‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण: सुरेश भटांचे दिव्यार्थी गाणे: मालवून टाक दीप

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


टीप: प्रस्तुत लेखाचा विषय तुम्हाला अश्लील वाटू शकतो.

===

मराठी रसिक म्हणून मिरवण्यासाठी पू ल-व पु ,मिसळ -पुरण पोळी, ढोल-लावणी अश्या ज्या काही नित्य गोष्टी आहेत, त्यात सुरेश भट आणि लता मंगेशकर ह्यांची नावे बहुतेकांच्या यादीत असतील. हृदयनाथ मंगेशकर आणि भट साहेब ह्यांनी काही अजरामर गीते आपल्याला स्वरबद्ध करून ठेवा म्हणून दिलेली आहेत. मालवून टाक दीप हे त्यातील एक जरा कमी प्रसिद्ध पण रसिकप्रिय गाणे आहे.

suresh-bhat-lata-mangeshkar-marathipizza

राग भूपेश्वरी/भुवनेश्वरी ह्यातील हे गाणे म्हणजे खूप लोकांसाठी डी-स्ट्रेसर आहे. ह्याच रागातील दुसरे प्रसिद्ध गाणे म्हणजे मेहंंदी हसन आणि फराज  ह्यांचे अबके हम बिछडे …!

हसन ह्यांची गजल थोडी उसळती रोमँटीक आहे. त्या मानाने मालवून टाक दीप हे आईने  गायलेल्या अंगाई सारखे एखाद्याला झोपी घालेल असेच आहे. अभद्रायण मालिकेत ह्याचा समावेश कुणालाही आश्चर्यकारक वाटेल. मुळात भटांची कविता आणि त्यातील प्रणय हा श्लील -अश्लीलतेच्या बंधनाच्या पलीकडे असतो. तो दादा कोंडके प्रकारचा द्विअर्थी तर नसतोच नसतो, पण भट ह्यांनी मांडलेला उत्कट प्रणय त्यातील अधीरता, अगतिकता ह्यांचे कंप सर्वांपर्यंत पोचतील असे नाही. म्हणून द्विअर्थी ह्याच्या सात्विक वळणाने आपण ह्या गाण्यातील कामआशय आणि प्रणय प्रतीके हयंचा आस्वाद घेऊयात.

मालवून टाक दीप,चेतवून अंगअंग
राजसा, किती दिसांत लाभला निवांत संग

ओपनिंग ball ला सेन्चुरी मारणे असा काही प्रकार असता, तर ह्या गीताचे हे पहिले कडवे/पद आशयगर्भ आहे हे सांगणे सोपे झाले असते. तर, नायक आणि नायिका बऱ्याच दिवसांनी भेटलेले नाहीत आणि शेवटी एकदाची त्याची भेट एकांतात झाली, असा अर्थ ह्या दोन ओळीतून होतो. मग ती काय म्हणते आपल्या राजसाला…”माझे अंगअंग चेतव आणि हा दिवा मालवून टाक”.


पण हे सांगतांना भटांनी वापरलेले शब्द बघता वेगळीच कमाल होते. पेटव ह्या शब्दात एक थेटपण आहे. त्या उलट चेतवणे हे हळूहळू सुरु होऊन, मग उत्कर्षाला लागणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अंग अंग चेतवून टाक, हे मागणे नसून ते आवाहन आहे. कितीतरी दिवसात मिळालेला हा निवांत संग आहे. त्यातही तो मिळालेला नसून लाभलेला आहे!

गाण्याच्या चालीवरून हा कुठल्या तरी ऐतिहासिक चित्रपटातील सीन असेल असे वाटेल एखाद्याला. पण भटांची इतर गीते बघितली असता, अगदी छोट्या घरातील बिऱ्हाड किंवा व्यस्तता ह्या मुळे कधी न मिळणारा असा हा निवांत क्षण आहे. मग निवांत संग असे म्हणताना नायिका तिच्या मनसोक्त-तृप्तीची आकांक्षा व्यक्त करते हे लक्षात येते आणि त्याचे आवाहन ती अंग अंग चेतवून टाक असे करते. त्यामुळे मग…मालवून टाक दीप ह्याचा अर्थ इथे पार बदलून जातो. अजाण किती दिवसांनतर आलेला हा निवांत संग आणि त्यात पेटून निघण्याची मनीषा असल्याने, आशेचा हा आजपर्यंत पेटता अंतरीचा अव्यक्त दिवा, मला पेटवून तू मालवून टाक असे ते मागणे आहे.

नायिकेने केलेली तृप्तीची ही मागणी जितकी उत्कट आहे तितकीच ती थेट पण आहे. खरेतर ह्या दोन ओळी ह्या गीताचे सार म्हणावे अश्या आहेत.

पुढे,

त्या तिथे फुलाफुलात ,पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्‍नभंग

निवांत संगाची ही रात्र सुरु होऊन जरी बराच वेळ झालेला असला तरी, रात्र अजून संपायची आहे. आतापर्यंत झालेल्या प्रणयाचे सूचक मेन्शन भट इथे करतात, पण त्याच सोबत पेंगत असलेली रात्र ,अजून कितीत तरी वेळ आणि कितीतरी प्रणय-आकांक्षा शिल्लक असल्याचे सांगून नायिका “….इतक्यात थांबू नको…माझ्या मनात जपून ठेवलेला संग होऊ दे …माझा स्वप्नभंग करू नको” असे म्हणते. स्त्रियांची हमी लपवून ठेवली गेलेली कामईच्छा अगदी सरळ सरळ ती बोलून जाते.

गारगार या हवेत, घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग

आणि तोच धागा पुढे घेऊन, मला कवेत घे आणि कुठलीही मर्यादा ,संकोच बाळगू नको आणि प्रणयाची ती सीमा गाठ, जिथे तुझे दृश रूप जाऊन तुझे अंतरंग व्यक्त होईल, ते अंतरंग मला कवेत घेऊन माझ्याकडे मोकळे कर… क्लायमक्स इतक्या हळुवार पणे पण लिहिता येतो ह्याचा पाठच भटांनी आपल्याला इथे दिलेला आहे

दूरदूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एकएक रूपरंग


मग तृप्तीकडे जात असलेल्या ह्या संगात कितीतरी क्रीडा झालेल्या आहेत, किती तरी वेळ गेलेला आहे. इतका कि आता रात्र जाऊन तिकडे तारकात पहाट न्हात बसलेली आहे, ती येईल इतक्यात. पण त्याची चिंता करू नको आणि लहान मोठे, जड सूक्ष्म असे जे काही अजूनही आपल्यात उरलेले असेल, शिल्लक असेल…ते सुद्धा टिपून घे.

हे तुला कसे कळेल ? कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?

दीर्घ काळ अतृप्ती बाळगणाऱ्या ह्या नायिकेला अविश्वास आणि खात्री ह्यांच्या पलीकडील संपूर्णता पाहिजे आहे, ते ती आत्ताच बोलली आहे. पण हे सगळे मागताना, वेचताना आणि सामावून घेताना तिला झालेल्या त्रासाची,आत्तापर्यंतची कळ ती बोलून जाते आणि पतंग आणि दिवा दोन्ही एक होताना दोघांचे अस्तित्व सारख्याच प्रकारे नष्ट होते , एकरूपतेची ती वेदना ती बोलून जाते!

काय हा तुझाच श्वास ? दर्वळे इथे सुवास !
बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग !

आणि हे सगळे झालेले असताना म्हणजे, शंकेपलीकडील तृप्ती आणि जाणीवे पलीकडील एकरूपता तिला आता मिळालेली आहे. तिचे मन हेच आता नाहीसे झालेले आहे, इतके की आता एकमेकांचा श्वास इतकेच त्यांचे अस्तित्व शिल्लक आहे. आपल्या कडे चर्चा होत नाही पण केलेला, घडलेला आणि व्यक्त झालेला संगही क्रीडेनंतरच्या अवस्थतून कळते. त्यात काळ, स्थिती आणि अस्तित्वाचे भान नसणे अशी एकरूपता महान समजली जाते आणि ही एकरूपता सुगंध बनून दरवळते आहे.

शारीरिक संग झाल्यावर सुद्धा विलग न होण्या इतके उदात्त प्रेम तिला मिळाले आहे. विश्वास बसू नये अशी स्वप्नपूर्ती आणि त्या एकरुपात, त्या भावरुपात ती म्हणते, “खूप हळू बोल नाही तर स्तब्ध अश्या चांदण्यांवर तरंग उठतील …” पण हे चांदणे वैश्विक नसून ..तिच्या अंतरातील रिकामे पण सारून, तिला सर्वांग व्यापून असलेले भावसमाधी चे चांदणे आहे आणि ते चांदणे…हा संग ..इथून पुढे असेच कायम राहो…त्यावर हलके देखील तरंग उमटू नये… may this moment be the forever असे ती आणि भट बोलून जातात ………!

मालवून टाक दीप या गीताचा तुम्ही येथे आस्वाद घेऊ शकता:

(अभद्रायण मालिकेचा या पूर्वीचा भाग देखील वाचा: ‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण :- कद्दू कटेगा तो सब मे बटेगा!)


InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
One thought on “‘डबल मिनिंग’ गाण्यांचं अभद्रायण: सुरेश भटांचे दिव्यार्थी गाणे: मालवून टाक दीप

  • April 7, 2018 at 9:45 am
    Permalink

    सुंदर!धन्यवाद!☺

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?