' देव म्हणून कृष्णाला वेगळा न्याय आणि घरातील पुरुषाला वेगळा न्याय…..असा विरोधाभास का? – InMarathi

देव म्हणून कृष्णाला वेगळा न्याय आणि घरातील पुरुषाला वेगळा न्याय…..असा विरोधाभास का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

किती विरोधाभासाच्या धुरात जगत आहेत भारतातील लोक विशेषतः स्त्रीया….तरुण मुलामुलींचं प्रेम यांना खपत नाही, पण कृष्णाच्या प्रेमाचे गोडवे गातात. एकपेक्षा जास्त स्त्रीशी प्रेमसंबंध ठेवलेले मान्य नाहीत, पण या बाबतीत कृष्णाचं कौतुक करताना थकत नाहीत. आपल्या नवऱ्याशी कोणी दूसरी स्त्री बोललेलं, अगदी बघितलेलंही सहन न होणाऱ्या स्त्रिया, हजारो स्त्रीयांमधे हरवलेल्या कृष्णाची आरती करतात

प्रेमविवाह, मुली पळवून नेऊन लग्न करणं निषिद्ध आणि खूप मोठ्ठा गुन्हा समजल्या जाणाऱ्या समाजात या अश्या प्रेम आणि पळवापळवीमध्ये माहिर असणाऱ्या कृष्णाचे आदर्श बाळकडू सारखे पाजले जातात. एकपत्नीत्वाचा हिंदू धर्मनियम सर्वमान्य असतानाही कृष्णाचे बहूपत्नीत्व सहज मान्य करून घेतलं जातं. एकनिष्ठता ही भारतीय विवाहसंस्थेचा मूळ गाभा आणि आदर्श पतीची व्याख्या असतानाही स्त्रीया कृष्णाच्या रासलीला कौतुकाने गातात पण स्वत:च्या पतीला मात्र बंधनात ठेवायला विसरत नाहीत.

raslila-marathipizza
hindugodwallpaper.com

नवऱ्याची मैत्रिणही असू नये म्हणणाऱ्या स्त्रिया, लग्नानंतर रुक्मिणीवर अन्याय करत राधेशी विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या कृष्णप्रेमावर किती तो विश्वास! आणि तो विश्वास इतका की नवविवाहितांना लग्नाची भेट म्हणून राधाकृष्णाचे फोटो भेट देत, आजन्म सुखी आणि सोबत राहण्याचा आशिर्वादही देतात. म्हणजे लग्न भले रुक्मिणीशी कर, पण सोबत कायम राधेची कर….कारण प्रत्येक मंदिर आणि फोटोत कृष्णाने त्याच्या प्रेयसीला आणि विवाहबाह्य संबंधांनाच फक्त जागा दिली आहे आणि लग्नाच्या बायका बसतात इथे कृष्णाची पूजा करत आणि तो असतो त्याच्या प्रेयसीसोबत!

कित्ती सहज मुर्ख बनवलं जातं स्त्रीयांना, म्हणजे सगळ दिसत असूनही कळत नाही आणि कळालं तरी वळत नाही. स्त्रीयांनो एक विचार करा कोणत्या स्त्रीला आवडेल की तिचा नवरा तिला घरीच बसवून, सगळे दागिने आणि घरगुती भौतिक सुख देऊन प्रेयसीसोबत फिरतो सगळे अधिकार तिला देतो. आवडेल का कुणाला ?? कुठल्या आईला असं आवडेल का, की आपला मुलगा आपल्या लग्नाच्या सुनेला सोडून बाहेर दुसऱ्याच मुलीसोबत असतो मन आणि शरीरानेही??

पळून जाऊन लग्न करणं तर सोडाच पण मुलाला त्यांच्या आया इतकं धमकाऊन दबावाखाली ठेवतात की, मुलगा आपली आवडही घरी बोलून सांगू शकत नाही. जात ,धर्म, रुढी परंपराचे धोंडे पाठीवर लादत का त्यांचा कणा मोडून टाकता?? का कृष्णाचे धड़े गिरवुन घेता मुलांकडून जर त्यांना कथेतल्या कृष्णासारखं वागता येत नसेल तर…. तुम्हाला कृष्णाच्या प्रेमलीला रासलीला यात काहीच गैर वाटत नाही मग मुलाच्या आवडीनिवडीमध्ये का बर गैर वाटतं??

आणि कृष्णाला इतकं आदर्श मानताच, तर मग त्याने नात्यांमधे कधी न मानलेल्या जातीयवादामध्ये का अडकून पड़ता. कृष्णाचं हजारो स्त्रीयांनी गुरफट्लेलं प्रेम, रुक्मिणीला पळवून नेऊन तिच्याशी केलेलं लग्न आणि तरीही तिला घरीच सोडून आपलं खरं नातं (विवाहबाह्य) राधेशीच आहे हे जगजाहिरपणे मान्य करायला भाग पाडणारा तुम्हाला देव आणि आदर्श वाटतो. मग हेच सगळं जर तुमच्या नवऱ्याने किंवा मुलाने केलेलंही चाललं पाहिजे आणि जर चालत नाही तर मग तुमचा आदर्श पोकळ आहे आणि तुम्हीही ढोंगी आहात.

आता तुम्ही म्हणाल तो देव आहे त्याने काहीही केलेलं चालतं. असं कसं हो चालतं पण?? (नियम ते नियम ना सगळयाना सारखेच असले पाहिजेत.अधिकार आहेत म्हणून कुटुंबप्रमुखाने मर्यादा सोडून वागून चालत नाही.) आणि देव/दानव/मानव कोणी असो स्त्री-पुरुषसुलभ भावना एकच असणार आहेत. सामान्य स्त्री असो किंवा देवी तिला कधीच आपला पती दुसऱ्या स्त्रीसोबत वाटुन घ्यायला आवडत नाही.

तेव्हा विचार करा लग्नात भेट म्हणून राधाकृष्ण देणाऱ्यांनो त्यांच्या घरात कुठल्या सापाचं पिलू सोड्ताय ते आणि कृष्णलिलेचे कौतुक करणाऱ्या स्त्रीया आणि आयांनो तुम्हाला तुमचा पती, मुलगा कृष्ण झालेला चालतो का ते पण बघा कारण तुम्हीच तुमच्या घरी तुमचा कृष्ण घडवताय……!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Jyotie Thorwat

Electronics & Communication engr. B.A.(English Litrature) Dr- Naturopath PGD-HR

jyotie has 3 posts and counting.See all posts by jyotie

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?