नवाजुद्दिन सिद्दिकी: बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अनेक वर्षे अंधारात राहिलेला तारा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

बॉलिवूड… भल्या भल्यांना या शब्दाची भुरळ पडते. या मायानगरीचा भाग बनण्यासाठी अनेक जण देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईची वाट धरतात. क्वचितच कुणाला यश मिळते आणि त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले जाते.

पण कित्येक लोक स्ट्रगल करून करून थकून परतीचा रस्ता धरतात अथवा मिळेल ते बारीक सारीक काम करत जगत राहतात.

स्ट्रगल किती करावे यालाही मर्यादा असतात ना? कारण प्रत्येकाच्या नशिबी अमिताभ बच्चन, राकेश रोशन सारखे बाप नसतात जे आपल्या पुत्रांचा प्रवेश या मायावी दुनियेत सुरळीत करून देतील. किंवा प्रत्येकाचे आडनाव कपूर नसते जेणेकरून जन्मतःच ते बॉलिवूड स्टार होणार असे विधिलिखित वर्तवले जाईल…

पण तरीही काही येतात, इथे जिद्दीने टिकून राहतात, संघर्ष करतात… थोडा थोडका नाही तर कित्येक वर्ष! मग कुठे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते आणि ते ही स्टार बनून चमकायला लागतात व रसिकांच्या मनात अढळस्थान मिळवतात!

असाच एक संघर्षातून प्रकाशात आलेला लखलखता तारा म्हणजे ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’

उत्तरप्रदेश मधील मुजफ्फरनगर या जिल्ह्यातील बुधना गावचा हा रहिवासी. एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेला आणि नऊ मुलांपैकी एक असणारा. लहानपणी कुणी कल्पनाही केली नसेल की, एक दिवस नवाजुद्दीनचे नाव भारतच काय पण विदेशातही गाजणार आहे.

 

nawaz-siddiqui-inmarathi
timesnow.com

भारतात, विशेषतः सिनेसृष्टीत गोऱ्या रंगाला महत्व आहे तिथे हा काळासावळा किडकिडीत अंगाचा नवाज जाईल, टिकेल आणि यशस्वी होईल याचा अंदाज कुणाला कसा येणार?

सिनेमात येण्यापूर्वी नवाजने अनेक नोकऱ्या केल्या. एका पेट्रोलियम कंपनीत केमिस्ट म्हणून काम केले. तिथे त्याचे मन रमले नाही म्हणून तो दिल्लीला आला आणि वॉचमनची नोकरी पत्करली. त्याच सुमारास त्याच्या मनात अभिनयाचे पंख फुटू लागले. त्याने NSD (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) येथे फार प्रयासाने प्रवेश मिळवला.

जेव्हा त्याचे  NSD मधले  शिक्षण पूर्ण झाले तेव्हा, ना कुठले काम होते ना राहायला घर! अक्षरशः उपाशी मरायची वेळ  आली होती. नैराश्याच्या गर्तेत सापडला असता त्याच्या मनात एक विचार आला, ‘जर कुठेही उपाशीच मरायचे असेल तर मुंबईला जाऊन मेलेले काय वाईट?’

अशाप्रकारे नवाजुद्दीन नावाचा एक अतिसामान्य मनुष्य अभिनयात करिअर घडवण्याच्या उद्देशाने मुंबई नावाच्या मायावी महानगरी मध्ये प्रवेश करता झाला…

मुंबई! मुंबईला अनेकांनी अनेक विशेषणे दिली आहेत. कुणाला मुंबई सर्वांना पोटासाठी खायला देणारी आई वाटते तर, कुणाला जीव घेणारी राक्षसीण वाटते. नवाजला मात्र त्यावेळी मुंबई म्हणजे शेवटची आशा वाटत होती हे मात्र निश्चित!

दारोदारी भटकल्यावर, निर्माता दिग्दर्शकांचे उंबरठे कित्येक दिवस झिजवल्यानंतर त्याला टीव्ही सीरिअल आणि सिनेमात फुटकळ रोल मिळू लागले. एखाद्या सिनच्या मागच्या गर्दीत उभा राहणारा चेहरा इतकीच त्याची ओळख.

त्याच्या दिसण्यामुळे त्याच्या अंगात असलेल्या अभिनय कलेकडे कुणी लक्षच दिले नाही. रंगभेदाचे एक उत्तम उदाहरण म्हणून बॉलिवूडकडे बोट दाखवले तरी चालू शकेल. गोरा रंग असणारे पण अभिनय कशाशी खातात याचा गंध नसणारे एका रात्रीत स्टार बनतात हे आपण बघितले आहेच. असो!

म्हणूनच करिअरच्या सुरुवातीला नवाजुद्दीनला ज्या चार सिनेमात काही सेकंदाचे रोल मिळाले त्यात अतिसामान्य व्यक्तीच्या भूमिकाच त्याच्या वाट्याला आल्या. उदाहरणार्थ, शूल मध्ये वेटरची भूमिका असो, मुन्नाभाई मधला पाकिटमार असो वा सरफरोश मधला गुन्हेगार असो…तो सर्व सामान्य दिसतो हेच त्यामागचे कारण होते.

 

Nawazuddin-Siddiqui-munnabhai-inmarathi
india.com

पण एक मात्र आहे, या काही सेकंदाच्या भूमिकेमधूनही तो आपली छाप पाडून गेला.

आमिर खान आणि संजय दत्त सारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करूनही नंतर पाच वर्षे तो अक्षरशः बेरोजगार होता. कुठलाही नवीन सिनेमा त्याच्या हाती नव्हता. संघर्ष काही संपत नव्हता…एका फ्लॅट मध्ये सिनिअर सोबत रूम शेअर करताना त्याच्याकडे भाडे भरण्याचे देखील पैसे नसायचे. पण सगळ्यांचा स्वयंपाक करण्याच्या अटीवर त्याला राहायची परवानगी मिळू शकली.

पाच वर्षांनंतर त्याला छोट्या-छोट्या भूमिका मिळू लागल्या परंतु, फेमस होण्यासाठी सरफरोश नंतर तब्बल बारा वर्ष त्याला प्रतीक्षा करावी लागली. एखादा असता तर तेव्हाच कंटाळून गावी निघून गेला असता.

पण हा कुणी साधारण व्यक्ती नाही तर ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’ होता ज्याला आपल्या अभिनय कौशल्यावर आत्मविश्वास आणि संधी मिळेलच यावर ठाम विश्वास होता.

मध्यंतरी काही शॉर्ट फिल्म्स आणि काही सिनेमे जसे की, देव डी, पिपली लाईव्ह, न्यूयॉर्क, पतंग वगैरे येत गेले आणि नवाज हळू हळू स्थिर होत गेला. पण अद्याप भाग्य उघडण्यास उशीर होता. तो योग आला अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या सिनेमामुळे…

नवाजने रंगवलेला फैजल खान कुणीही विसरू शकत नाही. वासेपुर सिरीज हिट होण्यामागे बऱ्याच अंशी फैजल खान चा हात आहे असे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरणार नाही. या व्यक्तिरेखेला लोकांनी आणि समीक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

 

nawaz-inmarathi
bookmyshow.com

जिथे तिथे वासेपुर ची चर्चा रंगू लागली. प्रत्येक जण त्यातल्या डायलॉगबाजीचा फॅन झाला. आणि मग मात्र नवाजुद्दीन सिद्दीकी नावाचे गारुड रसिकांच्या मनावर बसू लागले. नवाजची गाडी तिथून जी भरधाव सुटली ती अजूनही धावतेच आहे.गँग्स ऑफ वासेपुर नंतर नवाजुद्दीनला लक्षात राहण्याजोग्या भूमिका मिळू लागल्या.

तलाश मधील लंगडा तैमुर ला सुद्धा रसिकांची दाद मिळाली. या भूमिकेसाठी त्याला एशियन फिल्म्स चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर मिस लव्हली, बॉम्बे टॉकीज वगैरे सिनेमातील भूमिका ही गाजल्या आणि नंतर आला आयुष्यातील पहिला फिल्मफेअर मिळवून देणारा चित्रपट ‘द लंचबॉक्स’ हा सिनेमा तिकीटबारीवर चालला नसला तरी समीक्षकांनी मात्र याचे तोंडभरून कौतुक करून अभिनय क्षमतेला दाद दिली.

नंतर अनेक सिनेमे येत गेले आणि लोक नवाजुद्दीनला पाहण्यासाठी गर्दी करू लागले. मोठ्या मोठ्या नटांचा निर्मात्यापाशी आग्रह होऊ लागला की, नवाज ला सिनेमात घ्या.

किक, बदलापूर यातल्या उल्लेखनीय कामानंतर आला बजरंगी भाईजान. यामध्ये नवाजने पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाब च्या भूमिकेला सहज अभिनयाने चार चांद लावले. मांझी, हरामखोर, रईस मधला इंस्पेक्टर अश्या भूमिका सुद्धा  चांगल्याच गाजल्या.

सध्या धुमाकूळ घालणारी नेटफ्लिक्सची वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’ मधला गणेश गायतोंडे हा अनेकांच्या गळ्यातला ताईत झालाय. त्यातले संवाद तुफान लोकप्रिय झालेले आहेत. त्याच्या आगामी मंटो आणि ठाकरे या चित्रपटांविषयी उत्सुकता ताणली गेली आहे…

 

dailyexpress.com

नियतीचा न्याय कसा असतो बघा, ज्याच्या दिसण्यामुळे दुर्लक्ष केले होते आज त्याच्या अभिनयामुळे अनेक निर्माता, दिग्दर्शक नवाजुद्दीनच्या घरासमोर रांगा लावून उभे आहेत. त्याला बघायला लोक गर्दी करत आहेत. एकेकाळी अन्नाला तरसणारा नवाज आज सेलेब्रिटी बनलाय!

याला काळाचा महिमा म्हणायचा की कष्टाचे फळ हे तुम्हीच ठरवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?