' पद्मावत चित्रपट समीक्षा : एवढी बोम्बाबोम्ब होणं योग्य आहे का? – InMarathi

पद्मावत चित्रपट समीक्षा : एवढी बोम्बाबोम्ब होणं योग्य आहे का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

खरा इतिहास काय आहे? अशा चित्रपटांमधून इतिहासची ओळख किंवा विद्रुपीकरण होतं का? चित्रपटासाठी भन्साळी ला किती त्रास सहन करावा लागला? सेन्सॉर ने सांगितलेल्या कट्स मध्ये महत्वाचे सिन तर गेले नसतील ना? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय? अशा सगळ्या राजकीय वादातून निर्माण झालेल्या प्रश्नांना बाजूला ठेऊन फायनली आपल्या हातात आलेला १६३ मिनिटांचा “पद्मावत”, “चित्रपट” म्हणून कसा आहे हे बघुयात.

 

padmavat-inmarathi05
indiatimes.com

गावातल्या फोटो वाल्यांना फोटोशॉप नावाचं ऍप खूप चांगलं हाताळता येतं. मग ते एखाद्या काळ्या माणसालाही एडिट करून पार गोरचं करून टाकतात. बस्स तेच संजय लीला भन्साळीने इथं केलंय.

भव्य सेट्स, भारदस्त संवाद आणि लाऊड पार्श्वसंगीताचा वापर करून एका जेमतेम पटकथेला रोमांचक धर्मयुद्ध करून टाकलंय. भव्यदिव्य सेट्स उभा करून त्या परिस्थितीचे अचूक बारकाव्यांसह चित्रण करण्यासाठी भन्साळी प्रसिद्ध आहेत.

यावेळीही त्यांनी या क्षमतेचा अचूक वापर केलाय. चित्तोडगढ असू देत किंवा वाळवंटातील तंबू. प्रत्येक दृश्य, प्रत्येक फ्रेम हौशीने सजवल्या सारखी वाटते.

“I live like a common man, but when I make films, I make them like a King”

असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.

 

sanjay-bhansali-inmarathi
hindustantimes.com

त्या ऐतिहासिक काळाचा अनुभव भन्साळीच्या चित्रपटात आल्याशिवाय राहत नाही. या रंगांच्या वापराला, सगळ्या ठेवणीला चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात ‘mise en scene’ असं नाव आहे. हे कौशल्य त्यांना चांगलं जमलय. पण चित्रपट म्हणजे लिहिलेल्या कथेचं दृकश्राव्य प्रदर्शन, मूळ पटकथाच तगडी नसेल तर चांगल्या प्रदर्शनाचा फायदा होत नाही.

सुफी संत मलिक मुहम्मद जयासी यांच्या पद्मावत या कवितेवर आधारित या चित्रपटाची मूळ गोष्ट एव्हाना सगळ्यांनाच माहिती झाली आहे. मेवार चे राजा रतनसिंग (शाहिद कपूर) यांचे लग्न पद्मावती (दीपिका पदुकोण) या राजकन्येशी होतं. अल्लाउद्दीन खिलजी (रणवीर सिंह) पर्यंत पद्मावती च्या सौंदर्याची गाथा पोहोचते आणि तिला जिंकण्यासाठी तो मेवार वर हल्ला करतो.

राजपुत हरणार हे कळाल्यानंतर पद्मावती राणी जोहर करते, आगीत उडी घेते.

 

Deepika-Padukone-Padmavati-inmarathi
siasat.com

– अशी साधारण रूपरेषा आपल्याला ट्रेलर मधून कळाली होती. मजा ही, की खरंतर गोष्ट एवढीच आहे. याउपर आपल्याला चकित करील असं फारसं काहीच कथेत नाही. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी कथेत आवश्यक असणारे सरप्रायजिंग फॅक्टर (उदा. कट्टपा ने बाहुबली को क्यू मारा), पटकथेची खोली या गोष्टीच नाहीत.

चित्रपटातील मुख्य तीनही पात्रं खोलवर, सविस्तर लिहिलीच गेली नाहीत. त्यातल्या त्यात दीपिकाच्या पात्राला पसरायला तुलनेने जास्त मोठा कॅनव्हास होता. रणवीर सिंघच्या खिलजीच्या पात्राची “क्रूरता”, आणि शाहिदच्या रतनसिंह पात्रातील “राजपुतांचा तत्वनिष्ठपणा” एवढंच काय ते लिहिलं गेलं असेल.

“Layers of characters” म्हणतात ते दिसलं नाही. यामुळे ही पात्रे आपल्याला धरून ठेऊ शकत नाहीत. त्यांच्या हावभाव, प्रतिक्रियांची पुनरावृत्ती होत राहते. जशी कथा पुढे सरकते तसं फक्त संभाषण करत राहणंच त्यांच्या हातात राहतं.

अभिनेता कितीही चांगला असला तरी त्याला करायला काहीच नसेल तर ती भूमिका मृत वाटते, तेच झालंय.

रणवीर सिंह चा अभिनय म्हणजे चित्रपटातला महत्वाचा भाग. अफगाण मधून भारतात आलेला खिलजी, बादशाहला मारून सुलताने हिंद झालेल्या, पराक्रमी, क्रूर, अल्लाउद्दीनचं पात्र रणवीरने समर्पकरित्या साकारलंय. रणवीर त्याच्या अभिनयातील ऊर्जेसाठी प्रसिद्ध आहे, पण यावेळेस त्याने अभिनयात जास्तीची ऊर्जा न भरण्याचा संयम बाळगलाय. त्यामुळे ही भूमिका चांगलीच रंगली.

 

padmavati-khilji-inmarathi
hindi.bloggerpile.com

बाकी मान खाली करून, भुवया एकवटून, डोळे मोठे करत रागीट लूक देण्यासारखे प्रकार अपेक्षित होतेच. शाहिद कपूर हा ताकदीचा अभिनेता आहे. पण पात्र तितकंस लिहिलं न गेल्याने त्याच्या वाटेला येईल तितकाच भाग त्याने छान केलाय. संपूर्णवेळ भारदस्त राजपूत सन्मानाचे संवाद फेकायचे सोडून त्याच्या वाट्याला काहीच नव्हतं. दीपिकाला मात्र अभिनयासाठी भरपूर जागा होत्या. एक स्वाभिमानी, चतुर, राजपुत राणी तिने चांगली साकारली. काही प्रसंगी मात्र तिने अपेक्षाभंग केला असं म्हणावं लागतं.

कदाचित राजपूत सन्मानाच्या ओझ्याखाली मृत्यूपूर्व दुःखाची किंवा नवरा मारला गेल्याची वार्ता ऐकून कोसळायचं नाही, या तर्काने तिच्या अभिनयात सरसकटपणा आला असेल.

अदिती राव हैदरी ने खिलजीच्या बायकोचा, मेहरूंनीसाचा अभिनय छान केलाय. ज्याची जास्त चर्चा होतेय तो जिम सर्भ त्याने मल्लिक काफुरचं पात्रं साकारलय, तो खिलजीचा खास असतो. त्याचा अभिनयही चांगला झालाय. कास्टिंगच्या बाबतीत भन्साळी यावेळेस जरा चुकलेले वाटतात. दीपिका आणि अदिती हैदर एका दृश्यात सोबत येतात तेव्हा अदिती जास्त सुंदर वाटते.

 

adti-rao-padmavati-inmarathi
thestatesman.com

शाहिद कपूर ऐवजी दुसरा एखादा उंचापुरा अभिनेता खिलजी सोबत युद्ध करायला जास्त शोभला असता (मुळातच हे पात्रं खिलजीपेक्षा कमकुवत दाखवायचा उद्देश ठेवला असेल तर तो राजपूत म्हणून शोभणीय झाला नाही)

‎सिनेमॅटोग्राफर सुदीप चॅटर्जी यांचं काम अफलातून झालं आहे. बाजीराव मस्तानी प्रमाणे याही वेळेस त्यांनी कॅमेऱ्यातून अचूक गोष्टी हेरल्यात. सेट्सची भव्यता, युद्धाचे प्रसंग, जोहर करतानाच्या फ्रेम्स आणि बरच काही. या चित्रपटाच्या बाबतीत पार्श्वसंगीतानेच खरंतर समोर होणाऱ्या गोष्टींतील भावना कळतात, संगीतच बऱ्याच गोष्टींवर पांघरून घालतं. पण कथानकाची गराज नसताना येणारी गाणी कथेत अडथळा आणत राहतात. संगीत स्वतः भन्साळींनी दिलय. संगीत चांगलं आहे, कथेला शोभतं पण बऱ्याच जागी अतिवापर झालाय.

म्हणजे खिलजी रोमँटिक मुड मध्ये आला की संगीत सुरू होतं. तिथून बाहेर पडल्या नंतर लगेच युद्धाचं संगीत सुरू होतं. प्रत्येक भावना सांगायला संगीताच्या कुबड्या घेतल्या जातात.

शेवटच्या जोहरच्या सिनच्यावेळेस मात्र संगीताचा योग्य वापर झालाय. वेशभूषा आणि मेकअप अप्रतिम जमलंय. कला दिग्दर्शकांचीही मेहनत स्पष्टपणे जाणवते. त्या काळच्या दागिन्यांपासून, कलाकुसरीच्या वस्तू, भांडी, भिंतीचित्र, शस्त्र, सगळं प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाण्यासाठी मदत करतं. या क्षेत्रात पैकीच्या पैकी गुण देता येतील.

 

shahid-deepika-padmavati-photo-inmarathi
ibnlive.in

बाकी तांत्रिक क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात गोष्टी बदलत राहतात, कधी चांगल्या होतात कधी वाईट. पण भन्साळी म्हणून काही गोष्टी प्रत्येक सिनेमात पुनरावृत्त होत राहतात. क्लोजअप शॉट्सचा भडीमार ही त्यातली पहिली गोष्ट. सगळे छोटे छोटे शॉट्स. एकही लॉंग टेक नाही. पात्रांचे फक्त चेहरे एका नंतर एक संवाद करताना बदलत असतात. अभिनयाच्या कौशल्याला यामुळे वावच उरत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे स्लो मोशन. देवदास मध्ये शेवटच्या सिनला ऐश्वर्या स्लो मोशनमध्ये पळत असते, बाजीराव मस्तानीत बाजीराव स्लो मोशन मध्ये चालतो, पद्मावत मध्ये तर संपूर्ण चित्रपटभर पात्रं स्लो मोशन मध्ये असतात.

प्रत्येक हातवारे तसेच हळुवार मंद संगीतासोबत वेळ खात असतात. शेवटच्या सीनमध्ये तर खिलजी पद्मवतीला पकडायला स्लो मोशन मध्ये पळतोय आणि पद्मवती अग्निकुंडाकडे स्लो मोशन मध्ये चालतीए, खिलजी-पद्मावती-खिलजी-पद्मावती, बस्स ह्याच फ्रेम २ मिनिट रिपीट होत राहतात.

पण सेटची भव्यता, लाईट, वेशभूषा, सिनेमॅटोग्राफी आणि संगीत यांच्या संयमी एकत्रिकरणाने सगळ्या चुका झाकल्या जातात आणि म्हणून शेवटी दीपिकाचा जोहर करतानाच्या क्लोजअप शॉट ने आत्मदहनाचा तो प्रसंग आंगावर येतो, परिणामकारक ठरतो.

तर शौर्याच्या, स्वाभिमानाच्या ‎ऐतिहासिक कथेची वाईट पटकथा तांत्रिक कौशल्यातून दोष लपवत भव्यतेने दाखवली गेली, अशा पद्मावतला मी देतोय पाच पैकी दोन स्टार.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?