' मेघालयाच्या किर्र जंगलातील नैसर्गिक पूल जपण्यासाठी हा तरुण जीवाचे रान करतोय – InMarathi

मेघालयाच्या किर्र जंगलातील नैसर्गिक पूल जपण्यासाठी हा तरुण जीवाचे रान करतोय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

मेघालयातील खासी आणि जैंतिया पर्वतरांगांमध्ये जे घनदाट जंगल आहे त्यात असे अनेक नैसर्गिकरित्या निर्माण झालेले पूल आहेत जे कधीही नष्ट होत नाहीत.

फायकस इलॅस्टिका म्हणजेच रबराच्या झाडाच्या मुळांपासून हे पूल तयार करण्यात आले आहेत.

ह्या झाडांची मुळे एकमेकांत गुंफून हे पूल तयार झाले आहेत. हे पूल इतके टिकाऊ आहेत की वॉर खासी जमातीचे लोक इथे शतकानुशतके राहून त्यांचा उपयोग करत आहेत तरीही हे पूल तुटले नाहीत.

ह्या खासी पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील उतारावर बांगलादेशच्या सीमेलगत हे लोक अनेक शतके वास्तव्याला आहेत आणि ह्यांनीच हे पूल झाडांची मुळे एकमेकांमध्ये गुंफून हे मजबूत टिकाऊ पूल बनवलेत.

पिढ्यानुपिढ्या इथले लोक हे पूल बनवत आहेत. ह्या पुलांचा उपयोग करून हे लोक इकडून तिकडे प्रवास करतात. तसेच त्यांच्या शेतातील उत्पादने गावात नेऊन विकतात.

 

khasi inmarathi
Inhabitat.com

इथे घनदाट जंगल आहे. तसेच नद्या व कालवे सुद्धा आहेत. त्या ओलांडून जाणे कठीण आहे. त्यामुळे हे पूल त्यांना घनदाट जंगलातून नद्या, झरे व कालवे ओलांडून जाण्यासाठी उपयोगी पडतात.

रबराच्या झाडांच्या मुळांबरोबरच बांबू किंवा अरेका नटच्या झाडांचे पोकळ असलेले खोड सुद्धा हे पूल बांधण्यासाठी वापरले जाते.

बांबू किंवा अरेका नट झाडाचे खोड वापरून आधी पुलाचा सांगाडा तयार करण्यात येतो आणि त्यानंतर त्यावर रबराच्या झाडाची मुळे (झाड न कापता) गुंडाळण्यात येतात.

दर दोन वर्षांनी ह्या पुलाचा सांगाडा बदलावा लागतो कारण इथल्या वातावरणात आर्द्रता जास्त असल्याने बांबू सडून पूल कोसळू शकतो. असे २० ते ३० वर्षे दर दोन वर्षांनी पुलाचा सांगाडा बदलण्यात येतो. तोवर झाडाची मुळे सगळीकडे वाढलेली असतात आणि त्यांनी संपूर्ण पूल व्यापलेला असतो.

जेव्हा ही मुळे नदीच्या किंवा झऱ्याच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरापर्यंत व्यवस्थित व मजबूतपणे वाढतात आणि एकमेकांत पूर्णपणे गुंतलेली असतात.

तेव्हा पुलाचा सांगाडा बदलण्याची गरज उरत नाही कारण झाडांच्या मूळांनीच तो पूल तयार झालेला असतो आणि तो मजबूत व टिकाऊ असतो. पण अर्थातच ह्या पुलाची काळजी घेणे व त्याच्या मजबुतीकडे लक्ष देणे सुद्धा अतिशय आवश्यक असते.

साधारणपणे ही पूल ५० ते १०० फुटांपर्यंत वाढतात. ह्या जंगलातील सर्वात मोठा पूल हा १७५ फुटांचा आहे. हा पूल पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील मॉकिरनॉट गावात आहे.

हे नैसर्गिक पूल जतन करणे आवश्यक आहे आणि तेवीस वर्षीय मॉर्निंगस्टार खॉन्गथॉ नावाचा तरुण हेच काम करतोय. त्याने ह्या संवर्धनाच्या कामासाठी लिव्हिंग ब्रिज फाउंडेशन नावाची संस्था सुरु केली आहे.

 

living bridge inmarathi

इथल्या जमातींचा हा अद्वितीय सांस्कृतिक वारसा जपणे अत्यंत आवश्यक आहे. तो जपण्याचे महत्वपूर्ण काम मॉर्निंगस्टार करतोय. त्याच्या ह्या आगळ्यावेगळ्या कार्याची दखल द बेटर इंडियाने घेतली आणि त्याच्या कामाविषयी माहिती घेण्यासाठी त्याची खास मुलाखत घेतली.

ह्या मुलाखतीत त्याने सांगितले की हे “लिव्हिंग ब्रिजेस” ५०० ते ६०० वर्षे सहज टिकतात आणि ह्यासंदर्भात अनेकांनी अभ्यास व संशोधन केले असता त्यांनीही ह्या पुलांच्या टिकाऊपणाला दुजोरा दिला.

मॉर्निंगस्टार म्हणतो की,

“ह्या पुलांची नीट काळजी घेतली तर हे पूल शेकडो वर्षे टिकू शकतात. तुम्ही ह्या पुलांकडे वेळोवेळी देखभाल केली तर झाडांची मुळे सतत वाढत राहतील आणि जुनी जीर्ण झालेली मुळे गळून पडतील आणि त्या जागी नवी मजबूत मुळे वाढत राहतील.

ह्याने पूल टिकाऊ आणि मजबूत राहील. अभ्यासक म्हणतात की हे पूल ५०० ते ६०० वर्ष सहज टिकतील पण माझ्या मते तरी झाडांची मुळे सतत वाढतात त्यामुळे ह्यांच्याकडे वेळोवेळी लक्ष दिले तर हे पूल कायमस्वरुपी आहेत तसेच मजबूत व सुस्थितीत राहतील.”

मॉर्निंगस्टार पुढे म्हणतो की,”सध्या आपल्याकडे बांबू न सडता कायमस्वरूपी टिकून राहावा ह्यासाठी कुठले तंत्रज्ञान नाहीये. दर दोन वर्षांनी बांबूचा सांगाडा आपल्याला बदलावा लागतो जोवर झाडांची मुळे नीट वाढत नाहीत.

भविष्यकाळात बांबू अनेक वर्षांपर्यंत टिकून राहू शकेल असे काही तंत्र आपल्याला सापडले तर आपला पूल पटकन वाढून तयार होऊ शकेल.

आजवर आम्हाला खासी किंवा जैंतिया पर्वतरांगांमध्ये जितके पूल सापडले आहेत, ते सगळे अनेक शतकांपासून अस्तित्वात आहेत.”

 

bridge inmarathi
tripadvisor.com

पूल बांधला की सुरुवातीच्या काळात एका दिवसात फक्त ५ ते १० लोक त्यावरून जाऊ शकतात. अर्थात तो पूल कुठे आहे त्यावर सुद्धा त्या पुलाला किती वजन झेपेल हे अवलंबून असते.

कधी कधी नदी आणि पूलामध्ये केवळ दोन ते तीन मीटर अंतर असते तर काही ठिकाणी नदीच्या प्रवाहामुळे खूप उंचावर पूल बांधावा लागतो.

मॉर्निंगस्टारच्या गावामध्ये भौगोलिक कारणांमुळे हा पूल खूप उंचावर बांधलेला आहे. त्यामुळे त्यावरून जाताना काळजी घ्यावी लागते आणि एका वेळेला मर्यदित लोक त्यावरून जाऊ शकतात.

पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील पयनुर्सला तालुक्यातील रंगथीलियांग हे मॉर्निंगस्टारचे गाव आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो ह्या पुलंच्या संवर्धनाचे काम करतोय आणि त्यामुळे तो स्वतःला लिव्हिंग ब्रिज ऍक्टिविस्ट असे म्हणवतो.

गेल्या पाच वर्षांपासून मॉर्निंगस्टार कमजोर झालेले पूल परत दुरुस्त करून ते मजबूत करतोय तसेच नवे पूल बांधण्याचे काम देखील तो करतोय.

ह्या पुलांविषयी जनजागृती करण्यासाठी तो गावोगावी फिरून तिथल्या लोकांना ह्या पुलांच्या संवर्धनाचे तसेच ही प्राचीन कला जिवंत ठेवण्याचे महत्व पटवून देतो आणि ह्या पुलांची देखभाल कशी करायची हे देखील समजावून सांगतो.

 

rubber bridge inmarathi

 

सध्या नवीन आलेल्या तंत्रज्ञानामुळे लोक काँक्रीटचे पूल, फुटपाथ आणि पक्क्या रस्त्यांकडे वळू लागले आहेत आणि त्यांना ह्या लिव्हिंग रूट ब्रिजचा विसर पडत चालला आहे.

असे होऊ नये म्हणून लिव्हिंग ब्रिज फाउंडेशन ही संस्था विविध उपक्रम राबवून खासी समुदायात ह्या पुलांच्या संवर्धनाविषयी तसेच ही प्राचीन व अद्भुत कला जतन करून ठेवण्याबद्दल जनजागृती करते आहे.

मॉर्निंगस्टार सांगतो की,

“माझ्या गावात तर हे पूल खूप मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्या गावात असे २० पूल आहेत. २०१३ च्या सुमारास मी शिलॉंगमध्ये शिक्षण घेत असताना माझा स्थानिक लोकांशी आणि एनजीओशी संपर्क आला.

माझे वडील ह्याच ठिकाणी लहानाचे मोठे झाले. ते एक शेतकरी आहेत आणि त्यांनी व माझ्या इतर काही नातेवाईकांनी मिळून ह्या पुलांच्या देखभालीचे काम देखील केले आहे.

२०१४ साली पॅट्रिक रॉजर्स हा एक अमेरिकन प्रवासी मेघालयमध्ये आला होता. त्याच्याशी माझी भेट झाली आणि त्यानेच मला ह्या पुलांचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा दिली.

२०१६ साली मी माझे शिक्षण सोडून ह्याच कामावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. माझ्या घरच्यांना माझा हा निर्णय फारसा रुचला नाही. पण माझे काही मित्र हे एमबीए करून सुद्धा नोकरी मिळत नाही म्हणून आज घरात बसून आहेत.

आज तुमच्याकडे पैसे हवा किंवा ओळख हवी, तरच तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. पण माझे ध्येय नोकरी नाही. हे लिव्हिंग ब्रिज जतन करून ठेवणे हेच माझे ध्येय आहे, माझे वेड आहे.

माझ्या घरच्यांना हे पटत नसले तरी मी माझे काम सुरु ठेवले आहे. ह्या अनोख्या कलेविषयी जागृती करण्यातच माझी आवड आहे.”

 

morningstar feature
thebetterindia.com

इतर कुणाकडून काहीही मदत नसताना मॉर्निंगस्टारने २०१६ साली एकट्यानेच लिव्हिंग ब्रिजचे काम सुरु केले. त्याला स्मार्टफोन मिळाल्यानंतर त्याच्या कामाला खरी गती मिळाली.

तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने ह्या पुलांविषयी सोशल मीडियावर जनजागृती केली तसेच त्याने स्वतःचे फेसबुक पेज देखील तयार केले.

२०१८ च्या मे महिन्यात लिव्हिंग ब्रिज फाउंडेशन सुरु झाले आणि आज ह्या संस्थेत ध्येयाने झपाटलेली १० माणसे काम करतात. अर्थात स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पूल दुरुस्त करण्याचे, बांधण्याचे आणि मेंटेन करण्याचे काम मॉर्निंगस्टारकडेच आहे.

इतर ९ लोक जनजागृतीचे तसेच विविध कार्यक्रम घेण्याचे, उपक्रम राबवण्याचे व त्याविषयी लोकांना माहिती देण्याचे काम करतात. दर वर्षी इथले लोक ह्या ठिकाणच्या प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या पायवाटा व रस्त्यांची स्वच्छता करतात.

गावातील प्रत्येक जण ह्या कामात स्वतःहून सहभाग घेतो. तसेच पुलांची देखभाल सुद्धा केली जाते. मागच्या वर्षी ह्या संस्थेने एकूण १५ गावांमध्ये फिरून ह्या पुलांविषयी जागृती केली. ह्या वर्षी आणखी जास्त गावांत जाऊन तिथे काम करण्याचा त्यांचा विचार आहे.

आजही हे पूल वापरात आहेत. जिथे अजूनही रस्ते बांधलेले नाहीत,त्या दुर्गम भागात लोक अजूनही येण्या जाण्यासाठी ह्याच पुलांचा वापर करतात.

मॉर्निंगस्टार आणि त्याची टीम जेव्हा कुठल्याही गावात जाते तेव्हा गावातील जुन्याजाणत्या ज्येष्ठांची त्यांना साथ मिळते आणि स्थानिक लोक त्यांना पूल दुरुस्त करण्यासाठी मदतच करतात.

मागच्या वर्षी ह्यांनी जागतिक पर्यावरण दिनाला व ह्या वर्षी जागतिक वसुंधरा दिवसाला वेगवेगळ्या ठिकाणी असे दोन पूल बांधणे सुरु केले आहे. ह्या पुलांची प्रगती कशी होतेय ह्याची नोंद मॉर्निंगस्टार ठेवतो आहे.

त्याच्या मते पुढील २० वर्षांत हे पूल पूर्णपणे तयार होतील. त्याच्या मते आत्ता केलेलं काम ही भविष्यकाळासाठी केलेली तरतूद आहे.

 

Morningstar inmarathi
india.com

पूल बांधण्याबरोबरच ह्यांची टीम जंगलात शिडी, झोके, बसण्यासाठी जागा आणि बोगदेदेखील बांधत आहे. आणि हे सगळे बांधकाम नैसर्गिक वस्तू वापरून केले जात आहे म्हणून मॉर्निंगस्टार ह्या सगळ्याला “लिव्हिंग आर्किटेक्चर” असे नाव देतो.

त्याच्या उपजीविकेसाठी तो इथे येणाऱ्या लोकांसाठी गाईड म्हणून काम करतो. तसेच काही ठिकाणांहून त्याला ह्या संवर्धनाच्या कामासाठी देणगी देखील मिळते.

अर्थात आजवर त्याला कुठल्याही स्थानिक एनजीओ कडून किंवा सरकारकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. पण टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिच कडून त्याला मदत मिळाली आहे तसेच त्यांनी त्याला ह्या ठिकाणचे चांगले फोटो काढण्यासाठी कॅमेरा देखील भेट दिला आहे.

तसेच शिलॉंगमधील नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी कडून त्याला १८ मार्च २०१९ रोजी झालेल्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

२० जुलैला लिव्हिंग ब्रिज फाउंडेशनचा वर्धापन दिन असतो. ह्यावेळी ह्या दिवशी रबरची झाडे लावणाऱ्या, लिव्हिंग ब्रिज बांधणाऱ्या आणि त्यांची देखभाल करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याची त्यांची योजना आहे.

मॉर्निंगस्टार जे काम करतोय ते खरंच खूप मोलाचे आहे. त्यासाठी त्याला सगळ्या स्तरांवरून मदत मिळाली पाहिजे. हा प्राचीन वारसा जतन झाला पाहिजे आणि त्यासाठी जगाला मॉर्निंगस्टारच्या ह्या कामाबद्दल माहित होणे आवश्यक आहे.

मॉर्निंगस्टार तू खरंच तुझ्या नावाप्रमाणे एक तारा आहेस. तुझ्या ह्या ध्येयाला आणि कष्टांना सलाम!

===

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?