' अपंगांचे जीवन सुकर होण्यासाठी वाहून घेतलेल्या कर्मयोगी स्त्रिया, वाचा अभिमानास्पद कार्य! – InMarathi

अपंगांचे जीवन सुकर होण्यासाठी वाहून घेतलेल्या कर्मयोगी स्त्रिया, वाचा अभिमानास्पद कार्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

दिव्यांग लोकांना दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक असणारे प्रोस्थेटिक्स बाजारात अत्यंत महाग मिळतात. गरीब लोकांना ते परवडू शकत नाहीत.

पण हे प्रोस्थेटिक्स मिळाले तर दिव्यांगांना दैनंदिन आयुष्यात कामे करणे सुकर होऊ शकते. ते लोक सुद्धा आत्मनिर्भर होऊन स्वतःचे आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतात.

नूर जहाँ ह्यांच्यासाठी आत्मनिर्भर होऊन आयुष्य जगणे हे स्वप्नच होते. त्यांना आयुष्यभर लहान-सहान गोष्टींसाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत असे.

त्यामुळे आपण कधी आपल्या पायांवर उभे राहू शकू हे नूर जहाँ ह्यांना अशक्यच वाटत होते. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी पोलियोचा अटॅक आल्यामुळे त्यांना कमरेपासूनच्या खालच्या भागात संवेदना राहिली नाही.

त्यामुळे कुबड्या नाहीतर कुणाची तरी मदत घेऊनच त्यांना त्यांची सगळी कामे करावी लागत असत. त्यांनी हे सत्य जड हृदयाने स्वीकारले होते की आता आयुष्यभर आपण असेच परावलंबी आयुष्य जगणार आहोत.

 

rawwd Inmarathi
The Better India

परंतु १९९७ साली त्यांचा आयुष्यात असे काही घडले ज्याने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

द बेटर इंडियाशी बोलताना पन्नास वर्षीय नूर जहाँ ह्यांनी सांगितले की ,”मला तर असे वाटते की खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला बावीस वर्षांपूर्वी सुरुवात झाली.

जेव्हा ते लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितले की एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर ते लोक मला कृत्रिम अवयव तयार करण्याची नोकरी देतील.

तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मला खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायांवर उभे राहण्याची संधी मिळाली आणि मी स्वतः सकट माझ्यासारख्याच इतर हजारो स्त्रियांनाही मदत करू शकले. हे माझ्या आयुष्यात घडले हे माझे अहोभाग्य आहे.”

rawwd the better india InMarathi

 

नूर जहाँ आणि त्यांच्याप्रमाणेच इतर नऊ स्त्रियांना प्रशिक्षण देऊन कृत्रिम अवयव बनवण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांना रिहॅबिलिटेशन एड्स वर्कशॉप बाय वुमन विथ डिसॅबिलिटी (RAWWD) मध्ये सामील करून घेण्यात आले.

हे रिहॅबिलिटेशन एड्स वर्कशॉप बाय वुमन विथ डिसॅबिलिटी पाच ध्येयवेड्या व्यक्तींनी सुरु केले होते. ही संस्था म्हणजे मोबिलिटी इंडिया ह्या एनजीओची एक शाखा आहे जी दिव्यांगांना आत्मनिर्भर होण्यासाठी विविध प्रकारे साहाय्य करते.

चपल खसबनीस, अल्बिना शंकर, जयकोडी, रितू घोष आणि वेदा झकारिया ह्या पाच स्त्रियांनी दूरदृष्टीने ही संस्था स्थापन केली त्यामुळे अनेक दिव्यांग लोकांचे आयुष्य सुकर होण्यास मदत झाली.

 

prosthetics Inmarathi
The Better India

 

दिव्यांग स्त्रियांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट्य होते. ह्या दिव्यांग स्त्रियांनी सुद्धा पुढे ही साखळी सुरु ठेवत आपल्यासारख्या दिव्यांग स्त्रियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे सुरु ठेवले.

ही साखळी पुढे इतकी वाढली की त्यामुळे हजारो दिव्यांग लोक ह्या संस्थेशी ह्या ना त्या कारणाने जोडले गेले आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले.

आज जवळजवळ दोन दशकांच्या मोठ्या काळानंतर RAWWD चे निसर्गाच्या सानिध्यात असलेले छोटेसे ऑफिस म्हणजे नूर जहाँ आणि त्यांच्यासारख्या आत्मनिर्भर दिव्यांग स्त्रियांसाठी दुसरे घरच झाले आहे.

 

rawwd office InMarathi

 

ह्या प्रशिक्षण आणि नोकरीमुळे नूर जहाँ आणि त्यांच्यासारख्या अनेक स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली तसेच आयुष्याचे ध्येय देखील सापडले. ह्या स्त्रिया प्रोस्थेटिक्सच्या वर्कशॉप मध्ये काम करून आपल्यासारख्याच इतर लोकांना मदत करत आहेत.

ह्या संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या इंद्रा मोझेस ह्यांनी सांगितले की, “RAWWD ने ह्या स्त्रियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल तर घडवून आणलाच शिवाय त्यांना क्वालिफिकेशन आणि रोजगार सुद्धा दिला.

 

low cost Prosthetics Inmarathi
The Better India

 

तसेच इतर हजारो दिव्यांग लोकांना कृत्रिम अवयव आणि सपोर्टींग उपकरणे सुद्धा उपलब्ध झाली. ह्या सर्व गोष्टी आमच्या संस्थेत बाजारात ज्या भावाने मिळतात त्यापेक्षा कितीतरी कमी किंमतीत उपलब्ध आहेत.”

दिव्यांग स्त्रियांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी ही संस्था सुरु करण्यात आली. इंद्रा ह्यांनी पुढे असेही सांगितले की, “बऱ्याच दिव्यांग स्त्रियांना मोबिलिटी एड्स मिळत नाहीत.

ह्याचे कारण असे आहे की ह्या मोबिलिटी एड्स बनवण्यासाठी माप घेणारे किंवा त्या तयार करणारे जे तंत्रज्ञ आणि तज्ज्ञ लोक आहेत ते सगळे पुरुष असल्यामुळे दिव्यांग स्त्रियांना संकोच वाटतो. म्हणूनच स्त्रिया ह्या उपकरणांकडे वळत नाहीत.”

 

rawwd the better india 1 InMarathi

 


म्हणूनच संस्थेच्या संस्थापकांनी असे ठरवले की ही उपकरणे बायकाच बायकांसाठी व लहान मुलांसाठी तयार करतील व त्याच त्याचे फिटिंग देखील करतील. ह्याच प्लॅनप्रमाणे १० स्त्रियांचा एक गट तयार करण्यात आला.

हा स्त्रियांना एक वर्षभर प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. बंगळुरूला असलेल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये हे ट्रेनिंग देण्यात आले. ही संस्थेला सोसायटी फॉर प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्सकडून मान्यता मिळाली आहे.

 

ProstheticsHero_CJoshParkin Inmarathi
Mosaic Science

 

सुरुवातीला दहा स्त्रियांना ह्यात प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतरह्या संस्थेत आजवर २६ स्त्रियांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. नूर जहाँ आणि प्रेरणा ह्या दोघी ह्या संस्थेतील सर्वात जुन्या सदस्या आहेत आणि प्रशिक्षण घेणाऱ्या पहिल्या बॅचमध्ये त्या होत्या.

प्रशिक्षण झाल्यानंतर त्या दोघींना कृत्रिम अवयव बनवण्याचे काम मिळाले. आता ह्या संस्थेत एकूण ८ स्त्रिया काम करतात त्यापैकी ७ स्त्रिया ह्या दिव्यांग आहेत. RAWWD ह्या संस्थेमुळे अनेक स्त्रियांच्या हाताला काम मिळाले.

प्रशिक्षण घेतलेल्या अनेक स्त्रियांनी पुढे त्याच क्षेत्रात काम करणे सुरु ठेवले आणि काहींनी त्याच संस्थेत काम करणे पसंत केले.

rawwd the better india 2 InMarathi

उपकरणांसाठी कधी कधी त्यांचे क्लाएंट्स त्यांना थेट संपर्क करतात तर कधी शहरातील डॉक्टर त्यांच्या पेशंटना हे कृत्रिम अवयव बसवण्यास सांगतात. कारण त्यांच्याकडील उपकरणे आणि पार्टस हे उत्तम दर्जाचे असतात शिवाय कमी किंमतीत मिळतात.

आमच्या संस्थेत काम करणाऱ्या स्त्रिया क्लाएंट्सना तांत्रिक साहाय्य करण्याबरोबरच भावनिक आधार सुद्धा देतात. इतर दिव्यांग स्त्रियांसाठी ह्या स्त्रिया आदर्श आहेत.

ह्या संस्थेच्या वीस वर्षांच्या प्रयत्नांमुळे आजपर्यंत जवळजवळ चाळीस हजार दिव्यांग लोकांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक उपकरणांच्या रूपाने मदत मिळाली आहे.

 

women doctors of prosthetics Inmarathi
The Better India

 

आजवरचा प्रवासाकडे बघताना नूर जहाँ म्हणतात की,

“लोक आमच्याकडे बघताना दयार्द नजरेने करुणापूर्ण भावनेने बघतात. आमचे आत्मनिर्भर होणे आणि स्वतःच्या पायांवर उभे राहणे हा अनेकांना आमचा खूप मोठा पराक्रम वाटतो.

पण मी नशीबवान आहे की माझ्यात शारीरिक कमतरता असून देखील मी फक्त स्वतःचीच मदत केली नाही तर माझ्यासारख्याच इतर शेकडो महिलांना मदत करण्याची संधी मला मिळाली

आणि त्यामुळे त्यांना आवश्यक ती मदत आणि आत्मविश्वास मिळाला. ह्या गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान आहे.”

 

rawwd the better india 3 InMarathi

 

दिव्यांग लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या ह्या संस्थेला आणि नूर जहाँ ह्यांच्यासारख्या धैर्यवान महिलांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?