नव्या उन्मेषाच्या वाटेवर : “मुलुखमैदान”

आयुष्यात काही बदल हे घडतायत घडतायत हे समजून यायच्या आत घडूनही गेलेले असतात. गेल्या आठ वर्षात समाजात खूप मोठी क्रांती घडली. थर्ड जनरेशन मोबाईलने लोकांचं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकलं. ते इतकं विस्तारलं की माणसाला मोबाईलच्या रूपाने एक नवा अवयव मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. प्रत्येकाच्या हाताचं एक्सटेंशन झालं आहे मोबाईल. या थ्रीजी मोबाइलबरोबर सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आला. फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्राम हे प्रत्येकाच्या जगण्याचे मार्ग कधी होऊन गेले हे कोणालाच समजलं नाही. त्यातूनही ज्या लोकांना या सोशल मीडियामध्ये, गाणी कविता, लेख, फोटो यासारखं काहीतरी आयुष्य आहे त्यांच्यासाठी फेसबुक हे माध्यम आता संस्कृतीचा भाग आहे.

पत्रकारितेचं शिक्षण घेताना एक गोष्ट अनुभवास आली. भारतीय व्यक्तिमत्त्वामध्ये आणि करून पुरुषांमध्ये रमायचं असेल, तर काही गोष्टींचं थोडाफार ज्ञान तुम्हाला असणं हे अनिवार्य असतं. जर भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाशी आपली नाळ तुम्हाला जुळवून घ्यायची असेल तीन गोष्टी माहित असाव्या लागतात. एक राजकारण, दुसरं क्रिकेट आणि तिसरा हिंदी सिनेमा. मग या गोष्टींवर चढता किंवा उतरता क्रमांक कोणताही लागो. ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला ठाऊक असतील तर तुम्ही पानवाल्यापासून ते एखाद्या कंपनीच्या सीईओपर्यंत कोणाशीही संधान साधू शकता.

याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे या गोष्टींमध्ये आपल्याला काही भारी ज्ञान आहे आणि आपल्यापेक्षा कोणालाही जास्त समजत नाही, असा गंड अनेकांच्या मनात असतो. आणि जर एखाद्या माणसाला बोलतं करायचं असेल तर त्याला त्याच्या रस असलेल्या गोष्टींबद्दल बोलतं करावं. परंतु बहुतांश लोकांचा तिकडेच मोठा खड्डा असतो. आजच्या पत्रकारितेच्या मुलांना डॅनी या माणसाचं नाव आणि जगण्याचा व्यवसाय माहित नसतो. अमरीश पुरी यांच्या कानावरूनही गेलेला नसतो. संजय मांजरेकर कॉमेंट्री करणारा म्हणून ठाऊक असतो आणि पीव्ही नरसिंव्ह राव यांचा फोटो दाखवला तर हे लोक ओळखणार नाहीत. यांच्या हातात माईक आणि कॅमेरा गेला तर पुढची ऍक्शन निव्वळ भयाण असणार आहे.

मराठी पिझ्झा या ओंकार दाभाडकरच्या वेब पोर्टलवर लिहिण्याची माझी भूमिका हीच होती. माध्यमशक्ती सध्या दोन मोठ्या समस्यांमध्ये अडकली आहे हे अनेकांना समजून चुकलेलं आहे. अनेक प्रस्थापित पत्रकार आता पत्रकार राहिलेले नाहीत. राजकारण्यांनी अनेकांना गोड गोड बोलून आणि वेळीप्रसंगी मदत करून उपकृत करून ठेवलं आहे. राजकारण्यांना पत्रकारांशी मधुर संबंध ठेवावेच लागतात. त्यावरच त्यांच्या लोकप्रियतेचा घरचा नळ सुरु असतो. पण पत्रकारांना रोजी रोटी त्यांचं मीडिया हाऊस देत असतं. पण राजकारण्यांच्या खाल्या मिठाला जागायचं काम अनेक पत्रकार इमानेइतबारे करतात. बहुतांश प्रस्थापित मीडिया या लोकांनी व्यापून टाकला आहे.

पत्रकारितेची दुसरी समस्या तेवढीच भयंकर आहे. मुंबईतल्या उत्तमोत्तम महाविद्यालयांमध्ये जाऊन मास मीडियाच्या डिग्र्या घेणारे विद्यार्थी अनेकदा मोठं मोठ्या मोदींच्या हाऊसेसच्या फरश्याही पुसायचा लायकीचे नसतात. अनेक पत्रकारितेची पदवी घेतलेल्या मुलांना रेल्वे अपघाताची बातमीही देता येणार नाही असलं बकवास शिक्षण यांनी घेतलेलं असतं. मराठी मुलांनी तर भाषिक पत्रकारितेमध्ये येऊच नये अशी परिस्थिती आहे. इंग्रजीच्या पत्रकारांना उत्तम दिवस आहेत आणि “मराठीमध्ये बोला” असल्या बाण्याचा अर्थ ‘इंग्रजीचा दुस्वास करा’ असा घेणाऱ्यांसाठी हे क्षेत्रच नाही.

व्यावसायिक दृष्ट्याही माध्यमांच्या दोन प्रमुख समस्या आहेत. मराठी माध्यमं अगदी मरायला टेकलेली नाहीत पण तेजीत दौडतही नाहीयेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर वडाळा किंवा वांद्रे किंवा कुलाब्याला असलेल्या नवीन बांधकामाच्या जाहिराती असतात. त्यांच्या जागांची किंमत सरळ आठ कोटींपासून सुरु होते. अश्या उत्पादनाच्या लोकांकडे टाईम्सच्या त्या जाहिरातीसाठी एका दिवसासाठी एक कोटी रुपये मोजायला सहज असतात. मराठी वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या एवढ्या मोठ्या जाहिराती टिटवाळा किंवा शहाड भागाच्या असतात. आर्थिक तंगीचा भाग सुरु होतो तो इथून.

दुसरी व्यावसायिक समस्या म्हणजे पत्रकारितेत गेली चार वर्षे शिरलेला व्यक्तित्ववाद. मोठ्या मराठी पेपरचे संपादक वाट्टेल त्या गोष्टी छापतात, आलेले अहवाल मोडून तोडून मांडतात, वर या संपादकाची तळी उचलायला बघणारे लोक त्यात संपादकांच्या मर्जीतल्या गोष्टी छापतात. यावर पूर्वी वाचक म्हणून अवलंबून असलेला वर्ग आता स्वावलंबी झाला आहे. वानगीदाखल दोन उदाहरणे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय जीडीपीवर भाष्य केलं. त्यांच्या अहवालात घटलेल्या जीडीपीचा उल्लेख होता. लोकसत्तेने त्या अहवालात “नोटबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था खालावली” असा उल्लेख टाकला. प्रत्यक्षात नाणेनिधीच्या अहवालात कुठेही नोटबंदीचा जिक्र नव्हता. आपले वैयक्तिक हिशोब चुकते करायला हे होतंय की काय अशी शंका येते.

दुसरं उदाहरण बरंचसं वैयक्तिक आहे. प्रदेशच्या निवडणूका भाजपने जिंकल्यावर अनेक विरोधकांची अवस्था ‘हंगामा’ सिनेमातल्या राजपाल यादवसारखी झाली होती. एकमुखाने सर्वांनी त्याचं खापर ईव्हीएमवर फोडलं. २००९ साली जर्जर, वृद्ध, हतबल आणि निस्तेज अडवाणींनी आपल्या अपयशाला ईव्हीएम जबाबदार ठरवत याची सुरवात केली होती. त्यावेळी अडवाणींची यथेच्छ थट्टा उडवली गेली. अचानक अडवाणींच्या या आरोपांमध्ये लोकांना तथ्य वाटायला लागलं. लोकांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर संशय घेतला. पूर्वी असा संशय बाळासाहेब ठाकरेंनी “हा गायीचा नव्हे तर शाईचा विजय आहे” असं म्हणत व्यक्त केला होता. अचानक लोकांना बाळासाहेब द्रष्टे वाटायला लागले. या मुद्द्यावर माझा एका व्यक्तीशी वाद झाला. “दिल्ली तसंच बिहारमध्ये भाजप का हरली?” या माझ्या प्रश्नावर त्या व्यक्तीने “तेंव्हा भाजपाला मनाची लाज वाटत होती” असं उत्तर दिलं. मग जर तसं असेल तर तर २००४ साली काँग्रेस कशी काय जिंकली? या प्रश्नावर उत्तर होतं, “तेंव्हा आजचा फोरजी स्पीड नव्हता.” मी विचारलं “मग हॅकिंग जमत असेल तर तुम्ही आयोगाचं आव्हान स्विकारलं का बुवा नाही?” तर महानुभाव उत्तरले की निवडणूक आयोग मशिनला हात लावायला देत नाही.

“अहो मग तुम्ही हॅकिंग म्हणताय, ते टॅम्परिंग होईल, आणि दिल्लीत जर ९० हजार मशिन्सचे मदरबोर्ड उचकटले गेले असतील तर आम्हाला कळलं कसं नाही बुवा?”

– या माझ्या प्रश्नावर कंटाळून हे महाशय “तू भाजपचा प्रवक्ता बन” असं म्हणाले. सदर व्यक्ती एक खूप मोठ्या वर्तमानपत्रक गेली अनेक वर्षे नियमित स्तंभलेखक आहे. मी त्याला “तुम्ही पत्रकारिता सोडून मराठी सिरियल्सचे संवाद लिहा” असं सुनावलं.

मराठी पिझ्झामुळे लोकांना अपचन व्हायला लागलं ते यासाठी.

लाचार, बिनकामाच्या प्रस्थापितांनी आयुष्यभर जागा अडवून ठेवल्या आहेत. शेळ्या मेंढ्या न होण्याची कुवत असलेल्या प्रतिभेच्या लोकांना या विश्वात जागा नाही. त्यामुळे पक्षीय विचारसरणी नव्हे तर भूमिकेचे पक्षपाती असणाऱ्या तरुणांना आता व्यासपीठ हवं आहे आणि ते मराठी पिझ्झाने अलगद मिळवून दिलं.

आता मराठी पिझ्झा संपून “इन मराठी” हे वेबपोर्टल सुरु होतंय. इन या शब्दाचा अर्थ अनेकांगी आहे. तो ‘अंतर्याम’, ‘अंतरात्मा’ अश्या अध्यात्मिक शब्दांपासून ते थेट “एकदाच घुसणार” अश्या भावार्थानेही वापरला जाऊ शकतो.

आता माझ्याबद्दल थोडंसं.

Sourabh Ganpatye MulukhMaidan InMarathi

 

मी गोहत्याबंदीचा “उघड” विरोधक आहे आणि गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेचा देखील उघड विरोधक आहे. मी दारूबंदीचा प्रखर विरोधक आहे, आरक्षणाच्या समर्थानात मी लेखमाला लिहिलेली आहे, शंकराचार्यांचा मी अत्यंत खालच्या शब्दांत उद्धार केला आहे (विषय: हिंदू स्त्रियांनी दहा मुले जन्माला घालावीत), मी दहीहंडीच्या बाजारूपणाला विरोध करतो, मी दिवाळीतल्या फटाक्यांवर मी पोटतिडीकेने लिहिलं आहे.

राजकीय विचारधारा म्हणायची झाली तर मी महात्मा गांधींना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा नायक मानतो, जवाहरलाल नेहरू माझ्यासाठी स्वतंत्र भारताचा महानायक आहेत, तर पीव्ही नरसिंह राव माझ्यासाठी भारतीय आर्थिक स्वातंत्र्याचा महानायक आहेत. वेळोवेळी माझ्या हिंदुत्ववादी मित्रांना दुखावून मी हे मांडलं आहे. जवाहरलाल नेहरू काश्मिरच्या प्रश्नात दोषी नाहीत हे मी ठाम मांडतो. माझा प्रॉब्लेम हा आहे की नरसिंह राव हे आर्थिक स्वातंत्र्याचे महानायक (आणि डॉ. मनमोहनसिंग नायक) मानायचे म्हटले की मला त्यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी देश भिकेला लावला हा विचार करता येतो. दोनदा युद्ध जिंकूनसुद्धा काश्मिर आम्ही हाती घेतलाच नाही त्यामुळे आजचं गळू उठलंय हे जाणण्याला मी समर्थन देतो.

लहानपणापासून ऐकण्यात येणारे मराठी भाषेतले सुविचार आणि म्हणी हे माझं आवडतं भक्ष्य. मला यांच्या चिंधड्या उडवायला फार आवडतं. उदाहरणार्थ, अंथरूण पाहून पाय पसरावेत, त्याग हेच श्रेष्ठ दान आहे, किंवा काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर हे माणसाचे सहा शत्रू आहेत, ह्या वृत्तीमुळे आणि विचारधानामुळे आपली अफाट ऊर्जा असलेली मुलं दणकून फुटायच्या आधीच विझून जातात. माणसाच्या वागण्यापासून ते देशाच्या परराष्ट्र धोरणापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही मानसिकता आहे.

त्यामुळे मी भूमिकेचा पक्षपाती आहे हे नमूद करतो. माझ्या लेखनशैलीवर झालेले प्रमुख संस्कार म्हणजे नरहर कुरुंदकर, शेषराव शेषराव मोरे आणि कुमार केतकर. आणि या सगळ्यासकट पुरोगाम्यांसाठी मी आद्य मोदीभक्त आहे. त्यामुळे ज्यांना विशिष्ट विचारसरणीच प्यारी आहे त्यांच्याशी सामना अटळ आहे.

हे सगळं पॅकेज घेऊन, कोणत्याही दावणीला ना बांधता नव्या उन्मेषाच्या वाटेवर तुम्हाला भेटायला येत जाईन.

आजच्यापुरता धन्यवाद.

: सौरभ गणपत्ये

RisingSun-inmarathi
Seascapes | trigphotography.smugmug

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com . तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 39 posts and counting.See all posts by sourabh

One thought on “नव्या उन्मेषाच्या वाटेवर : “मुलुखमैदान”

 • October 29, 2017 at 4:02 pm
  Permalink

  सत्याचे प्रयोग पुस्तकात स्वातंत्र्य कोणी शिजवले याचा उल्लेख असो नसो त्या लेखकाला श्रेय देणे म्हणजे बिरबलाच्या खिचडीने कुपोषण दूर झाले मानल्या सारखे आहे.

  भारतीय स्वातंत्र्याचे श्रेय माईन कांफ हे लोक प्रीय आत्मचरित्र लिहिणाऱ्याला आहे. त्या चरित्रात या गोष्टीचा उल्लेख असो नसो ब्रिटिशांच्या ढुंगणावर सणसणीत रट्टे मारून त्यांचे सूर्य न मावळणारे साम्राज्य बेचिराख करण्याचे वास्तविक सामर्थ्य त्याच लेखकाच्या कर्मात होते.
  ~
  संगो यांचे मानो न मानो

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?