' धोनीला न्यूझीलंडचा कॅप्टन म्हणतोय “देश बदल, आमच्यात सामील हो!” – InMarathi

धोनीला न्यूझीलंडचा कॅप्टन म्हणतोय “देश बदल, आमच्यात सामील हो!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

काल झालेल्या भारत न्यूझीलंड सामन्यात भारताचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. कालच्या सामन्यात आपली टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळली आणि मधल्या फळीचा तर आपला प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

कालच्या सामन्यात चवथ्या क्रमांकाचा व एकूणच मधल्या फळीचा प्रश्न प्रकर्षाने उजेडात आला. रोहित, राहुल, विराट, हार्दिक, कार्तिक, पंत ह्या सगळ्यांनाच न्यूझीलंडच्या भेदक माऱ्याचा सामना करणे जमले नाही.

हे सगळे कालच्या सामन्यात पटापट तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजाने सुंदर आणि संयमी खेळी करत भारताला दारुण पराभवातून खेचून बाहेर आणले आणि त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चांगली साथ दिली.

जडेजा बाद झाल्यानंतर सुद्धा जोवर धोनी खेळत होता तोवर भारत जिंकेल ही आशा कायम होती.

पण गप्टिलच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे धोनी धावचीत झाला आणि भारताच्या उरल्यासुरल्या आशांना सुरुंग लागला. ह्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघाने खरंच उत्तम खेळाचे प्रदर्शन केले होते.

 

indian cricket team inmarathi
Yahoo Cricket

आपले खेळाडू मध्येमध्ये थोडे चाचपडत होते पण एकूण आपल्या संघाने शेवटपर्यंत चांगली लढत दिली. रोहित, राहुल, विराट, बुमराह ह्यांचा खेळ खरंच छान झाला ह्यात वादच नाही. पण लोकांनी महेंद्रसिंह धोनीला मात्र नावे ठेवण्यात कसूर केली नाही.

धोनीने आता निवृत्ती घ्यावी, त्याचा खेळ बिघडलाय, तो फारच हळू खेळतोय अशी मते व्यक्त करत लोकांनी एकेकाळी आपल्याला प्रचंड यश मिळवून दिलेल्या धोनीची असामान्य कारकीर्द विसरून त्याला यथेच्छ ट्रोल केले.

काल धोनी मैदानावरच येताना खालच्या क्रमांकावर आला. इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तेव्हा प्रेशर घेऊन, संयमी खेळी करून त्याने आपल्याला सामने जिंकून दिले आहेत.

पण तेव्हा त्याला इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली नाही. काल त्याला फलंदाजीसाठी इतके शेवटी शेवटी का पाठवले हे एक कोडेच आहे.

त्याही साठी त्याला लोकांनी लगेच नावे ठेवली. पण हा फलंदाजीला केव्हा यायचे हा निर्णय आता धोनी घेत नाही. तो निर्णय कर्णधार आणि मॅनेजमेंट घेते. काल माहीला इतक्या शेवटी शेवटी पाठवले ह्यात त्याची चूक नाही.

 

ms dhoni inmarathi
crickbuzz.com

तरीही जडेजा एका बाजूने संघाची अवस्था सावरत असताना त्याला चांगली साथ दिली. जडेजा जेव्हा धावा काढत होता तेव्हा दुसऱ्या बाजूने खिंड लढवत ठेवणे अत्यंत आवश्यक होते ते काम काल धोनीने केले.

त्याने संघाची एक बाजू भक्कमपणे सावरून ठेवली. नाहीतर आपल्याला अत्यंत दारुण पराभव स्वीकारावा लागला असता.

आपल्या देशात खेळाडू चांगला खेळला तर लोक त्याला लगेच डोक्यावर बसवतात. पण एखादा दिवसच आपला नसतो, त्यावेळी जर पराभवाचा सामना करावा लागला तर लगेच त्याच डोक्यावर घेतलेल्या खेळाडूला नावे ठेवण्याची घाई सुद्धा असे बालिश चाहते करतात.

धोनीचे यष्टिरक्षण, त्याचा अनुभव, त्याची फलंदाजी आपल्याकडची माणसे विसरली असली तरीही प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना मात्र आजही धोनीच्या क्षमतेविषयी शंका वाटत नाही.

ह्यावरून आपल्या लोकांनी धडा घेतला पाहिजे. सगळेच दिवस सारखे नसतात. घरात बसून मोठं मोठ्या गप्पा मारणे सोपे आहे पण प्रत्यक्षात मैदानावर जेव्हा इतके टेन्शन असते तेव्हा शांतपणे खेळणे किती अवघड असते हे लोकांच्या लक्षातच येत नाही.

ज्यावेळी आपल्याच देशातील लोक, अगदी माजी खेळाडू सुद्धा धोनीचा इतिहास विसरून त्याला नावे ठेवत आहेत, त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू मात्र धोनीची बाजू घेतोय. त्याचे कौतुक करतोय.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ह्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची बाजू घेत टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे.

 

 

धोनीने अतिशय संथ फलंदाजी केली म्हणून आपण हरलो असे म्हणणाऱ्यांना केन विलियम्सनने टोमणा लगावला आहे. न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली.

सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी धोनीच्या खेळाविषयी विराट आणि विलियम्सन ह्या दोघांनाही प्रश्न विचारले. एका पत्रकाराने विलियम्सनला विचारले की जर तो भारताचा कर्णधार असता तर त्याने धोनीला संघात घेतले असते का?

ह्यावर विलियम्सनने हसून उत्तर दिले की धोनी न्यूझीलंड कडून खेळू शकत नाही पण तो एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे.

त्या पत्रकाराचे ह्या उत्तराने समाधान झाले नाही. म्हणून त्याने विलियम्सनला परत तोच प्रश्न विचारला की तुम्ही भारताचे कर्णधार असतात तर काय केले असते?

त्यावर विलियम्सनने उत्तर दिले की अर्थातच त्याने धोनीला संघात घेतलेच असते. कारण धोनीचा अनुभव मोक्याच्या क्षणी अतिशय उपयोगी पडतो.

 

ms dhoni bat 4 inmarathi
espncrickinfo.com

त्याने कायमच संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आजच्या मॅचमध्ये त्याची व जडेजाची भागीदारी अतिशय सुन्दर होती. धोनी एक वर्ल्ड क्लास क्रिकेटर आहे. पुढे विलियम्सनने असेही विचारले की,

“धोनी नागरिकत्व बदलण्याच्या विचारात आहे का? जर असे असेल तर आम्ही आमच्या संघात त्याचा नक्कीच समावेश करू.”

धोनीवर संथ खेळल्यामुळे टीका होते आहे. ह्यावर विलियम्सन म्हणाला की, “आम्ही अनेकदा असे बघितले आहे की धोनीने बऱ्याचदा शेवटच्या क्षणी सामना जिंकून दिला आहे. त्याची विकेट आमच्यासाठी खूप कठीण होती. हा काही सोपा खेळ नव्हता.”

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची बाजू घेतली आहे. त्याने रवींद्र जडेजा व महेंद्रसिंह धोनीच्या लढाऊवृत्तीचे कौतुक केले आहे.

पण त्याने असेही म्हटले की फलंदाजीचा भार फक्त टॉप ऑर्डरवर टाकणे चुकीचे आहे. आपण फक्त टॉप ऑर्डरवर विसंबून राहून चालणार नाही.

त्याने असेही म्हटले की २४० हे लक्ष्य फार काही कठीण नव्हते. अर्थात न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यामुळे टॉप ऑर्डर कोसळल्यावर पराभवाचा पाय तिथेच रचला गेला.

आपण कायम रोहित किंवा विराट खेळेल ह्यावर अवलंबून राहून चालणार नाही.

 

virat rohit inmarahi
Hindustan Times

इतर खेळाडूंनी सुद्धा आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. तसेच आपण धोनीकडून तो सततच चांगला खेळेल आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढून मॅच जिंकून देईल अशी अपेक्षा करू शकत नाही.

जरी त्याने ह्यापूर्वी अनेक सामने एकहाती आपल्या बाजूने फिरवून आपल्याला जिंकून दिले आहे, तरीही नेहमीच त्याने असे करावे अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे.

तसेच विराट कोहलीने सुद्धा धोनीची बाजू उचलून धरली आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना तो म्हणाला की, “मैदानाच्या बाहेर बसून बोलणे सोपे आहे. पण प्रत्यक्ष खेळताना तिथे परिस्थिती बघून खेळावे लागते.

आजच्या मॅचमध्ये धोनीने एका बाजूने खिंड लढवली. त्यावेळी तिथे तेच करणे योग्य होते.”

दुसऱ्या देशातील प्रतिस्पर्धी खेळाडू सुद्धा तर धोनीची क्षमता जाणून त्याची बाजू घेत असेल तर आपल्याकडच्या अतिउत्साही highly -reactive फॅन्सने जरा शांतपणे विचार करायला हवा की एखाद्या मॅचमध्ये जर खेळ बिघडला तरी खेळाडू निकामी होत नसतो.

त्या परिस्थितीत आपणच आपल्या खेळाडूच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. नाहीतर तुमच्या फॅन असण्याला काय अर्थ उरतो?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?