मोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : वैद्य परीक्षित शेवडे

===

आयफोनचं नवीन मॉडेल बाजारात येण्यापूर्वीच ऍपल च्या एका कर्मचाऱ्याकडून एका बारमध्ये ‘विसरलं’ गेलंं. या फोनबद्दल मीडियात प्रचंड चर्चा झाली. आयफोन हे जबरदस्त प्रॉडक्ट आहे, आजवरच्या सगळ्या मोबाईल्सना मागे टाकेल असा हा फोन आहे वगैरे वगैरे चर्चा रंगल्या. ही सगळी हवा पद्धतशीरपणे झाल्यावर मग स्टीव्ह जॉब्सने आपला प्रोटोटाईप चोरीला गेल्याची तक्रार केली आणि त्यासंदर्भात कायदेशीर पावलं उचलली. मात्र तोवर झालेल्या या चर्चांचा आयफोनला पुरेपूर फायदा झाला.

स्टीव्ह जॉब्सच्या चरित्र अभ्यासकांपैकी काहींनी हे सारं प्रकरण त्यानेच घडवून आणलेलं होतं असं मत व्यक्त केलंय. याला कारणीभूत असलेली गोष्ट म्हणजे बेरकीपणा. व्यवसाय आणि राजकारण यांत हा बेरकीपणा लाखमोलाचा असतो.

steve-jobs-marathipizza

 

हे सगळं लिहिण्यामागचं कारण म्हणजे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वडोदराच्या एका भाजप कार्यकर्त्यांशी झालेलं दूरध्वनी संभाषण जे सध्या बरंच व्हायरल झालंय. याचा बेरकीपणाशी काय संबंध? हे संभाषण मी नीट ऐकलं; अगदी पुन्हा पुन्हा ऐकलं. याबाबतच माझं निरीक्षण नोंदवतो.


ज्यांनी ही क्लिप ऐकली नसेल, तर इथे ऐका :

 

गोपाल गोहील हे बडोद्यातले भाजप कार्यकर्ते, त्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी निवडलं गेलं. दिवाळीच्या दिवशी मोदींचा फोन आला आणि त्यांचं काही संभाषण झालं. मात्र हे संभाषण नैसर्गिक होतं का? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

या संभाषणात गुजरात निवडणुका हा विषय येणारच हे स्वाभाविक आहे. मात्र हा विषय छेडताना गोपालभाईंनी जितका घडाघडा प्रश्न विचारलाय ते बघता हा प्रश्न पाठ केला होता की वाचला असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यानंतर मग मोदींनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत जी काही फटकेबाजी केली आहे ती धमाल आहे. यात ‘जी साहेब, हाँ साहेब’ या पलिकडे गोपाल गोहील यांचा काहीच संवाद नाही. मोदींनी एकतर्फी काँग्रेसला मजबूत धुतलंय. साधारणपणे संभाषण हे दोन्ही बाजूंच असतं नं? इथे मात्र तसं नाहीये!! मोदीच बोलताना ऐकू येतात. हे संभाषण गोपालभाई रेकॉर्ड करत आहेत हे मागे वाजणाऱ्या बीप वरून आपल्या लक्षात येतं. मोदींसारख्या अखंड सावध व्यक्तीकडून त्याकडे दुर्लक्ष होईल? मात्र मोदी याबाबत काहीच विचारत नाहीत! किंबहुना भाजपवर खोटे आरोप कसे होत आहेत; त्याकरता व्हॉट्सअपचा कसा उपयोग होत आहे याबाबत ते बोलतात. व्हायरल करण्याकरता याच व्हॉट्सअपचा आधार घेतला जाणार असतो!! हे संभाषण रेकॉर्ड होणार याची पूर्वकल्पना त्यांना होती का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

narendra-modi-marathipizza01
indianexpress.com

 

गोपालभाई हे केवळ भाजप कार्यकर्ते नसून हे एक दुकानदारदेखील आहेत. गुजरातचे व्यापारी हे भाजपच्या विरोधात आहेत अशी हवा तयार केली जात असताना एक व्यापारी; कार्यकर्ता अशा व्यक्तीला थेट पंतप्रधान फोन करत आहेत ही भावनिक सादच नव्हे का? योगायोग (?) म्हणजे काल गुजरात निवडणूकीची तारीख जाहीर होते आणि कालच विविध मीडिया त्यांच्या संकेतस्थळावर हे संभाषण प्रसिद्ध करतं. इतकंच नाही तर एरव्ही आपल्यावरील बेछूट आरोपांबाबत चकार शब्द न काढता त्यांना अनुल्लेखाने मारणारे मोदी आज या संदर्भातील इंडिया टुडे ची लिंक ट्विट करत म्हणतात;

‘गोपालभाईना नेहमीच एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखत आलो आहे. आज सारा देश त्यांना ओळखतो.’

 

modi gopal bhai call audio clip inmarathi

त्यांना या संभाषणाची इतकी दखल का बरं घ्यावीशी वाटते? यातच राजकारणातला बेरकीपणा दडलेला आहे. पद्धतशीरपणे हे संभाषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचलंच की!

मोदीविरोधक याला त्यांची चाल म्हणत आहेत तर मोदीसमर्थक सर्वसामान्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा योग्य असल्याचा हा पुरावा असल्याचे सांगत आहेत. प्रसिद्धी; मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक…कोणत्याही ब्रँडच्या यशासाठी आवश्यक असते. मोदी हे यशस्वी ब्रँड आहेत हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. इतक्या छोट्या विषयाची चर्चा होणं हे त्यांचं यशच आहे.

राजकारण असंच असतं. चीत भी मेरी पट भी मेरी.

You love him or you hate him but you dare not ignore him.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page | Copyright (c) 2017 InMarathi.com . All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *