' “नक्षलवाद हा दहशतवादच आहे” – हे समजून घेण्यासाठी…. – InMarathi

“नक्षलवाद हा दहशतवादच आहे” – हे समजून घेण्यासाठी….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – अॅड. सौरभ गणपत्ये 

कोणताही दहशतवाद निपटून काढायचा असेल तर त्या विचारसरणीला आधी मात द्यावी लागते. आपल्या देशामध्ये “नक्षलवादी हे दहशतवादी आहेत की नाही?”, ह्यावर जो पर्यंत चर्चा चालेल तो पर्यंत आपली सुरक्षादले नक्षलवाद्यांचं काहीच वाकडं करू शकणार नाहीत.

नक्षलवाद्यांबद्दल सर्वात जास्त स्पष्ट विचार आणि स्पष्टवक्तेपणा पी. चिदंबरम ह्यांनी दाखवला. नक्षलवाद्यांना त्यांनीच पहिल्यांदा दहशतवादी असं संबोधलं. एका कार्यक्रमामध्ये, त्यांनी दहशतवादाची व्याख्या सांगून, त्यात नक्षलवादी बसतात असा पवित्रा घेतला.

 

naxalites InMarathi

 

आपल्या देशामध्ये मूळ गोंधळ इकडूनच सुरू होतो. नक्षलवाद्यांना दहशतवादी म्हटलं – की अनेक डाव्या विचारवंतांची गळवं दुखायला लागतात. नक्षलवाद म्हणजे हाफिज सईद किंवा अबू बगदादीचा दहशतवाद नाही ह्यावर पांडित्यपूर्ण विवेचन सुरू होतं.

एक निश्चित विचारसरणी नक्षलवादामागे आहे आणि तो “गरिबांचा, वंचितांचा आणि शोषितांचा लढा आहे” असं मत हिरीरीने डावे लोक मांडायला लागतात.

 

naxalites 1 InMarathi

 

आधी म्हटल्याप्रमाणे जर विचारसरणीला मात द्यायची असेल, तर त्या आधी ती समजून घेणे जास्त महत्वाचं आहे. कोणत्याही समाजामध्ये दोन आर्थिक पार्श्वभूमीचे लोक असतात.

श्रीमंत आणि गरीब. श्रीमंतांच्या हातात उत्पादन साधनं असतात, त्याच बळावर ते गरिबांचं शोषण करत असतात. ही परिस्थिती बदलायला कष्टकरी वर्ग क्रांती घडवायला पुढे येतो आणि प्रस्थापित व्यवस्था उखडून फेकून देतो.

ही क्रांती हिंसक आहे, रक्तरंजित आहे. अश्या विचारसरणीनेच नक्षलवादी प्रभावित झालेले असतात. गरिबांची, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची (भले तो खरा असेल), त्यांच्या होणाऱ्या शोषणाची चित्रं प्रभावीपणे मांडून १८ ते २२ वयोगटातल्या तरूण मुलामुलींना ह्या चळवळीमध्ये खेचण्याचा प्रयत्न सुरू होऊन १० वर्ष लोटली आहेत.

खैरलांजी प्रकरणात महाराष्ट्रातल्या काही भागांत दंगली उसळल्या आणि अत्यंत योजनात्मक पद्धतीने डेक्कन क्वीनला आग लावली गेली या मागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता – हे सर्वांना आठवत असेलच.

 

khairlanji hatyakand InMarathi

 

एकंदरीत नक्षलवादाची विचारसरणी, कार्यपद्धती आणि त्यांच्या कारवायांचं प्रकटीकरण कोणत्याही नावाजलेल्या दहशतवादी संघटनेपेक्षा कमी नाही.

नक्षलवाद्यांपेक्षाही मोठं आव्हान, त्यांच्या समर्थकांचं आहे.

कम्युनिस्ट पक्षातील अनेक मोठे नेते, “बंदूक हातात घेतलेली ती मुलं नक्कीच काहीतरी बदल घडवून आणतील” असं मत भर व्यासपीठावर सर्रास मांडायचे. आपला वैचारिक गोंधळ सुरू आहे तो ह्या लढ्यापासून. नक्षलवाद्यांना दहशतवादी म्हणायचं की नाही ह्यावर अजून सिस्टीममध्येच एकमत नाही.

 

naxalites 2 InMarathi

 

जर हा लढा खरोखरच शोषितांचा असेल तर गांधीवाद मूर्खपणा ठरतो. कारण तुमचे हेतू काहीही असोत, परंतु तुमची धोरणेच शेवटी तुमचा शेवट ठरवत असतात. “साध्य नव्हे, तर साधनच महत्वाचं असतं” – हे गांधीजी सांगायचे ते ह्याचसाठी.

त्याही पुढे – ज्या सैनिकांचा बळी घेऊन हा लढा पुढे नेला जातो, ते सैनिक खुद्द सधन कुटुंबातील किंवा शोषक नसतात. ते ही गरीब कुटुंबातीलच असतात. अश्या सैनिकांचा बळी घेऊन पुढे जाणारा हा लढा नेमका कशाचा बदला घेतोय?

 

naxalites 3 InMarathi

 

नक्षलवाद्यांच्या कारवायांच्या मागे त्यांचं वंचितपण होतं हे क्षणभर मान्य करूया. पण हाच जर का न्याय लावायचा झाला तर १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी मस्जिद विध्वंस आणि मुंबईतल्या दंगली ह्यांची ‘स्वाभाविक प्रतिक्रीया’ म्हणून गृहीत धराव्या लागतील.

नक्षलवाद्यांच्या समर्थकांची ही तयारी आहे काय? कोणत्याही धर्माचे अतिरेकी लोकांचा ब्रेन वॉश करून आपलं मनुष्यबळ वाढवत असतात. नक्षलवादी काही वेगळं करत नाहीत.

 

naxalites 4 InMarathi

 

अनेकदा नक्षलवाद्यांवर टीका जरी केली, तरी डावे लोक, शेपटीवर पाय पडल्यासारखे उसळतात. आणि आपली विचारसरणी त्यामागे मांडू लागतात. ज्या तत्वज्ञानातच हिंसाचार आहे, ते तत्वज्ञान जर अंगिकारायचं असेल तर नक्षलवादी आणि जिहादी ह्यांच्यात फरक तो काय राहिला? ह्या सत्याचा सामना करण्याची ताकद नक्षल समर्थकांमध्ये आहे का?

आता आणखी खोल जाऊन, मुळात नक्षलवाद हा खरोकरीच अन्यायाचा, शोषणाचा, पिळवणूकीचा प्रतिकार का – हे बघू.

हा “वाढत्या पिळवणूकीचा प्रतिकार का नाकारता?” असा सवाल करणारी अनेक मंडळी असतात. या देशाचे अगदी वाटोळे झाले आहे असा आततयी विचार जरी क्षणभर केला तरी याच राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतला एक घटक म्हणून मला काही पडतात त्याची मांडणी खालील प्रमाणे करता येते.

हे सर्व प्रश्न वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांमधूनच पडले आहेत आणि नक्षलवाद्यांच्या कोणाही सहनुभूतीदाराकडून ह्यावर समाधानकारण उत्तरं मिळणं शक्य नाही.

१) व्यवस्था आणि राज्यकर्ते पिळवणूक करणारे असतील तर त्यांच्या पोलिसांसारख्या शिलेदारांना नक्षलवादी लक्ष्य आणि भक्ष्य बनवितात. ही जर त्यांची विचारसरणी असेल तर मृत महिला पोलिस ही गरोदर आहे असे लक्षात आल्यावर तिच्या पोटात गोळ्या मारल्या जातात. याने अन्यायाचा प्रतिकार वाढतो का?

२) शाळा नामशेष करणे, पूल उडवणे, रस्ते उखडणे ह्या जर अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या पद्धती असतील तर शाळा, रस्ते, पूल ही अन्यायाची प्रतीके म्हणायची का?

३) मरणानंतर वैर संपत असेल तर मृत जवानांच्या शरीरात बॉम्ब लावून किंवा शरीराचे तुकडे करून अन्यायाचा अधिक चांगला प्रतिकार करता येतो का?

 

naxalites 5 InMarathi

 

४) २०१२ साली नक्षलवाद्यांचा क्रमांक दोनचा प्रमुख सव्यसाची पांडा याने क्रमांक एकचा प्रमुख गणपतीला लिहिलेल्या पत्रात स्त्री पुरुष नक्षलवादी एकत्र अंघोळ करत असल्याचा उल्लेख आहे. हा असा अन्यायाचा प्रतिकार होतो का? की यातून नवी व्यवस्था जन्माला येणार आहे?

५) “आपला मुलगा किंवा मुलगी उत्तम नक्षलवादी व्हावेत” अशी प्रामाणिक इच्छा किती सहनुभूतीदारांची आहे? का तिथेही शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा?

६) “जा पोरा/पोरी, जा! आज किमान एक पोलिस तरी मारूनच ये!” असा आशीर्वाद शहरी आणि सुशिक्षित प्रकारात मोडणारे किती सुजाण पालक देतील?

७) पुण्या मुंबईत जागा गमावणारे किती तरी लोक असतात. अनधिकृत बांधकामे नेहेमीच पाडली जात असल्याने किती लोक बेघर होत असतील याची कल्पनाच केलेली बरी. मग सगळ्यांनी वाढत्या पिळवणूकीचा प्रतिकार म्हणून बंदुका हातात घ्याव्यात का? आणि घेतल्याच तर देशाचे खरेच भले होणार आहे?

 

naxalites 6 InMarathi

 

८) “नक्षलवाद्यांची सर्व हिंसा प्रकर्षाने छापली जाते पण पोलिसी कृत्यांना मात्र जास्त प्रसिद्धी मिळत नाही” असा एक लाडका आक्षेप व्यक्त केला जातो. खरं सांगायच झालं तर पोलिसांची वेगवेगळ्या प्रकरणात आधीच इतकी बदनामी आणि नाचक्की झाली आहे की ते प्रामाणिक आणि धुतल्या तांदूळासारखे असतात यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. पण तरीही – आपला मुलगा आयपीएस अधिकारी व्हावा असे एखाद्या बापाला वाटेल की नक्षलवादी दलांचा मोठा कमांडर व्हावा असे वाटेल?

वस्तुस्थिती ही आहे की या देशासमोर नक्षलवाद हा मोठा प्रश्न आहे आणि त्यांचे सहनुभूतीदारही मोठ्या प्रमाणात आहेत.

जो पर्यंत सिस्टीम मधील लोक (आणि सिस्टीम बाहेरचे आपण सर्व सुद्धा) – नक्षलवाद हा सुद्धा दहशतवादच आहे – हे स्पष्टपणे मान्य करणार नाही, तो पर्यंत ह्या समस्येवर समाधान निघणं अशक्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?