अखंड स्वराज्याची सावली | धन्य ती जिजाऊ माऊली ||

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अखंड स्वराज्याची माता म्हणजे राजमाता जिजाऊ ! स्वराज्याचे दोन ढाणे वाघ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या छत्रछायेखाली वाढले त्या राजमाता जिजाऊ! ज्यांनी स्वराज्य उभारणीमध्ये बहुमुल्य साथ दिली आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या राजमाता जिजाऊ! मुत्सद्दीपणा, नितीमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ! माँसाहेब जिजाऊंबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच! त्यांच्या महतीचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडावेत. त्यांचे नाव जरी मुखातून निघाले तरी शरीर अगदी रोमाचून उठतं! ज्यांना आपण हिंदवी स्वराज्याचे दैवत मानतो त्या छत्रपतींना जन्म देणाऱ्या या माउलीची जीवनगाथा देखील तितकीच अगाध आहे. त्यांचे चरित्र जाणून घेताना त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगळ्या जिजाऊ उलगडताना दिसतात.

jijau-marathipizza

स्रोत

साक्षात भगवान श्रीकुष्णाचे वंशज असलेल्या देवगिरीचे सम्राट यादवरावांच्या घराण्यामधील पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांना १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे कन्यारत्नाचा लाभ झाला. लहानपणापासूनच जिजाऊ अगदी हुशार होत्या. त्यांच्या बोलण्या-वागण्यातील धीटपणा सहज दिसून येत असे. ही पोर पुढे जाऊन नक्कीच काहीतरी विलक्षण करणार हे तेव्हाच लखुजी जाधवांच्या लक्षात आले होते. वयात आल्यावर लखुजी जाधवांनी त्यांच्या तोलामोलाच्या असलेल्या भोसले घराण्यातील शहाजीराजांसोबत जिजाऊंचा विवाह लावून दिला. शहाजीराजांसारखा शूर, पराक्रमी ऐश्वर्यसंपन्न पती आपल्याला लाभला याचे जिजाऊंना केवढे कौतुक! पण सोबतच त्यांना हे देखील ठावूक होते की अश्या वीराला जन्मभर सोबत करणे म्हणजे निखाऱ्यावरून चालण्यासारखे आहे. कधी दैवगती फिरेल आणि भोग नशिबी येतील हे सांगता येणारे नव्हते. आणि त्याचा प्रत्यय जिजाऊंना लवकरच आला.

राजकीय बेबनावामुळे पुढे लखुजी जाधव आणि शहाजीराजे भोसले यांच्यात वैर निर्माण झाले. या प्रसंगातून स्वत:ला सावरत जिजाऊंनी मात्र सासरकडच्यांची बाजू घेतली आणि लग्नानंतर मरेपर्यंत पतीला सोबत करण्याची शपथ त्यांनी पाळली. शहाजीराजे पराक्रमी असले तरी त्यांचे स्वत:चे साम्राज्य नव्हते. मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी शहाजीराजांनी केलेली धडपड जिजाऊंनी स्वत: पहिली होती. तेव्हाच त्यांच्या मनात कुठेतरी स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाचे बीज रुजले.

jijau-marathipizza01

स्रोत

जिजाऊंना सहा मुली आणि दोन मुलगे अशी एकूण आठ अपत्ये! पहिला मुलगा झाला त्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले. त्यानंतर ४ मुले झाली पण दुर्दैवाने ४ ही मुले मृत्यू पावली. १९ फेब्रुवारी १६३० रोजी फाल्गुन वैद्य तृतीया सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि त्याचे नाव ‘शिवाजी’ ठेवण्यात आले.

थोरले पुत्र संभाजी राजे हे शहाजी राजांच्या संगोपनात वाढत होते तर धाकटे पुत्र शिवाजी राजे हे जिजाऊंच्या संगोपनात स्वराज्याची दीक्षा घेत होते. जिजाऊंनी लहानपणापासुनच शिवरायांवर अतिशय उत्तम संस्कार केले. त्यांच्या गोष्टींमधून शिवरायांना चांगल्या आणि वाईटामधील जाण आली. थोडे मोठे झाल्यावर जिजाऊंनी त्यांना राजनीती शिकवली आणि ‘स्व’राज्य काय असतं याचे धडे देण्यास सुरुवात केली. एव्हाना मोठे झालेले शिवराय युद्धकले मध्ये पारंगत झाले होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्या स्वराज्यनिर्मितीचे ध्येय माझा हाच पुत्र साकार करू शकतो याची त्यांना खात्री पटली. मुत्सद्दी,धडाडी,कणखरपणा,धैर्य हे जिजाऊंचे गुण शिवरायांनी आत्मसात केले होते. जिजाऊंचे निपक्षपाती न्यायदान, कर्तव्यकठोर स्वभाव, प्रजेबद्दलचे ममत्व, हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा, त्यांना स्त्रियांच्या बेअब्रुची असलेली चिड या साऱ्या गोष्टी शिवरायांच्या मनावर परिणाम करत होत्या आणि हळूहळू शिवराय घडत होते.

jijau-marathipizza02

स्रोत

जिजाऊंनी त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याच्या केवळ ३६ खेड्यांच्या जहागिरीवर स्वराज्यनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या मावळ प्रांतातल्या गोरगरीब सामान्य रयतेच्याच त्या माऊली अन सावली झाल्या. सर्वांवर त्यांचा मायेचा हात होता. शहाजी राजांची कैद व सुटका, अफझल स्वारी, शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांन दिली. शिवराय स्वत: मोहिमांवर गेले जिजाऊ स्वत: स्वराज्याचा गाडा हाकीत असतं.

ज्या दिवशी स्वराजयनिर्मितीच्या ध्येयाचे बीज त्यांच्या मनात रुजले तेव्हापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होत्या तो क्षण अखेर आला आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे त्यांना वाटले. ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसांनी जेष्ठ वद्य नवमी शके १५९६, १७ जून १६७४ वर बुधवार रोजी मध्यरात्री पाचाड येथे जिजाऊसाहेबांचे निधन झाले. आपल्या मुलाचा हिंदू नृपति म्हणून झालेला राज्याभिषेक पाहून ती माऊली कृतार्थ झाली आणि आपले जीवनकार्य संपवून स्वर्गाच्या वाटेवर निघाली आणि स्वराज्याच्या स्वामीसह अवघा स्वराज्य पोरका झाला.

jijau-marathipizza03

स्रोत

जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा होत्या. त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहानग्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. स्वराज्यनिर्मिती ही एकच आस जन्मभर उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?