत होते.

दादा किशन की जय हा त्यांचा युद्धघोष होता. त्यांचा कंपनी कमांडर होता मेजर शैतान सिंग भाटी नावाचा राजपूत.

मैदानी भागातले हे लोक. उंच डोंगरांवर, बर्फाच्छादित हिमालयात लढण्याची त्यांच्या शरीराला सवय नव्हती, प्रशिक्षणही नव्हतं. सोळा ते अठरा हजार फूट उंचीवर लढायलाच काय नुसतं जायलाच लोकरीचे जाड कपडे लागतात. आपल्या सैनिकांकडे मात्र सुती युनिफॉर्म आणि त्यावर घालायला एखादा हलका स्वेटर एवढंच होतं.

जो काही थोडासा वेळ आणि हत्यारं मिळाली ते वापरून चार्ली कंपनीने खंदक खणले. मजबूत रक्षात्मक खंदकांपेक्षा मोर्चे म्हणावेत अशी त्यांची परिस्थिती.

३ किलोमीटर लांब व २ किलोमीटर रुंद अशी ही पोस्ट महत्त्वाची होती. कारण चुशुलची हवाईपट्टी राखायची असेल तर ही पोस्ट शत्रूच्या ताब्यात जाऊन चालणार नव्हतं. शत्रूच्या संख्याबळाबद्दल काही कल्पना नव्हती पण १२४ जवानांची ही कंपनी रेझांगलाचं रक्षण करायला तैनात केली गेली होती.

या पोस्टच्या मागेच डोंगर असल्याने तोफखान्याची मदत शैतान सिंगच्या कंपनीला मिळणे अशक्य होते. बटालियन हेडक्वार्टर ने जमेल तितकं लढा नाहीतर सुरक्षित जागी माघार घेऊन मोर्चे बांधा असा आदेश दिला होता. पण चार्ली कंपनीचा निश्चय पक्का होता की पोस्ट काही झालं तरी सोडायची नाही.

प्रत्येक जवानाकडे दुसऱ्या महायुद्धातील 0.303 रायफल आणि सहाशे राउंड होत्या. दोन इंची मॉर्टरची उखळी तोफ होती आणि फक्त सहा लाईट मशीनगन होत्या. चहा करायला पाणी उकळायचं असेल तर तासभर लागायचा. चुशुलजवळ स्पॅन्गुर गॅप सरोवर आहे तिथं इतर काही तुकडया मगर हिल आणि गुरुंग हिलसारख्या पोस्टवर तैनात होत्या पण चार्ली कंपनी रेझांगला खिंडीत एकटीच होती.

बटालियन हेडक्वार्टर आणि अल्फा कंपनी मागे काही किलोमीटर अंतरावर होते. मेजर शैतान सिंहचा रेडियो ऑपरेटर रामचंद्र यादव त्याचा जुनाट रेडियो थंडीमुळे बॅटरी गोठून बंद पडू नये म्हणून सतत प्रयत्न करत होता. १७ नोव्हेंबरच्या रात्री बर्फाचं वादळ आलं पोस्ट गोठून गेली … जेमतेम ६०० मीटर अंतरावरच्या गोष्टी दिसत होत्या. मध्यरात्र उलटून गेली आणि वादळ शमलं.

 

वर चढून यायला उपयुक्त अशा सर्व घळ्या आणि नाले रोखण्यासाठी मेजर शैतान सिंहने डायमंड फॉर्मेशन मध्ये आपली कंपनी विखुरली. प्लॅटून क्रमांक ९ सगळ्यात पुढे तर थोड्या डाव्या बाजूला आणि उंचावर प्लॅटून क्रमांक ८ तर उजवीकडे प्लॅटून क्रमांक ७ ने मोर्चा बांधला होता.

सर्वात वरच्या बाजूला मेजर शैतान सिंगने आपला सेक्शन व कंपनी हेडक्वार्टरचा मोर्चा बांधला … रेडियोमन रामचंद्र यादव आणि एलएमजी घेऊन बॉडीगार्ड निहाल सिंग तिथं तैनात होतेच.

पहाटेच्या भयाण अंधारात प्लॅटून ८ च्या कमांडर गुलाब चंद ला खाली हालचाल जाणवू लागली … हवेत व्हेरी लाईट राउंड फायर करून उजेडाचा फ्लॅश पाडल्यावर मोठ्या संख्येने चिनी आक्रमक नाले चढून येताना दिसले.

रेडियोवर जवळजवळ ४०० चिनी सैनिक वर येत आहेत असा संदेश पाठवल्यावर प्लॅटून क्रमांक ८ शी संपर्क तुटला आणि त्याच वेळेला प्लॅटून क्रमांक ७ नेही गोळीबार करायला सुरुवात केली. सूरजा रामने चिनी सैनिकांना ३०० यार्ड अंतरावर येऊ दिले आणि मग गोळीबार केला.

 

 

काही वेळाने चिनी सैन्याची दुसरी लाट पोस्टवर चढून येऊ लागली. आता सर्व प्लॅटून आणि २ इंच मॉर्टर सेक्शनने निकराचा प्रतिहल्ला केला आणि सगळे नाले चिनी सैनिकांच्या मृतदेहांनी भरून गेले. पहाटे पाचच्या सुमाराला चिनी आक्रमकांची तिसरी लाट रेझान्गला वर येऊन धडकली. प्लॅटून ७ व ८ ला बाजूने निष्प्रभ करून मग प्लॅटून क्रमांक ९ ला घेरायचे असा चिनी इरादा होता.

पण एलएमजी, मॉर्टर आणि अचूक गोळीबाराचा वापर करून हा हल्लाही परतवला गेला. भारतीय मोर्च्यापर्यंत पोहोचलेले वीसेक चिनी सैनिक हातघाईच्या लढाईत मारले गेले. या वेळी मात्र प्रत्येक भारतीय मोर्चात आपले जवान शहीद झाले होते आणि संख्याबळ कमी झाले होते.

आतापर्यंत चिनी कमांडरना समजले होते की ही पोस्ट घेणे सोपे काम नाही. त्यांनी सहाच्या सुमारास पोस्टवर तोफखान्याचा भडीमार सुरु केला. मोठ्या उखळी तोफांच्या सोबतीला आता ७५ मिमी रिकॉईललेस गन आणि १३२ मिमी रॉकेटनी पोस्ट भाजून काढायला सुरुवात केली.

त्साकाला इथं तैनात असलेल्या ५ जाट रेजिमेंटच्या कॅप्टन प्रेम सिंह च्या नोंदीनुसार रेझान्गला वर आता रॉकेटचा भडिमार होत होता. संपूर्ण पोस्टच जणू पेटली असावी असं लांबून भासत होतं…

आगीच्या ज्वाळांनी खिंडीचा माथा उजळून निघाला होता. एका रॉकेटच्या अचूक माऱ्याने मेजर शैतान सिंगचा मोर्चा उडवला पण तो वाचला आणि मोर्चाबाहेर आला. या भडिमारात एकही भारतीय मोर्चा शिल्लक राहिला नाही आणि बरेचसे जवान मारले गेले आणि जखमीही झाले. भारतीय तोफखान्याकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला पण पहिले गोळे आपल्याच पोस्टवर पडल्याने तो बेत सोडून द्यावा लागला.

पण मेजर शैतान सिंह आपल्या कंपनीचा धीर वाढवण्यासाठी आता प्रत्येक मोर्चाच्या ठिकाणी जाऊन जवानांना प्रोत्साहन देऊ लागला. “दादा क्रिशन की हम पर कृपा है, ये दिन फिर नहीं आयेगा… हम सब अहिर यादव हैं पोस्ट नहीं छोडेंगे … बने रहो लडते रहो” निहाल सिंगने हे शब्द ऐकले.

 

 

 

त्याचवेळी प्लॅटून क्रमांक ९ च्या मागे ७०० जवान आलेले दिसले … सुरुवातीला वाटलं की १३ कुमाऊँ ची अल्फा कंपनी मदत घेऊन आली आहे. पण लवकरच स्पष्ट झाले की १५ याकवर हत्यारे लादून चिनी आक्रमक वर चढू पाहत होते…!

कंपनी हवालदार मेजर हरफूल सिंगला पोस्ट घेरली गेली आहे हे लक्षात आले … प्लॅटून क्रमांक ९ ने मिळेल ते हत्यार वापरून प्रतिहल्ला चढवला. मेजर शैतान सिंह प्लॅटून ८ कडे जात असताना लाईट मशीनगनची फैर त्यांच्यावर आली आणि हात मोडला.

पण हा अधिकारी जवानांचा धीर सूटू नये म्हणून प्रत्येक मोर्चावर आलटून पालटून जाऊन जवानांना मदत करू लागला.

कंपनीचा नर्सिंग असिस्टंट धर्मपाल दहिया जाट वीर … तो हातात बँडेज आणि इंजेक्शन घेऊन मोर्चा मोर्चावर जाऊन जवानांना मदत करत होता.

यावेळी प्लॅटून क्रमांक ७ जवळजवळ संपूर्णपणे मारली गेली होती. गोळ्या संपत आल्या होत्या. आता ग्रेनेडचा मारा करून या प्लॅटूनच्या उरलेल्या अहिरांनी शत्रूचे आणखी सैनिक मारले. जमादार सूरजा राम मोर्चबाहेर आला आणि चवताळून त्याने संगिनीने ६-७ चिनी सैनिकांना कंठस्नान घातले व हुतात्मा झाला.

आता तिथं नाईक शाही राम उरला होता तो त्याची लाईट मशीन गन घेऊन वेगळ्या ठिकाणी जाऊन बसला आणि चिनी आक्रमकांवर अचूक गोळीबार करू लागला. रिकॉईललेस गनच्या गोळ्याने त्याचा वेध घेतला. शहीद होण्यापूर्वी शाही रामने आपली एलएमजी तोडून फेकून दिली.

 

आठवी प्लॅटून जवळजवळ संपली होती…नाईक सिंग राम पहलवान होता. संगीनीने भोसकून त्याने शत्रूला मारण्याचा प्रयत्न केला पण बोथट झालेले त्याचे हत्यार चिनी सैनिकांच्या जाड फरकोट मधून आत घुसेना … त्याने दोन चिनी सैनिकांना गळा दाबून मारले आणि दोघांची डोकी एकमेकांवर आपटून यमसदनी धाडले.

शत्रूच्या मिडीयम मशीनगनला त्याला शांत करावे लागले. उखळी तोफ चालवणाऱ्या नाईक राम कुमारने अनेक चिनी सैनिक मारले … त्याला सतत रेंज बदलून गोळे डागावे लागत होते. मॉर्टर शेल संपल्यावर तो आपली बंदूक घेऊन लढू लागला आणि मग ग्रेनेड हल्ल्यात शहीद झाला.

सकाळी सातच्या सुमारास शत्रूच्या मिडीयम मशीनगनने मेजर शैतान सिंगवर अचूक हल्ला केला. पोटात अनेक गोळ्या लागून मेजर शैतान सिंग जबर जखमी झाले … हरफूल सिंग आणि जय नारायण त्यांना घेऊन एका मोठ्या पत्थराच्या गेले आणि तिथं त्यांना सुरक्षित लपवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही शत्रूने गोळीबार सुरु केल्यावर आपल्याला सोडून जाण्याची आज्ञा मेजर शैतान सिंहने दिली व ते आपली एलएमजी घेऊन प्रत्युत्तर देऊ लागले.

उरलेले तीन सैनिक आणि उरलासुरला दारुगोळा घेऊन हवालदार मेजर हरफूल आता शेवटचा प्रतिकार करू लागला. त्याने रेडियोमन रामचंद्र यादवला ताकीद दिली की मेजर शैतान सिंगचा पार्थिव देह शत्रूच्या हातात पडता कामा नये.

 

 

जमादार हरी रामने घाईघाईने स्प्लिंटरने जखमी झालेल्या कपाळाला बँडेज बांधले व शत्रूवर ग्रेनेड हल्ला चढवला. रेडियोमन रामचंद्र यादवही जखमी होता … त्याने मेजर शैतान सिंगांना आपल्या शरीराला बांधले व डोंगराच्या उतारावरून घसरत गोल गोल घरंगळत एक किलोमीटर मागे आणले.

मेजर शैतान सिंगच्या हातावरील घड्याळ सकाळी सव्वा आठला बंद पडले होते … हे घड्याळ नाडीवर चालत असे … शैतान सिंह शहीद झाले हे लक्षात आल्यावर त्यांच्या देहाला झाकून रामचंद्र यादव बटालियन हेडक्वार्टर पर्यंत मागे आला.

तिथं बटालियनने आग लावून माघार घेतल्याचे लक्षात आले. पुढे काही अंतरावर त्याला वाचवण्यात आले पण कोणीही त्याने सांगितलेल्या घटनाक्रमावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं.

फक्त १२० लोक इतक्या मोठ्या प्रमाणात शत्रूला टक्कर देऊ शकतच नाहीत असं काही वरिष्ठांचं दिल्लीत म्हणणं होतं. खोटे अतिशयोक्त वर्णन केल्याबद्दल कोर्टमार्शल होऊ शकेल अशी ताकीद काहींनी रामचंद्र यादवला दिली.

या लढाईत ११३ अहिर सैनिक मारले गेले. पाच जबर जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेले सापडले तर सहा सैनिकांना चीनने युद्धबंदी बनवले. त्यापैकी एकाचा चीनच्या तावडीत असताना मृत्यू झाला तर पाचजण शिताफीने चिनी सेंट्रिंना मात देऊन परत आले. जेव्हा निहाल सिंहने चीनच्या कैदेतून निसटून परत येऊन रामचंद्र यादवने सांगितलेलीच हकीकत सांगितली तेव्हा कुठे काय घडलं त्यावर दिल्लीतले अधिकारी विश्वास ठेवू लागले.

चीनने पोस्ट तर घेतली पण पुढे येऊन चुशुल घेण्याचे धाडस आक्रमकांना झाले नाही. बीजिंग रेडियोला पाठवलेल्या संदेशानुसार चीनचे सर्वाधिक सैनिक या हल्ल्यात मारले गेले … ही पोस्ट घेण्यासाठी चीनला आपले १३१० सैनिक गमवावे लागले.

पुढे जेव्हा रेडक्रॉस बरोबर मोठी टीम रेझान्गला रीजवर गेली तेव्हा ही कहाणी अतिशयोक्त नाही याचा पुरावाच हिमालयाने त्यांच्या समोर ठेवला होता. एक सैनिक हातात ग्रेनेड धरून फेकण्याच्या पावित्र्यातच मारला गेलेला दिसला… नर्सिंग असिस्टंट धर्मपाल दहियाच्या एका हातात मॉर्फीनची भरलेली सिरिंज आणि दुसऱ्या हातात बँडेज होते… चार्ली कंपनीच्या ३२ जखमी जवानांना या वीराने बँडेज बांधले होते.

चुशुलला लष्करी इतमामात या शहीदांवर अंतिम संस्कार केले गेले. मेजर शैतान सिंहांचे पार्थिव जोधपूरला त्यांच्या घरी नेण्यात आले व तिथे त्यांना मानवंदना देऊन अंतिम संस्कार केले गेले.

मेजर शैतान सिंहना परमवीर चक्र देण्यात आले. जमादार हरी राम, जमादार सूरजा राम, जमादार राम चंदर, नाईक हुकूम सिंह, नाईक गुलाब सिंह, नाईक राम कुमार यादव, नाईक सिंग राम, सिपाही धर्मपाल दहिया या सर्वांना वीर चक्र देण्यात आले. हवालदार मेजर हरफूल, हवालदार जय नारायण, हवालदार फूल सिंग आणि सिपाही निहाल सिंगना सेना मेडल दिले गेले.

हवालदार जय नारायणाला मेन्शन इन डिस्पॅच चा मान मिळाला. ब्रिगेडियर रैनांना चुशुलच्या संरक्षणासाठी महावीर चक्र दिले गेले तर १३ कुमाऊँचे कमांडिंग ऑफिसर एच एस धिंग्राना अतिविशिष्ट सेवा मेडल चा गौरव मिळाला.

खूपच क्वचित एका लढाई साठी एका कंपनीला इतकी पदके दिली जातात…

चुशुलचे रक्षण करता करता १३ कुमाऊँची संपूर्ण चार्ली कंपनी शहीद झाली. कुमाऊँ रेजिमेंटला या लढाईसाठी बॅटल ऑफ ऑनर मिळाला. आज १३ कुमाऊँ मध्ये सी कंपनी किंवा चार्ली कंपनी पुन्हा उभी केली गेली आहे … फक्त तिला चार्ली कंपनी ऐवजी रेझांगला कंपनी असे नाव देण्यात आले आहे.

१९६२ च्या पराभवातून भारतीय सैन्य आणि सुरक्षा थिंक टॅंक बरंच काही शिकले आणि रेझांगला व वॅलॉंगसारख्या ठिकाणी हेही स्पष्ट झालं की चिनी अजेय नाहीत.

पण जर आपल्या शीर्ष राजकीय नेतृत्वाने कूटनीतील सामरिक तयारीची जोड दिली असती … अतिशय अवास्तव अशी फॉरवर्ड पॉलिसी सैन्यावर लादली नसती आणि युद्धाला तोंड फुटल्यावर आपल्या पायदळाला जर सुसज्ज वायुसेनेची मदत मिळाली असती तर तेव्हाही कदाचित निकाल वेगळा लागला असता.

संदर्भ – १३ कुमाऊँ रेजिमेंटचे निवृत्त सैनिक व अधिकारी

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?