' RSS म्हणजे ISIS ? राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो? – InMarathi

RSS म्हणजे ISIS ? राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मध्यंतरी राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये बुसेरीयस समर स्कूल आहे. राहुल गांधी ह्या शाळेत शिकलेत. २२ ऑगस्ट २०१८ रोजी शाळेने आपल्या माजी विद्यार्थ्याला शाळेत येण्याचे निमंत्रण दिले. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून राहुल गांधी त्यांच्या शाळेत भाषण देण्यासाठी गेले.

ह्या भाषणात त्यांनी नेहमीप्रमाणे उलटसुलट बोलून संपूर्ण जगाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. ह्या भाषणादरम्यान त्यांनी भाजप व मोदी सरकारवर यथेच्छ टीका केली.

परंतु हे करताना त्यांनी इसिस ह्या दहशतवादी संघटनेची RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुलना केली. त्यांनी मॉब लीचींग म्हणजे काय हे समजावून सांगताना इसिसचे उदाहरण दिले.

राहुल गांधी म्हणाले की,

“लोकांमध्ये भेदभाव करणे हे एकविसाव्या शतकात हानिकारक आहे. अमेरिकेने इराकवर हल्ला केला.अमेरिकेने इराकच्या काही व्यक्तींवर सरकारी नोकरी करण्यावर बंधने लादली. सद्दाम हुसैनच्या सेनेला हरवायला अमेरिकेला काही महिन्यांचा कालावधी लागला. ज्या लोकांवर ही बंदी घालण्यात आली होती त्यांच्याकडे मोबाईलचे नेटवर्क होते.अमेरिका व इराकच्या सैन्याने ह्या व्यक्तींना मोकळे सोडले होते.

ही माणसे म्हणजे जणू जिवंत हत्यारेच होती. त्यांनी बंडाचे निशाण उभारले. ते अमेरिकेविरुद्ध लढले. त्यांनी खूप नुकसान केले. परंतु हे सगळे तिथेच न थांबता सिरीया व इराकच्या अस्थिर भागात जाऊन पोहोचले. ह्या भागातील परिस्थिती अतिशय कठीण होती. ह्याच माणसांनी मग आणखी हातपाय पसरून इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिस ह्या अतिशय धोकादायक संघटनेला जन्म दिला.”

राहुल गांधी ह्यांनी सांगितलेल्या ह्या इसिसच्या जन्माच्या गोष्टीत सगळं कसं सरळसरळ घडताना दिसतं! परंतु इसिसचा जन्म का आणि कसा झाला, त्यांनी काय काय कृत्ये केली हे वाचले की सर्वांना कळेल की इसिस व रा. स्व. संघाची तुलनाच होऊ शकत नाही.

 

rahul-isis-inmarathi
reuters.com

जेव्हा तालिबान व अल कायदा निर्माण झाले तेव्हाच इसिसचा सुद्धा जन्म झाला-

इसिस ह्या दहशतवादी संघटनेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्यामागचा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे.

अफगाणिस्तानच्या युद्धापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती. १९७९ साली सोविएत संघाने अफगाणिस्तानवर हल्ला केला. सोविएतच्या ह्या कृत्यामुळे इस्लामिक राष्ट्रे दुखावली गेली. त्यांना वाटले की, हल्ला अफगाणिस्तानवर नसून इस्लाम धर्मावर झालेला हल्ला आहे. संपूर्ण मुसलमान बांधवांवर झाला आहे. ह्या इस्लामिक राष्ट्रांच्या ह्या गैरसमजामध्ये अमेरिकेने भर घातली.

अमेरिका व सोविएत ह्यांचे आधीपासूनच भांडण आहे. दोन्ही राष्ट्रांत शीतयुद्ध सुरु होते. ह्या जगावर अधिसत्ता कोणाची चालणार ह्यावरून अमेरिका व सोविएत दुसऱ्या महायुद्धापासूनच शीतयुद्ध सुरु होते.

सोविएत व अफगाणिस्तान ह्यांच्या भांडणात अमेरिका, सौदी व अन्य अरब राष्ट्रांनी अफगाणीस्तानच्या युद्धाला “जिहाद” चे स्वरूप दिले. आणि ह्या युद्धात लढणारे अफगाण हे “मुजाहिदीन” झाले.

१९८८ सालापर्यंत सोविएतची अवस्था फार बरी राहिली नाही. त्यामुळे त्यांनी अफगाणिस्तान सोडून दिले. ते गेले परंतु त्यांच्यामुळे अफगाणिस्तानची अवस्था वाईट झाली. अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरूच राहिले. ह्या सगळ्यात ११ ऑगस्ट १९८८ रोजी अल कायदाची स्थापना झाली. अल कायदातील महत्वाच्या व्यक्तींमध्ये ओसामा बिन लादेन व अल जवाहिरी हे होते.

ह्या व्यक्तींना सौदीचा पाठींबा होता. त्यांना सौदीकडून भक्कम आर्थिक मदत मिळत होती शिवाय त्यांच्या डोक्यात जिहादी विचारधाराही पक्की होती.

 

al qaeda-inmarathi
edition.cnn.com

तेव्हाच अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या गृह युद्धात सहभागी होण्यासाठी इस्लामिक देशातून अनेक युवक अफगाणिस्तान व पाकिस्तानात येऊ लागले. ह्यात एक जॉर्डनचा अहमद फधल नज्जाल अल-खल-अय्याह नामक युवक होता. ह्याने नंतर स्वत:ला अबु मुसाब अल-जरकावी हे नाव दिले. हे कुख्यात नाव माहिती नाही अशी व्यक्ती विरळाच!

हा दहशतवादी एके काळी जगातील मोस्ट वॉन्टेड माणूस होता. ह्या माणसावर अमेरिकेने १७५ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. ह्याच अल जरकावीने नंतर इसिसला जन्म दिला.

ओसामा बिन लादेन व अल जरकावी अनेक वर्ष अफगाणिस्तानमध्ये होते तरीही ते एकमेकांना भेटले नव्हते. १९९९ साली पहिल्यांदा त्यांची भेट झाली. ओसामा व जरकावी ह्यांची पार्श्व भूमी पूर्णतः भिन्न होती.

ओसामा हा उच्च मध्यमवर्गीय घरातून आलेला युनिवर्सिटीमध्ये शिकलेला माणूस होता तर जराकावी एका गरीब कुटुंबातून आलेला थोडेफार शिकलेला मुलगा होता. त्याने अनेक गुन्हे केले होते. व लैंगिक अपराधासाठी एकदा तुरुंगात सुद्धा जाऊन आला होता.

जरकावीच्या ह्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे ओसामाचे त्याच्याविषयी फार चांगले मत नव्हते. तसेच दोघांच्या विचारांत सुद्धा पुष्कळ फरक होता. खरे तर दोघेही जिहादच्याच मार्गावर चालले होते परंतु ओसामापेक्षा जरकावी जास्त कट्टर होता. दोघांचे विचार आपापसात जुळले नाही.

नंतर जरकावी जॉर्डनला परत गेला. १९९९ साली जरकावीने जमात-अल तावहिद वल-जिहाद ही स्वतःची वेगळी दहशतवादी संघटना स्थापन केली.

इकडे इराकमध्ये सद्दाम हुसैनची बा’थ पार्टी इराकवर वर्चस्व गाजवत होती. राजकीय नेते तसेच सेनेपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडे ह्याच पार्टीचे लोक होते. इराकमध्ये ही पार्टीने जी सिस्टीम चालवली होती ती म्हणजे लोकांवर एक प्रकारचा अत्याचारच होता. परंतु ह्या सिस्टीमने इराकला एकत्र बांधून ठेवले होते. सद्दाम हुसैन सुन्नी असल्याने बा’थ पार्टीत सुन्नी लोकांचीच चलती होती. शियांना फार भाव नव्हता.

 

rahul-isis-inmarathi01
indiatoday.in

आता राहुल गांधींनी भाषणात ज्या इराकी लोकांचा उल्लेख केला ते तिकरिती लोक इराकमधील बा’थ पार्टीमधील प्रभावशाली लोक होते. सद्दाम हुसैनचे ह्याच लोकांशी जवळचे संबध होते. सद्दाम हुसैन जेव्हा सत्तेवर आला तेव्हा ह्या लोकांचे इराकमध्ये वजन वाढले. त्यांना ह्याच्या शासनात इराकी रिपब्लिकन गार्ड्स, सद्दामचे अडवायजर्स, टॉप सरकारी अधिकारी अश्या अनेक संधी मिळाल्या.

जेव्हा अमेरिकेने इराकवर हल्ला केला तेव्हा सद्दाममुळे हे तिकरिती लोक सुद्धा अमेरिकेच्या रडारवर आले. अमेरिकेने ह्या तिकरीती लोकांच्या प्रदेशावर अनेक वेळा बॉम्बहल्ले केले.

जेव्हा अमेरिकेने सद्दाम हुसैनला हरवले तेव्हा बा’थ पार्टी इराकमधून नामशेष करणे हा अमेरिकेचा उद्देश होता. अमेरिकेने युद्धानंतर कोएलीशन प्रोविज़नल अथॉरिटीची (CPA) नेमणूक केली.

ह्या अथॉरिटीने एकामागून एक असे अनेक वादग्रस्त नियम केले. ह्या नियमांना जग हंड्रेड ऑर्डर्स ह्या नावाने ओळखते.

ह्या आदेशानुसार बा’थ पार्टीच्या लोकांना सत्तेतून, सेनेतून व सरकारी नोकरीतून सुद्धा हद्दपार करण्यात आले. CPA च्या रडारवर तिकरिती लोक सुद्धा होते. CPAच्या नवनव्या आदेशांमुळे तिकरिती लोकांचे जगणेच कठीण होऊन बसले.

अनेक तिकरिती लोकांना अटक करण्यात आली. सद्दाम हुसैनने शियांवर अनेक अत्याचार केले. पण त्याच्यानंतर सत्तेत शियांचाच भरणा होता. ह्या सगळ्यामुळे सुन्नी लोकांत अशी घबराट पसरली की, आता शिया लोक त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचा बदला सुन्नींकडून घेणार! इराकमध्ये शिया विरुद्ध सुन्नी असा तणाव निर्माण झाला.

CPA ने सद्दामच्या सेनेला तसेच गुप्तहेर संस्थांना सुद्धा सेवेतून काढून टाकले. सेनेच्या जवानांच्या नोकऱ्या गेल्या आणि रिटायर्ड अधिकाऱ्यांची पेन्शन बंद झाली. ही गोष्ट पुढे इराकला फार महागात पडली.

 

shia and sunni-inmarathi
strategicstudyindia.blogspot.com

शियाबहुल सरकारला इराकवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नव्हते. तेव्हाच ह्याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी इराकमध्ये आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली. अनेक जिहादी दहशतवादी इराक मध्ये आले. जरकावी सुद्धा इराक मध्ये आला.

ह्या दहशतवाद्यांना पलीकडून सिरीयाकडून मदत मिळाली. सिरियात तेव्हा बशर अल-असद ह्याची सत्ता होती. इराकमधून अमेरिकेला बाहेर घालवण्यासाठी असदने दहशतवाद्यांना मदत केली.

२००४ साली जरकावीने आपल्या संघटनेचे नाव अल-कायदा इन इराक (AQI) असे नाव दिल्याने त्याला भरघोस आर्थिक मदत मिळू लागली व ह्या संघटनेत अनेक तरूण भरती होऊ लागले. AQI ने फक्त अमेरिकेचे सैन्यालाच लक्ष्य बनवले नाही तर अल्पसंख्याक शिया मुस्लिमांवर सुद्धा अनेक हल्ले केले. एक म्हणजे शिया व सुन्नी ह्यातील वाद, शिवाय अमेरिका असे इराकवर दुहेरी संकट घोंगावत होते.

ओसामाला जरकावीच्या कामाची पद्धत मान्य नव्हती. त्याने जरकावीला अनेकदा टोकले. परंतु जरकावीने त्याचे ऐकले नाही. काहीच दिवसात AQI ने इराकच्या काही प्रदेशावर ताबा मिळवला. जरकावीच्या ह्या कट्टरपणामुळे काही सुन्नी संघटनासुद्धा त्याच्यापासून वेगळ्या झाल्या.

नंतर २००६ साली अमेरिकेच्या एका हवाई हल्ल्यात जरकावी मारला गेला. त्यानंतर AQI च्या कारवाया थंड पडल्या. त्यातील अनेक लोक पकडले गेले किंवा मारले गेले.

ह्यानंतर २०१० सालपर्यंत इराकची अवस्था सुधारू लागली होती. परंतु पंतप्रधान नूरी अल-मलिकी ह्यांनी हुकुमशाहीचे तंत्र वापरायला सुरुवात केली. त्यांनी परत शियांना संधी देणे सुरु केले. हे सुन्नींना सहन झाले नाही. हे सरकार अतिशय बेकार आहे तसेच सुन्नींचे ह्यात नुकसान होणार अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली

. ह्याच दरम्यान इराकमध्ये अबू बकर अल-बगदादी ह्याने AQI ची जबाबदारी घेतली. त्याच्या नेतृत्वाखाली AQI परत जोमाने उभी राहिली.

 

Abu_Musab_al-Zarqawi-inmarathi
wikipedia.org

ह्या बगदादीने सद्दाम हुसैनच्या सेनेतल्या बेरोजगार लोकांना एकत्र आणणे सुरु केले. हे लोक सैन्याचे प्रशिक्षण घेतलेले सैनिक होते. त्यांना युद्धाचा तगडा अनुभव होता. ह्याच लोकांना CPA ने टार्गेट केले होते. २०११ साली सिरीयामध्ये असदच्या सरकारविरुद्ध क्रांती सुरु झाली. सिरियात गृह युद्ध भडकले.

ह्या युद्धाचा फायदा AQI ने घेतला. सिरियात सुद्धा AQI ने जाळे विणायला सुरुवात केली. बगदादीने अबु मुहम्मद अल-जोलानीला सिरियात पाठवले. जोलानीने तिथे जभात अल-नुसरा ह्या संघटनेची सुरुवात केली. सिरियात ह्यांचे वर्चस्व वाढत गेले.

२०१३ साली बगदादीने त्याच्या जिहादी संघटनेचे नाव बदलून इस्लामिक स्टेट इन इराक ऐंड सीरिया म्हणजेच ISIS असे नाव ठेवले. ह्या इसिसकडे सैन्याचे खडतर प्रशिक्षण घेतलेले सैनिक आहेत. हे सैनिक त्यांच्या संघटनेचे काम करण्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहेत.

ह्या इसिसने इराकच्या मोसुल नावाच्या शहरावर हल्ला केला तेव्हा ह्या इसिसच्या भीतीने इराकी पोलीस व सैन्याने काहीही प्रतिकार न करता तिथून आपले सैन्य मागे घेतले. ह्याच मोसुलमध्ये बगदादीने घोषणा केली कि आता तोच इस्लामचा नवा खलिफा आहे.

अशी ही इसिसच्या जन्माची कहाणी! आपले राहुल गांधी बोलले संघ व अरब देशातील इसिस सारखेच आहेत. हे बोलण्याआधी त्यांनी किमान इसिसच्या इतिहासाचा अभ्यास करायला हवा होता.

इसिस ही एक दहशतवादी कारवाया करणारी संघटना आहे. तर संघ कार्यकर्ते हे कायम राष्ट्रनिर्मिती साठी झटत आले आहेत. दोन्ही संघटनांच्या विचारधारेची तुलनाच होऊ शकत नाही.

संघाची तुलना इसिससारख्या महाभयंकर संकटाशी करणाऱ्या राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही “खरी” कहाणी कोणी सांगेल काय?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?