“बंदूक बाळगण्याचं लायसन्स पाहिजे? दहा झाडे लावा..!” – एक अभिनव उपक्रम

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बंदुका बाळगणं हा शौक असू शकतो? हो.. लोक आपला शौक पूर्ण करण्यासाठी काय करु शकतात? जर बाब प्रतिष्ठेची मानली जात असेल तर लोक प्रतिष्ठेसाठी काहीही करु शकतात. जीव देऊ शकतात, घेऊ शकतात.

पण याच मुद्द्यावर एका जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण रक्षणाचा विडा उचलला आहे.

झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश निव्वळ घोषणाबाजी करण्यापुरता ठेवला नाही. त्यावर त्या अनुषंगाने काही निर्णय घेण्यात आले आहेत आणि राबवण्याचा आराखडा तयार केला आहे.

आणि लोकांना त्या आराखड्यानुसार काम करायला भाग पाडले आहे. यात जबरदस्तीने नाही तर समजूतीने हे काम करायला लोकांना प्रेरीत केलं आहे.

 

bhutan tree plantation marathipizza 00
india.com

 

कोण आहेत हे अधिकारी? आणि काय आहे त्यांची योजना? कोणता आराखडा आखून त्यावर ते काम करायला लागले आहेत? हे आहेत ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी अनुराग चौधरी.

त्यांनी बारकाईने अभ्यास केला असता त्यांना जाणवलं ते‌ असं..ग्वाल्हेर आणि चंबळच्या विभागात लोकांना काय आवडतं? तर बंदुक जवळ असणं. त्यासाठी ते काहीही करायची तयारी ठेवतात. पण परवाना हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मग तो परवाना देताना चौधरींनी एक शक्कल लढवली. काय होती ती?

बंदूक चालवायला आवडते??? लायसन्स आहे??? नाही… हवंय??? मिळेल….दहा झाडं लावा…देऊ लायसन्स!!!

चाट पडलात वाचून…ना? पण हे खरं आहे. मध्यप्रदेश मध्ये ग्वाल्हेर आणि चंबळच्या विभागात ही अट लागू करण्यात आली आहे. हा प्रदेश बंदूक बाळगण्याचा मोह असणाऱ्या लोकांसाठी प्रसिध्द आहे.

येथे बंदुक जवळ आहे ही गोष्ट अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. याचाच वापर पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी तेथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी श्री. अनुराग चौधरी यांनी केला आहे.

 

anurag chaudhari inmarathi
thehindu.com

 

बंदूक बाळगण्याचा परवाना मागितल्यानंतर ही अट ठेवण्यात आली आहे, की झाड लावा.. त्यासोबत सेल्फी काढा..,मग मिळेल परवाना. नुसतं झाड लावलं आणि झालं असं नाही. त्यासाठी पुढची पायरीही आहे.

पण ही अट केवळ तातडीने एखाद्या माणसाला जीवाला धोका आहे आणि त्यासाठी लायसन्स पाहीजे असेल तर शिथिल करण्यात आली आहे.

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वाॅर्मिंग मुळे वाढत असलेलं तापमान, कमी होणारं पर्जन्यमान, रुसलेला वरुणराजा आणि आग ओकणारा सूर्य.. यावर्षी एप्रिलमध्ये तापमान ४७ अंशावर पोचलं होतं.

वारंवार ओढवणारी दुष्काळी परिस्थिती हे सारं पाहून सरकारी पातळीवर काय करता येईल याचा विचार केला.

या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हा एकमेव उपाय आहे. आणि सर्व पातळ्यांवर प्रयत्न करुनही अजून लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मग लक्षात आलं की लोकांना झाडं लावण्यासाठी उद्युक्त करणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे ही नवी भन्नाट आणि अभिनव कल्पना लढवून लोकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभं करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणून ही नवी अट ठेवली आहे.‌

 

deforestation-inmarathi
cdn.yourarticlelibrary.com

 

ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी अनुराग चौधरी यांनी ही अभिनव कल्पना लढवली आहे. सध्याच्या घटकेला तेथे जवळपास २०हजार लोकांकडे बंदूक बाळगण्याचा परवाना आहे आणि नव्याने परवाना मागणारे दरमहा २०० अर्ज दाखल होतात.

ग्वाल्हेर आणि चंबळच्या विभागात बंदूक बाळगणं हा अतिशय प्रतिष्ठेचा विषय मानला जातो.

अनुराग चौधरी म्हणतात,

“हा नियम मला पावसाळा सुरू होण्यापूर्वी लागू करायचा आहे. ज्यामुळे लोक पर्यावरणाबाबत जागरुक होऊन वृक्षारोपण करण्यास पुढे येतील. जागतिक आरोग्य संघटनेने ग्वाल्हेर हे अत्यंत प्रदुषित शहरातील एक शहर म्हणून जी यादी प्रसिद्ध केली आहे त्या यादीत समाविष्ट केले आहे.

त्यांनी लोकांना सांगितले आहे, तुमच्या घराभोवती दहा झाडं लावा. समजा एखाद्या माणसाकडे जमिन नाही तर त्याला सरकारी जमिन दाखवली जाईल दर्यावर त्यानं वृक्षारोपण करावे आणि त्यावेळी फोटो काढून ठेवावा. त्याची नीट देखभाल करावी.

कोणतीही गोष्ट २१ दिवस सातत्याने करत राहिल्यास २२ वर्मा दिवशी तिची सवय होते. ३० दिवस झाडांची देखभाल करत राहिल्यास नक्की तो सवयीचा भाग बनेल आणि झाडं जोमाने वाढतील.

 

tree-plantation-inmarathi
wildrangers.in

 

त्यानंतर ३० दिवसांनी त्या झाडाच्या सद्यस्थिती सह फोटो काढून ते दोन्ही फोटो अर्जासह कार्यालयात जमा करावेत. हा पर्यावरणपूरक अभिनव उपक्रम आहे याची अनुराग चौधरी यांना खात्री आहे.

१० वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने ग्वाल्हेर आणि चंबळच्या विभागात असाच एक अभिनव उपक्रम राबविला होता. बंदूकीचा परवाना देण्यापूर्वी काही सामाजिक कामाची जबाबदारी त्या परवान्यासाठी ठेवली होती.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी ही अट त्या परवान्यासह ठेवली होती. त्याला ग्रामीण भागातील लोकांचा फार छान प्रतिसाद मिळाला. २०० पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया त्यावेळी डॉक्टरांनी केल्या होत्या.

गेल्या २० वर्षांत त्या भागात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेला कधीच मिळाला नव्हता इतका प्रतिसाद मिळाला होता.

यापासून प्रेरणा घेऊन अनुराग चौधरी यांनी ही अट ठेवली आहे. जर बंदुकीसाठी पुरुष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायला तयार होतात तर वृक्षारोपण करण्यास नक्कीच तयार होतील हा विश्वास अनुराग चौधरी यांना आहे.

मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे पोलिस रेकॉर्ड तपासून त्यांना परवाना कायदेशीर बाबी लक्षात घेऊन न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

revolver inmarathi
thehindu.com

एका अधिकाऱ्याने सांगितले,

“मागील वेळी बंदुकीचा परवाना न देण्याचा निर्णय आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांना फार त्रासदायक ठरला होता. लोकांनी त्यांच्यावर फसवल्यचा आरोप केला होता आणि कसलंही सहकार्य दिलं जाणार नाही असं सांगितलं होतं.”

पण, ही कल्पना किती वेगळी आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असणारा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, झाडांची होत असलेली कत्तल या सर्व आव्हानांना केवळ आणि केवळ वृक्षारोपणाचा उपायच तारु शकतो.

आज लोकं बंदुक हवी म्हणून झाड लावायचा शब्द देऊ शकतात पण हे काम कसलंही प्रलोभन, लालूच न दाखवता केवळ आपली पृथ्वी आणि पुढच्या पिढीला प्रदूषण रहीत पर्यावरण मिळावं यासाठी प्रत्येकाने करणं आवश्यक आहे.

खरंच जल है तो कल है… पण हे जल मिळावं यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करत राहणं महत्त्वाचं आहे.

त्या साखळीतला प्रमुख घटक वृक्ष आहे. तो लावा…जगवा तरच आपलं आयुष्य हिरवंगार होईल. नाहीतर पृथ्वी वाळवंटात बदलायला वेळ लागणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““बंदूक बाळगण्याचं लायसन्स पाहिजे? दहा झाडे लावा..!” – एक अभिनव उपक्रम

  • January 1, 2020 at 7:26 pm
    Permalink

    लेख वाचून समाधान झाल

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?