“त्याकाळी” सुकुमार, सुंदर स्त्रियांच्या शोषणाचा सिस्टिमॅटिक धंदा झाला होता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बॅले डान्स हा पाश्चिमात्य नृत्य प्रकारातला एक नावाजलेला नृत्यप्रकार. या नृत्याप्रकाराच्या आकर्षक स्वरूपामुळे तो अल्पावधीत जगभर लोकप्रिय झाला. जगभरात ज्या ज्या ठिकाणी युरोपियन माणूस व्यापाराच्या आणि सत्ता स्थापन करण्याच्या निमित्ताने पोहोचला तिथे बॅले हा नृत्यप्रकार पोहोचला.

या नृत्याला तब्बल तीनशे वर्षांचा इतिहास आहे. सतराव्या शतकात युरोपातील रेनेसांस पर्वाच्या दरम्यान इटलीमध्ये या नृत्यप्रकाराचा जन्म झाला.

रेनेसांसच्या आधुनिकतावादी विचारप्रवाहानंतर युरोपात मोडर्न जीवनपद्धतीची, राहणीमानाची आणि वेशभूषेची मोठी लाट आली.

 

renaisance_inEurope_inmarathi
edtech2.boisestate.edu

मनोरंजनाच्या नवनवीन साधनांची आणि कलाकारांची युरोपात भरभराट झाली. तेव्हापासून बॅले डान्स हा नृत्यप्रकार प्रचंड प्रसिद्ध झाला.

एकोणिसाव्या शतकात फ्रान्समध्ये अनेक मोठमोठ्या ओपेरा बॅले क्लब्सची स्थापना झाली. अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब स्त्री कलाकारांसाठी ही रंगभूमीच होती. या क्लब्समधून नृत्यांगनांना रोजगार मिळू लागला. दारिद्र्यातून बाहेर पडण्याचे आणि भरपूर पैसे कमविण्याचे ते साधन बनू लागले.

जसजसे या क्लब्सचे प्रस्थ वाढले तसतशी कलाकारांसाठी स्पर्धा वाढली. स्पर्धेतून अनेक अमानुष अटींचा जन्म झाला.

 

opera_club_inmarathi
history.com

चौदा पंधरा वर्षे वय असलेल्या मुली या क्लबमध्ये नृत्यांगना म्हणून भरती केल्या जात. शहरातले धनिक श्रीमंत लोक क्लबमध्ये नृत्य पाहण्यासाठी हजेरी लावत.

कालांतराने या मुलींवर “हवा तसा अनिर्बंध” हक्क असणे हा श्रीमंत वर्गासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला. आणि यातून बॅले डान्सर्सच्या लैंगिक शोषणाला सुरुवात झाली. आणि सक्तीची देहविक्री हा या नृत्यांगनांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनून राहिला.

ओपेराच्या आर्थिक गणितात शहरातील धनिक व्यक्ती हा अत्यंत महत्वाचा घटक होता.

१८६० साली चार्ल्स गार्नियर याने स्वतःच्या स्वप्नातलं भव्य असं ओपेरा हाउस उभारलं. त्या हाउसमध्ये तर अशा व्यक्तींसाठी विशेष प्रवेशाची व्यवस्था होती. ओपेरा हाउसच्याच इमारतीत एका अलिशान दालनाची निर्मिती करण्यात आली. “फोयर डे ला डान्स” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दालनाची जागा मुख्य रंगमंचाच्या बरोबर मागच्या बाजूला होती. या ठिकाणी कलाकार नृत्याआधीचा सराव आणि मेक-अप करत.

 

dencers_at_opera_club
Fine Art Images

पण या दालनांची निर्मिती पूर्णतः श्रीमंत व्यक्तींचा कम्फर्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. एका अर्थाने हे दालन म्हणजे बॅले डान्स करणाऱ्या कलाकारांचे प्रदर्शन मांडण्यासाठी सजवण्यात आले होते.

“कोम्ते डी मॉग्नी” या समकालीन लेखकाने तर या ओपेरा हाउसचे वर्णन करताना “Epic scenes took place backstage,” असे म्हटले आहे.

तो पुढे म्हणतो,

“रंगमंचाच्या मागचे दालन म्हणजे तर शहरातल्या प्रतिष्ठित व्यक्तींसाठी एकमेकांना भेटण्याची, आर्थिक करार करण्याची, व्यापारासंबंधी मिटींग्स घेण्याची आणि अत्यंत मादक वातावरणात वेळ घालवण्याची जागा म्हणून नावाजलेली होती”

बॅले नृत्यांगनांसाठी ही ओपेरा हाउस म्हणजे नरकासारखी जागा होती.

हाउसमध्ये त्यांचावर प्रतिष्ठित व्यक्तींचे मनोरंजन करण्याची सक्ती असे. अनेकदा तर त्यांचे गंभीर शोषण या व्यक्ती करत असत. त्यांच्यातले बरेचजण राजघराण्यातील, महत्वाचे पैसे पुरवणारे लोक असायचे. त्यांच्या आर्थिक मदतीवर ओपेरा हाउस चालत असे.

 

backstage_at_opera_inmarathi
victorianparis.files.wordpress.com

“एजर डेगास” या प्रसिद्ध चित्रकाराने या क्लबमध्ये जाणाऱ्या त्याच्या अनेक मित्रांना हाताशी धरून ओपेरा हाउसच्या रंगमंचामागील दालनात थेट प्रवेश मिळवला आणि तिथल्या बँलेट डान्सर्सच्या जगण्याचे वास्तव चित्रण केले आहे. त्यांची दयनीय परिस्थिती दर्शविण्यासाठी ही चित्रे पुरेशी बोलकी आहेत.

याच हाउसमध्ये काढलेले डेगासचे “Little Dancer of Fourteen Years” हे चित्र जगप्रसिद्ध आहे. नृत्याच्या पुढच्या स्टेपची वाट पाहत असणाऱ्या एका बेल्जियन डान्सरचे हे चित्र. पण या चित्रावर त्या काळात कठोर टीका झाली. ही मुलगी प्रचंड कुरूप आणि माकडासारखी दिसणारी असल्याचे त्याच्या टीकाकारांनी म्हटले.

 

Little_Dancer_Aged_Fourteen_inmarathi
tate.org.uk

डेगासची चित्रे, त्याचे विषय विचित्र वाटू शकतात. पण एकोणिसाव्या शतकात ओपेरा क्लबच्या चमचमणाऱ्या दुनियेच्या मखमली पडद्यामागे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे कशा प्रकारे शोषण व्हायचे त्याचं भयानक वास्तव त्याने आपल्यासमोर ठेवलं आहे. मानवजातीला कित्येक हजार वर्षाच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे. त्यात त्याने अनेक चढ-उतार, जय-पराजयाचा सामना केलाय. कित्येक आघात पचवलेत. पण –

माणसाने अनेकदा माणसाचाच ‘माणूस  असण्याचा’ हक्क नाकारलाय हाही विषण्ण करणारा इतिहास उत्क्रांतीच्या प्रक्रियेने आपल्या उरात जपून ठेवला आहे.

अमानुषतेची परमावधी गाठली जाते तेव्हा काय वेदना सहन कराव्या लागतात याची आठवण आपल्याला ओपेरा क्लबचा इतिहास आणि डेगासची चित्रे कायम करून देत राहतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?