' प्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक! – InMarathi

प्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आकर्षक मथळा देणं आणि मुद्दाम फसवा मथळा देणं ह्यातील फरक अनेक माध्यमांकडून दुर्लक्षिला जातोय. त्यावर चपखल भाष्य करणारं लेखन मकरंद केतकर  ह्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये केलंय.

===

 

शाहरूख ‘त्या’ अभिनेत्रीविरुद्ध तक्रार दाखल करणार.

 

वाचा काय म्हणाले बाबा रामदेव.

 

कुलभूषण खटल्यासाठी साळवेंची रोजची फी ३० लाख

 

sakal-marathipizza01
इंग्लिशमधे ‘बेट’ म्हणजे सावजाला फसवण्यासाठी लावलेलं आमिष. विविध न्युज पेजेसवरचे वर उल्लेखलेले मथळे वाचून बातमीनुसार तुम्ही कुतूहलाने त्यावर क्लिक करता किंवा देशाभिमान जागृत होऊन तावातावाने क्लिक करता. बातमी वाचल्यावर मात्र तुम्हाला कळतं की मथळ्याला साजेसं आत काहीच नाही. म्हणजे अ‍ॅमेझॉनवरून मोबाईल मागवल्यावर आत साबणाची वडी निघाली की होईल तशी अवस्था तुमची होते आणि तुम्ही एकतर दुर्लक्ष करता किंवा चिडून कमेंट मधे काहीतरी खरडून जाता. अशा जितक्या कमेंटस येत राहतील तितकी ती पोस्ट आणि जोडीने ब्रँडचं नाव सतत फ्लोट होत राहतं. अनेक लोकं या प्रकाराला भुलतात म्हणून या प्रकारच्या पब्लिसीटीला ‘क्लिक-बेट’ असं म्हटलं जातं.

बिझनेस करणार्‍यांसाठी सोशल मिडियाचा एक महत्वाचा ‘अनसेड’ नियम आहे. पहिल्या तीन-चार सेकंदात जर तुम्ही लक्ष वेधू शकला नाहीत तर तुम्ही तेवढ्या प्रॉडक्टपुरता किंवा बातमीपुरता क्लायंट किंवा पॉप्युलॅरिटी गमावली. कारण तीन ते चार सेकंदांच्या वर (तेही मी खरंतर जास्तच म्हणतोय) कोणीही पेजवर थांबत नाही आणि स्क्रोलिंग चालू राहतं. म्हणून प्रिंट मिडीयाचा इलेक्ट्रॉनिक विभाग या वेळेकडे विशेष लक्ष देतो. स्ट्रॅटेजीनुसार खळबळजनक मथळा किंवा फोटो टाकून अशी अर्धवट वाक्य त्याच्या जोडीला टाकली जातात.

clickbait-marathipizza
पूर्ण बातमी न वाचता केवळ मथळा वाचून कमेंटमधे व्यक्त होणारी जमात आपल्याकडे खूप मोठी आहे. ‘एनी पब्लिसिटी इज ए गुड पब्लिसीटी’ या फंड्याचा वापर हे इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले फार चतुराईने करतात. त्यामुळे प्रियांकाच्या बिकीनीवरच्या पोस्टवर किंवा ‘असा साजरा करा सर्वोत्तम मधुचंद्र’ या पोस्टस् वर लोकांनी न्यूज पेजची कितीही हटाई केली तरी ती पोस्ट काही रिमूव्ह केली जात नाही किंवा भविष्यातही तशाच पोस्ट येत राहतात.

ई-सकाळची साळवेंची पोस्ट जर तुम्ही ओपन करून बघितली तर त्यांनी या खटल्यासाठी नेमकी किती फी घेतलीय हे त्यात दिलंच नाहीये. फक्त ते एवढी मोठी रक्कम नेहमी चार्ज करतात असं लिहिलेलं आहे. वास्तविक सुषमा स्वराज यांच्या ट्वीटनुसार त्यांनी फक्त एक रूपया फी घेतलेली आहे. त्यामुळे मथळा आणि मजकूर यांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. पण ई-सकाळच्या फेसबुक पेजवर असा प्रक्षोभक मथळा वाचून सुरूवातीला अनेक जणांनी साळवेंविषयी वाईट मत बनवलं आहे.

त्या बातमीची लिंक: कुलभूषण खटल्यासाठी साळवेंची रोजची फी 30 लाख

काही जणांनी त्यांच्या कामाच्या दर्जाचा आदर करून त्यांना चार्जेसबद्दल सपोर्ट केलं आहे आणि सरतेशेवटी एक रूपया फी ची बातमी आल्यावर अनेकांनी खोटी बातमी छापल्याबद्दल सकाळची कान उघाडणी केली आहे. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे सरतेशेवटी सगळ्यांनीच ई-सकाळचा ‘फ्लोट’ होण्याचा हेतू साध्य करून दिला आहे. ती पोस्ट अजूनही त्यांच्या पेजवर तशीच आहे.

बातमीचं महत्व, त्यातली सत्यता, मुद्देसूद विश्लेषण आणि त्या अनुषंगाने काढले जाणारे बर्‍यापैकी अचूक निष्कर्ष वगैरे वेळखाऊ गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ आहेच कुणाकडे? आपण बळी पडतो म्हणून अशी सवंग आमिषं येत राहतात, लोकं कमेंट करत राहतात, त्यातून त्या घटनेविषयीचा एक मतप्रवाह बनत जातो आणि समाजात विष पसरत राहतं. त्यामुळे गड्यांनो, आपली सारासार बुद्धी जागेवर ठेवून बातमीचा अ‍ॅनॅलिसीस करणं, तिची पत ठरवणं हे काम संपादक, बातमीदार यांच्या ऐवजी आता आपणंच हाती घ्यायचं आहे. जेणेकरून समाजातील सुजाणता आणि सामंजस्य वर्धिष्णू होण्यास मदत होईल.

दर्जेदार पत्रकारीता, निष्पक्ष पत्रकारिता, निर्भीड पत्रकारिता, रोखठोक बातम्या वगैरे घोषवाक्य लिहायला, वाचायला आणि वदायला एकदम बेष्ट आहेत. व्यवहारात मात्र असं कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्याशिवाय स्पर्धेत टिकून राहायला पर्याय दिसत नसावा.

असो. हे सगळं पाहिलं की पु.लंं.च्या माझी खाद्ययात्रा लेखामधल्या ‘जिलबीचं जेवण’ या परिच्छेदातलं वाक्य आठवंल्याशिवाय राहात नाही.

जिलबीचं जेवण या बातमीला साजेसा मजकूर नसला तरी मथळा ठसठशीत हवा म्हणून अंगठ्याएवढ्या वळणाची जाड जिलबी पानात पडते.

लेखक: मकरंद केतकर 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?