' फेब्रुवारी महिन्यात भटकंती करताय? मग ह्या ठिकाणांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे! – InMarathi

फेब्रुवारी महिन्यात भटकंती करताय? मग ह्या ठिकाणांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपण भारतीय लोक पर्यटनाच्या बाबतीत अत्यंत नशीबवान आहोत. कारण वर्षाच्या कुठल्याही महिन्यात फिरायला जाण्यासाठी आपल्याला बंदी नाही. आपण उन्हाळ्यात सुद्धा मनसोक्त फिरू शकतो आणि कडाक्याच्या थंडीतही पिकनिक ठरवू शकतो. पावसाळ्यात तर वर्षासहली असतातच!

उन्हाळ्यात फिरायला जायचे असेल तर उत्तर भारतातील थंड हवेची ठिकाणं आहेत आणि आपल्या शहरातल्या कडाक्याच्या थंडीला कंटाळून चार दिवस वेगळ्या वातावरणात जायचे असेल तर भरपूर मोठा समुद्रकिनारा आपल्याला मिळाला आहे.

ह्याशिवाय निसर्गसौंदर्याने नटलेली, ऐतिहासिक वारसा असलेली भरपूर ठिकाणे आपल्याला उपलब्ध आहेत.

आपल्याकडे अनेक लोकांना हिवाळ्यात फिरायला जायला आवडते. कारण उन्हाचा त्रास होत नाही आणि पावसामुळे ओले होण्याची चिंता नसते. फक्त थंडीसाठी अंगात स्वेटर अडकवले की हिवाळ्यात फिरणे सोपे होते म्हणूनच लोक हिवाळ्याचे चार महिने मस्त भटकंती करून घेतात.

 

tourist-inmarathi
india.com

आता जानेवारी महिना संपल्यात जमा आहे. थंडीचा कडाका हळूहळू कमी होत जाणार, शिशिर ऋतू संपून वसंताची चाहूल लागणार आणि वातावरण परत आल्हाददायक होणार.

फेब्रुवारी महिन्यात आपल्याकडच्या बहुतांश पर्यटनस्थळांचे वातावरण चांगले व आल्हाददायक असते.

उत्तर भारत, दक्षिण भारत , ईशान्य भारत आणि जवळ जवळ संपूर्ण देशातच सुंदर सुंदर ठिकाणे आहेत. उन्हाळा सुरु होण्याच्या आधी जर तुम्ही सहलीचा बेत आखणार असाल तर पुढील ठिकाणे ह्या दिवसात सहलीसाठी उत्तम आहेत.

१. गुलमर्ग

 

gulmarg-inmarathi
tourmeindia.com

तुम्हाला जर बर्फात मज्जा करायची असेल,थंडी अनुभवायची असेल तर काश्मीरसारखे दुसरे ठिकाण नाही. “मेडो ऑफ फ्लॉवर्स” म्हणून प्रसिद्ध असेलेले गुलमर्ग हे काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आहे.

ह्याच भागात आशियातील सर्वात मोठी केबल कार सर्व्हिस आहे. ह्या केबल कार मधून चौदा हजार फुटांवर जाऊन बर्फाची मजा अनुभवायला मिळते.

तुम्हाला जर बर्फात खेळण्यास आवडत असेल किंवा बर्फ पडतानाची मजा अनुभवायची असेल तर त्यासाठी फेब्रुवारी हा उत्तम काळ आहे.

ह्याठिकाणी तुम्हाला स्कीईंग, स्नोबोर्डिंग असे बर्फातले खेळ खेळता येतील. भारतातील स्वर्ग असेच ह्या ठिकाणचे वर्णन करता येईल. स्वित्झर्लण्डला तोडीस तोड असे हे ठिकाण आहे. पांढऱ्याशुभ्र बर्फाने आच्छादलेले डोंगर आणि सूर्यप्रकाशामुळे त्याचे बदलत जाणारे रंग बघायचे असतील तर ह्या ठिकाणी जायलाच हवे.

२) जैसलमेर

 

Jaisalmer fort1-marathipizza
flickr.com

तुमच्या शहरात कडाक्याची थंडी असेल आणि तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळे वातावरण अनुभवायचे असेल तर फेब्रुवारी महिन्यात तुम्ही जैसलमेरला जाऊ शकता. भारताचे सुवर्णशहर “गोल्डन सिटी ऑफ इंडिया” असे जैसलमेरला म्हटले जाते.

प्राचीन काळातल्या भव्यदिव्य इमारतींचे हे शहर आहे जे सुवर्ण इतिहासाची साक्ष देते. थार वाळवंटात वसलेले हे शहर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

पिवळ्या रंगाचे सोन्यासारखे दिसणारे वाळूचे खडक हे ह्या शहराचे आकर्षण आहे.

प्राचीन काळातील सुंदर हवेली, शाही महाल, रंगेबेरंगी बाजार ह्याने हे शहर नटलेले आहे. फेब्रुवारी महिन्यात येथे डेझर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. ह्या फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांना अस्सल ,पारंपरिक राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडते.

३. गोवा

 

goa-tourism-inmarathi
travelnewsdigest.in

ज्यांना समुद्राचे आकर्षण आहे आणि जे दिवसेंदिवस समुद्रकिनाऱ्यावर लाटा बघत घालवू शकतात अश्यांसाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. फेब्रुवारी महिना हा गोव्याला जाण्यासाठी उत्तम काळ आहे. फेब्रुवारी मध्ये इथले वातावरण आल्हाददायक असते.

कडाक्याची थंडी नाही की रणरणते ऊन नाही, निळेशार आकाश, त्याखाली अथांग निळाशार समुद्र, समुद्रावरून येणारी ताजी हवा आणि निसर्गाचे सुंदर रूप ह्यावेळी येथे अनुभवायला मिळते.

ह्याशिवाय गोव्याची खासियत असलेले कार्निव्हल बघायचे असेल तर फेब्रुवारी महिन्यात गोवा ट्रिप नक्की ठरवा.

दर वर्षी फेब्रुवारी महिन्यातच हे कार्निव्हल गोव्यात आयोजित केले जाते. हा पोर्तुगीज फेस्टिव्हल एकदा तरी नक्की बघावा. ह्यात पारंपरिक संगीत, नाच, मनोरंजन, नाटके आणि पारंपरिक गोवन जेवण ह्यांची रेलचेल असते. खरी गोवन संस्कृती बघायची असेल तर फेब्रुवारी महिन्यात ह्या कार्निव्हल दरम्यान गोव्याला जायला हवे.

४. कूर्ग

 

Coorg-Experiences-inmarathi
evolveback.com

कर्नाटक राज्यातील कूर्ग एक निसर्गरम्य ठिकाण आहे.निसर्गाने ह्या ठिकाणी मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे म्हणूनच कूर्गला भारताचे स्कॉटलँड म्हणतात.

भारत कॉफीचे सर्वाधिक उत्पादन ह्या ठिकाणी होते. कॉफीचे मळे, हिरव्यागार जंगले, त्या जंगलात दिसणारे सुंदर प्राणी व पक्षी हे सगळे शांत वातावरणात बघायचे असेल तर ह्या सिझनला कूर्ग नक्की बघण्यासारखे आहे.

ह्या हिल स्टेशनचे वातावरण सुद्धा आल्हाददायक असते. त्यात जर तापमान कमी झाल्याने पाऊस पडला तर शांत, हिरव्यागार वातावरणाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. इथले रस्ते सुद्धा चांगले आहेत त्यामुळे आजूबाजूचा परिसर फिरणे सोपे जाते.

५. अंदमान

 

andaman nikobar marathipizza
news18.com

सुंदर निळेशार पाणी ,पांढरीशुभ्र वाळू असलेले समुद्रकिनारे, हिरवीगार झाडे ह्यामुळे अंदमान स्वर्गाप्रमाणे सुंदर दिसते. इथे तर स्कुबा डायविंग करून समुद्राच्या आतील सौंदर्य सुद्धा बघता येते. स्नॉर्केलिंग आणि स्कुबा डायविंग करण्याचा सिझन फेब्रुवारी आहे.

ह्याच सीझनमध्ये तुम्हाला समुद्रातले कोरल रीफ (प्रवाळ) आणि रंगेबेरंगी मासे अगदी स्पष्ट बघायला मिळतील.

ह्याशिवाय इथले प्रसिद्ध सेल्युलर जेल, एलिफन्ट बीच, बॅरेन आयलँड, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियन म्युझियम ही इथली ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

ह्याशिवाय ईशान्य भारतातील थंड हवेचे ठिकाण दार्जिलिंग, केरळमधील कोचीन (कोची),थेकडी, उत्तराखण्ड मधील औली, मसुरी, राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, तामिळनाडू मधील उटी, कोडाईकनाल, गुजरात मधील कच्छ, पंजाब ,वाराणसी, दिल्ली, आग्रा, खजुराहो , जगन्नाथपुरी, कोणार्क, काझीरंगा अभयारण्य, दमण आणि दीव ही ठिकाणे सुद्धा बघण्यासारखी आहेत आणि फेब्रुवारीमध्ये इथले वातावरण चांगले असते.

 

rajasthan-tourism-inmarathi
zeenews.india.com

खरे तर ह्याच सीझनमध्ये मुंबई, कोकण आणि नाशिक येथे सुद्धा सुंदर वातावरण असते. त्यामुळे अगदी फार लांब जायचे नसेल तर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सुद्धा कमी दिवसाची सहल ठरवू शकता.

ह्या दिवसात सगळीकडेच वातावरण चांगले असल्याने तुम्ही कुठेही सहल ठरवू शकता. रोजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या आयुष्यातून लांब निसर्गाच्या सानिध्यात शांत ठिकाणी गेल्यास मन प्रफुल्लित होते आणि मनावरचा ताण हलका होतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?