' ट्रकशी जिव्हाळ्याचं नातं असलेल्या “Horn OK Please” या शब्दप्रयोगाची रंजक जन्मकथा नक्की वाचा – InMarathi

ट्रकशी जिव्हाळ्याचं नातं असलेल्या “Horn OK Please” या शब्दप्रयोगाची रंजक जन्मकथा नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कधी रस्त्यावर ट्रक नजरेसमोरून गेला की त्या ट्रक मागे लिहिलेला Horn OK Please हा शब्द हमखास आपलं लक्ष वेधून घेतो, आणि जन्मापासून हा शब्द नजरेस पडत असल्यामुळे आपण देखील दिसल्या दिसल्या नकळत तो मनातल्या मनात वाचतो देखील!

केवळ ट्रकच नाही तर ट्रान्सपोर्टच्या अनेक गाड्यांवर सर्रास हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का, “या शब्दाचा नेमक उगम कसा झाला?”

चला तर आज जाणून घेऊया या कोड्या मागचं कोणालाच माहित नसलेलं उत्तर!

 

horn-ok-please-marathipizza

 

तत्पूर्वी जाणून घेऊ या या शब्दामागचा सर्वमान्य समज/अर्थ

त्या शब्दामध्ये OK हा शब्द अधिक मोठा आणि ठळक शब्दांत लिहिलेला आढळतो. कारण मागील वाहनाने समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे असे त्यांना सांगायचे असते.

Horn व Please हे शब्द लहान अक्षरांत असतात. मागील गाडी अधिक जवळ आल्यास त्यांना ते शब्द दिसावेत आणि त्यांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याची वाट मागावी – असा सामान्य संकेत ह्यातून दिसतो.

आता जाणून घेऊ या याचा उगम कसा झाला.

ह्या शब्दप्रयोगच्या उगमाची ३ वेगवेगळी कारणं सांगितली जातात.

पहिला दावा असं सांगतो की, ‘Horn OK Please’ ही टाटा कंपनीमार्फत चालवली गेलेली एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती – जी त्यांनी त्यांच्या OK या साबणाच्या प्रसारासाठी राबवली होती.

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळी ट्रक इंडस्ट्रीमध्ये केवळ टाटा कंपनीचे वर्चस्व होते. त्यामुळे कंपनीने आपल्या नव्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी याच ट्रकचा मुव्हिंग होर्डींग्ज म्हणून वापर करण्याचे ठरवले.

त्या काळचा टाटा कंपनीने सदर केलेल्या नव्या साबणाच्या प्रोडक्टचा लोगो म्हणजे कमळाच्या फुलाचे चित्र होते आणि आजही बहुसंख्य ट्रक्स वर OK शब्दाच्या वरती कमळाच्या फुलाचे चित्र असलेला हा लोगो आढळून येतो.

 

horn-ok-please-marathipizza01

 

परंतु दुसरा दावा असे सांगतो की, पूर्वीच्या काळी सर्वच रस्ते हे सिंगल लेनचे होते, ज्यावरून ओव्हरटेक करणे सोपे नसायचे.

तेव्हाच्या ट्रक्सना रियर मिरर व्हूज देखील नसल्यामुळे मागून एखादी लहान गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असेल, तर ते देखील कळायला मार्ग नसायचा. परिणामी अपघात होण्याची शक्यता असायची.

त्यामुळे एक नवीन शक्कल लढवण्यात आली ती म्हणजे ‘Horn Please’ हे दोन शब्द लिहिण्यात आले. दोन्हींच्या मधे “OK” लिहून या शब्दाभोवती बल्ब लावला जायचा.

म्हणजे –

मागून येणाऱ्या गाडीने Horn Please! ह्या विनंती नुसार हॉर्न वाजवायचा.

ट्रक ड्रायव्हरने OK शब्दावरील बल्ब पेटवून त्याला सिग्नल द्यायचा की “पुढचा रोड क्लियर आहे”.

हळूहळू मल्टीलेनचे रोड्स तयार होऊ लागले आणि बल्ब सिग्नल सिस्टम गायब झाली. पण ‘Horn OK Please’ हा शब्द मात्र तसाच राहिला.

तिसराही एक दावा केला जातो ज्यात थेट दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ येतो.

 

third-world-war-marathipizza

 

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंधनाची कमतरता असल्याने ट्रक्स केरोसीन वर चालवले जायचे, पण त्यात असा धोका होता की लहानश्या अपघाताने देखील ट्रकचा स्फोट व्हायचा.

त्यामुळे सावधानी बाळगण्यासाठी ट्रक्सच्या मागे ‘On Kerosene’ असे लिहिले जायचे, म्हणजे मागू येणाऱ्या गाड्या उगाच ओव्हरटेक करण्याची घाई करणार नाहीत आणि मोठा अपघात होणार नाही.

पुढे ‘On Kerosene’ चे संक्षिप्त रूप म्हणजे OK ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिले जाऊ लागले आणि सोबतच सिग्नल म्हणून Horn Please देखील लिहिण्यास सुरुवात झाली.

 

horn-ok-please-marathipizza02
arpin.in

 

या तीन पैकी टाटा कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिचा दावा हा सर्वमान्य मनाला जातो. इतर दावे त्यापुढे दुबळे ठरतात. पण अजूनही हा गमतीशीर शब्दप्रयोग आला कुठून हे खात्रीशीर रित्या स्पष्ट झालेले नाही.

असो, ते काही का असेना.

Horn OK Please या शब्दने आजही वाहतुकीची शिस्त शाबूत आहे हे मान्य करावे लागेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?