' नाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा – InMarathi

नाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या महाराष्ट्राचे आणि बॉलिवूडचे वातावरण एका वादामुळे ढवळून निघाले आहे हे आपण जाणतोच.

सुरुवात झाली ती तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने केलेल्या सनसनाटी आरोपापासून. तनुश्रीने आरोप कुणा साध्या नटावर केला नाही तर, सर्वांच्या आवडत्या आणि आपल्या विशिष्ठ अभिनय शैलीने परिचित असणाऱ्या नाना पाटेकर यांच्यावर केलाय.

 

tanushree-nana-inmarathi
dailyhunt.com

तनुश्रीच्या म्हणण्यानुसार दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी तिचा विनयभंग केला. आता हा गंभीर आरोप केल्यानंतर खळबळ उडणार हे अपेक्षितच होते.

तनुश्री फक्त एवढ्यावरच थांबली नाही तर, तिने मनसेच्या राज ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधला. नाना आणि राज ठाकरे यांची मैत्री असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कुटुंबाला धमक्या दिल्या आणि माझी गाडी फोडली असा तिचा दावा आहे.

या सर्व प्रकरणात बॉलिवूड मधील अनेकांनी तिची बाजू घेतली आणि तिला समर्थन दिले. पण घटनेला दोन बाजू असतात. त्यामुळे काहीजणांना नाना पाटेकर असे वागू शकतात यावर विश्वास बसत नाही म्हणून नानाची बाजू घेतली.

आता या वादात कोण खरे आणि कोण खोटे हे दहा वर्षानंतर ठरवणे म्हणजे कठीण काम आहे.

साहजिकच या आरोपामुळे सर्वांच्या प्रश्नार्थक नजरा नाना पाटेकर यांच्याकडे वळल्या. नानांनी मात्र हे आरोप स्पष्ट शब्दात नाकारले आहेत. उलटपक्षी खोटे बोलून बदनामी केल्यामुळे त्याने तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

हा वाद आता कोर्टात जाणार असल्याने याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना आहे.

या पार्श्वभूमीवर बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटींनी भाष्य करणे टाळले. परंतु काहीजण मात्र गप्प न बसता आपले परखड मत मांडत आहेत. आपल्या मराठमोळ्या रेणुका शहाणे यांनी सुद्धा त्यांचे मत फेसबुक पोस्टद्वारे इंग्रजीमध्ये मांडले आहे.

त्याचे भाषांतर आम्ही पुढे देत आहोत…

renuka-tanushree-dutta-inmarathi
theindianexpress.com

नाना पाटेकर यांना जितकं त्यांच्या लहरी स्वभावासाठी ओळखलं जातं तितकंच त्यांना त्यांच्या असाधारण प्रतिभेसाठी किंवा त्यांच्या शेतकऱ्यासाठी केलेल्या समाजकार्यासाठीही ओळखलं जातं.

चित्रपट सृष्टीतील कित्येक स्त्रिया नि पुरुषांना त्यांच्या रागाला किंवा नाराजगीला सामोरे जावे लागले आहे. मी नाना किंवा तनुश्री दोघांसमवेत कामही केलं नाही आणि मी ‘होर्न ओके प्लीज’ या चित्रपटाचा भागदेखील नव्हते.

परंतु तनुश्रीच्या गोष्टीतील काही मुद्दे आहेत ज्याच्याशी मी सहमत आहे. ते मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते.

१. तनुश्रीने हे स्पष्ट केलं आहे की, तिला एक डान्स स्टेप गैरसोयीची वाटली आणि तिला त्या डान्स स्टेप दरम्यान नानाचे हावभाव/स्पर्श आवडले नाहीत. जरी नानाचा हेतू तिची छेडछाड करण्याचा नसला तरी दिग्दर्शक किंवा नृत्य दिग्दर्शक तिला सोयीस्कर वाटेल अशी डान्स स्टेप घेऊन येऊ शकत नव्हते का?

कामाची जागा या लोकांना भयभीत करण्यासाठी आहेत की स्वस्थ वातावरणात काम करण्यासाठी? कलाकारांना सोयीस्कर वाटतील अशा रीतीने डान्स स्टेप बदलल्या असत्या तर त्या चित्रपटाच्या पायाखालची जमीन सरकली असती का?

कदाचित ज्या गोष्टी तनुश्रीला गैरसोयीच्या वाटल्या त्या दुसऱ्या एखाद्या स्त्रीला वाटल्या नसत्या. पण सेटवर असलेल्या सर्व पुरुषांनी आपल्याच सहकारी व्यक्तीविरुद्ध एकत्र यायला हे काही (सबळ) कारण नाही.

जर ती खरेच तिथं आसपास असलेल्या पुरुषांपैकी कोणाची मुलगी असती तर त्यांनी तिला गैरसोयीचं  वाटणारं काही करू दिलं असतं की, डान्स स्टेप बदलायला लावली असती ? कदाचित हाच फरक असतो ‘मुलीसारखी असणे’ आणि ‘सख्खी मुलगी असणे’ यात.

२. जणू काही चार पूर्ण वाढ झालेले पुरुष एका मुलीविरुद्ध पुरेसे नव्हते म्हणून की काय कथित राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तनुश्री व तिच्या पालकांना धाकदपटशा दाखवण्यासाठी बोलावले गेले. जर ही भडक प्रतिक्रिया नाही तर काय आहे?

कथित राजकीय पक्षाच्या ‘महाराष्ट्राच्या अभिमान’ ला तनुश्रीने ठेच पोहचवली म्हणून माफी मागावी अशी मागणी होती. तुमचा यावर विश्वास बसतोय ना? हे असलं वागणं, एखाद्या मुलीला तिला गैरसोयीच्या वाटणाऱ्या डान्स स्टेप जबरदस्ती करायला लावणे महाराष्ट्राला गर्वास्पद वाटेल?

महाराष्ट्राचा गर्व स्त्रियांना सन्मान देण्यात आणि महाराष्ट्र स्त्रिया राहण्याकरिता अधिक सुरक्षित करण्यात सामावलेला नाही का ? या उपरोधाबद्दल बोला.

 

tanushree-rajthakrey-inmarathi
mymahanagar.com

३. आता याच्या परिणामाकडे वळू. या घटनेमुळे कोणाच्या करीयरवर परिणाम झाला? त्या पुरुषांपैकी कोणावरही वाईट वेळ आली नाही. त्यांचा ‘ मी’ पणा, त्यांचा अहंकार जिंकला. प्रबळ, प्रभावी नि प्रस्थापित पुरुषांना उद्योग जगतातून (फक्त चित्रपट उद्योग सृष्टीतून नव्हे) जो काही पाठिंबा मिळू शकतो तो सारा (या) पुरुषांना मिळाला.

जी एकमेव व्यक्ती यामुळे मानसिक घाव सोसत होती ती म्हणजे तनुश्री. आणि ते घाव अजूनदेखील भरले नाहीत. कृपया हे समजून घ्या.

ता.क.

सेटवरच्या एका अनाम सूत्रांनी मला सांगितले की, त्या चित्रपटाचे थोर निर्माते देय रकमा न चुकवल्याबद्दल कायदेशीर बाबींना सामोरे जात होते. त्यांना अंडरवर्ल्डकडून पैसा पुरवला गेल्याबद्दलही सांगितले.

पण हो हो हो…मला वाटतं हे सगळं ठीक आहे. तो स्वच्छ प्रामाणिक असावा. कारण सरतेशेवटी तो ‘महाराष्ट्राचा अभिमान’ मिरवत होता. बरोबर ना ?

खूप मोठा ‘मी’ असणारी काही छोटी लोकं( स्त्री आणि पुरुष दोघे) जगभर शक्तीस्थानी बसली आहेत.

जेव्हा खूप लोकं एका व्यक्ती विरुद्ध एकत्र येतात असं मी पाहते तेव्हा त्याला मी छळवाद मानते. नि छळवाद हा कोणत्याही बाजूने योग्य असू शकत नाही. याला बळी पडलेला व्यक्ती माणसातून उठतो. माझ्या मते त्या दिवशीचे विजेते नव्हे तर तनुश्री हीच धीट-धाडशी आहे.

रेणुका शहाणेंच्या या पोस्टवरून दिसतंय की, त्या स्पष्टपणे तनुश्री दत्ताची बाजू घेत आहेत. आता या प्रकरणात राज ठाकरे काय बोललात? नाना पाटेकरांच्या कायदेशीर नोटिशीला तनुश्री काय उत्तर देते? रेणुका शहाणे यांच्यासारखी तनुश्रीची बाजू आणखी कोण घेणार?नाना पाटेकरांची बाजू घेऊन कुणी सेलेब्रिटी मैदानात उतरेल काय?

 

tanushree-on-nana-and-raj-inmarathi
koimoi.com

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याचे औत्सुक्य वाढले आहे.

पण या प्रकरणामुळे स्त्रियांवर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा पुन्हा प्रकाशात आला आणि त्यावर बरीच साधक बाधक चर्चा होत आहे हे मात्र निश्चित!

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?