' कम्युनिस्टांच्या विरोधात बोलले म्हणून नारायण मूर्तींना तुरुंगात टाकण्यात आलं होतं! – InMarathi

कम्युनिस्टांच्या विरोधात बोलले म्हणून नारायण मूर्तींना तुरुंगात टाकण्यात आलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या औद्योगिक क्षेत्रात चमकणारा एक स्वयंभू तारा भेट दिल्याबद्दल आपण सर्वांनी खरेतर त्या बल्गेरियन गार्ड्सचे आभार मानायला हवेत.

ही घटना आहे १९७४ सालची. नारायण मूर्ती यांच्या जीवनाला आणि पर्यायाने भारतीय उद्योगविश्वाला एक नवी दिशा देणारी घटना म्हणणे अतिशय योग्य होईल.

पॅरीसवरून मैसूर या त्यांच्या मूळ गावी परतीचा प्रवास करत असताना नारायण मूर्ती बल्गेरिया आणि सर्बिया यांच्या सीमेवरील निस या गावी पोचले. त्याच स्टेशनवर घडलेली ही घटना आहे.

तो शनिवारचा दिवस होता आणि रात्रीचे ९ वाजले होते. त्यावेळी एका ड्रायव्हरने त्यांना निसच्या रेल्वे स्टेशनवर आणून सोडले.

 

Niš_railway_station_Inmarathi

 

रात्रीची वेळ असल्याने सर्व रेस्टॉरंट्स बंद झाले होते आणि बँकादेखील सकाळीच उघडणार होत्या. त्यांच्याजवळ स्थानिक चलन नसल्याने त्यादिवशी त्यांचं जेवण झालंच नाही.

रात्री उशिरा सोफिया एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर आली आणि त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असे दोन प्रवासी होते. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांचा विषय कम्युनिस्ट राजवटीत जगणे कसे मुश्कील बनले आहे इथवर आला.

हे संभाषण सुरु होते तोवरच तिथे दोन बल्गेरियन गार्ड्स आले आणि त्यांनी नारायण मूर्तींना ताब्यात घेतले.

तब्बल ७२ तास नारायण मूर्तींना एका अंधाऱ्या खोलीत अन्नपाण्यावाचून कोंडून ठेवण्यात आले. बल्गेरियाच्या कम्युनिस्ट सरकारबद्दल ते द्वेषपूर्ण टिप्पणी करत असल्याच्या संशयावरून त्यांना असे डांबून ठेवण्यात आले होते.

त्या अंधाऱ्या खोलीत जिथे किमान उजेड येण्यापुर्ती खिडकी किंवा आजूबाजूचा आवाज सुद्धा येण्याची काही सोय नव्हती तिथून सुटून सुखरूप भारतात पोहोचू ही आशा देखील मावळली होती.

पण, भारत या मित्र राष्ट्रातून आल्याच्या कारणावरून तब्बल तीन दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली.

 

Infosys-NR-Narayana-Murthy Inmarathi

 

कडाक्याच्या थंडीत आणि अन्न-पाण्यावाचून काढलेल्या या ७२ तासांत आणि त्यानंतरही भारतात पोहोचेपर्यंतच्या एकाकी प्रवासात, कम्युनिस्ट विचारसारणीबद्दल त्यांनी भरपूर विचार केला.

समाजात भीषण दारिद्र्य आहे हे जरी सत्य असले तरी, कम्युनिस्टांच्या कडव्या विचारांतून समाज परिवर्तन घडणे शक्य नाही.

भारतातील जनतेचे हे दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी आपण एक मोठा उद्योग उभारू हा संकल्प त्यांनी त्यावेळी केला.

त्यांच्यावर गुदरलेल्या या प्रसंगामुळे कम्युनिस्टांबद्दल त्यांना वाटणारा आदर तर संपलाच पण, असे कडवे कम्युनिस्ट होण्यापेक्षा आपण भारतातील मध्यमवर्गीय तरुणांच्या वाट्याला आशेचा किरण देणारे दीप होऊ; त्यांचा हाताला काम मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल असे काही तरी काम आपल्या हातून झाले पाहिजे हा निश्चय त्यांनी त्या क्षणी केला.

या घटनेनेच त्यांच्या मनात भारतात एक मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करण्याचे बीज पेरले. या प्रसंगातून गेल्यानंतर आपला निश्चय सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न सुरु केले आणि त्यानंतर जे घडले जे जगजाहीर आहे.

 

Infosys-employees-to-get-50-million-shares-as-performance-incentives Inmarathi

 

प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग किंवा आकस्मिक घटना घडतात. ज्याला आपण कशापद्धतीने प्रतिक्रिया देतो, यावर आपला पुढील प्रवास अवलंबून असतो. अशा काही घटनाच आयुष्याला विधायक वळण देण्यासाठी कारणीभूत ठरतात.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर येणारे असे प्रसंगच आपल्याला खूप काही शिकवून जातात, ज्यामुळे माझा पुढील प्रवास निश्चित झाला, असे एन. आर. नारायण मूर्ती सांगतात.

आपण निर्माण केलेल्या संपत्तीचा लाभ आपण एकट्यानेच घेतल्याने कधीही त्याची वृद्धी होत नाही. उलट ही संपत्ती तुम्ही समाजातील लोकांशी विभागून घेतली तर त्याची आणखीन वृद्धी होते यावर नारायण मूर्ती यांचा दृढ विश्वास आहे.

म्हणूनच इन्फोसिसच्या नफ्यातील केवळ ३% वाटाच मूर्ती स्वतःसाठी घेतात. इतर आयटी प्रमुखांपेक्षा मूर्ती आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अतिशय वेगळे आहे.

इतर आयटी प्रमुख तर व्यवस्थापनावरील नियंत्रण सोडण्यास देखील तयार नसतात.

आज इन्फोसिस ही ६ अब्ज डॉलर वार्षिक उलाढाल असणारी भारतातील एक प्रचंड मोठी कंपनी आहे, जिथे १.५ लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात.

 

Narayana-Murthy-Story Inmarathi

 

कार्पोरेट क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या इतर भारतीय कंपन्यांसाठी हा एक पथप्रदर्शक दीपस्तंभ आहे.

गेल्या ३० वर्षांत आपल्या कर्मचाऱ्यांना ५०,००० कोटी रुपयांची भागीदारी देणाऱ्या या कंपनीने सामान्य मध्यम वर्गीय माणसाला देखील लखपती बनण्याची संधी दिली.

एका छोट्याशा फ्लॅटमधून सुरु झालेली ही कंपनी आज २८ दशलक्ष स्क्वेअर फिट इतक्या अवाढव्य क्षेत्रफळात पसरली असून सध्या तिचे ४.५ लाख गुंतवणूकदार आहेत.

जागतिक स्तरावर भारतीय उद्योजकांना अवकाश मिळवून देण्याव्यतिरिक्त अवघ्या तीन दशकात या कंपनीने बहुविध यश संपादन केले आहे.

न्युयॉर्क विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधून दिलेल्या एका भाषणात मूर्ती यांनी आपल्या जीवनातील काही अनुभव आणि त्यातून घेतलेल्या धड्यांचा किस्सा सांगितला. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी जीवनात आणि इन्फोसिस सारखी महाकाय कंपनी सांभाळत असताना कोणत्या तत्वांचा अवलंब केला याविषयीही माहिती दिली.

 

narayanamurthy1- Inmarathi

 

ते म्हणतात, “आपण प्रत्येकानीच कधी न कधी अशा झाडाची काही फळे चाखलेली असतात, जे झाड आपण कधीच लावलेले नसते किंवा त्याचे संगोपन केलेले नसते. पण, आपल्यापूर्वी कोणीतरी झाड लावले, त्याची निगा घेतली म्हणून आपल्याला फळे चाखता आली. त्याचा आनंद घेता आला.

त्याचपद्धतीने आपणही समाजाचे उत्तरदायीत्व समजून असे काही काम केले पाहिजे की, त्याचा लाभ समाजातील इतर घटकांना आणि विशेषतः वंचित घटकाला मिळायला हवा.

आपण निर्माण केलेली संपत्ती, मग ती आर्थिक, बौद्धिक किंवा भावनिक कोणत्याही स्वरूपातील असो, तिचा उचित उपयोग होण्यासाठी ती सर्वांसोबत वाटून घेता आली पाहिजे.

ही आपली एक नैतिक आणि पवित्र जबाबदारी असून पुढच्या काळात ही जबाबदारी तुम्ही तुमच्या समर्थ खांद्यावर निश्चितच पेलाल अशी मला अशा वाटते.”

आयुष्यातील कठीण प्रसंगातून उद्भवलेल्या नैराश्यातूनही स्वतःसाठी आणि इतरांसाठीही एक सुखाचा राजमार्ग शोधणारे हे व्यक्तिमत्व आजच्या तरुणांसाठी देखील प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?