' असंख्य विरोधांच्या वेदना सहन करत सेंद्रिय बियाणांना जन्म देणाऱ्या या मातेची कहाणी तुम्हालाही प्रेरणा देईल – InMarathi

असंख्य विरोधांच्या वेदना सहन करत सेंद्रिय बियाणांना जन्म देणाऱ्या या मातेची कहाणी तुम्हालाही प्रेरणा देईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नऊवारी साडी, डोक्यावर पदर, नाकात मोठाली नथ आणि ‘जुनं ते सोनं’ चा नारा लावणारी, अगदी आपली आईच वाटावी अशी स्त्री आज घरोघरी पोहोचली आहे.

ही व्यक्ती म्हणजे नेमकी कोण असा प्रश्न पडलाय? चला तर जाणून घेऊया, राहिबाई सोमा पोपेरे म्हणजेच आपल्या ‘seed mother’ बद्दल.

अतिशय साध्या आणि बेताच्या परिस्थितीतही त्यांनी असाध्य ते साध्य करून दाखवलं. कोणतीही वेगळी गोष्ट करायची म्हटली की त्याला विरोध हा आलाच.

प्रचंड विरोध पत्करून आपल्या बांधवांसाठी त्या उभ्या ठाकल्या. अविरत कष्ट आणि ध्येयपूर्तीसाठी उचललेली योग्य पावलं हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.

 

rahibai popere 2 inmarathi
maharashtra times

 

ह्या यशोगाथेची सुरुवात झाली ती म्हणजे राहिबाईंचं ७ जणांचं कुटुंब अकोल्याला स्थलांतरित झालं तेव्हा. पावसाळ्यात शेती आणि इतर वेळी त्या साखरकारखान्यात मजुरी करीत असत.

त्याचदरम्यान पदरातील ७ एकर जमिनीपैकी ३ एकर जमिनीवर राहिबाईंनी लक्ष केंद्रित केलं. आपल्याकडील ज्ञानाने तसेच निरीक्षणशक्ती चांगली असल्यामुळे त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी २ एकर जमिनीवर (जी अनुत्पादक मानली जाई) हरितक्रांती घडवून आणली.

बघता बघता त्या २ एकरांवर भाज्या उगवल्या. त्यांनी शेतात शेत-तळी तसेच जलकुंडंही बांधलं.

पुढे त्यांचा कार्यातील हा उत्साह बघून महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ऑफ रूरल एरियाज (MITTRA) तर्फे त्यांना कुक्कुटपालन आणि नर्सरीसाठी मदत मिळाली. बघता-बघता नेहमीपेक्षा ३० टक्क्यांनी उत्पादन वाढलं.

 

देशी बियाणे : 

 

rahibai inmarathi
CGTN

 

आज इतकी माहिती आणि यश मिळूनही देशी बियाण्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्या प्रयत्नशील आहेत. संकरित आणि सिन्थेटिक बियाण्यांपेक्षा देशी बियाण्यांचे अनेक फायदे असल्याचंही त्या सांगतात.

त्यांच्या अनुभवाप्रमाणे देशी बियाणं हे सर्वच बाबतीत उजवं आहे. ते फक्त दुष्काळ, उष्णता आणि रोगांचा प्रतिकारच करत नाहीत; तर पौष्टिकही असतात. ते मातीची सुपीकता जपण्यासही मदत करतात.

त्यांना अतिरिक्त खतांची, कीटकनाशकांची तसेच अधिक पाण्याचीही गरज भासत नाही. इतर बियाण्यांपेक्षा त्या स्वस्तात उपलब्ध असतात.

 

rahibai popere 1 inmarathi.jpg inmarathi
CGTN

 

दुसरा मुद्दा असा की, शेतकऱ्यांच्या शोषणविरोधीसुद्धा देशी बियाणं उपयुक्त आहे. आजकाल अनेक कंपन्या हायब्रीड बियाणी पुरवू लागल्या आहेत.

मात्र नेहमी पुरवठा होईल असंही नाही आणि वर्षभर बियाणं साठवणंही अशक्य आहे. त्यामुळेच देशी बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन खूपच महत्वाचं आहे.

योग्य निवड आणि संरसक्षण हेच टिकाऊ, प्रभावी शेती आणि अन्न सुरक्षिततेचं मूळ आहे. काळाची गरज लक्षात घेत राहिबाईंनी अनेक बियाण्यांचा साठा केला आहे.

प्रभावीपणे शेती करत त्यांनी अनेक अनुत्पादक जमिनी सुपीक बनवल्या आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार, धान्यातील केमिकल्समुळे अनेकांना आजारांना सामोरं जावं लागतं.

 म्हणूनच त्या गावकऱ्यांना आवाहन करतात की शेती कुठल्याही कीटकनाशक किंवा रसायनांशिवाय करा. देशी बियाणं वापरा जे सर्वोतोपरी श्रेष्ठ आहे.

 

ज्ञानदान :

ज्ञान हे देण्याने नेहमीच वाढतं. राहिबाई स्वतःजवळ असलेलं ज्ञान फक्त स्वतःपुरतंच मर्यादित न ठेवता ते इतरांनाही भरभरून देण्याचा प्रयत्न करतात. शेतकरी तसेच कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी शेतीबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात.

 

rahibai 3 inmarathi
hindubusinessline

 

स्वतःकडील ज्ञानाचा प्रयोग आणि त्यातून मिळालेला अनुभव इतरांना नक्कीच फायद्याचा ठरावा म्हणून त्या कार्यरत आहेत.

 

बचतगट :

स्वतःच्या कष्टाचं फळ स्वतःपुरतं मर्यादित ठेवण्याची वृत्ती हल्ली सर्रास बघायला मिळते. परंतु राहिबाई अशा स्वार्थी आणि कोत्या मनाच्या कधीच नव्हत्या. उलट आपल्या ज्ञानाचा आपल्या शेतकरी वर्गाला आणि समाजाला उपयोग व्हावा असंच त्यांना वाटतं.

म्हणून त्यांनी अकोल्यातील स्थानिक महिलांच्या मदतीने स्थानिक बियाणी गोळा करायला सुरुवात केली.

 

rahibai 1 inmarathi
CGTN

 

त्यानंतर ‘कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती’ ह्या बचत गटाची स्थापना केली आणि त्या मार्फत हेल्थ कॅम्प, सोलरचे दिवे तसेच इतरही शेतोपयोगी उपक्रम राबवले.

 

सीड बँक :

राहिबाईंनी सीड बँकेचीही स्थापना केली. शेतकऱ्यांना बियाणं देताना, त्यांनी दिलेल्या बियाण्याच्या दुप्पट बियाणं परत करावं अशी एकमात्र अट त्यांना घातली जाते जेणेकरून त्यांचं सार्वभौमत्व टिकून राहील. चांगल्या बियांचा पुरवठा अखंड चालू राहील.

आज अनेक बियाण्यांचं संवर्धन करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पैशांच्या बँका तर जागोजागी आहेतच पण अशा बियाण्यांच्या बँकांची ठिकठिकाणी स्थापना व्हावी असं त्या कळकळीने म्हणतात.

अशा बॅंकांमुळे दर्जेदार बियाणं आणि पर्यायी पीक तर मिळेलच पण वर्षाकाठी आर्थिक बचतदेखील होईल.

 

rahibai 2 inmarathi
kkwagh.edu

 

आदिवसी कुटूंबांना पोषणयुक्त धान्य मिळावं म्हणून २५००० कुटूंबांना किचनगार्डनसाठी मदत करण्याचा त्यांचा मानस आहे.

त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे कृषिक्षेत्रातील जैवविविधता अजूनही टिकून आहे.

 

जागरूकता :

 

rahibai popere inmarathi
thebetterindia

 

महिला सबलीकरण, स्वच्छता, आरोग्य, बी संवर्धन, स्वयंपाकघरातील स्वच्छता ह्याबाबत त्यांनी महिलांना जागरूक करत पुढाकार घायला प्रोत्साहीत केलं आणि बघता बघता त्यांचं काम हे एकापुरतं मर्यादित ना राहता सर्वांपर्यंत पोहोचलं.

 

कामाची दखल :

कष्टाचं फळ हे मिळतंच. राहिबाईंना त्यांच्या कष्टाचं फळ तर मिळत होतंच पण त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना पुरस्कारांचीही जोड मिळाली.

कृषी विज्ञान केंद्र भाबळेश्वर तर्फे ‘द बेस्ट सीड सेव्हर’ तसेच BAIF ‘बेस्ट फार्मर २०१४-१५’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं.

मा. रघुनाथ माशेलकरांनी त्यांना ‘सीड मदर’ हे नाव देऊ केलं. मिनिस्ट्री ऑफ वूमन अँड चाईल्ड डेव्हलोपमेंट; गव्हरमेन्ट ऑफ इंडिया तर्फे ‘नारीशक्ती पुरस्कार २०१८’ त्यांना प्रदान करण्यात आला.

अनेक शास्रज्ञ त्यांच्या प्रकल्प भेटीस येऊन गेले.

 

rahibai popere 1 inmarathi
pibarchive

 

खरंतर कोणत्याही पुरस्काररूपी फळाची अपेक्षा न करता आपल्या बांधवांसाठी त्या नि:स्वार्थीपणे कार्य करत आहेत. त्यांनी सुरु केलेली चळवळ बघता बघता नावारूपास आली.

आपल्या समाजाची अशा रीतीने सेवा करणं हे प्रत्यक्ष कठीणच होतं पण त्यांनी जिद्दीने ते केलं आणि अजूनही करत आहेत. इच्छा तिथे मार्ग…..!

त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा, मानाचा असणारा ‘पद्मश्री ‘ देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे ही बातमी नक्कीच अभिमानास्पद आहे. आपणही त्यांच्याकडून थोडीशी प्रेरणा घेऊया.

आपल्या समाजाप्रती आपल्या कर्तव्याची पूर्तता करूया. लक्षात ठेवा, प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?