ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पहिल्या भागाची लिंक: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग १

दुसऱ्या भागाची लिंक: ज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २

===

1 मार्च 1960.

ब्युनोस एरिजच्या विमानतळावर एल-अल(EL AL) ह्या इजराईली विमानसेवेचं विमान उतरलं आणि स्वी अहरोनी अर्जेंटिनात दाखल झाला. स्वी मोसादचा एजंट होता. खोटे कागदपत्र दाखवून तो अर्जेंटिनामध्ये आईशमानचा माग काढण्यासाठी आला होता. आल्या आल्या स्वीने काही स्थानिक माणसे कामाला लावली. तो आईशमान जिथे राहायचा तिथला अचूक पत्ता काढण्याच्या मागे लागला. लोथार हरमनकडून मिळालेल्या माहिती नुसार स्वीने एका स्थानिक माणसाला एक निनावी भेटवस्तू देऊन रिकार्डो क्लेमेन्ट, म्हणजेच आईशमानच्या घरी पाठवलं.

पण आईशमान तोवर ते घर बदलून निघून गेला होता. आलेल्या नव्या भाडेकरूकडून आईशमानचा पत्ता मिळणं स्वीला फारसं कठीण गेलं नाही.

zvi-aharoni-marathipizza

16 मार्च रोजी स्वी अहरोनी आईशमानच्या नव्या पत्त्यावर पोचला. त्या घराचे आणि त्यात राहणाऱ्या लोकांचे फोटो काढून घेण्याचा स्वीचा प्रयत्न यशस्वी झाला. घराबाहेर छोट्याशा बगीच्यात काम करत असणाऱ्या आईशमानला स्वीच्या दोन स्थानिक माणसांनी गुंतवून ठेवलं आणि स्वीने काळजीपूर्वक आईशमानचे सर्व बाजूनी सुस्पष्ट फोटो घेतले. अजून काही माहिती गोळा करून स्वी अहरोनी काळजीपूर्वक युरोपमार्गे इजराईलला परतला. पहिला टप्पा यशस्वी ठरला होता!

इकडे आयसर हॅरेल(मोसाद चीफ) जोरात तयारीला लागले होते.

mossad-revenge-isser-harel-marathipizza
आयसर हॅरेल

सगळी चक्रे हातात घेऊन ते स्वतः हे मिशन लीड करत होते. ह्या गुप्त कामगिरीसाठी त्यांनी रफी आयतान ह्या वरिष्ठ मोसाद अधिकाऱ्याची नेमणूक केली. रफी आयतानची जबाबदारी होती की आईशमानला पकडून कोणालाही न कळू देता इजराईलमध्ये सुखरूप आणायचे! सगळी तयारी आणि प्लॅनिंग सुरु असताना स्वी अहरोनी माहिती घेऊन हजर झाला. आयतान, हॅरेल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते सर्व फोटो अत्यंत बारकाईने तपासले. सर्व चाचपणी करून अखेर कानाचा आकार पाहून त्यांचं हाच एडॉल्फ आईशमान असण्यावर एकमत झालं.

आयतान आणि हॅरेल ह्यांनी एक टास्क फोर्स बनवली. त्याचे हेड अर्थात रफी आयतान होते. अनेक खोटे पेपर तयार करण्यात आले. नेमकं हे सगळं कसं पार पडणार ह्याची माहिती इजराईलच्या राष्ट्रपतींना देखील कळवण्यात आली नाही.

मे 1960च्या सुरुवातीला स्वी अहरोनी आणि रफी आयतान सह काही मोसाद एजंट अर्जेंटिनामध्ये दाखल झाले. चार दिवसांच्या फरकाने आयसर हॅरेल आणि आणि अजून काहीजण देखील ब्युनोस एरिजमध्ये अवतरले. सर्वजण अर्थातच ओळख बदलून आलेले. विशेष म्हणजे प्रत्येक एजंट जगाच्या एका वेगळ्या शहरातून अर्जेंटिनामध्ये आला.

कोणतेही दोन एजंट एकाच शहरातून अर्जेंटिनात प्रविष्ट झाले नाहीत. काही घोटाळा झालाच तर मोसादवॉर ठपका येऊ नये म्हणून घेण्यात आलेली ही खबरदारी होती. ब्युनोस एरिजमध्ये आल्यानंतर ह्या टास्क फोर्सने आईशमानच्या दैनिक हालचालींवर पाळत ठेवायला सुरुवात केली. आईशमान कुठे जातो, कोणाला भेटतो, कधी घरी येतो, कसा येतो वगैरे. हि सगळी माहिती गोळा करून टास्क फोर्सने आईशमानला अलगद जाळ्यात पकडण्याचा दिवस ठरवला.

11 मे 1960! संध्याकाळी 7 पासून सगळी टास्क फोर्स आईशमानच्या घराच्या आजूबाजूला दबा धरून बसली. एकूण दोन कार होत्या. पैकी एक जरा दूरवर होती. घराजवळच्या कारमध्ये स्वी अहरोनी, रफी आयतान, पीटर मालकीन आणि झीव केरेन हे एजंट होते. झीव कार खराब असल्याचे नाटक करत बोनेट उघडून बसला होता तर स्वी स्टीरिंगवर होता. आईशमानची बस त्यादिवशी नेहमीपेक्षा जराशी उशिरा आली आणि तो बस मधून उतरला. पीटरने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला कारमध्ये कोंबून कार सुसाट वेगाने निघून गेली.

adolf-eichmen-maratipizza
एडॉल्फ आईशमान

एडॉल्फ आईशमानला एका गुप्त जागी नेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. डॉक्टरांकरवी तपासले गेले. खाणा खुणा ओळखून त्याची ओळख पटवण्यात आली.

सुरुवातीला आढेवेढे घेणारा आईशमान थोड्याच वेळात कबूल झाला!

त्यावेळी अनेक नाझी आणि शुस्टाफेल अधिकारी अर्जेंटिनामध्ये ओळख लपवून शरण जाऊन बसले होते. अनेक जण अर्जेंटिनाच्या बडया लोकांच्या जवळचे होते. ज्यू लोकांबद्दल अर्जेंटिनामध्ये विरोधी वातावरण नसलं तरी फारसं मैत्रीपूर्ण देखील नव्हतं. अर्जेंटिना हा एक सार्वभौम देश असल्याने आपल्या एका नागरिकाला अन्य देशाने पकडून न्यावे ह्याची परवानगी मिळण्याची शक्यता शून्य होती. आईशमानला अत्यंत गुप्तपणे अर्जेंटिनामधून बाहेर काढणे गरजेचे होते. आयसर हॅरेलचा मेंदू कामाला लागला!

20 मे 1960 रोजी आईशमानला अल-एल विमानसेवेचा एक कामगार अशी खोटी ओळख देण्यात आली. सोबतच्या डॉक्टरांनी त्याला ड्रग्स देऊन अर्धवट गुंगीत ठेवलं. सर्व मोसाद एजंट देखील एअर-स्टीवॉर्डचा वेष धारण करते झाले.

एका कर्मचाऱ्यांची तब्येत अचानक खराब झाली असल्याचे दाखवून आईशमानला अर्जेंटिनाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन इजिजा विमानतळावरून इजराईली विमानसेवेच्या एका विमानात अत्यंत गुप्तरित्या चढवण्यात आलं. 20 मेच्या मध्यरात्रीच्या जरा आधी चार इंजिन असलेलं ते “ब्रिस्टॉल ब्रिटानिया” विमान अर्जेंटिनामधून उडालं आणि 22 मे 1960 रोजी सकाळी 7.35 वाजता लाखो ज्यूंची कत्तल करणारा क्रूरकर्मा एडॉल्फ आईशमान इजराईलच्या धर्तीवर उतरला!!

1960च्या काळात कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान नव्हे, टेलिफोन सेवा देखील सर्वत्र कार्यरत नव्हती. अंतरजालाचे माध्यम नव्हते. आजसारखे कॅमेरे व इतर यंत्रणा नव्हती तरीही आयसर हॅरेल, रफी आयतान आणि मोसादने हे कदाचित जगातले सर्वात अवघडपैकी एक मिशन यशस्वी करून दाखवले. केवळ कल्पनाच केली जाऊ शकते.

एडॉल्फ आईशमानला इजराईलच्या यागुरमधल्या एका तुरुंगात ठेवण्यात आले जिथे तो पुढचे नऊ महिने बंदी राहिला!

adolf-eichmann-marathipizza

एडॉल्फ आईशमानवर जेरुसलेम जिल्हा न्यायालयात रीतसर खटला भरण्यात आला. लाखोंची हत्या, ज्यूं लोकांवर अत्याचार, गॅस्टॅपो आणि शुस्टाफेलसारख्या आतंकी संघटनांत सहभाग असे एकूण 15 गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले.जेव्हाही आईशमान न्यायालयात येई तेंव्हा त्याला बुलेटप्रूफ काचेच्या डब्यात बसवण्यात येत असे. इजराईली सरकारला भीती होती की सामान्य जनतेतील कोणी माथेफिरू आईशमानची हत्या करेल म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असे. आपल्या बचावात आईशमान फक्त “मी फक्त एक कर्मचारी होतो, लोकांना मारण्याचा हुकूम बजावत होतो” इतकेच बोलत असे.

mosaad-revenge-of-jew-massacre-court-case-marathipizza

आईशमानच्या वकीलाने त्याची शिक्षा कमी करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण मोसादचे पुरावे इतके अचूक आणि सबळ होते की अखेर न्यायालयाने 56 दिवसांच्या कामकाजानंतर ओट्टो एडॉल्फ आईशमानला मृत्यूची शिक्षा फार्मवली.

1 जून 1961 रोजी आईशमानला फासावर लटकवण्यात आले आणि त्याच्या अंत्यविधीनंतर त्याची राख भूमध्य समुद्रात विखरून टाकण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा महत्वाचा सरदार आणि 60 लाख ज्यूंचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या कर्दनकाळ ठरलेला एडॉल्फ आईशमान संपला आणि मोसाद, स्वी अहरोनी, रफी आयतान आणि आयसर हॅरेल इतिहासात कायमचे अमरत्व मिळवून बसले.

समाप्त

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 27 posts and counting.See all posts by suraj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?