पाकिस्तानचा कडेलोट जवळ – भारत यातून शिकतोय ना?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

डोह शांत, निश्चल असताना एकापाठोपाठ सलग दगड येऊन डोहातील पाण्यात धाडधाड कोसळावेत आणि डोहाची सगळी शांतता भंग करून टाकावी असे काहीसे शेजारच्या पाकिस्तानात मागच्या महिन्यात घडले होते. तीन दिवसात तिथे सलग आणि लागोपाठ आठ दहशतवादी हल्ले झाले होते, तेही देशाच्या चारही प्रांतात! त्यात विशेष म्हणजे या हल्ल्यामध्ये जबरदस्त नियोजन होते. यात सैन्य, न्यायधीश, व्यापारी, निमलष्करी दले, पोलीस, सर्वसामान्य लोक सर्वांना लक्ष्य करण्यात आले होते. शहाबाज कलंदरवरील हल्ला सगळ्यात जबरदस्त होता. 100 काहीतरी निरपराध माणसे यात निष्कारण मेली होती.

समाजातील प्रभावशाली लोक आपल्या फायद्यासाठी एखाद्या देशाची कशी वाट लावू शकतात? याचं पाकिस्तान हे मुर्तीमंत उदाहरण आहे . “हे काय चाललय आपल्या देशात?आपण कुठल्या दिशेला गेलो?कुठला आणि कशासाठी जिहाद करतोय?” हे एका पाकिस्तान्याने विचारलेले प्रश्न त्या समाजाच्या हताशपणाचे बिकट वास्तव मांडतात.

pakistan-bombblast-marathipizza
http://www.independent.co.uk

धर्माच्या धुंदीमध्ये वेगळा देश मिळविल्यानंतर तो टिकवायचा असेल तर त्याची धर्माची धुंदी उतरली नाहीतर जास्तच चढली पाहिजे, हे पाकिस्तानात प्रभावशाली व सत्ताकारणातील महत्वाच्या पदी असलेल्या लोकांच्या लगेचच लक्षात आले आणि त्यांनी मग या देशाला त्या रस्त्यावर लोटून दिले. धर्म या एकाच पायावर उभारण्यात आलेल्या या देशात मग सगळे काही धर्माला अनुसरूनच करण्याचा, असण्याचा अट्टाहास तेथील मुल्ला व मौलवी यांच्या कडून धरण्यात आला. हे करण्यासाठी सरकारी पातळीवरूनही प्रोत्साहन देण्यात आले होते.


2002 पर्यंत हे सगळे बीनबोभाटपणे सुरू होते. मुशर्रफ यांनी पहिल्यांदा याला चाप लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ब-याच दहशतवादी संघटनावर बंदी घातली, पण आतापर्यत या संघटनांची पाळेमुळे समाजात इतकी खोलवर रूजली होती की यांनी सरकारलाही जुमानले नाही. याला पाकिस्तानी सैन्यातील काही घटकांचे असलेले समर्थन हे पण हे कारण होते. यांच्या मदतीमुळेच या संघटनांनी मुशर्रफ यांच्यावरसुद्धा तीनवेळा जीवघेणा हल्ला केला होता. यातील एका हल्ल्यात पाकिस्तानी वायुसेनेचे काही अधिकारी दोषीही सिद्ध झाले आहेत. यावरून परिस्थितीची गंभीरता लक्षात येऊ शकेल. त्यातून हा देश अण्वस्त्र धारी असल्यामुळे, त्यातून सीमेशेजारीच असल्यामुळे भारताच्याही सुरक्षिततेला जबरदस्त धोका निर्माण झालेला आहे.

pakistan-jihad-marathipizza
http://www.dailymail.co.uk

एखादा जिहादी मानसिकतेचा जनरल यांचा नेता झाला आणि त्यांनी दहशतवादी यांना अण्वस्त्रे दिले तर? याच चिंतेमुळे ओबामा ,“मला पाकिस्तानमुळे रात्री झोप लागत नाही” असे म्हणाले होते. त्यातून टॅक्टिकल अण्वस्त्रे हा प्रकार या देशाने भारताच्या ‘कोल्ड स्टार्ट’ या सैन्य सिद्धांतास प्रत्यूत्तर म्हणून निर्माण केली आहेत. यातील सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या अण्वस्त्रांचे नियंत्रण युद्धभूमीवरील खालील रँकच्या अधिका-यांकडे असणार आहे. पाकिस्तानी सैन्यात जिहादी यांनी घुसखोरी केली आहे अशा आशयाचे अनेक अहवालही प्रसिद्ध झालेले आहेत. याचमुळे मागील महिन्यात CIA या अमेरिकन गुप्तहेर संस्थेचे इस्लामाबादमधील स्टेशनचीफ म्हणून काम केलेल्या अधिका-याने पाकिस्तानला अतिशय धोकादायक देश ठरवले आहे.

पाकिस्तानातील या संघर्षाला अजूनही एक किनार आहे. ती म्हणजे जिओसेक्टेरियन शिया-सुन्नी यांच्यातील संघर्षाची. शियाबहुल असलेले देश व सुन्नीबहुल असलेले देश यांच्या आपापसातील अविश्वासाने व यामुळे प्रत्येक देशातील आपल्या फिरक्याच्या संघटनेला दिलेल्या पाठबळामुळेही सर्व मुस्लीम देशात अस्वस्थता आहे. पाकिस्तानही याला अपवाद नाही. तिथेही इराण शिया तर सौदी सुन्नी संघटनांचे वित्तपोषण, प्रशिक्षण ही कामे करतो. पाकिस्तान हा सुन्नीबहुल असला तरी तिथे शियांची संख्याही लक्षणीय आहे. आता ताजा हल्ला हा एक सुफी पंरपरेचा वारसा सांगणाऱ्या धर्मस्थळावर करण्यात आला आहे. यापाठीमागे ISIS ही संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

isis-in-pakistan-marathipizza
http://en.europe-israel.org

पश्चिम आशियातील सलाफी इस्लामची परंपरा सांगणाऱ्या या संघटनेने दक्षिण आशियातील हनफी इस्लामची परंपरा सांगणाऱ्या स्थळावर हल्ला केला आहे. दक्षिण आशियातील हनफी इस्लाम हा सलाफीपेक्षा तुलनेने मवाळ व परधर्म सहिष्णू आहे. याचे उत्तम उदाहरण भारताचे देता येईल. जगातील तिसऱ्या क्रमांकाची मुस्लीम जनसंख्या भारतात शांततेने जगत आहे. यांना सलाफी इस्लामच्या नादाला लागण्यापासून रोखण्याचे आव्हान आता आपल्या समोर आहे. आता भारतातील मुस्लीम शांततेने राहत नाहीत. यासाठी केरळ, प.बंगालचे दाखले दिले जातीलच. पण यात तथ्य कमी आणि राजकीय प्रचारबाजी जास्त असल्याचे सहज लक्षात येते. उदाहरणार्थ अशी अनरेस्ट असलेले भाग आज लपून राहूच शकत नाहीत. तेथील वास्तव बाहेर आलेच असते. त्यामुळे सोशल माध्यमातील फेक फोटोशाॅपवर मेंदूपोषण झालेल्या मेंदूना किती गंभीरपणे घ्यावे? यालाही काही मर्यादा आहेतच.

धर्माचा वापर राजकारणासाठी केला तर काय होऊ शकते? याचा पाकिस्तान हा चांगला धडा आहे. आपण तो पाठ केला पाहिजे आणि त्यातून शिकलेही पाहिजे. जोपर्यंत भारत धर्मनिरपेक्ष आहे तोपर्यंत भारताचे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही आणि म्हणूनच या धर्मनिरपेक्षतेला नख लावणाऱ्या कृतींचा आपण जमेल तिथे जमेल तसा सडकून विरोध केलाच पाहिजेत. पण याचा अर्थ धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली दहशतवादी यांचे केले जाणारे समर्थन कदापि खपवून घेतले नाही पाहिजे.

जगा आणि जगू द्या हे आपल तत्त्व जो यानुसार वागण्याची हमी देतील त्यांनाच लागू असले पाहिजे. ज्यांना शस्त्राची भाषा समजते त्यांना तसेच समजावून सांगितले पाहिजे. तरच येथून पुढे भारतात शांतता नांदेल..!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 30 posts and counting.See all posts by shivraj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *