नरेंद्र दाभोलकर, संशयित खुन्याच्या समर्थनातील मोर्चा आणि गर्दीतला एक “बघ्या”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

डॉ नरेंद्र दाभोलकरांचा निर्घृण खून होऊन आज ५ वर्ष पूर्ण झालीत. ह्या पाच वर्षात दाभोलकरांच्या खुनामागे नेमके कोण आहेत हा प्रश्न उभा महाराष्ट्र विचारत होता. त्याला काही प्रमाणात उत्तर मिळण्यासाठी संपूर्ण ५ वर्ष खर्ची पडली आहेत. संशयित खुनी आज गजाआड आहेत, त्यांची कसून चौकशी होत आहे.

परंतु ह्या अटकेनंतर अधिकच गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. पहिला म्हणजे – हे आरोपी पकडून भागणार आहे का? त्यांच्या पाठीशी कोण आहे? त्यांना खून करण्याची प्रेरणा/कॉन्ट्रॅक्ट देणारे कोण आहेत हे समोर येणार की नाही?

 

Vaibhav-Raut-narendra dabholkar inmarathi

 

आणि दुसरा म्हणजे –

संशयित गुन्हेगारांना समर्थन देणारे मोर्चे जर निघत असतील तर आम्ही काय विचार करावा? काय समजावं?! “सिद्ध होत नाही तो पर्यंत निर्दोष” हे तत्व कायद्यात असलं तरी संशयिताच्या समर्थनात मोर्चा काढून “नेता ऐसा हो” म्हणू धजणारे कोणत्या विचाराने हे कृत्य करतात?

ह्या प्रश्नांनी महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील प्रत्येक सुजाण, विचारी माणसाला विचारात टाकलं आहे.


ह्याच अनुषंगाने, फेसबुकवरील लोकप्रिय लेखक डॉ सचिन लांडगे ह्यांनी दोन मनस्वी पोस्ट लिहिल्या आहेत. त्या दोन्ही इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.

===

काळ सोकावतो आहे…

ATS ने पकडलेल्या आतंकवादी वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात निघालेल्या मोर्च्याचा फोटो पाहिला.

पहिली गोष्ट, समाजातल्या ठराविक मानसिकतेच्या लोकांना अशा (अशा म्हणजे, आपल्या आयडीयलॉजीशी मिळत्याजुळत्या) आतंकवाद्याला सपोर्ट करावं वाटणे.

दुसरी गोष्ट, पोलिसांनी अशा प्रकारच्या (आतंकवाद्याच्या समर्थनार्थ निघणाऱ्या) मोर्चाला रीतसर परवानगी देणे..!

तिसरी गोष्ट, समाजातल्या मोठ्या जनसंख्येने तो आतंकवादी, त्याची पितृसंस्था आणि हा समर्थन मोर्चा या तिन्हींबाबत मुद्दाम/ठरवून मौन बाळगणे…

 

vaibhav raut support march inmarathi

 

…आणि ही तीच लोकं आहेत बरं का, जी याकूब मेनन च्या फाशीच्या वेळी जमलेल्या मुस्लिम जमावाचे फोटो सोशल मीडियावर फिरवून ‘बघा – बघा’ म्हणत होती!

म्हणजे ‘त्यांनी’ केली ती ‘चूक’.! आणि आपण करतोय ती काय आहे?

काय फरक आहे या वैभव राऊत आणि याकूब मेनन च्या दोन घटनांमध्ये?

इसिस च्या थरारक आतंकाच्या बातम्या येतात आणि इथले बहुतांश मुस्लिम पानाफुलांचे फोटो फेसबुकवर टाकण्यात दंग असतात. जसं काय, काही देणंघेणंच नाही. साधा निषेधाचा शब्दही नाही.

अरे मित्रांनो, जेव्हा धर्माच्या नावाखाली आतंकी कृत्ये होतात, तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेला धर्म आमचा नाहीये, म्हणायला कशाला कोणी निमंत्रण द्यायला हवंय..’मीच का बोलू?’ , ‘मी मुस्लिम आहे म्हणून मी दरवेळेस बोलावंच का?’ अशा पळवाटा जर तुम्हाला तुमचं व्यक्तिस्वातंत्र्य वाटतं, अधिकार वाटतो…तर तोच फॉर्म्युला आता काही हिंदू वापरताहेत…!

निषेधाचीही जबाबदारी झटकत असाल तर तुम्हाला ‘तात्विक समर्थक’ का म्हणू नये?!

बंगालमधल्या मालदामधे कुठल्या तरी हिंदू महासभेच्या छाटछुट नेत्याने मोहमद पैगम्बर विषयी आक्षेपार्ह विधान केलं म्हणून मुस्लिम समाजाचे तब्बल अडीच लाख लोकांनी रस्त्यावर जाळपोळ करत आतंक माजवला.

 

malda riots marathipizza

 

पण “दादरीत चुकीचं घडलं” म्हणणारे आणि त्यावर पोस्टिंचे रतीब टाकणारे, मालदा बाबत मात्र एकदम चिडीचूप होते. अनुल्लेखाने मारणे यालाच म्हणतात.

आणि आज त्याच वाटेवर जात बहुसंख्य हिंदू ह्या ‘समर्थन मोर्च्याला’ अनुल्लेखाने मारताहेत…!

असं दाखवायचं की,

आम्ही ही बातमी वाचलीच नाही…? अहो, दोन दिवस फेसबुकवरच आलो नाही हो….! अरे, गडबडीत त्यावर लिहायचंच राहिलं बरं का.. .! काय म्हणता! आम्हाला तर ही फेक न्यूजच वाटली…!

मग आपणही मुस्लिमांच्याच वाटेने चाललो आहोत का? सनातन, वैभव राऊत हे तुम्हाला ‘आपले’ वाटतात का? हिंदू अतिरेक्यांच्या दहशतीमुळं गप्प आहात, की त्यांच्याबद्दलच्या ‘सॉफ्ट कॉर्नर’मुळं?

आता आपणही भारताचा ‘सीरिया’ होईपर्यंत वाट पहायची का?

आतंकवादी फार थोडेच असतात. पण, त्यांच्या समर्थकांच्या हृदयातल्या आशेवर तो आतंकवाद पोसला जात असतो. आणि समर्थन मोर्चा काढणाऱ्यांच्या मेंदूत पुढच्या आतंकाची बीजे असतात…

…आणि आतंकवादी कृत्याकडे डोळेझाक करणाऱ्यांच्या मनातल्या सॉफ्ट कॉर्नरवर त्याचा विश्वास असतो…!

काळ यामुळेच सोकावतो…

===

एक बघ्या आणि दाभोळकर…

(‘बघ्या, दाभोळकर आणि मंगळागौर’ या शिर्षकाचा लेख शब्दवेल या ब्लॉगस्पॉट वर २०१३ साली प्रसिद्ध झाला होता. त्याचा संदर्भ आजच्या परिस्थितीशी जुळवून मी ही पोस्ट तयार केली आहे.)

एक बघ्या असतो. जिथं गर्दी जमली तिथं जाऊन मज्जा बघायचा त्याचा स्वभाव असतो. पण मी जो म्हणतोय तो बघ्या मात्र त्या गर्दीतल्या इतर बघ्यांसारखा गरीब आणि फाटका नसतो.

हा बघ्या खात्यापित्या घरचा असतो. चांगला शिकलेला असतो. त्याच्याकडे चांगला मोबाईल आणि अनलिमिटेड नेट पॅक असतो. व्हाट्सएपवर भाराभर पोस्ट्स फॉरवर्ड करण्यात तो पटाईत असतो. फेसबुकवर आजूबाजूला वारं जसं वाहतंय तशाच पोस्ट्स तो टाकत असतो.

 

sakshi.com

तो कुठल्या आयडीयलॉजीचा नसतो. तो फक्त मेजॉरिटीच्या बाजूने असतो.

“खतरे में” च्या आवया उठल्या की तो हिंदू रक्षक असतो.

जातींचे मोर्चे निघाले की तो जातीयवादी असतो.

पंध्रागष्ट सव्वीस जानेवारीला तो भारतीय असतो….!

एखादं जातीअंताचं भाषण ऐकलं की, सगळ्या जाती संपून समाज एक व्हावा म्हणतो, पण जातीच्या मेळाव्यात तो बराच ऍक्टिव्ह असतो..

बघ्याची आई उपवास करते. बघ्याला आणखी चांगल्या पगाराची नौकरी लागावी, त्याने आपल्या जातीतलीच बायको करावी, त्या बायकोने सारे सणवार करावे, सासूला मान द्यावा, बघ्याची सिगारेट सुटावी, बघ्या सुखी रहावा ई. ई…!

घरात लाईट गेली की आई स्वामींना साकडं घालते, बाबांना यायला उशीर झाला की ती व्यंकटेश स्तोत्र म्हणते. आणि बाबांना कधी ऑर्डर्स नाही मनासारख्या मिळाल्या की महाराजांची पोथी वाचते…!

ती वर्षातून एकदा सत्यनारायण करते. तिने बघ्यासाठी, आणि तिच्या (काहीही फुफाटा न करता अग्नी दिलेल्या) सासूसाठी नारायण नागबळीही केलाय.

बघ्याला आईचं हे ‘अति’ वाटायचं. बघ्या आईला आधी समजावू पहायचा. मग त्याला कळलं की आई ऐकतच नाहीये. ती फक्त बघ्याला बोलू देतीये. तिच्या भोवती तिच्या काल्पनिक कठीण परिस्थितीचे, तिला न मिळणाऱ्या भौतिक सुखांचे, तिच्या परिश्रमपूर्वक जगण्याचे, तिच्या स्वामी, बाबा आणि देवांचे जे कवच आहे त्यात “प्रश्न” घुसूच शकत नाहीत.

आणि त्या कवचात आई सुखरूप आहे..!!

आता बघ्या आईला जे ती वांछील तो ते करू देतो, जोवर ते त्याच्या आड फारसे येत नाही.

पण बघ्या आधी जाम श्रद्धाळू होता. म्हणजे इयत्ता तिसरीत त्याचा आठवा क्रमांक हुकला याचं कारण होराभूषण शास्त्री यांच्या दर रविवारी छापून येणाऱ्या भविष्यानुसार ‘त्याला असलेली साडेसाती’ हे होतं. मग तो त्यासाठी शनिस्तोत्र वाचू लागला. मग तो परीक्षेच्या अगोदर हातावर दही घेऊन बाहेर पडू लागला.

पण ही काही श्रद्धा नव्हती, हे आज बघ्या सांगू शकतो. ही असली तर ही देवाबद्दलची भीती होती, किंवा खंडणी म्हणा हवं तर…!

मग नंतर बघ्या हळूहळू अश्रद्ध बनत गेला. म्हणजे तो उघड नास्तिक झाला नाही कधी. पण त्याने अस्तिक असण्याचे जे आचार-विचार बाळगावेत ते सोडले. ते केले नाहीत तर काय ह्याची भीती सोडली.

पण बघ्या “निर्भय” झाला नाही.

कधीमधी बघ्याची चांगलीच फाटायची. पण तो कोणाला न दाखवता एकटाच मनात टाके घालायचा. पण कधीकधी हे ‘देवादिकांचं न करणे’ त्याला झेपायचं नाही. मग बघ्या हळूच भगवद्गीता वाचायचा, किंवा मनाचे श्लोक म्हणायचा.

जरी तो थेट देवाला वेठीस धरायचा नाही, पण त्याच्या जाणीवेबाहेरचा, आकलनापलीकडचा ‘एक बिंदू’ आधाराला धरून तो हलके हलके स्थिर व्हायचा. मग त्याची फाटायची थांबली, की परत तो अधांतरीचा बिंदू सोडून आपल्या नेहमीच्या कामधंद्यांना लागायचा…!

कधी कधी त्याला कळायचं नाही कि स्वतःची त्वचा तरातरा ओढून मोकळं व्हायची जी तहान लागते, जी वेडीपिशी तगमग होते तिचं काय करायचं..? मागे फिरायचे रस्ते बंद, आणि पुढे असली येडझवी अवस्था..!!

मग त्याच्या मध्ये बघ्या परत स्वतःला शांत करायचे आध्यात्मिक उपाय करायचा.
आणि बघ्या शांत व्हायचाही.

आता बघ्या मुर्दाड आहे. तो स्वतः स्वतःची अवहेलना करत नाही की पाठ थोपटत नाही. तो सामाजिक जबाबदारीने पोक घेत नाही की उच्छृंखल मुक्तपणाने उनाडूनही जात नाही.

तो फक्त बघतो.. जसं त्याने काही वर्षांपूर्वी दाभोळकरांचं मरणं बघितलं…

 

dabholkar-inmarathi
indianexpress.com

बघ्या रात्री एका नव-विवाहित मित्राकडे होऊ घातलेल्या मंगळागौरीस जातो. तिथे तो जेवतो. मग तो खेळ बघू लागतो. त्याचा दोस्त बायकोबरोबर एक फुगडीही घालतो. बघ्या तिथे जमलेल्या नव, जुन्या आणि पोक्त विवाहीतांचे खेळ बघू लागतो. त्यातल्या गाण्यांचे बोल ऐकू लागतो.

मोड्युलर किचन मध्ये जगणाऱ्या, टू बीएचके त वावरणाऱ्या आणि मराठी सिरियल्स पाहणाऱ्या संसारिक स्त्रियांचे खेळ.

मग भरल्या पोटी ढेकर द्यावे तसे त्याला सतावणारे प्रश्न आठवतात:

सगळी श्रद्धा का अंधश्रद्धा?

की पूर्वी हे खेळ आणि सण म्हणजे संसाराचे कष्टाळू गाडे ओढणाऱ्या बायकांची स्पेस होती? म्हणजे युटिलिटी?

आपला धर्म, किंवा प्रथा-परंपरा म्हणजे निव्वळ सामूहिक स्तराच्या गंमतीचा संरक्षित पाशवी आनंद, का माणसांना एकत्र जमून ‘पेन्ट-अप’ करण्याची सोय?

आपल्या ह्या रुढी-परंपरा किती खोल घुसल्या आहेत, काळात आणि स्थळातही?

पण म्हणजे आपण किती विचार करून आपल्या कृती ठरवणार? आणि त्यात किती जणांना किती दुखवायचं?

आणि असं करून जे काही हाती लागेल ते फक्त आपलं आपल्याशी राहणार असेल, त्याला सर्वांना पटणारा अर्थ नसेलच, तर मग एकूणातच हे उद्योग आणि हे प्रश्न का?

आणि ह्यातल्या किती बायकांना ठाऊक आहे दाभोळकरांना कशासाठी मारून टाकलेलं ते? ते कशासाठी मेले? कोणासाठी मेले?

 

dabholkar-inmarathi
www.livemint.com

बघ्याला आता समोरचे खेळ तद्दन खोटे वाटू लागतात. त्या बायकांचे खेळ मोबाईलवर शूट करत असलेले नवरे त्याला मजेशीर वाटतात.
त्याला त्यात “कळप” म्हणून जगण्याचे सुख दिसते. समोर आजूबाजूचे वास्तव नाकारत फक्त स्वतःतच खुश राहणाऱ्या आणि सणावारांच्या गुंगीत तल्लीन होणाऱ्या मेंढरांचा कळप दिसतो.

त्याला आठवतं, नालासोपाऱ्यात सापडलेल्या बॉम्बच्या बातमीने तो हादरला होता.. मग धर्मांधांच्या विरोधात कोणी कठोरपणे लिहिल्यावर बघ्यानं त्याला सुचवलेलं बघ्याला आठवतं…

“तुम्ही उगाच महत्व देता त्यांना.. दुर्लक्ष करायचे हो..!” हा आपण दिलेला सल्ला एका बॉम्बस्फोटाच्या रूपाने त्याला समोर दिसतो..

आपलं आणि आपल्यासारख्या असंख्य बघ्यांचं दुर्लक्षच फळाला आलंय, असं त्याला जाणवतं.. बघ्याला घाम फुटतो..

अरे,असतील दोनचार अपवाद, ते म्हणजेच सगळे हिंदू नाहीत. असा त्याचा तावातावाने आणि ठामपणे केलेला प्रतिवाद नालासोपाऱ्यातील समर्थनमोर्चाने दुबळा ठरवतो…!

 

vaibhav raut support rally inmarathi
dnaindia.com

हिंदू सहिष्णू आहेत, म्हणताना असं म्हणताना फुगणारी त्याची छाती, सनातन विषवल्लीची फोफावलेली पाळेमुळे पाहून दडपून जाते.

आणि मग त्याला पाच वर्षात पहिल्यांदा अगदी मनापासून वाईट वाटतं की दाभोळकरांना गोळी घातली गेली. अशी परिस्थिती राहिली तर कदाचित पुढे आपलाही सीरिया होईल, आणि हीच गोळी आपल्या पुढच्या कितव्यातरी पिढीचा जीवदेखील घेईल. या विचारांनी तो भयभीत होतो.

फुटलेल्या घामाने आणि दडपलेल्या छातीने बघ्या मंगळागौरीतून निघतो.

रस्त्यावर येतो आणि फुफ्फुसांत सिगारेटचा धूर भरू लागतो.

आणि पुन्हा मनातल्या मनात फाटलेल्या गां*ला टाके घालायचा प्रयत्न करू लागतो…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “नरेंद्र दाभोलकर, संशयित खुन्याच्या समर्थनातील मोर्चा आणि गर्दीतला एक “बघ्या”

 • August 20, 2018 at 3:43 pm
  Permalink

  याच एटीएस ने मेजर पुरोहित ना बनावट पुरावे त्याच्याच घरी ठेवून अनेक वर्षे छळले होते. एन आय ए ने तसे रीतसर सांगितले. एक स्त्री असूनही साद्ध्वी प्रज्ञा ला अपमानजनक वागणूक दिली गेली तीला आजार झाला.

  Reply
 • August 21, 2018 at 5:45 pm
  Permalink

  दोन्ही लेख तर्कदुष्ट आहेत. एकतर निर्लज्जपणे याकूब मेमन या कायद्याने फाशी दिलेल्या माणसाची तुलना ज्याच्यावर अजून आरोपही सिद्ध झालेले नाहीत अश्या व्यक्तीशी केली आहे. उद्या समजा आरोप सिद्ध झाले तर जरूर लेख लिहावा. असलेच महात्मे कर्नल पुरोहितांविरुद्ध ९ वर्ष गरळ ओकत होते आणि अफझल गुरूला वाचवायला मध्यरात्री कोर्टात धावणारी मंडळीही याच माळेची. आणि हे जर “सरसकटीकरण” वाटत असेल तर दुसऱ्या लेखात वर्णन केलेला “बघ्या” हे सरसकटीकरण नव्हे काय???

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *